Thursday, September 2, 2010

रात्र गणेशोत्सवाची आहे... मराठी माणसा जागा रहा...

पुर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # सप्टेंबर २०१०

टिळक तुमचे महत्त्व फक्त दोन गोष्टींसाठी. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती. मराठी माणसाला तहहयात वर्गणीची सोय करुन गेल्याबद्दल टिळक तुम्हाला धन्यवाद! बाकी, 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही', 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' आणि 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हे तुमचे डायलॉग पाठ व्हायला सोपे म्हणून अजून सर्वांच्या लक्षात आहेत. तुमच्या भरगोस मिश्या आणि पुणेरी पगडी यामुळे तुम्हाला चारचौघात ओळखणे सोपे जाते. गेला बाजार स्वातंत्र्य वैगेरे ठीक आहे पण गणेशोत्सवाची आयडीया ग्रेटच. शिवजयंती ऐवजी शिवसप्ताह करण्याचे तुमच्या डोक्यात कसे आले नाही ? फक्त एका दिवसाच्या जयंतीसाठी प्रायोजक मिळवतांना किती फाटते याची तुम्हाला कल्पना नाही यायची टिळक. तरीही तिथीनुसार आणि तारखेनुसार दोन दोन जयंत्या साजर्‍या करुन आम्ही आमची भागवून घेतो आहोत. तरीही, यासाठी मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही आज जर इथे असतात तर एवढया अपराधासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा मंडालेच्या तुरुंगात पाठवले असते. पण असो. गणेशोत्सवासाठी तरी मराठी माणूस मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. आता या उत्सवाला मागे-पुढे घडणार्‍या सगळ्याच गोष्टी 'लोकमान्य' झाल्या आहेत.


टिळक, तुम्हाला माहित आहे, श्रावणात आपण घेत नाही. त्यामुळे ओस पडलेल्या बारची अवस्था बघवत नाही. कदाचीत तुमच्या काळात ब्रम्हवृंद तसले अभक्ष भक्षण करीत नसावेत. आता आम्ही सगळेच सगळ्या बाबतीत समता, बंधुभाव पाळतो. तरीही जी चैतन्यावस्था असते तिला गौरी पुजनानंतर सुरुवात होईल. त्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत. थोडी 'ढकलल्या'नंतर सुर-तालाला जी धार येते ती वर्णनातीत असते. ढोल-ताश्याच्या गजरात किंवा बेंजोच्या तालावर गणपतीच्या पुढे-मागे जे आणि जश्याप्रकारे आम्ही नाचतो ते तुम्ही बघितलेत तर टिळक तुम्हीही तोंडात बोटे घातली असतीत. त्यावेळी आम्ही तुम्हालाच काय पण आम्हालाही विसरतो. तुम्हीही गणेशोत्सवामागचा हेतू विसरुन जाल. पण तो मुद्दा नाही. आता आमचाही गणेशोत्सव साजरा करण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. आता तुम्हीच काय ब्रम्हदेवाचे पप्पा आले तरी तो आम्ही बदलणार नाही. 'गणेशोत्सव साजरा करणे हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे तो आम्ही बजावणारच'. 'तुमचे डोके ठिकाणावर राहो न राहो.'


रस्त्यारस्त्यावर मुर्त्यांचे बाजार भरले आहेत. गणपतीबाप्पा भक्तांची वाट पहात आहेत. प्रत्येक गणेशमुर्तीच्या गळ्यात, हातात त्यांच्या किमतींचे टॅग लटकवलेले आहेत. किंमतीवरुन घासाघीस चालू आहे. वजन, उंची, रुप, रंगाची चाचपणी करुन माल पसंत केला जातो आहे. सरत्या श्रावणाच्या मौसमात गणेशोत्सवाचा वारा सुटला आहे. मराठी माणूस पेटला आहे.


गणपतीची चाहुल लागली की आरत्यांची फुकट पुस्तकं घरात यायला लागतात. कुठे पेपराबरोबर कुणी मोदकाबरोबर तर कुणी आणि कश्या कश्या बरोबर. पुस्तकं साचत जातात. पुस्तक समोर धरलं तरीही आम्ही 'सुखकरता दुख'करता'च म्हणतो. पण इतकी वर्ष असाच सराव झाल्यामुळे गणपतीलाही त्याची सवय झाली असावी. आणि हो, प्रत्येक वेळेला आरत्या संपता संपताना 'घालीन लोटांगण' हा शब्द कानावर आला की सुटल्यासारखं वाटतं. पण त्यानंतर 'अन्याय माझे...' वैगेरे सुरु झालं आणि कॉंपिटिशनला एकासएक भेटले की बघायला नको. काहीजण यावर तास तास घालवतात. आरतीचा सुर इतका कानात आणि मनात बसलाय की आरतीतल्या त्या त्या जागा आल्या की नुसतं त्या त्या लयीत ओरडलं तरी भवसागर पार केल्यासारखं वाटतं.


या दिवसात सार्वजनीक मंडळं, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या छातीवरचे बिल्ले यांचा रुबाब बघण्यासारखा असतो. चिल्लर चिल्लर माणसं या दिवसात कडक नोटेसारखी फडफडत असतात. झब्बा लेंगा घालायचा आणि इकडून तिकडून फिरत बसायचं एवढंच काम. पण तरीही त्या कामात ऐट असते. मंडळात पैसा खाण्याचा मान सगळ्यानाच मिळतो असं नाही. पण उमेदवारीच्या काळात खुलेआम मिरवण्याचा चान्सही काही कमी नाही. इकडून तिकडे कुणा कुणाला आवाज देण्यातही सुख असतं. रांगेला वळण लावायचं, भाविकांवर उगाचच आब दाखवायचा. कुणाला तिर्थ-प्रसाद द्यायचा. कुणाला लाईनीत घुसवायचं. कुणाला लाईनीतून काढून गाभार्‍यात बसवायचं. असा बिनपैशाचा तोरा मिरवायला मिळाला की मराठी माणसाला धन्य वाटतं.


मंडप, डेकोरेशन, लाईटींग, देखावे, स्पिकर, सांस्कृतीक कार्यक्रम यांची व्यवस्था लावण्यात अध्यक्ष गर्क आहेत. त्यात काही अधिक उणं होता कामा नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. कडेकोट बंदोबस्तातही कुठे कुठे हात मारता येईल. कुणाकुणाची पत्ती काटता येईल याचं प्लॅनींग चालू आहे. गेल्या वर्षिचा जमाखर्च मनासारखा जमला आहे. पुरावा म्हणून त्याची पुस्तकं छापून आली आहेत. बाकी स्थानीक नागरिकांसाठी संगीत खुर्ची, बायकांसाठी गाढवाला शेपूट लावणे सारख्या स्पर्धा आयोजण्याचे घाटत आहे, त्यांचे बक्षिस समारंभ, सत्कार समारंभ यासाठी मंडळांतर्गत विशेष समिती असते.


उरलेला मराठी माणूस भावीक होऊन रात्रभर फिरत असतो. काहींच्या श्रध्दा फारच जहाल असतात ते अनवाणी म्हणजे चप्पल-बूट हातात घेऊन फिरत असतात. यांना डेकोरेशन, देखावे बघण्यातच जास्त रस असतो. त्यासाठी तो अख्खा गाव-मुंबई पालथी घालतो. अशा भाविकांच्या सेवेसाठी फुकट पचपचित रसना जागोजाग असतोच. चुकून चहा. गणपतीचा प्रसाद म्हणजे सफेत फुटाणे. नंतर नंतर तो तेच तेच खाऊन-पिऊन कंटाळतो. पण हा नियतीनेच मराठी माणसासाठी दिलेला प्रसाद आहे. त्यानं यापेक्षा वेगळी अपेक्षा करु नये.


पुर्वी रात्रभर भरगच्च कार्यक्रम असायचे. काहीच नाही तर रात्रभर भजनं कुटत बसायची. पण आता रात्री दहा नंतर सरकारने स्पिकरवरच बंदी आणल्यामुळे आणि पोलीस एवढं काम तरी इमाने इतबारे करीत असल्यामुळे मराठी माणसाची 'जान'च हरवल्यासारखी झाली आहे. आणि आपण जे जे करतो आहे ते ते दुसर्‍याला कळल्याशिवाय मराठी माणसाला चैनच पडत नाही. शांततेने काही करण्याचा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे रात्र सामसूम. कदाचित मनातल्या मनात गणपतीबाप्पा सुप्रीम कोर्टाचे आभार मानत असेल. पण गणपती तर जागवला पाहिजे. त्याच्या समोरची वात जळत ठेवण्याच्या नावावर काही लोकांना पत्त्याचा डाव मांडता येतो. पत्त्याला जुगार म्हणणे या पवित्र दिवसात तरी बरे दिसत नाही. पण अनेक लोक या दिवसात देशोधडीला लागतात. नव्या खिलाडींची एन्ट्री याच दिवसात होते. 'ज्योत से ज्योत जगाते चलो' या धर्तीवर हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोच आहे. वेळ घालवण्यासाठी सुरु झालेला हा डाव आयुष्य वाया कधी घालवतो कळत नाही.


शेवटी विसर्जन. म्हणजे एक प्रकारचं दु:खच. ते ज्या ज्या प्रकारे व्यक्त करता येईल ते केलं जातं. दु:ख पिण्यानं हलकं होतं हे पुरातन सत्य आहे. त्यामुळे ते इथंही असतंच. सजवलेल्या ट्रकावर गणपती. अंगाखांद्यावर विरघळलेला गुलालाचा घाम, डोक्याला भगवी पटटी, नाशिक बाजा किंवा पुना ढोलाचा खणखणाट, तो बजेट बाहेर असल्यास बेंजो किंवा नुसताच स्पिकर. त्या तालावर थिरकणारी गर्दी. पोटात कंट्री, कॉर्टर किंवा चपटी आणि मुखात गणपती बाप्पा मोरया. बघणार्‍याच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय रहात नाही.


विसर्जनाला दरवर्षी पहाट होते. पुढल्यावर्षी लवकर या म्हणत दुसरा दिवस उजाडतो. दुसर्‍या दिवशी सकाळी किनार्‍यावर गणेशमुर्तींचे भग्नावशेष इतस्ततः विखरुन पडलेले असतात. त्याच अवयवांसारखा मराठी माणूसही उत्सवाची धुंदी उतरल्यावर सैरभर होतो. ते विखुरलेले तुटलेले अवयव संदर्भहीन असतात. त्यात देवत्व किंवा सत्त्व नसतं असं त्या क्षेत्रातले अधिकारी मानतात. भक्ताच्या मनातही त्याला काही किंमत नसते, तसं मराठी माणसाचंही! गेल्या दहा दिवसाचा रंग उतरवून मराठी माणूस डोळे चोळीत उठतो. सुकी भाजी चपातीत गुंडाळून खिशात नाहीतर रंग उडालेल्या प्लास्टीकच्या पिशवीत कोंबतो आणि नऊ सत्राच्या ट्रेन मध्ये घुसतो. ट्रेन प्लॅटफॉर्म सोडते आणि गर्दीचाच गजर होतो. गणपती बाप्पा ss मोरया sss , पुढल्या वर्षी ss लवकर या sss

प्रवीण धोपट

सेक्सी छक्के

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # सप्टेंबर-२०१०

लालेलाल लिप्स्टीक, भडक मेकअप, कडक हावभाव आणि ढंगदार अदा. गोरेगावच्या चेकनाक्यावरचं रात्री आठ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत हे चित्र नजर खेचून घेतं. प्रवासात असू तर पुढं जाणार्‍या वहानासोबत माना आपोआप मागे मागे वळत राहतात. चालत असू तर पाय आपोआप थबकतात. बोलत असू तर शब्द जिथल्या तिथे थिजतात. कुतूहल जागं होतं आणि जाणारा येणारा प्रत्येकजण तिथं मनातल्या मनात का होईना क्षणभर तरी रेंगाळतो. पुढं ज्याची त्याची कुवत, हिंमत, काळ, काम आणि वेळ.



गोरेगाव आरे चेकनाका. हायवेवर गाडयांची ये जा. आणि रस्त्यालगतच्या झाडीत उभ्या असलेल्या तृतीयपंथीचे इशारे. मधुनच भरदाव गाडयांना ब्रेक लागतो. साईडचा सिग्नल देत गाडया डाव्या बाजूला पार्क होतात. लघवीच्या बहाण्याने जो तो वळून वळून मागे बघतो. आणि हिंमत करुन थोडा मागे मागे सरकतो. उभ्या तृतीयपंथीतला कुणीतरी एक पुढं होऊन व्यवहार समजावतो. पटला तर झाडीत आत नेतो. पंधरा-वीस मिनीटांच्या अंतराने कुणीतरी इकडे-तिकडे पहात बाहेर. पुन्हा पुढच्या रस्त्याला. अडकलेल्या गाण्याचे तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू यावेत तसं चित्र. रात्रभर.


रात्री अकरानंतर बसेसची ये जा तशी कमीच. पण बसस्टॉपवर रेंगाळणार्‍यांची संख्या कमी होत नाही. कुणी सिगरेटच्या बहाण्याने, कुणी पाणीपुरीच्या बहाण्याने बिचकत विचकत जवळ जाऊन झाडीत काय दिसतंय का याचा अंदाज घेत राहतो. पण काळोख आणि घनदाट झाडी दाद देत नाही. मग सुरु होते पाणीपुरी वाल्या भैया जवळ चौकशी. तो ही कॅसेट वाजवल्यासारखा सांगत राहतो. ज्याला एवढंच ज्ञान पुरेसं होतं तो निघतो. त्याच बसस्टॉपच्या आजुबाजुला कॉलसेंटर वाल्या गाडयाही थांबतात. ज्याची वेळ भरते तो निघुन जातो बाकीचे थांबून राहतात डोळयांचे लाड पुरवीत.


मुंबईतल्या रिक्षा-टॅक्सीवाल्यांना मुंबईचं विशेषतः रात्रीच्या मुंबईचं जे ज्ञान असतं ते त्याला तोड नाही. अनेकांना इथला व्यवहार माहीती असतो. काही रिक्षावाले बसस्टॉपच्या पुढे रिक्षा उभ्या करुन सराईताप्रमाणे बिनधास्त उभ्या कुणाच्या सोबतीनें आत जातात. बाहेत येतात. रिक्षात ठेवलेली पाण्याची बाटली हातावर, तोंडावर रिकामी करतात. कुणी पॅसेंजर मिळालाच तर त्याच्यासोबत पुढे नाहीतर स्टार्टर मारुन एकटाच तृप्त रिकामा होऊन जोगेश्वरीच्या दिशेने. त्यातलाच एकजण असाच बाहेर आल्यावर त्याला विचारलं, लुटेते नही? तर म्हणाला 'बिल्कुल नही, सबका एकही भाव रहता है. जादा कुछ रहेगा तो जादा पैसा'. जादा मतलब ? फ्रेंच करना है तो डबल...


माझ्या डोक्यात खटाखट टाळ्या मारुन घाबरवणारे तृतीयपंथी होते. आडदांड, झगझगीत साडया. गालावर तुरळक दाढीचे खुंट वाढलेले किंवा गुळगुळीत दाढी करुनही चेहर्‍यावर उरलेल्या दाढीमिश्यांची जागा ओळखता येऊ शकणारे. पैसे मागणारे. शिव्या देणारे. आशीर्वाद देणारे. रागाला आले की नेसणं वर करु का असे विचारणारे. सिग्नलवर, रेल्वेत भीख मागणारे. अंगचटीला येतांना किळस वाटावी असे पुरषी छक्के. पण इथलं चित्र याच्या शतपटीनं उलटं. बारीक चणीचे. अपवाद वगळता सगळेच गोरेपान. पातळ पोटाचे. भरगच्च छातीचे. पंधरा ते पंचविशीतल्या मुलींसारखे बाकदार, नक्षिदार. क्षणभर या मुलीच असाव्यात अशी शंका येते. वॅक्सींग, आयब्रो, नेलपॉलीश, सेंट, मनगटावर सोनेरी घडयाळं, एखाददुसरी कचकडयांची बांगडी. कानात डौलदार डूल, उंच टाचांच्या चपला, उत्तम साज आणि नवथर अंदाज. एखाद्या नखरेल तरुणीला लाजवेल अशी अदा. ना अधिक ना उणं. सगळे रंग-ढंग मापासमाप, जिथल्यातिथे. कपडे कमीच. मीडी, नाहीतर फ्रॉक्स. चुकुन साडी किंवा पंजाबी ड्रेस.


ब्रीज वरुन जाणारे उघडया ट्रक- टेंपोतले माहितगार खुलेआप आवाज देतात. ' ए मामू ...' खालूनही त्याला लागलीच प्रतिसाद जातो' ए भडवे...'. तास-दिडतासानी असा सादप्रतिसाद चालू राहतो. रस्त्यावरुन छत्रीचा आडोसा करुन कुणी-कुणी दबकत जायला लागतो. ना धड त्याला त्यांच्याकडे बघण्याची हिंमत होत ना विचारण्याची. तेव्हा दुरुनच त्याला एखाद्या मालाची माहीती सांगावी तसं, 'आजा आरामसे करुंगी, क्या करना है ? आगेसे? पिछेसे? आजा... मुह मे भी लुंगी. पचास रुपया. आजा ये छोरा... ये राजा... ये मेरी जान... तरीही तो पुढेच चालला तर मागून कचकचीत शिवी आणि सोबतीला टाळी.


पोलीसांची गाडी धिम्या गतीनं सिग्नल ओलांडते आणि यांची पळापळ होते. मागच्या झाडीत चिडीचुप आणि सामसुम. आता इथं काहीच घडत नसल्यासारखं. श्वास रोखुन धरल्यासारखी. आत गेलेली गिर्‍हाईकं आतल्याआत. आणि बाहेर पोलीसांची गाडी साईडचे पिवळे सिग्नल सुरु करुन पंधरावीस मिनीटांसाठी उभी. पोलीसांची ठरलेली गिर्‍हाईक आत दडून बसलेली असतानाही बाहेर उलटया दिशेनं गाडी हाकणारे रिक्षावाले, बाईक्सवाले, गाडीवान आपसूक गळाला लागतात. वाघ मारायला गेलेल्या शिकार्‍याच्या जाळ्यात ससेही अडकतात तसं होतं. पोलीस आत जातांना दिसले नाहीत.


पोलीसांची गाडी दूर गेल्यावर पुन्हा रस्त्याच्या कडेने पहिल्यासारखा रंग भरतो. आता मी ही थोडं धाडस करुन पुढे होतो. एकासोबत बोलता बोलता चल अंदर चल म्हणत त्यानं हाताला धरुन मला आत झाडीत खेचलं. आता सुटका नव्हतीच. त्यानं क्या करना है विचारलं. मी पन्नास रुपयांची नोट काढुन पुढं धरली. झपकन खेचुन त्यानं ती नोट छातीच्या आडोशाला खेचली. मी विचारलं, पुलीसका डर नही. तो म्हणला, डर कायका ? पुलीसभी भडवे है... मी साधेसुधे प्रश्न विचारण्याच्या तयारीत आणि तो माझ्या पॅंटच बक्कल उघडण्याच्या घाईत. मी म्हणालो सिर्फ बात करनी है काम नही. तर म्हणाला रायटर है क्या? सिरीअल लिखनी है, पिक्चर निकालनेका है की पेपरमे छपवानेका है? मी म्हणालो ऐसा कुछ नही, बस जनरल बात करनेकी है. त्यानं टाळी मारुन अजुन एकाला आत बोलावलं. त्याला म्हणाला, रायटर है... काम नही करनेका. तर दुसरा सुरु... बोल क्या चाहिये इन्फॉरमेशन... हम काम भी करना चाहे तो क्या करे... कौन रखेगा काम पर... कौनसी नौकरी मिलेगी हमे... और कौन देगा... भीख मांगने गये तो भी कोई भीक नही देता. आंखे फाड फाड कर देखेते रहते है... उन आखोंको क्या चाहिये ओ हमे मालूम है... वही हम करते है... बोल काम करने का है क्या... मी पुन्हा नाही म्हणालो तर म्हणाला... तो फिर चल निकल...


रात्रीचे अडीच वाजले होते. पावसाची रिपरीप चालू होती. चहा- सिगरेटच्या सायकलस्टॉलवर काही रिक्षावाले, काही फिरस्ते रेंगाळत होते. तिथंच पुलाखाली एक जोडपं इडली- डोसे काढीत होतं. तुरळक गाड्या रस्त्यावरुन चरचरत जात होत्या. आणि सस्त्यालगतच्या या खेळातले काही भिडू आत जात होते काही बाहेर येत होते.

प्रवीण धोपट
pravindhopat@gmail.com

Tuesday, August 17, 2010

पार्वतीचं बाळ जन्माला येत आहे

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०

इतस्ततः पडलेले शरीराचे तुकडे. कुणाचे हात तुटलेले. कुणाचे पाय. कुणाचं पोट फाटलेलं. तर कुणाचं डोकं फुटलेलं. रक्त साकळावं तसे रंगाचे डबे विखरुन पडलेले. सुकलेले डाग. शरीरातल्या धमन्या आणि शिरा लोंबकाळव्यात तसा तुटलेल्या हाता पायातून काथ्याचा गुंता. डोळ्याच्या खोबणीत फक्त पांढरी बुब्बुळं. उघडीबंब शरीरं. स्टोव्ह, एक्सॉ ब्लेड्स, चाकू अशी आजुबाजुला पडलेली हत्यारं आणि तिथल्या माणसांच्या अंगाखांद्यावर पिठाच्या चक्कीत धान्य पिसणार्‍या भय्याच्या अंगावर साचते तशी पांढरी पावडर. जमिनीवर, भिंतींवर, कपडयांवर रंगाचे डागच डाग.



हे चित्र आहे कारखान्यातलं. जिथं गणपती आकार घेतो आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातल्या हे सगळ्याच कारखान्यातलं प्रातिनिधीक चित्र. गणपती घरात किंवा मंडपात यायला आता पंचवीस दिवस उरले आहेत. मंडळांच्या वर्गणीचे जत्थे पिवळी पावतीपुस्तकं घेऊन घराघराच्या उंबर्‍यांवर, जाहिरात दारांच्या गारेगार ऑफीसेसमध्ये फिरु लागले आहेत. मंडप, चलचित्र, लाइटींग, मनोरंजनाच्या कार्यक्रमांची जुळवाजुळव चालू आहे ती गणपतीच्या स्वागतासाठी त्या गणपतीच्या मुर्तीला रुपरंग देण्याचं काम जोरात सुरु आहे. दिवस-रात्र.


रात्री दहानंतर कारखान्यातलं काम तसं थंडावलेलंच. तरी कामावरुन सुटून आलेले कामगार इथं रात्रीचं काम करीत होते. दिवसभर काम करुन थकलेले तिथंच आडवे. तिथल्याच बाजल्यावर कुणी झोपलेले. कुणी लवंडलेले. आणि गणपतीच्या मुर्ती आपापल्या जागेवर शांत. निशब्द. मारकुटया मास्तरांनी दंगेखोर पोरांना शिक्षा करुन ठेवल्यासारखे एका जागी एका पोजिशन मध्ये बसलेले, उभे, लवंडलेले.


सलूनमध्ये न्हावी आपल्याला खुर्चीवर बसवून त्याला पाहिजे तशी आपली मान तर कधी खुर्ची वळवून घेतो. तशी कारागीरा समोर फिरत्या स्टुलावर बसलेले गणपती. कॉप्रेसरची घरघर सुरु आहे आणि स्थीर नजरेनं स्टुलाची चक्ती फिरवत रंगाचा स्प्रे गणपतीच्या धोतराच्या सुरुकुत्यांवर, पोटाच्या, मानेखालच्या, हातांच्या घडीवर सरसर फिरवला जातो आहे. सराईताप्रमाने कारागीराचा हात चालत राहतो आणि गणपतीच्या शरीराचा एक एक अवयव जिवंत होत जातो.


एका कारखान्यात गेल्या विस वर्षांपासनं गणपतीचंच काम करणारा चंद्रकांत भेटला. इथं संपुर्ण मोत्यात घडवला जाणार्‍या गणपतीची जबाबदारी त्याच्याकडं होती. शरीराच्या अववयापासून अंगावरच्या दागदागीन्या पर्यंत संपुर्ण मोतीच मोती. एक एक मोती ओळीत गुंफुन गणपतीला तो त्याच्या मनातलं रुप देत होता. त्या आधी त्यानं पंधराविस फुटाचे गणपतीही हाताळले आहेत. मी विचारलं, काम करतांना गणपतीला तुमचा पाय वैगेरे लागत असेल? तो म्हणाला, लागणारंच. दर वेळेला पाया किती पडायचं आणि काम कधी करायचं? एकदाच शेवटी सगळ्यांच्या पाया पडायचं. माफ कर म्हणायचं, झालं. रंगाचं काम असलं की पंखा पण लावता येत नाही. मच्छर फोडून काढतात. त्यामुळे शेवटी घाई होतेच. तेव्हा गणपतीच्या दर्शनी भागावरच जास्त लक्ष द्यावं लागतं. मागचं कोण बघतंय?


एका कारखान्यात शिरतांना चप्पल चालेल का विचारलं तर त्यानं आपल्या पायातली चामडयाची चप्पल दाखवली. तो सेलीब्रेटीचंच कौतूक करण्यात रंगला होता. कोण कोण कलाकार कशी कशी ऑर्डर देतो त्याचं गुणगान करतांना तो क्षणाक्षणानं फुलत होता. तिथले वेगवेगळ्या स्टाईलचे गणपती त्यांच्या वैशिष्टयांसह स्पष्ट करीत होता. प्यायला पाणी मागितलं तर त्यानं बॅगपायपरच्या रिकाम्या खंब्याची बाटली पूढं केली. पाणी पिऊन मी बाटलीकडं बघून हसलो तर तो म्हणाला, रात्रंदिवस काम करायचं तर असं अधून मधून टॉनीक लागतंच आणि कामही कसदार होतं.


मातीच्या गणपतीला खूप झंजट असतं म्हणाला. आणि त्या गणपतीचा भावही जास्त. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीलाच मागणी जास्त असते. रंग गेला तर पैसे वापस म्हणाला. पण ते टेस्ट करायचं म्हणजे विसर्जनाचा दिवस उगावणार. आणि तेव्हा कलर गेला तरी त्या दिवशी एवढं दु:खाचं वातावरण असतं की पैसे परत मागायला कोण जाणार? त्याने एशिअन पेन्टचे ऑइलबॉन्ड कलर दाखवले.


गणपतीचे डोळे काढणार्‍या कारागीराला या धंद्यात विशेष मान आहे. ते काम म्हणे जिकरीचं असतं. एक जण डोळे रंगवता रंगवता तल्लीन झाला होता. डोळ्यातल्या काळ्या वर्तुळावर मारलेला एकच सफेद ठिपका गणपतीच्या जीवात प्राण ओततो. गणपतीच्या उंचीनुसार तो या ठिपक्यांची जागा बदलत होता. तो म्हणाला जर गणपती आपल्या उंचीच्या पटटयात येत असेल तर ठिपके डोळ्यांच्या बाजुला आणि जर गणपतीची उंची जास्त असेल तर हेच ठिपके खालच्या साईडला काढावे लागतात. प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे, गणपती आपल्याकडेच बघतो आहे.


आजकाल ट्रेंड कश्याचा आहे विचारलं तर म्हणाला लालबागच्या राज्यासारख्या गणपतीचा. कुणाकुणाला तो नवसाला पावलेला असतो. पावलास तर तूला घरी आणू असाही नवस असतो. त्यामुळे अलिकडच्या काळात लालबागच्या गणपतीच्या प्रतिकृतीला बरीच मागणी असते. आणखी एक तो 'माय फ्रेंड गणेशा' सिनेमा आल्यापासनं पहिल्याच वर्षी विशेषत: मुलांच्या आग्रहाखातर गणपती आणणारे त्या गणपतीची ऑर्डर करतात. साईबाबाच्या खांद्यावर बसलेला. शिवाजीच्या आवेशात उभ्या असलेल्या, बालाजीची प्रतिकृती असलेला, टिळकांच्या सोबत असलेला, शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला असे कितीतरी गणपती लोक आवर्जुन मागतात. म्हणजे एका दगडात दोनही पक्षी मारल्यासारखं होतं. उंचीवर मर्यादा आल्यापासनं लोक गणपतीच्या सुंदरपणाकडं अधिक लक्ष देतात. काही काही तर छापून आलेल्या गणपतीची पोस्टरही आणून देतात. पण त्याचा रेटही जास्त असतो. मागणी तसा पुरवठा.


वर पत्रा बाजुला पत्रा आणि परातीवर आधारलेलं मंडप. अधुनमधून पाणी आत शिरु नये म्हणून त्यावर शाकारलेली ताडपत्री किंवा मेणकापड. सगळेच कारखाने कुठंतरी बिल्डींगच्या आधारानं किंवा मैदानात. तिन-चार महिन्यासाठी चालणारा खात्रीचा तरीही कुठलीही ठोस सोय नसलेला हा व्यवसाय. एका कारखान्याचा मालक म्हणाला की, जे आज कारखाना मालकांच्या हिमतीवर चालू आहे ते ही आता संपेल असं वाटतंय. लालबाग परळ भायकळ्याच्या आजूबाजूला आता उंचचउंच इमारती उभ्या राहायला लागल्याहेत. त्याच्या आधाराने पराती, मंडप बांधणं दुरच तिथं उभं रहायलाही मिळायचं नाही. इथला मराठी माणसाचा उत्साह फक्त मिरवणूकीत नाचण्यापुरता उरला आहे. बाकी उरलेले दिवस तेच ते बुजलेपण. इथली गणेश टॉकीज बंद झाली आणि भारतमातेच्या जागेवर मॉल, मल्टीप्लेक्स कधी उभं रहातंय याची फक्त वाट पहायची. एक एक करुन पायाखालची जमीन सरकते आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल्स मध्ये गणपती विकायला ठेवण्याचे दिवस आता दुर नाहीत. हौस आहे. परंपरा आहे म्हणून करीत रहायचं एवढंच.


लालबागच्या राजा आता सेलिब्रेटींच्या दर्शनभेटीमुळे गणपतीमधला सेलिब्रेटी झाला आहे. तो गणपती तिथल्या तिथेच तयार केला जातो. त्याचं काम आजपासूनच सुरु होतं आहे. लालबागच्या राजामुळं आजुबाजुच्या इतर गणपतीचा म्हणजे मंडळांचा झगमगाट आता कमी कमी होतो आहे. त्याला इलाज नाही. जो पर्यंत इतर गणपती भक्तांना पावत नाहीत तो पर्यंत मंडळांचेही असेच हाल होणार. भक्तांच्या सोइसाठी कोंबडीगल्लीच्या परिसरात गरम खाडा इथं भलामोठा मंडप उभारला आहे. मागच्या बाजूला दिग्विजय मिलच्या मैदानात फक्त नवस फेडणार्‍यांसाठी निवारा केला आहे. योगायोगानं त्या गल्लीचं नाव चोर गल्ली असं आहे. रांगारांगातून गणपतीच्या पायापर्यंत पोचणारी जिन्याची वळणंही मजबूत आणि नयनरम्य आहेत.


या परिसरात अनेक छोटेमोटे मंडप असेही आहेत जिथं गणपती बनत नाहीत फक्त विकले जातात. चौकशी केल्यावर कळलं ते पेण वरुन आणलेले आहेत. तिथं फक्त धंदा आहे. इथ गणपतीच्या अंगावर एक बिल्ला लटकवलेला असतो. कधी कधी तो गणपतीच्या नंबरचा असतो तर कधी तो विकत घेतलेल्या मालकाचा.


फायबरच्या साच्यातून मातीचे किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गणपती बनताना, त्यावर रंग चढताना, गणपतीच्या डोळ्यात भाव उतरतांना बघणं हा एक सोहळा आहे. वेळ, मेहनत आणि कारागीराला पैसे मिळणं हा व्यवहार आहे. तो कश्यातूनही साधता येतो. पण आज पेण वरुन गणपती आणून त्याचा रस्त्यावर बाजार मांडणं हे बघायला बरं वाटत नाही. उद्या कदाचीत काळाच्या ओघात लालबाग-परळचे कारखाने उठतील. पेण वरुन रेडीमेड गणपती आणले जातील. पण त्यानंतर एक लक्षात ठेवलं पाहिजे की, 'पेण' आणि 'चिन' काही दूर नाही.

प्रवीण धोपट

99672 93550
pravindhopat@gmail.com

Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?

पूर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरिष पारकर # ऑगस्ट २०१

काल त्रेसष्ठावं सरलं म्हणून आजपासून चौसष्ठावं लागलं. घडयाळाची टिकटिक रोखता येत नाही. सरणारी वेळ थांबवता येत नाही. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष या क्रमानं काळ आपलं एक एक पाउल टाकत पुढं सरकत राहतो. आणि आपण योगायोगानं किंवा ठरवून साधलेली वेळ वर्षावर्षानं साजरी करीत राहतो. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे. हे आता सवयीनं आपल्याला माहित झालेलं आहे.

या दिवशी दरवर्षी सकाळी 'कर चले हम फिदा जान और तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या गाण्यानंच जाग येते. हक्काची सुटटी म्हणून उशीरापर्यंत ताणून द्यायचं तर हमखास झोप येत नाही आणि सकाळी झोपेच्या ऐन मोसमात स्पिकरवर 'कर चले..'. अशी दिवसाची अनवॉन्टेड सुरुवात. टिव्ही लावावी तर पुन्हा मनोज कुमार 'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती' उगाळत बोंबलत असतो. चॅनेल बदलावा तरी तेच.

सालाबाद प्रमाणे या ही वर्षी, शाळेच्या पटांगणात (अर्थात ज्यांची शिल्लक आहेत त्यांची, उरलेली वर्गातल्या वर्गात) उभे राहुन मुले झेंडयाला अभिवादन करतात. एकुणच आज तरी देशभक्तीपर आवेशात वंदे मातरंम आणि जनगणमन. शेवटी कुणीतरी... कुठुनतरी... 'भारत माता की... जय'. या दिवशी हौशी शिक्षक गांधी टोप्या घालतात. काही नेहरुंचे कपडे. शिक्षिका तिरंगी किंवा पांढर्‍या साडयात. बर्‍याच जणांच्या खिशाला टाचणीत अडकवलेला झेंडा दिसतो. नंतरही काही दिवस मुख्याध्यापकांच्या टेबलावर एकमेकांना तलवारीसारखे छेद देऊन दोन झेंडे दिसत राहतात. अशा देशप्रेमानं भारलेल्या दिवसात कुणीतरी त्यांना ते भेट म्हणून देतोच. शाळेतल्या काही हुशार मुला-मुलींची तिच ती तोंडपाठ भाषणं होतात. झाशीच्या राणीपासून टिळक, गांधी, बोस, सावरकरांपर्यंत सगळ्यांची उजळणी होते. ज्या शाळेत संगीत शिक्षक असतील तिथे कंपल्सरी एक देशभक्तीपर समुहगीत. अर्थात मुला-मुलींच्या वेगवेगळ्या तसंच उंचीनुसार रांगा लाऊन आणि संगीत शिक्षक मधोमध उभे राहुन हातवारे करीत तबला-पेटीच्या नादात-ताला-सुरात (?) गाणं सादर केलं जातं.

आज काही पालक आपल्या गाडयातून प्रवास करतांना आणि आपल्या मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मुद्दामहुन सिग्नलवर तिरंगी झेंडे विकत (ते ही भीख मागितल्यासारखं) असलेल्या मुलांकडूनच घासाघीस करुन का होईना घेतात. तेवढंच आपलं देशप्रेम आणि गरीबालाही मदत. गाडीच्या डॅशबोर्डावर गणपतीच्या शेजारी आपला काही दिवस शोभा म्हणूनही झेंडा बरा वाटतो.

सरकारी कचेर्‍यात आज गांधीजीना भिंतीवरुन खाली उतरवलं जातं. बाकीच्यांचे फोटो उपलब्धतेनुसार आजुबाजुला. काही ठिकाणी शिवाजी महाराजांनाही त्या रांगेत बसवतात (बिचार्‍या महाराजांना कल्पनाही नसेल की अश्या काही स्वातंत्र्यदिवसासाठी आपल्याला इथं बसायला लागेल) पण फोटोला इलाज नसतो. तो जिथं बसवला किंवा ठोकला जातो तिथं बसतो किंवा लटकतो. मग तो फोटो शिवाजीचा असो नाहीतर गणपतीचा.

देशातर्फे दिल्लीच्या लाल मैदानात आणि महाराष्ट्र राज्यातर्फे शिवाजी पार्क वर पोलीसांचे बँड, लेझीम पथक आपली कलाकारी सादर करतात. सराव कर-करुन आज मुख्यमंत्र्याना, राज्यपालाना, गॉगल वाल्या प्रेक्षकांना आणि टिव्हीवाल्यांना शिस्तीत चालून दाखवतात. काही दुचाकीवरुन तर काही विमानातूनही कसरती करुन आपलं प्रदर्शन मांडतात. अश्यावेळी लोककला पाहिजेच. ती असतेच. याठिकाणी कुठुन कुठुन कश्या कश्यात पहिल्या आलेल्या लोकांचे सत्कार केले जातात. प्रशस्तीपत्रकं, शाली किंवा श्रीफळं दिली जातात. ती कुणाकुणाला वाटायची यासाठी काही कमिटया, समित्या वर्षभर कार्यरत असतात.

या दिवशी चढाओढ दिसते ती बॅनरची. वेगवेगळ्या पक्षांचे नेते-उपनेते-कार्यकर्ते आपापल्या वकुबाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा देत झळकतात. आजकाल कुणी कुणाला शुभेच्छा द्यायच्या याचाही धरबंद राहिला नाही. जो तो उठतो. फ्लेक्स वाल्याला गाठतो. कटींग-पेस्टींग करतो. दोन-चार पोरांना हाताला धरुन रातोरात झळकतो. नजर जाईल तिकडे तिरंगा. डोळ्यासमोर, पायाखाली तिरंग्याचा कचराच कचरा. म्युनसीपालटी देशाच्या नावानं बोटं मोडीत डंपिंग ग्राउंडवर दुसर्‍या दिवशी शिळं झालेलं देशप्रेम जाळून टाकते.

बिल्डर सुध्दा या दिवशी वर्तमानपत्रात पान पान जाहीराती देतात. वेगवेगळया बिल्डरांच्या रंगीबेरंगी, गगनचुंबी जाहिराती बघुन आपल्यालाच आपण 'बेघर' आहोत असं वाटायला लागतो. मनातल्या मनात आपण रस्त्यावर आल्यासारखे वाटतो. चित्रातल्या गाडया, झाडं, रस्ते, तलाव, माणसं, फर्नीचर पाहिलं की वाटायला लागतं की आपण एखाद्या गुहेत वैगेरे रहात आहोत की काय. शक्य आहे ते आजच्या दिवशी बुकींग करतात बाकीचे चोळत चडफडत राहतात.


काही बाजार आजच्या दिवशीच किंवा मागे पुढे दोन-चार दिवस 'बीग' सुट देतात. त्या दिवशी आपल्याला कळत नाही. भावनेच्या भरात आपणही खर्च करतो. अमुक घेतलं तर तमूक फ्री. येवढं घेतलं की तेवढं फ्री. या फ्री फ्री च्या नादात माणूस फिरफिर फिरतो. नंतर कळतं की सुट-बीट झुट है. पण त्याला काही इलाज नसतो. सर्वसामान्य माणसालाही वाटत राहतं की, आपण काळाला धरुन असलंच पाहिजे. काळाबरोबर वहात गेलंच पाहिजे. मार्केटला- जाहिरातीना बळी पडलंच पाहिजे. आता सगळ्यांनाच दरवर्षी येणार्‍या अश्या 'सुटी'चे दिवस पाठ झाले आहेत. त्या दिसवांसाठी तरी यापुढे आपण १५ ऑगस्टची वाट पहायला पाहिजे.

भारत आपला देश आहे. हा देश शेतीप्रधान आहे. त्यामुळं इथं आत्महत्येसाठी शेतकर्‍याला प्राधान्य दिलं जातं. इथं अजुनही दारिद्रय रेषेखाली जगत राहणार्‍या माणसांचं प्रमाण ३७ टक्के आहे. इथं छोटे उद्योग धंदे जन्माला आल्यापासून एक दोन वर्षात बंद पडतात. आणि मोठया व्यावसाईकांच्या प्रगतीपुढे आकाशही ठेंगणं पडतं. जन्माला येण्याआधीच किमान शंभरातल्या दहा मुलीना मारलं जातं. कुपोषणानं अजुनही १७ टक्के मुलं मरतात. इथं प्राथमीक शाळेत गळती होणार्‍या मुलांचं प्रमाण २.७ दशलक्ष इतकं आहे. अजुनही राज्याराज्यात सिमेवरुन, पाण्यावरुन आपापसात भांडणं आहेतच. इथलं हजारो टन धान्य साठवायला गोदाम नाही म्हणून सडतं आणि इथंच भुकेपाठी गरीबाचा जीवही जातो. इथं दिड-दोन लाखाचा पगार घेणार्‍याला आणि दोन-चार हजारात काम करणार्‍यालाही एकच बाजार आहे. इथं काही गाडीवानांच्या समोर पार्कींगसाठीचा प्रश्न आहे तर काहींच्या पायात फाटक्या चपला नाहीत. इथं आपल्या मतावर निवडून आलेल्या माणसाची झटपट प्रगती कशी, का आणि कधी होते हे कळत नाही. टिव्हीवरच्या बातम्यामुळं काल काय झालं ते आठवत नाही. आता काय चाललंत ते समजत नाही आणि उद्या काय होणार आहे याचा अंदाज येत नाही. नुसता किचाट, गोंधळ.

हा लोकशाही देश आहे, हे माहीत आहे. पण लोकांचं लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय रे भाऊ? कुठले लोक, कुणाचं राज्य, कश्याचं कल्याण?

प्रवीण धोपट.
pravindhopat@gmail.com

Friday, August 6, 2010

भाजीचा बाजार

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०

रात्रीचे बारा वाजले आहेत. दोघा-तिघांचा घोळका दोन-चार ठिकाणी गप्पा छाटत. एखाद-दुसरी गाय इतस्ततः पडलेला पाला हुंगत, चरत. काही गाई त्यांची वासरं मस्त रंवंत करत रस्त्यात कुठेही कशीही निवांत बसलेली. गेटवर चहा वाल्याच्या आजुबाजुला माणसांचा गराडा. स्टोव्हच्या फरफरणार्‍या आवाजाशी स्पर्धी करीत गावगप्पांचा फड रंगलेला. पिंपातलं पाणी प्लॅस्टीकच्या मगातून घटघटा पिऊन वर चहाचा झुरका त्यावर तंबाखुचा बार. दोनचार ठि़काणी ओळीत काही हातगाडया काही सायकली काही मोटारबाईक्स एखाद-दुसारा ट्रक टेम्पो. बाकी सुनसान मैदान आणि बाजूला दुकानाचे गाळे काळोखात निपचित.

वाशीच्या सेक्टर १९ मधलं एपीएमसी मार्केटचं हे चित्र त्यानंतर रात्री क्षणाक्षणानं बदलायला लागतं. माणसं, टेम्पो, ट्रक्स, लाईटस, हॉर्न्स, गाडयांचे आवाज, पेट्रोल-डिझेलचा धूर, धावपळ, पळापळ, आरोळ्या, किचाट गोंधळानं वातावरण भरुन जातं. बघता बघता रात्र चढत गेली आणि भाजीपाला मार्केटमध्ये सकाळ कधी झाली हे कळत नाही. इथं कुणाच्या डोळ्यावर पेंग नाही की कुणी झोपलेला नाही. उत्साहाला उधाण आल्यासारखं हलतं, बोलतं, चपळ वेगवान चित्र.

रात्री साडेबारा पाऊणच्या आसपास भाजीनं भरलेला एक ट्रक गाळ्याच्या कठडयाला लागतो आणि पंधरा-वीस कामगार झटापटीनं त्यातला माल उतरवायला लागतात. ट्रकातल्या काळोखातही नेमक्या व्यापार्‍याचं किंवा त्याच्या गाळ्याचं नाव घेतलं जातं, हातात विळ्यासारखा काटा गोणीत अडकवून तिघांनी उचललेला डाग एकाच्या डोक्यावर जातो. तो वळताना त्याच गतीनं दुसरा, तिसरा, चौथा... वेगवान लयीत ट्रक केव्हा खाली झाला कळला नाही. अर्ध्या चडडया, अंगात बनीयान, खांद्यावर भगवा टॉवेल, डोक्यावर चुंबळीसाठी खोलगट गोणी आणि तोंडात चित्रविचित्र हेल. यातले बहुतेक कामगार सोलापुर बॉर्डरवरचे त्यामुळे भाषा मराठी कानडी मिश्रीत. कष्टाचं काम पण त्यातल्या गतीमुळं त्याला आनंदाची, उत्साहाची झालर लागते आणि तेच काम हलकं फुलकं होऊन जातं.

सगळेजण आपापल्या कामात गर्क. एक सफारीतला तरुण मागे हाताचा गुणाकार करुन ट्रकाच्या आजुबाजुला खालीफुकट फिरत होता, म्हणून त्याला विचारलं तर म्हणाला, 'मी डायवर हाय, मला काय माहित नसतंय.' ... काय आहे, म्हणून एक म्हातारा पुढं आला. त्यानं एका झटक्यात सांगून टाकलं. 'शेतकर्‍याचा काय संबध नसतोय इथं. शेतकरी तिथल्या हुंडेकर्‍याकडं माल देतोय. हुंडेकरी सोताच्या नाहितर भाडयाच्या गाडीनं त्या त्या नावाच्या चिटटया लिहुन माल इथल्या व्यापार्‍याकडं धाडतो आनं इथनं पुढं मुंबयचा व्यापारी, त्याच्याकडनं भय्याकडं आनि तिथंन पुढं तुमच्या घरात'. एवढं बोलून तोही सटकला. त्याला कुणीतरी मास्तर अशी हाक मारली. असे अनेक मास्तर पुढे भेटले. नासीक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर कडून आलेल्या ट्रक-टेम्पोमधुन एक कागद ड्रायव्हरकडून थेट त्या मास्तरांच्या हातात पडत होता. प्रत्येक चिठठीबरोबर दहा-वीस रुपयाची नोट चिकटलेली असायची. तिथून पुढे जो तो त्या मास्तरच्या मार्गदर्शनानुसार. एकामागून एक असे ट्रक टेंम्पोची गर्दी आता वाढत चालली. एकाला लागून एक अश्या शिस्तीत गाडया उभ्या रहात आणि त्याच शिस्तीत माल उतरवला जाई. एका ड्रायव्हरला गाईड करायला पंधरावीस आवाज. व्यापार्‍यांच्या लगतलगतच्या मोकळ्या गाळ्यातही नुसत्या नंबरावरुन नेमका माल नेमक्या गाळ्यात येऊन पडत होता. अडाणीपणातही एक शहाणपण दडलेलं असतं त्याचा एक सुंदर नमुना.

रात्री दोन-अडीचच्या सुमारास मार्केटच्या गेटमधुन चारचाकी सुंदर चकचकीत गाडया येतांना दिसतात. त्या असतात मुंबईच्या व्यापार्‍यांच्या. घामानं भिजलेल्या हमालांच्या दुनियेत, चेहर्‍यावर झोपून उठल्यानंतरची तॄप्ती,. ताज्या चेहर्‍यावर पावडरचा हलका हात, कपडयांवर सेंटचा अंधुक वास. मनगटावर घडयाळ, एखाद्याच्या हातात ब्रेसलेट किंवा बोटात अंगठी, खिशात मोबाईल घेऊन व्यापारी प्रवेश करतो. बहुसंख्य मराठीच. पण गुजरात्यांनाही या धंद्यातली गंमत कळायला लागली आहे. हमालांच्या यादीत युपी-बिहारींची नावं केव्हाच घुसली आहेतच. मैदान ते गाळ्यामधली धावपळ सुरुच राहते. पण आता लक्ष वेधून घेतो तो दुकानाचा गाळा.

संपुर्ण मैदान ट्रक-टेम्पो-हातगाडया आणि माणसांच्या लगबघीनं भरुन गेलेलं असतं. दुकानाचे गाळे आता स्वच्छ प्रकाशात उजळतात. वांगी, पडवळ, भेंडी, कारले, काकडी, कोबी, वाटाणा, दुधी, भोपळा, तोंडली, दोडका, रताळी, पालक, मेथी, कोथींबीर, मिरच्यांची पोतीच्या पोती. एकावर एक रचुन ठेवलेल्या गोण्यांच्या मधोमध भाजी विक्रीचा घाऊक धंदा सुरु होतो. मुख्य व्यापार्‍याच्या आजूबाजूला भाजी घेण्यासाठी उत्सुक चार-सहा जणांचा कोंडाळा. मुख्य विकणारा हातरुमालाच्या खाली समोरच्याच्या हाताची बोटं नेमक्या पेरात दाबून भाव पक्का करतो. भाव पटला तर टाळी कडाडते. (अंतराअंतरावर वेगवेगळ्या गाळ्यावर अश्या टाळ्या कडाडत राहतात आणि त्याचाच एक उत्सव बनुन राहतो.) सांकेतीक भाषेत व्यापारी भाव उच्चारतो, झरझर डाग (गोणी) वजन काटयावर येते. काटयावर वहीत लिहित असतो कृषी उत्पन्न बाजार समीतीचा एक माणूस. प्रत्येक वजनातला आठ टक्के हिस्सा त्याचा. शेतकर्‍याची फसवणूक होऊ नये म्हणून तो उभा.

त्या दिवशी भेंडीचा किरको़ळ बाजारातला भाव चाळीस रुपये किलो होता. तेव्हा ती भाजी इथे चौदा रुपये किलो होती. जो विकत होता त्या अडत्याचं कमिशन, त्याआधी काटेवाल्याचा पगार, समितीचं कमिशन, ट्रक-टेंपोचं भाडं, शेतापासून इथपर्यंत किमान चारवेळा मालाची चढउतार करण्यासाठी हमालांची मजूरी, ड्रायव्हर, डिझेल, मेंटेंनन्स, जाग्याचं भाडं. आणि या सगळ्याच्या खाली शेतकरी. ज्याच्या वाटयाला याच भाजीचा भाव किलोला तीन ते पाच रुपयाच्या आसपास मिळतो. ज्यासाठी तो किमान चार-सहा महिने शेतात राबतो. खतासाठी, पावसासाठी, पाण्यासाठी, विजेसाठी, कर्जासाठी कायम दुसर्‍यावर अवलंबून राहतो. शेतकर्‍यानं या सगळयासाठी हुंडेकर्‍याकडून आगाऊ घेतलेली उचल शेतातला माल उचलता क्षणीच काटली जाते. त्याच्या वाटया येणारा पैसा हा सगळ्यांच्यापेक्षा कमी. निसर्गापासून व्यापार्‍यापर्यंत आणि सरकारपासून अधिकार्‍यापर्यंत सगळ्याकडूनच शेतकर्‍याला नाडलं जाण्याची हमी आहे.

रात्रभर आपल्या खांद्याला झोळी लटकवून काही बाया काही पोरं फिरतांना दिसत होती. सुरुवातीला लक्षात येत नव्हतं, पण नंतर तेच चित्र डोळयापुढून हलेना. त्यांची लाचार लगभग बघण्यासारखी असायची. ट्रक-टेंम्पो खाली करतांना फाटलेल्या गोण्यातून काही भाजीपाला खाली पडायचा. तो उचलण्यासाठी यांची झुंबड उडायची. पण रात्रभरच्या या झटापटीत त्यांच्या झोळ्या भरुन जायच्या. इतक्या मेहनतीनंतर मिळवलेल्या या सप्तरंगी भाजीवर त्यांच्या दिवसाचा भार असायचा. ती उचललेली भाजी दिवसभर नाक्यावर विकायची. आणि पुन्हा दुसर्‍या रात्री इथंच. पु.ल.देशपांडेच्या 'ती फुलराणी' नाटकात एक वाक्य होतं की, 'आपल्यासारख्या माणसांचा उकीरडा तो कावळ्यासाठी घास असतो' त्याची आठवण झाली.

भाजी उतरता उतरता चहावाला यायचा. सगळ्या हमालाना आहे त्याच जागेवर चहा दिला जायचा. ट्रकावर वेगवेगळ्या पोजमध्ये उभे असलेले हमाल युध्दानंतरच्या विजयी विरांसारखे वाटले. चहा म्हणजे कामगारांसाठी अमृत-विसावा. चहावर तंबाखू किंवा त्याचीच सुधारीत आधुनीक आवृत्ती गुटखा आणि पुन्हा त्याच उत्साहात मर- मर. तेवढया मिळालेल्या वेळेत बाजुलाच लटकवलेल्या पिशवीत पसा दोन पसा भाजी जायची. शेजार्‍या पाजार्‍यांना फुकट वाटायला नाहितर खानावळ वालीला द्यायला. प्रत्येकाच्या डोक्यावर मागून उघडी खोल गोणी असायची. सहज हाताला लागतील त्या भाज्यानी आपसूक भराल्या जायच्या.

भाजी मार्केटच्या दक्षीण बाजूला संडास मुतार्‍यांची रांगच रांग. रात्रभर गर्दीत. तिथंच एका टोकाला विठ्ठल रखुमाइचं मंदीर. कुलूपात. विठोबाच्या अंगणात शनीचं मंदीर. उघड्यावर. शनी कोणात्याही सिझनमध्ये किमान बारापैकी एका राशीला नडतच असतो. त्याची उठबस झाली पाहिजे. विठोबाची आठवण दर एकादशीला नाहीतर आषाढी कार्तीकीला तर दर शनिवारी शनीचा टिळा लावणारे अनेक.
पुढे त्याच रांगेत चहा, वडा, मिसळच्या टपर्‍या रात्रभर भरात असतात. नदीच्या पाण्यातल्या भवर्‍यासारखा पितळेच्या पातेल्यात चहा उकळत रहातो. आधी सफेदच पण पिळून पिळून काळ्या चॉकलेटी पडलेल्या फडक्यात गुंडाळून चहा गाळला (पिळला) जातो. चहा वर चहा संपत रहातो.
दाना बाजार, कांदा बटाटा बाजार, फळ बाजार आणि हा भाजी पाला बाजार. सुधाकर नाईकांच्या काळात मुंबईच्या बाहेर नवी मुंबई वाशी इथं हलवलेला हा शेती उत्पन्न बाजार आता इथं चांगलाच रुळला आहे. कितिही महागाई असो दोन वेळच्या जेवणाच्या ताटात आपल्या हक्काची जागा राखुन ठेवणारी भाजी आपल्यापर्यंत पोचण्याआधी शेतकर्‍यापासून ते भाजी विकणार्‍या शेवटच्या भय्यापर्यंत हजारो हात खपत असतात.


प्रवीण धोपट.
99672 93550

pravindhopat@gmail.com

महाराष्ट्राच्या सीमा जळताहेत

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # ऑगास्ट -२०१०



मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला या वर्षी पन्नास वर्षे झाली. तो दिवस साजरा करुन तीन महिने उलटले नाहीत तोवर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांचा सिमावाद उफाळून आला. जो वाद गेली पन्नास वर्षे चालूच आहे. पुढेही चालू राहील, कारण महाराष्ट्राचे बेळगाववरचे आणि बेळगावकरांचे महाराष्ट्रावरचे प्रेम कमी व्हायला तयार नाही. खरंतर कर्नाटक राज्याच्या बाजुने हा वाद संपला आहे कारण बेळगाव आणि सिमेवरची गावं कर्नाटकातच राहतील असा निर्णय केंद्राने दिला आहे. कॉग्रेसला हा प्रश्न मिटवण्यात कधीच रस नव्हता. भाजपच्या मनात काय आहे हे कळायला मार्ग नाही. कारण कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आहेत. आणि ते मराठी आहेत. तरीही हा प्रश्न मिटावा असे भाजपलाही वाटत नाही. शिवसेना निवडणूका आल्या की गरजेपुरता हा प्रश्न गरम करुन पुरवते आहे.

महाराष्ट्राचं केंद्रातलं सर्वपक्षीय खासदारांचं बळ लक्षात घेता हा प्रश्न आजही धसास लावता आला असता पण त्यात बिचार्‍या बेळगावच्या मराठी जनतेपलिकडे कुणालाही या प्रश्न सोडवावा असे सध्या तरी वाटत नाही. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी असे चार मुख्यमंत्री केंद्रात आहेत. पण या निर्णयानं कुणाच्याही अस्मितेला तडा गेलेला नाही. राजीनामा वैगेरे दुरच साधी प्रतिक्रीयाही कुणी दिली नाही. शरद पवारानी या प्रश्नाची उडवलेली खिल्ली सर्व टिव्ही धारकांनी पाहिली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या अर्ध्या कच्या मराठी (महाराष्ट्रासाठी) इंग्लीशमधे (दिल्ली(मॅडम)साठी) चष्म्याआडून आपली मते मांडली. 'वर्क इन प्रोग्रेस' या धर्तीवर त्यांचे उपाय चालू आहेत. केंद्राकडून हा निकाल जाहीर झाला त्या दिवशी आणि काही दिवस नंतरही त्याचे पडसाद कोल्हापुरात (कदाचित शेजारधर्म म्हणून) उमटत राहिले. बाकी महाराष्ट्र तसा थंडच होता. वर्तमानपत्रांच्या बातमीपलिकडे त्या प्रश्नाला मुंबईत आणि उर्वरीत महाराष्ट्रात जागा नव्हती. जाळणे, तोडणे, फोडणे, मोडणे, फासणे, फेकणे, मारणे हे शिवसेना पुरस्कृत सगळे सोपस्कार झाल्यावरही प्रश्न आहे तिथंच आहे. त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी दोनचार टिव्ही बाइटच्या पलिकडे कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेला बेळगावच्या मराठी माणसानी त्यांची जागा दाखवली आहे. आता मनसेच्या भीतीने शिवसेनाही या बेळगाव सिमावादाच्या प्रश्नातून काढता पाय घेईल असे वाटते. वाट बघण्याशिवाय आता कुणालाच पर्याय नाही.

कर्नाटकचा धुरळा बसतो न बसतो तोच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधार्‍यावरुन घेतलेला पवित्रा हा सुध्दा महाराष्ट्राच्या सिमावादाची नवीन नांदीच म्हणावी लागेल. चंद्राबाबूनी केवळ पोटनिवडणूकीसाठी केलेली स्टंटबाजी आहे असे म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर उद्या हा वाद आणखी पेटल्याशिवाय राहणार नाही. चंद्राबाबू नायडूं बरोबर ५० आमदार, २ खासदार आणि २३ कार्यकर्त्यांना अटक झाली होती. आपल्या किती आमदारानी कुठल्या प्रश्नासाठी अशी एकत्रीत अटक करुन घेतल्याची आठवतेय? नांदेड जिल्ह्यात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र सिमेवर असलेल्या धर्माबाद तालूक्यात गोदावरी नदीवर जो बाभळी बंधारा बांधाण्यात येणार आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशातील पोचमपाड धरणातील एकूण क्षमतेच्या फक्त अर्धा टक्काच पाणी अडणार आहे. हे वास्तव माहिती असूनही चंद्राबाबूनी सर्वशक्तीनीशी हा प्रश्न पणाला लावला आहे. आणि त्याची सुनावनी सर्वोच्च न्यायालयात १६ ऑगस्ट २०१० ला होणार आहे. प्रश्न मानला तर समजूतीनेही सुटू शकतो पण तो संबधीताना सोडवायचा असला तर... कर्नाटकाचाही प्रश्न सोपाच वाटला होता.

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश सिमावादाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतर काही सिमांचाही विचार करुया. जो कदाचीत महाराष्ट्रासाठी भविष्यातली डोकेदुखी ठरणार आहे. गेल्याच आठवडयात सिमांन्तच्या (मुंबईतल्या पत्रकारांचा गट, ज्याच्यावतीने महाराष्ट्राच्या सिमेवर वसलेल्या तालूक्यांच्या आर्थीक-सामाजीक- शैक्षणीक आणि राजकीय परस्थीतीचा अभ्यास केला जातो) निमित्ताने जळगाव जिल्यातल्या चोपडा तालूक्याला जाणे झाले. चोपडा तालूका मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर आहे. ही बॉर्डर म्हणजे वणेर नदी. मुख्यथा आदिवासी वस्ती असलेला वणेर नदीचा परिसर जंगलानी व्यापलेला आहे. खरतंर आता होता असे म्हणायला हवे. कारण गेल्या चार-सहा वर्षात इथे भरमसाठ जंगलतोड झाली आहे. सरकारी नोकरदार म्हणतात याला केंद्रीय वन संरक्षक कायदा २००६ जबाबदार आहे. जंगलतोडी संबधी कलेक्टर म्हणतात या जमिनींवर आमचा अधिकार नाही. या जमिनींचे सात-बाराचे उतारे देण्याचा अधिकार आमच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे कलेक्टर म्हणजे महसूल विभाग मोकळा. फॉरेस्ट खाते म्हणते आम्ही काही करु शकत नाही. लोक रात्रीची झाडं तोडतात. आमच्या हातात बंदुका आहेत पण त्या चालवण्याचं स्वातंत्र्य नाही. जंगल तोडणार्‍याना कायद्याचं छुपं संरक्षण आहे. आणि परिसरातले लोक म्हणतात फॉरेस्ट खात्यात भ्रस्टाचार आहे. तेच जंगलतोडीला प्रोस्ताहन देतात आणि पैसे खातात. राजकीय अनास्था इथेही आहे. या तालूक्यातून तिन आमदार आहेत. त्यातलेच एक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अरुण गुजराथी. त्याच्या रसाळ वाणीतून स्त्रवणार्‍या मधाळ कविता आपण ऐकल्याच असतील.

महाराष्ट्राच्या जंगलांची कत्तल करुन ८३ हजार हेक्टर जमीन सपाट झाली आहे. जंगलतोडीचं दु:ख आहेच पण त्याहीपलिकडचं वास्तव म्हणजे त्या सपाट झालेल्या जमिनीवरची मालकी मध्यप्रदेशच्या आदिवासी शेतकर्‍यांची आहे. जमीन महाराष्ट्राची आणि शेती मध्यप्रदेशची ही स्थिती म्हणजे अगामी सिमावादाची चाहुल आहे.


गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर जिथं सुरु होते त्या सुरगणा तालूक्याची सिमारेषा अगदी न आखताही स्पष्ट दिसते. जिथून गुजरात बॉर्डर सुरु होते तिथून हिरवळही सुरु होते. आणि उलटया दिशेला रखरखाट. इथुन महाराष्ट्र सुरु होतो हे ओळखता येते. या दोन्हीच्या सिमारेषांवर चेकपोस्ट आहेत. एक गुजरातचा जो गुजरातच्या हद्दीत आहे आणि एक महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. काही मिटर अंतरावर असलेल्या ह्या दोनही चेकपोस्टवर महाराष्ट्राचे जे उत्पन्न आहे त्याच्या शंभर पट गुजरातचे उत्पन्न आहे.

महाराष्ट्राच्या एकूण ३६ जिल्यातल्या ३५६ तालूक्यांपैकी २० तालूके दुसर्‍या राज्याना मिळतात. ज्यांच्या सिमारेषा अगदीच पुसट आहेत. अर्थातच अशा बॉर्डरवर भींती घालणे हा उपाय होऊ शकत नाही. पण तरिही इथे त्यांचे आपापसात रोजच्या भेटीगाठीतून काही प्रश्न तयार होतात. त्या प्रश्नाना काही नाजूक वळणं असतात. ती समजून घेऊन वेळीच सोडवली गेली नाहीत तर पुढे त्याचे स्वरुप भयंकर होऊ शकते.

इथं बॉर्डरवर राहणार्‍या लोकांच्या मनातून राज्यांच्या सिमारेषांची गणीतं पुसून गेलेली असतात. त्यांचे आपापसात रोटी-बेटीचे, सलोख्याचे, प्रमाचे संबध असतात. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या मुलीचे बाळंतपण तिच्या माहेरात म्हणजे परराज्यात होते आणि मग जन्माला आलेल्या मुलाची गिनती कुठे करायची हा पेच कलेक्टरला पडतो. कुणी महाराष्ट्राचा असून इतर राज्यात नोंदवला जातो तर कुणाची स्थीती ना घर का न घाट का अशी. काही बिलंदरांची नावे दोन्ही राज्यात. दोन दोन रेशन कार्ड आणि दोन दोन मतदार ओळखपत्र. भाषा हा प्रश्न नसतो. पण तो प्रश्न मानला तर त्याचंही शेवटी राजकारण होतंच. बॉर्डरवर राहणारा दोन्हीकडच्या भाषा लिलया बोलतो. सहज वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून इथं राहणार्‍या लोकांचे रोजचे प्रश्न जरी सुटले, तरी कदाचित तेच उद्याचे वाद ठरु शकतात.


प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

Monday, July 19, 2010

करवटे बदलते रहे....

पूर्वप्रसिध्दी : महानगर (संपादक- वृंदा  शरद बाळ) : जुलै-२०१०

रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र. निसर्गाचं चक्र वर्षानुवर्षे असंच चालू आहे. त्यात आपण आपला क्रम आखलेला असतो. प्रत्येकाला निसर्गानं दिलेली वेळ सारखीच. त्यात ज्यानं-त्यानं आपापली वेळ साधायची. कधी कुणाला हा दिवसाचा वेळ पुरत नाही तर कधी कुणाला तोच दिवस जाता जात नाहीत. दिवस सरतो पण रात्र छळत रहाते.

शेता-शिवारात राबणार्‍या, दिवसभर मान मोडून काम करणार्‍याला गाढ झोप लागते. तर काहिना झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मनगटाच्या घडीवर डोकं ठेऊन आणि शरीराची पुरचुंडी करुन झोपणार्‍याला पेकाटात लाथ पडल्याशिवाय जाग येत नाही आणि गुबगुबीत गालीछावर लोळत पडलेल्यांच्या डोळ्याला झोप शिवत नाही. कुणाच्या झोपेचा ताबा गोड स्वप्नांनी घेतलेला असतो. तर कुणाच्या झोपेला चिंता कुरतडत असते. दिवसरात्रीचा हा खेळ कुणाच्या वाटयाला कसा येईल हे सांगता येत नाही.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे. पावसाची रिपरिप. बाजूलाच बसस्टॉपच्या आडोशाला मी उभा.भरदाव वेगात जाणार्‍या गाडयांचे टायर्स रस्त्यावरच्या पाण्यात सुंदर नक्षी उठवतात. ती ही क्षणभरच. पुन्हा एकजीव पाणी. पुन्हा एकादी नवीन नक्षी. झरझर बदलणारे हे रस्त्यावरचे नक्षीकाम आपल्याला गुंतवून ठेवतं. त्यात वरुन मिसळणारा दिव्यांचा उजेड त्या नक्षित आणखीनच रंग भरीत रहातो. गाडयांच्या वेगाबरोबर वाढत आणि विरळ होत जाणारा आवाज. टायर्सच्या आवाजाची चरचर. पेट्रोलच्या धुरात मिसळणारा प्रकाश आणि पावसाच्या रेघा खिळवून ठेवतात.... आणि तिथं सिटखाली झोपलेला एकजण आपली कुस बदलतो. आपले हातपाय आपल्या अंगाशी आक्रसुन पुन्हा झोपेच्या कुशीत. जन्मापुर्वी आईच्या पोटात बाळ असतं तसं.

रात्री दिड वाजता हवा खायला म्हणून हायवेलगतच्याच झोपडपटटीतून आलेलं एक तरुण जोडपं. त्यातला तो म्हणाला आम्ही इथं नेहमीच येतो. त्याची बायको गर्भार होती. मला त्या झोपलेल्याचं कुतुहल होतं. मी त्याला विचारलं तर हा म्हणाला की तो गेली सहा-सात वर्षे इथंच झोपतो. युपी वरुन आलेला आहे. प्लास्टीक मोल्डींगच्या कारखान्यात दिवसभर काम करतो. घरदार नाही. खाणं पिणं इथं तिथंच. आंघोळ कारखान्यातल्या नळाखाली. कपडे साधेसुधे दोनचार. आणि झोपायला इथं बसस्टॉपवर. हा म्हणाला. आता चांगलीच सोय झाली आहे. पुर्वी साधे उघडे बसस्टॉप होते. तेव्हा याचं कठीण व्हायचं. मग कुठंतरी दुकानाच्या वळचणीला. पण आता किमान पाट टेकता येते. तो उठायची वाट बघत होतो. पण उठला नाही. ते ही दोघं निघुन गेले. मी ही.

पुढ चेकनाक्यावर. ओळीत पंधरा विस रिक्षा. काही काही रिक्षामधून मागच्या सिटमधून बाहेर आलेले पाय. जवळ जाऊन बघीतलं तर आत शरीराची मुटकुळी करुन झोपलेले रिक्षावाले. कुणी जाडजुड मागची सिट बसायच्या सिटच्या वर मागून आडवी टाकतो आणि तिच्या उतारावर उताणी झोपतो. त्यातलेच काही जागे. घोळक्याचे चार-सहा. नाक्यावर, अण्णाकडची चहा पिता पिता मी विचारतो, सोये नही? नही, मच्छर काटती है. जब ऐसी नींद आयेगी की काटनेवाली मच्छर भी याद न आये तब जा के सोयेंगे. तब तक चलता है.

तिथंच दोनचार रिक्षा. गिर्‍हाइकाची वाट बघत. कुणी येणारा जाणारा दिसला की कशीही आडवीतिडवी रिक्षा चालवीत त्याच्या समोर. किधर? गिर्‍हाईक असेल तर निघायचं नाहितर पुन्हा आपल्या घोळक्यात. विचारलं नाईट करते हो? तर हां म्हणाला. पर, आज कल कोई मजा नही है. कोई फॅमीली है तो आती है. बाकी साले सब बेवडे. दो चार रहते है. जबरदस्ती घुस जाते है. ना बोलने पर भी सुनते नही. और भाडा देने के टाईम गालीया देते है. रात का टाईम कौन क्या करे. जादा बोलूं तो मारते भी है. क्या करे? ...धंदा है.

दुसरी बात आज कल ये कॉल सेंटर का धंदा बहुत जोर मे है. उनके लिये रात और दिन एक जैसा. रातभर उनकी गाडीया घुमती है. सबको मालूम है. बस के भाडे मे वो छोडते है. कौन जाएगा रिक्षे से. जहां रिक्षा का भाडा सौ होगा वहा ये लोग दस रुपये मे छोडते है. आजकल रात का धंदा करना बहुत कठीन हो गया है. एखाद-दुसरा भाडा मिल गया तो मिल गया नही तो जय सिया राम.

कभी कभी कोई जंटलमन आता है. हात मे बक्सा. दुर का भाडा. मन मे डेढ-दो सौ की गिनती करते करते उसका ठिकाना आता है. लेफ्ट मे खडी करके दो मिनट मे आता हुं करके चला जाता है. और वापिस नही आता. बक्सा खोलके देखे तो खाली. मन मे ही उसको दो चार गाली दे के रातभर जागते रहने का. उस रात निंद आती नही. और दुसरा भी दिन खराब हो जाता है.

हायवे वर ब्रीज होऊन ट्रॅफीकचा प्रश्न किती सुटला माहीत नाही. पण त्या पुलाखाली काही गरीबांची, भिकार्‍यांची झोपायची मात्र मस्त सोय झाली. इथं झोपणार्‍यासोबत त्याची बायको, दोन चार पोरं टोरं आणि इतरही सगेसोयरे. आजुबाजुला विखुरलेलं सामानसुमान. पुलाखाली एकदम सुरक्षीत. एकमेकांवर तंगडया टाकून, अंगावरचे अस्ताव्यस्त कपडे, आणि बिनधास्त झोप. ताणून दिल्याचा आनंद आणि बेफिकीरी. अधुनमधुन उठणार्‍या खाजेला शांत करीत त्यांची रात्र 'करवटे' बदलत निघुन जाते. पहाटे पहाटे छोटया मोठ्या धंद्याना सुरुवात.

रिक्षा-टॅक्सीवाले, भिकारी, चहा-सिगरेटवाले यांच्या सोबतीने मुंबईतली रात्र पेंगत रहाते. काहींची रात्र छपरांच्या आडोशा- आडोशाने सरत असताना. याच मुंबईत काहींची रात्र मूउशार गादया गिरदयात लोळत असते. एसी बेडरुम, त्यात ऐसपैस आकर्षक बेडस, दिलखेचक रंग-संगती, चकचकीत आरसे, मंदसा उजेड आणि गुलाबी स्वप्न पहात रात्रही रंगीबेरंगी होत असतांना. दुसर्‍या दिवसाची वाट पहात जागणारी, पेंगणारी, काम करणारी मिळेल तिथं डुलक्या काढणारी, विश्वासानं कुठेही मान टाकणारी माणसं मुंबईच्या कुशीत आपापले दिवस रात्रीच्या भयाण वास्तवाच्या आधाराने ढकलत असतात.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

तू भिजत रहा

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # जुलै-२०१०

अन्यतः नकाशे बनवण्याची कटकट वाढलीच असती. पुन्हा गेली पन्नास वर्षे नजरेत भरलेला किंवा बसलेला आकार बिघडला असता ते आणि निराळंच. वर फटाक्यांचा, बॅनरवरचा आपला खर्च वाचला तो वाचलाच ना? (...नाही ...नाही, रांगोळ्या वैगेरे आत्ता नाहीत, पुढच्या वर्षापासून. त्याला आधीपासनंच तयारी करायला लागते.) त्यामुळे एका अर्थानं झालं ते बरं झालं. जर तर चा खेळ नेहमी हरण्यातच मजा असते. कारण हारलेल्याचा सल नेहमी माणसाच्या आशा आकांक्षाना अधिक उर्जा पुरवीत राहतो. विजयाचा आनंद एकदाच किंवा वर्षावर्षानं आठवत राहिला असता एवढंच. एक मे ला कंपनी म्हणून आणखी एक दिवस. त्यावरुन पुन्हा भांडणं किंवा सुवर्णमध्य. मग पुन्हा (शिवाजी महाराज जयंती स्टाईल) शिवसेना, मनसे, भाजपा यांची सुटटी एक मे आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे सरकारी हॉलीडे 7 जुलै. थोडक्यात बेळगावने महाराष्ट्रात येण्याचा मुहुर्त तुर्तास टळला आहे. हे बरंच झालं.

पण एक ना एक दिवस बेळगाव महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे केंद्रालाही माहीत असणार. तिथंली बहुसंख्य जनता मराठी आहे. अगदी आकडेवारीतच बोलायंचं झालं तर ५४.७ % मराठी तर कन्नड भाषिक २३.८ % आणि इतर उरलेले. बेळगावचा मराठी भाग ऐतिहासिक, भाषिक, वाडमयीन, धार्मीक अंगाने महाराष्ट्रीयन आहे. ज्योतिबा, खंडोबा, विठोबा, तुळजाभवानी ही त्यांच्या श्रद्धेची ठिकाणं आहेत. या शहरात एकुण दहा वाचनालयं आहेत. त्यापैकी सात पुर्णपणे मराठी. दोन द्विभाषिक तर एक कन्नड. बहुसंख्य शाळांचे माध्यम मराठी. उर्दु भाषिकांची दुसरी भाषा मराठी. १ डिसेंबर १८९१ साली पंच कमिटी म्हणून स्थापन झालेल्या आणि आता महानगर पालिकेत रुपांतर झालेल्या बेळगाव शहरातील या १३५ वर्षे जुन्या संस्थेचा कारभारही पुर्णपणे मराठीतूनच होत आला आहे. पण पुढे महाजन समितीनेही या मुद्यांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करुन महाराष्ट्राच्या विरोधीच सुर लावला. ते या ठिकाणी इतरत्र देत असलेल्या तक्त्यातूनही लक्षात येईल.

तालूका                         गावे                        भाषिक टक्केवारी


                                                        मराठी                कानडी            इतर

बेळगाव शहर               ...                ५२.००                २३.००             २५.००

बेळगाव तालूका           ९                  ९६.१६                  ...                   ...

अथणी                         १०                 ६१.००                  ३३.००             ६.००

खानापूर                      ५०                ८६.७०                 ...                   ...

कारवार                       ५०                ७८.००                १५.००             ७.००

सुपा                           १३१                ८४.००                   ६.००            १०.००

हल्याळ                      १२०                 ६२.००                 ३२.००              ६.००

हुमनाबाद                  २८                   ६३.००                  १६.००            २१.००

भालकी                      ४९                 ५९.००                  ३०.००            ११.००

संतपूर                       ६२                  ६०.००                  २६.००            १४.००

आळंद                       १०                   ६८.००                  २४.००             ८.००

त्या जनतेला महाराष्ट्रात येण्याची आस आहे. बेळगावातल्या 'महाराष्ट्र एकीकरण समिती' नावाच्या पक्षाचे चार-सहा आमदारही निवडून येतात. अपवाद गेल्या निवडणूकीचा त्याची कारणंही आता आपल्या सगळ्यांना माहिती झाली आहेत. तिथल्या महानगरपालिकेतले बहुसंख्य नगरसेवक मराठी असतात. किंबहुना १९८४ सालापासून आजपर्यंतचे १९ महापौर मराठीच आहेत. आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्य वेगवेगळी असली तरी त्यांचा देश एकच आहे. म्ह्टला तर प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. पण तरीही तो भिजत ठेवलेला आहे. आणि तो भिजत राहण्यातच खरी गंम्मत आहे. लोकशाहीत खरंतर लोकभावनाच प्रबळ ठरायला हवी. तरीही बेळगावचा प्रश्न सुटत नाही. त्याला उत्तरोत्तर आणखीनच पेच पडताहेत. हे खरंच अनाकलनीय आहे.


इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी ती म्हणजे, सिमाभाग हा प्रश्न इतिहासाचा आहे, भुगोलाचा आहे अर्थात भावनेचाच आहे. आणि काँग्रेसला त्यांच्या विरोधकांना फक्त भावनांचे खेळ खेळायला द्यायचे आहेत. भावनेच्या खेळात सामील होणार्‍यांचं शेवटी हसंच होतं. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात हा खेळ चालला आहे. या पुढेही चालणार आहे. त्यामुळे काँग्रेस सहजासहजी बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याच्या भावनेला भीक घालणार नाही, हे नक्की.

बेळगाव, निपाणी, खानापूर,कारवार, बीदर, भालकी असा मराठी बहुभाषिक सिमाभाग महाराष्ट्राला न देता तो गेली ५० वर्षे हा विषय कुजत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्राने हा मराठमोळा भाग मैसूरच्या (कर्नाटक) घश्यात ढकलला होता. भाषावार प्रांतरचनेचे नियम धाब्यावर बसवले गेले. असं करण्यामागे कोणतेही निकष नव्हते. असलेच तर ते महाराष्ट्र द्वेशाचे. खरंतर याच बेळगावात १९४६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या निमित्तानेच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं गेलं होतं. पण अजून झोप उडाली नसल्यामुळे स्वप्नही तशीच आहेत.

गुजरात राज्याची निर्मीती करतांनाही खुद्दा बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई यांनी डांगी भाषा मराठीला जवळची आहे असा अहवाल दिला होता. तरीही लोकल बोर्डाच्या ठरावावर डांग आणि उंबरगाव हा भाग गुजरात मध्ये घालण्यात आला. तेही घोंगडं अजून भिजतंच आहे. उपरवालेके घर मे देर है अंधेर नही असं आपण म्हणतो किंवा मानतो. सर्व पक्षांनी आपली सर्व शक्ती एकवटून 'जोर लगा के...' म्हणत शेवटचा टोला हाणला, सर्व बळ पणाला लावून एक जोराचा धक्का दिला तर बेळगावचा सीमाप्रश्न धक्क्याला लागू शकतो.

बेळगावची जनता दुरदैवाने कर्नाटकासोबत नांदत असली तरी तिचं प्रेम महाराष्ट्रावर आहे. खरंतर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करायला मिळावं असं वाटतंच. वाटायलाच पाहिजे. पण तसं न होण्यातही एक गंम्मत असते. ती हुरहुर आयुष्यभर तरी जपता येते. लग्नानंतरच्या नवलाईचे नऊ दिवस संपले की प्रेम, लग्न, संसार या मार्गाने पुढे सरकलेला गाडा नंतर आयुष्यभर ओढत रहावा लागतो. मग 'याच साठी केला होता का अटटाहास?' असं म्हणण्याची पाळी येते. पण नाईलाजाने का होईना वडीलधार्‍याच्या शब्दाला मान म्हणून आपल्याला न आवडणार्‍या माणसाशीही संसार करावा लागतो. तो जर प्रमाणीकपणानं केला तर पुढे बर्‍याच वेळेला (म्हणजे अश्या प्रकारच्या सगळ्याच सिनेमात) एका पावसात प्रियकराची भेट होते. याची बायको आणि तिचा नवराही अकाली गेलेला असतो. भुतकाळातल्या रम्य आठवणी निघतात. नियतीचे आभार मानले जातात. फुलं फुललेलीच असतात. झरे झुळझुळत असतात. वारे वहात असतात. पक्षी गात असतात. वासरं बागडत असतात. मुलं नाचत असतात. झाडं-वेली डोलत असतात. त्याच वेळी यांनी त्यावेळी गायलेलं गाणं बॅगराउंडला पुन्हा वाजत असतं आणि द एंड. तसं विरोधकांचं राज्य येवो अशी कार्नाटकी विठोबाला आपण प्रार्थना करुया. तेवढीच आपली गंम्मत. गेली हजारो वर्षे कानडा असुनही विठोबाला आपण आपला मानला. आता आपल्याला माहितच आहे की बेळगाव आपलाच आहे पण त्याना काही वर्षे त्याला आपला मानु दे. कारण आपल्यापेक्षा इतिहास, भुगोल आणि परमेश्वराचंही वय जरा जास्तच असतं, नाही का?



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

Sunday, July 11, 2010

केईएम ला केईएम सारखंच ठेवायंच आहे...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०

केईएम म्हणजे आरोग्य क्षेत्रातली दंतकथा. जन्म मृत्युसोबत इथं जगण्यातल्या तमाम दुखांचीही नोद होत असते. माणसा-माणसातले संबंध, नात्या-नात्यातली वीण, कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सगे-सोयरे यांच्यातल्या भावभावनांचा खेळ इथंच बघायला मिळतो. आपल्या-परक्याची सिमारेषा सुस्पष्ट दिसायला लागते ती इथंच. आपल्या माणसासाठी रात्र रात्र जागणारी आणि केवळ उपचार म्हणून मारी बिस्कीटाचा पुडा आणि नारळातलं पाणी पुढे करुन तोंडदेखली चुकचुकणारी कित्तेक माणसं याच केईएमनं पाहिली आहेत. वेदना, यातना, पिडा या शब्दांचा कचरा इथं जागोजाग साचलेला दिसतो. आक्रोश आणि आसवांची तर गिनतीच नाही. 'मी'च का? माझ्याच वाटयाला हे सर्व का? असं म्हणून परमेश्वरालाही थेट जाब विचारावा, धारेवर धारावं अशी ही जागा. पाप-पुण्याचा हिशोब मांडायला फुरसत मिळते ती ही इथंच. इथून निघतांना माणूस दोनच गोष्टी बाहेर घेऊन जातो, ते म्हणजे आनंद किंवा दु:ख. कुणाचा वाटा कोणता आहे, कुणाच्या नशीबी कोणते भोग यावेत याची कुंडली काळ मांडत असतो आणि या भोगाची तिव्रता कमी करण्यासाठी अहोरात्र कष्टत असतात डॉ. संजय ओक आणि त्यांचा परिवार.
डॉ. संजय ओक केईएमचे आजचे डीन. पाउणशे वर्षांच्या इतिहासाचे आत्ताचे साक्षिदार. नुकतीच आरोग्य सेवेतली त्यांनी एकवीस वर्षे पुर्ण केली. त्या निमित्तानं त्यांच्याशी बातचीत. गरीब कुटुंबातून वर आलेल्या डॉक्टरचा प्रवास आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा लेखाजोखा.

डॉक्टर व्हावसं का वाटलं?

एकतर आपल्या हुशार मुलांनी डॉक्टर व्हावं असं स्वप्न आपल्या आईवडीलांनी पहाण्याचा तो काळ. माझ्या वडिलांची मी डॉक्टर तेही सर्जन व्हावं अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. घरातलं वातावरण मी डॉक्टर होण्यास अनुकुल ठेवलं. त्यामुळंच मी शिवाजी विद्यापीठातून एम.बी.बी.एस आणि एम.एस पुर्ण केलं.

मुंबईत कसे, कधी आलात? केईएम चे डीन होऊ असं वाटलं होतं?

१९८६ साली. माझं अकॅडेमीक करिअर चांगलं होतं. ते बघून डॉ. स्नेहलता देशमुख यांनी मला एक पत्र पाठवलं आणि मुंबईत बोलावून घेतलं. आणि मग सुरुवातच झाली. गेल्या १ जुलैला या गोष्टीला एकवीस वर्षे पूर्ण झाली. आजही मला ते दिवस लख्ख आठवतात. मुंबईतलं असं कोणतही मोठं हॉस्पिटल नसेल जिथे मी नोकरी केली नाही. केईएम चा डीन होईन असं स्वप्नातही नव्हतं. मी माझं काम करीत गेलो. डीन होणं ही चांगल्या कामाची पावती आहे असं मी समजतो.

रॅगींग या विषयाकडे तुम्ही आज कसे बघता? मुन्नाभाई एमबीबीएस मुळे तो विषय जरा जास्त अधोरेखीत झाला होता. अधुनमधुन वर्तमानपत्रात वाचायलाही मिळतं..

मी ही विद्यार्थीदशेत असतांना सुरुवातीला रॅगींगचा बळी होतो. पण त्याचं प्रमाण अगदीच मामुली होतं. व्हर्बल कमेंटस किंवा गाणी म्हणून दाखव या टाईपमधलं. पण पुढे पुढे धीर चेपला. नंतर याच कॉलेजात मी विद्यार्थी नेता होतो. खाजगीकरणाविरोधी आम्ही आंदोलनंही केली होती.
आज रॅगींग प्रतिबंधक कायदा अस्तीत्वात आहे. त्याला कठोर शिक्षाही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्याला आळा बसला आहे. पण बळी तो कान पिळी या न्यायाप्रमाणं काही गोष्टी छुप्या पध्दतीनं चालू असतात. आज त्याचं प्रमाण निश्चितच कमी झालं आहे.

डॉक्टर झाल्यावर स्वतंत्र खाजगी प्रॅक्टीस करावी असं वाटलं नाही? काय कारणं होती पैसा, आत्मविश्वास की मराठी माणूस...?

त्याही काळी सरकारी नोकरीपेक्षा खाजगी क्षेत्र चढणीलाच होतं. पण नोकरीच करायची असं पहिल्यापासूनच ठरवलं होतं. आणि या माझ्या ठरवण्याला पुर्ण आकार दिला तो देशमुख बाईनी. ज्या मला माझ्या आई समानही आहेत. आजही त्यांच्याशी माझे स्नेहाचे संबध आहेत. त्यांनी माझ्यातला शिक्षक जागा केला. माझ्या भविष्याची दिशा ठरवून दिली. त्याचबरोबर डॉ. प्रकाश जहागीरदार. असे शिक्षक मार्गदर्शक मिळायला भाग्य लागतं. ते मला मिळालं. त्यामुळं इतक्या वर्षातल्या सरकारी सेवेचा मला पश्चाताप नाही. आज सहावा वेतन आयोग आहे. तेव्हा तो ही नव्हता. महिन्या अखेरीचा पगार मध्यमवर्गासारखा मलाही जेरीला आणायचा. पण कामाचं समाधान त्याच्याही पेक्षा शतपटीनं असायचं. जे सुख शांती, समाधान आणि सौभाग्य मला सरकारी नोकरीनं दिलं ते खाजगी प्रॅक्टीसनं कधीही दिलं नसतं. मला आजही माहीत आहे आणि तेव्हाही माहीती होतं की मी जे महिन्याला कमावतो आहे ते मला रोज छापता आलं असतं. पण पैशापेक्षाही वेगळी दुनीया असते ती मला या नोकरीनं दाखवली. खाजगी प्रॅक्टीस करुन मिळवलेला निव्वळ पैसा ते करु शकला नसता.... आणि मराठी म्हणशील तर तो मी आहेच.

या व्यवसायात कट प्रॅक्टीस, रिपोर्ट्सचं रॅकेट जोरदार आहे...

हे अगदी सुश्रुताच्या काळापासनंच चालत आलं आहे. डॉक्टर म्हणजे देव तरी असतो किंवा यम तरी, अश्या स्वरुपाचे श्लोक तेव्हाही पहायला मिळायचे. सरकारनं काही थेट ह्स्तक्षेप केला नाही तर हे टाळता येणं अश्यक्य आहे. आणि आपला वेळ प्रसंगी खिश्याला चाट देऊन रुग्णांना मदत करणारेही अनेक डॉक्टर आहेत. जिथं वाईट आहे तिथं चांगलंही आहे. आज केईइएम मध्ये कधी कधी अडीच अडीच लाखाच्या सर्जरी विनामुल्य होतात. तपासण्या, औषधांचा खर्चही नगण्य असतो. हे ही आहेच की...

बोगस किंवा अनधिकॄत डॉक्टर झोपडपट्ट्यातून दिसतात. त्यांच काय?

त्यांना आळा घालणं हे राज्य सरकारचं काम आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सील सारख्या संस्था आहेत. जे याला आळा घालू शकतात. आम्ही म्हणजे महानगरपालिकेच्या असे डॉक्टर निदर्शनास आले तर आम्ही त्याची यादी सरकारकडे सोपवतो. त्यांचं पुढ काय करायचं हा निर्णय सरकारचाच असतो.

सरकारी नोकरीच्या काही मर्यादा असतात का? तुमचा काय अनुभव...

सरकार ही एक चौकट असते. पण त्या चौकटीतही स्वातंत्र्य असतं. ते आपलं आपल्याला कळलं पाहिजे. या चौकटीत काहीही न करताही रिटायर्ड होता येतं. पण चॉईस आपला असतो. काही निर्णयांना उशीर होतो. मंजूरी लागते. पण ही त्या कामाची, यंत्रणेची गरज असते. ती गरज आपल्याला कळली की काम सोपं होतं. नुसतंच सरकार वाईट असं म्हणून चालत नाही. त्याच्या चांगल्या बाजू लक्षात ठेऊन आपल्याला नांदावं लागतं. कारण आपला संबध काम होण्याशी असतो. ते करवून घेण्याचं कौशल्य कलेकलेनं आपल्यात डेव्हलप होत जातं. जर ही यंत्रणा नाकाम असती तर ती इतके दिवस टिकून राहिली नसती. तीची म्हणून तिला एक स्ट्रेन्थ आहे. ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज मी इथपर्यंत पोहोचलो म्हणजे हे मला कळलं आहे, नाही का?

डॉक्टरांचे संप त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. या व्यवसायाला काही पथ्य असावीत की इतर व्यवसायासारखाच हा ही व्यवसाय मोजला जावा? आपल्याला काय वाटते?

दुर्दैवानं आता डॉक्टरी पेशालाही व्यवसायाचं स्वरुप आलंय. ते टाळता येण्यासारखं नाहीये. पण व्यवसायाच्या पलिकडेही जाउन जेव्हा रुग्णांच्या जीवाशी खेळ चालतो तेव्हा ते फारच भयावह वाटतं. आणि संपाचं म्हणशील तर आता सगळ्याच क्षेत्रात एक प्रकारची जागरुकता आलेली आहे. प्रत्येकाला आपल्याला मिळणार्‍या सुखसोई कायम कमीच वाटतात. ज्यानी त्यानी आपल्या मागण्यांसाठी आग्रह धरणं चुकीचा नाही म्हणता येणार. पण त्यासाठी दुसर्‍याला वेठीस धरणं चुकीचंच आहे. डॉक्टरांच्या संपाच्या वेळी रुग्णांचे हाल होतात. हे खरं आहे.

प्रत्येक डॉक्टरने खेडयामध्ये जाऊन काही काळ प्रॅक्टीस करावी असा कायदा आहे. पण तो मात्र मानला जात नाही...

याला कारण विद्यार्थ्यानी डॉक्टर होण्यासाठी घातलेला पैसा. डॉक्टर म्हणजे पैसे छापण्याचं मशीनच बनला आहे. आणि कायद्याच म्हणशील, तर कायदा म्हणतो खेडयात जा नाहीतर एक लाख भरा. आज लाख रुपये सरकारच्या तोंडावर फेकून आपली सुटका करुन घेणारे कित्तेक आहेत. खरंतर खेडयात आज डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे. अगदी ठाण्यापलिकडे चार्-पाच किलोमिटर गेलात तरी तिथं कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या सोई नाहीत. मला वाटतं हे जर खरोखरच असं व्हावं असं सरकारला वाटत असेल. तर तो अभ्यासक्रमाचाच भाग बनला पाहिजे. प्रत्येक डॉक्टरला खेड्यात जाणं कम्पलसरी करायला हवं यातूनच ते हाऊ शकतं. जसं परदेशात मिलिटरीची नोकरी करणं प्रत्येक डॉक्टरला सक्त्तीचं असतं, तसं इथंही व्हायला पाहिजे.

सरकारी खात्यात नवीन दाखल झालेल्या मशीन्स/उपकरणे बिघडली तर ती दुरुस्त करण्याची तजवीज नसते. आपल्या हॉस्पीटलमध्ये असे बंद पडलेले विभाग किती आहेत?

सुदैवानं केईएम मध्ये असं नाही. आज प्रत्येक विभागात बसवलेली अद्ययावत यंत्रणा चालू स्थीतीत आहे. याला कारण म्हणजे आम्ही तशी सोयच करुन ठवलेली आहे. कोणतही नवीन मशीन घेण्याबरोबरच आम्ही कमीतकमी पाच वर्षाचं अन्युअल मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्टच करतो. प्रत्येक मशीन बरोबर मुळ कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देते. त्यानंतरची पाच वर्षे. कदाचीत यात अधीक पैसे जातात. पण हेतू साध्य होतो. आणि केइएम सारख्या रुग्णालयात कुठलंही मशीन आठ वर्ष राहिलं तरी खुपच झालं

रात्री अपरात्री कधीही केईएममध्ये कुणालाही मुक्त प्रवेश घेता येतो? केइएम हॉस्पिटलच्या सुरक्षे विषयी कोणत्या सोयी आहेत? त्या पुरेशा आहेत का?

सुरक्षेच्या बाबतीत मी समाधानी नाही. कारण सुरक्षा रक्षकांची संख्या फारच कमी आहे. इथं महिला सुरक्षारक्षकांचीही गरज आहे. कारण काही महिला मार्‍यामार्‍याही करतात. त्यावेळी पुरुष सुरक्षारक्षकाला नुसतं बघत राहण्यापलिकडे काहिच करता येत नाही. अठराशे बेडचं हॉस्पिटल. तेवढेच किंबहुना याहुन जास्त रुग्ण. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक. त्याना बघायला येणारे असा पाच-सात हजार माणसांचा जथा रोज केईएमच्या आवारात असतो. त्याला आवर घालणं निश्चीतच सोपं नाही.

आणि केईएम्च्या सुरक्षा यंत्रणेचा कार्यभार डीन च्या अखत्यारीत येत नाही. त्याला स्वतंत्र खातं आणि त्याचा कमिशनर वेगळा असतो.

स्वच्छतेच्या बाबतीतही इथं अशीच अवस्था आहे...

आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. पण येणारी माणसं आपल्या सवयीनाही बरोबर घेऊन येतात. थूंकणे हा आपला जन्मसिध्द अधिकार असल्यासारखी माणसं वागतात. जिथे थुंकु नका असं लिहिलेलं असतं त्यावरही माणसं थुंकतात. आम्ही एक रंगरंगोटीचा अभिनव उपक्रम केला होता. प्रवेशद्वाराजवळचे खांब आम्ही रोज सकाळी रंगवून घ्यायचो. पुन्हा रात्रीपर्यंत तो पिचकार्‍यानी रंगलेला असायचा. स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या कर्मचार्‍यांनी कितीही खबरदारी घेतली तरी ती कमीच वाटते. लोकांनीही आम्हाला मदत,सहकार्य करायला हवे.

खाजगी मदत किंवा कॉर्पोरेट पार्टनरशीपचा काही विचार करता...

असे अनेक प्रस्ताव आहेत. पण हे मानायला युनीयन्स तयार होत नाहीत. त्याना खाजकीकरण होईल की काय याची भीती वाटते.

युनीयनचा आणि व्यवस्थापनेचे संबंध कसे आहेत?

जसे इतर ठिकाणी असतात तसेच. प्रत्येकानी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली की आम्ही व्यवस्थापन म्हणूनही आमची जबाबदारी टाळत नाही. माझे सगळ्याच म्हणजे जवळजवळ सहा युनीयन्सची संबध चांगले आहेत.

तुमच्या कारकिर्दीत सुरु झालेला एखादा उपक्रम...

इथे जवळजवळ साडेतीन हजाराहुन जास्त स्टाफ आहे. ज्यांचा रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी रोजचा संबध येतो. कर्मचारी आणि इथं येणार्‍या माणसांचं प्रमाण कायम व्यस्त असतं. डॉक्टरांनी, नर्सेसनी, वॉर्डबॉयनी आपल्याशी बोललं पाहिजे. आपलं दु:ख समजून घेतलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य होत नाही. त्यामुळे कधी कधी गरज नसतांनाही एकमेकांतले संबध ताणले जातात. आणि मग मारामार्‍यापर्यंत प्रकरणं येऊन पोचतात. याला आळा बसावा त्यासाठी अगदी ऑर्डबॉय, आया पासून ते डॉक्टरांपर्यंत आम्ही सॉफ्टस्किल डेव्हलप करण्याचा प्रोग्राम आयोजीत केला आहे. त्याचे परिणामही चांगले दिसताहेत.

लिखाणाची सवय कधीपासूनची...

पहिल्यापासूनच लिहितो. आजवर माझी छत्तीस पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. कधी व्यवसायाचा भाग म्हणून तर कधी मनातलं सांगावसं वाटलं म्हणून. लिहित असतो. आजही माझं काही वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिणं चालू असतं. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. यातून लोकांशी थेट संवाद साधता येतो. लिहित राहणार आहे.

आजवरच्या सेवेत आपण समाधानी आहात? पुढची काय स्वप्नं आहेत?

हो नक्कीच... मला सरकारी नोकरीनं जे दिलं आहे ते खाजगी प्रॅक्टीस नक्कीच देऊ शकली नसती. आणि स्वप्नाचं बोलायचं झालं तर मला केईएम केइएमसारखं ठेवायचं आहे. जिथं जात, धर्म, राज्य, प्रदेश याच्या सिमा ओलांडून माणसं आपल्या बरेपणासाठी येतात. इथं येतांना त्यानी हक्कानं यावं. संगवरवरी फरश्यानां, रंगीबेरंगी भिंतीना, कडेकोट बंदोबस्ताला आणि थंडगार एसीच्या गारव्याला बघुन बुजता कामा नयेत. हा परिसर, इथला स्टाफ, इथली जमीन त्याना आपली वाटायला पाहिजे. आज वाटते तशी.


प्रवीण धोपट

99672 93550

pravindhopat@gmail.com

जिथे सागरा धरणी मिळते...

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०

अथांग निळा समुद्र. सुसाट सळसळता वारा. लाटांची गाज. आजुबाजुत पसरलेला ओला गारवा. क्षितिजावर काळ्या प्रकाशाची आभा. लाटेमागून लाट एका संथ लयीत किनार्‍यावर उतरत रहाते. मनाला गुंतऊन शरीराला रिझवत ठेवते. समुद्रावर लवलवणारा वारा पाण्याला खेळवत राहतो आणि काठावरुन पाण्यात पडणारे प्रकाशाचे कवडसे वरवर नाचत राहतात. मधुनच पडणारी पावसाची सर पाण्यावर थरथरत रहाते. दिवसभराचा शीण मऊशार वाळूत निथळत राहतो आणि आपण अधिक ताजेतवाने, फ्रेश होत जातो. मन वाळूत रुतुन बसतं. पाय निघायचं नाव घेत नाहीत.

...आणि शिटयांच्या आवाज कानावर येतो. ती पोलिसाची असते म्हणून. आता निघावंच लागतं. आणि आपण पुन्हा सिंमेंटच्या चकचकीत जगात. माणसांच्या दुनियेकडे पाठ फिरवून उभं राहिलं तर जगातल्या कोणत्याही समुद्राची गोष्ट वेगळी नसावी. आपल्याच तंद्रीत, आपल्याच नादात. असाच मुंबईचा जुहु समुद्रकिनारा. मुंबईच्या सौंदर्यातली एक नखरेल अदा.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास बांधाच्या आडोश्याने, दगडांच्या कुशीत, वाळूत, बसलेली-लपलेली जोडपी घराकडे निघायच्या तयारीत. अंगाला चिकटलेली वाळू झटकत रुतलेल्या पावलांना ओढत सोबतचा आधार घेत धिम्या पावलांनं परतीला लागतात. जशी रात्र चढायला लागते तसे एक एक करुन माणसांचे पाय उलटया दिशेने चालायला लागतात. बारा साडेबारा नंतर उरतात ते श्रीमंत आणि सडाफटींग. त्यांच्यावर लक्ष ठेवायला पोलीस. त्यांच्या पोटाची भुक भागवणारी दुकानं आणि पेटलेल्या शिरीराची आग शमवणार्‍या पोरी.

जुहु पोलीस चौकीच्या तोंडावरुन समुद्रकिनार्‍यावर प्रवेश केला की उजव्या अंगाला लागतात ती खानपानाची दुकानं. पण पुर्वीसारखां मुंबईच्या किनार्‍यावरचा ऐसपैसपणा गेला आणि त्यांची जागा या पॉश दुकानांनी घेतली. दिलखेचक रंग, आकर्षक सजावट, भगभगणारा उजेड माणसाना आपल्या दिशेनं ओढत रहातो. पुर्वीचे भेळवाले, पाणिपुरीवाले भय्ये नेस्तनाबूत झाल्यासारखे. आता बहुतेक दुकानांचे मालक मुसलमान, गुजराती, मारवाडी. पावभाजीच्या दुकानावरची दोन पोरं ओरडून ओरडून दुकानाकडे गिर्‍हाईकं खेचत होती. त्यातल्याच एक म्हणाला, 'अभी बारीश है ना. इसलिये. पयले जैसा मजा नही. अभी कुछ नही. पयले घोडा गाडी थी. घोडे की सवारी थी. बच्चोंके लिये गेम थे. सर्कल थे. सोरट था. क्या नही था इधर. पुरा एंजॉयमेंट था. अभी चौपाटीका नक्षा ही बदल गया. मजा नही. कुछभी मजा नही.'

आपला कॅमेरा आणि सँपलचे लॅमिनेट केलेले फोटो हातात घेऊन एकानं विचारलं, तर नाही म्हणाल्यावर खट्टु झाला. हमारे पास मोबाईल है उससे खिचेंगे तर म्हणाला' ये मोबाईलने हमारे धंदे की गांड मारी है. त्याच्यासारखी विस-बावीस वर्षांची पाच-सहा पोरं डिजीटल कॅमेरा घेउन हा फिरता धंदा करीत होती. पुर्वी पैसे पुर्ण चुकते करुन घरी पोस्टाने आठ-दहा दिवसानी फोटो मिळायचे. आता तिथल्यातिथे पाचएक मिनिटात कॉपी काढुन देण्याची सोय आहे...तरीही ही अवस्था. त्यातूनही काही हौशी असतातच.

समुद्रकिनार्‍यावर उजाव्या साईडला चालत दोन-तिनशे मिटर गेलं की काली बस्ती आहे. हॉटेल रामदा पाल्म ग्रोव्हच्या मागच्या बाजूस. अंधुकसा उजेड. लांबून पाहिलं तर माणसांच्या काळोख्या प्रतिकृती. दहा एक मिटरवरचं दिसतं. जवळ गेल्यावर तिथं तुरळक पंधरा-वीस माणसं काही बसलेली काही भिरभिरलेली. कुणा कुणाशी तुकडया तुकडयानं बोलत काही बायका. एक बाई जवळ आली. बंगाली होती. गोरीपान. मध्यम बांध्याची. चमकदार साडी. चेहर्‍यावर जाडसर मेकअप. म्हणाली, क्या ...टाईमपास? मी म्हणालो, नही ऐसाही. ...चलेगा? किधर? इधरही. तिनं बोट दाखवलं तिथं चिंचोळा बोळ होता. क्या करोगी. क्या करनेका बोले तो... हिलानेका, दबानेका, इंजॉय करनेका. कितना? सौ रुपया. वो काम नही करती? ...उसका तिनसो रुपया. मी काहीच बोललो नाही...ती, जाने का है क्या? घर जाने का टाईम हो गया. खाली पानी निकालने का है तो बोल पचासमे...मी तरीही काही बोललो नाही तर म्हणाली फोकट का टाईमपास.

मघापासून तिथंच रेंगाळत एकजण उभा होता. ती त्याच्याकडे सरकली. दोन-चार सेकंदाचंच बोलण झालं.. आणि ती दोघं आत समुद्राकडे निघाले. आता वीसेक पावलं चालल्यावर त्यानं इकडेतिकडे पाहिलं. पोजिशन पक्क्या झाल्या. गरजे पुरते कपडे वर(तिचे) खाली(त्याचे) गेले. उभ्या उभ्याच ती दोघ एकमेकांत घुसली. ती अनुभवी होती. त्याला पुरेसा स्पेस करुन देत होती. पाच सात मिनिटांचा हा समागमाचा खेळ सागराच्या पार्श्वभुमीवरचा अजिंठया-वेरुळाची आठवण देऊन गेला.

रात्रीचा दिड वाजतो. शिटया वाजवत पोलीस यायला लागतात. माणसं आपलं आपण समजतात. हातात काठी, बॅटरी घेऊन इथं तिथं शोधत राहतात. कुणी भेटलाच तर निघायची खुण करतात. दोन पर्यंत किनारा सुनसान होतो. आता एखाद-दुसर्‍या कुत्र्यापलिकडे तिथं कुणीही नसतं. आता खाण्याच्या स्टॉल्सवर गर्दी उसळते. पावभाजी, कालाखटटा, भेळपुरी, ज्युस, पानाची दुकानं आपोआप फुलतात. गळ्यात टोपली अडकवून सिगरेट- गुटका विकणारा विकता विकता थकुन जातो. आणि मागून पोलीस शिट्या वाजवीत, काठ्या आपटीत राहतात.

निघताना सुर्यही रेंगाळतो. माणसांचंही तेच. मधल्या चौकात फॅशन परेड असावी तसा आठ-दहा पंधरा ते पंचवीसमधल्या तरुण पोरींचा घोळका हसत खिदळत असतो. कुणी झुलत, कुणी बिचकत, कुणी थेट एखाद्या पोरीला गाठतो. बोलतो. पटलं तर तिला रिक्षात बसवून निघून जातो. अडीचच्या सुमारास पोलीसांच्या शिट्यांचा जोर आणखीन वाढतो. हा शेवटचा इशारा आता प्रत्येकालाच कळतो. आता चौकीच्या कठड्याला रेलून चार-सहा पोलीस. रस्ता, मैदान, बससॉप निर्मनुष्य. रिक्षा, टॅक्सीज, बाईक्स, श्रीमंत मुलांच्या कार्स झर झर डोळ्यापुढून सरकत रहातात.


आता सारं संपलं आहे असं वाटायला लागतं आणि एका गावावरुन दुसर्‍या गावावर ढग सरकावेत तसं जुहु तारा रोड माणसानी भरायला लागतो. आता त्या मुली तिथं जाऊन उभ्या राहतात. पंधराशे रुपयाच्या खाली उतरत नाहीत. सि-प्रिन्सेस होटेलपासून जुहुतारा रोडपर्यंत रिक्षांची प्रदक्षिणा चालू असते. त्यात बसलेल्या पोरी रस्त्यावर उभ्या असलेल्या, बाईक्सवर रेललेल्या, आणि कारच्या काचा खाली सरकाऊन वाट बघत असलेल्या गिर्‍हाईकांशी दोन-दोन शब्द बोलत रहातात. संभाषणाची क्लोजींग लाइन रिक्षावाल्यालाही कळते त्यानुसार तो आपल्या एक्सलिएअटरवरची मुठ फिरवत, आतल्याआत त्यांच्या बोलण्याला गती देत रहातो. त्याच रस्त्यालगत काही मध्यमवयीन माणसं उभी असतात. येणार्‍या जाणार्‍या कारमधुन- बाईकवरुन कुणीतरी त्यांच्याजवळ थांबतं, बोलतं, निघुन जात. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं, तिथं (आता जिथं बांधकाम चालू आहे) काही छोटेखानी बंगले होते. त्यात पंधरा-वीस पोरी ठेऊन बंदिस्त धंदे चालायचे. ते आता बंद झाल्यामुळे गिर्‍हाईकांचे वांदे होऊ नयेत म्हणून ती माणसं मार्गदर्शन करीत होती. खारला सोळाव्या रस्त्याला शेर्-ए-पंजाब नावाचं हॉटेल आहे तिथं कुठतरी फ्लॅटवर हे लोक गरजवंताला घेऊन जातात. तिथं घेऊन जायचे यांना पन्नास-शंभर रुपये द्यायचे. जमलं तर तिथं बाविसशे रुपये खर्च करुन पोरीसोबत तास घालवायचा.

अर्ध्या किलोमिटरच्या जुहुच्या रस्त्यावर एकच धंद्यातील मालाचा दर पन्नास रुपयापासून बाविसशे रुपयांपर्यंत. साईज इधर्-उधर. मुंबईनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या जगण्याची सोय केली आहे, हेच खरं. कुणाच्याही वेळेची आणि भुकेची गाठभेट करुन द्यायला मुंबई सदैव एका पायावर तयार असते.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

Friday, July 2, 2010

सैनिकहो तुमच्यासाठी...

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जुलै-२०१०


सैनीकांच्या आधी महाराष्ट्रात कार्यकर्ते रहात होते. महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ ही ओळख महाराष्ट्र अनेक वर्ष अभिमानानं अंगाखांद्यावर खेळवत आला आहे. आजही कुणी तसं म्हटलं तर पुर्वीचा काळ आठवून माणूस भुतकाळात रमतो. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी विचारानं या कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्राला दिली. मंथन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण हे शब्द नव्या परिमाणासकट कार्यकर्त्यांच्या रोमारोमात भिनायचे. कार्यकर्ता बोलायला लागला की त्याच्या शब्दाशब्दातून विचाराची एक एक लडी उलगडत जायची. 'आपण समाजाचं काही देणं लागतो' हे केवळ वाक्य नसायचं तर त्यासाठी माणसं आपल्या आयुष्याची आहुती द्यायचे. आपापल्या कुवतीप्रमाने जो तो समाजाला आपलं योगदान देण्यासाठी आतुरलेला असायचां. भारलेला असायचा.

त्या काळात नेताही आपली ओळख 'कार्यकर्ता' अशी करुन द्यायचा. तेव्हा तो आपला, आपल्यातलाच वाटायचा. आपल्यासारखेच त्याचे कपडे असायचे. आपल्यासारखंच त्याचं घर असायचं. असलीच तर आपल्यासारखीच त्याची नोकरी असायची. आपल्यासारखेच त्याचेही प्रश्न असायचे. आपलेपणावर वसलेली समाजाची व्यवस्था असायची. सामान्य कार्यकर्यांची दु:खं नेत्याला माहीत असायची आणि नेत्याच्या घरातला रुबाब कार्यकर्त्यालाही माहीत असायचा. नेत्याच्या साधेपणाची समाजात चर्चा असायची आणि कार्यकर्त्याच्या तडफेचं नेत्याला कौतुक असायचं.


शिवसेनेच्या जन्माबरोबर कार्यकर्ता मेला. त्याच्या जागी सैनीक आला. पण त्याच्या ठाई जुन्या कार्यकर्त्याचा आब, पोक्तपणा नव्हता आणि सैनीकाची शिस्तही नव्हती. शिष्ठाईची जागा हुल्लडपणानं घेतली. विचाराची जागा आदेशानं घेतली. विचार आचरणासाठी असतो आणि आदेश फक्त पाळण्यासाठी. विचारांच्या आचरणात भुतकाळाचं तारतम्य असतं आणि भविष्याचं भान असतं तर आदेश पाळण्यात निव्वळ वर्तमानाचं दडपण आणि अस्तीत्वाची भीती असते. या अस्तीत्वाच्या भीतीनं माणूस फक्त गांगरुन जातो. भेदरुन जातो.


शिवसेनेच्या जन्मापासून आजतागायत मराठी माणूस फक्त भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याला कसल्यातरी अनाठाई भीतीनं, चिंतेनं ग्रासलं आहे. ही भीती ही चींता कशाची आहे हे त्यालाही अजून कळलेलं नाही. आपण मराठी असल्याचा अभिमान वाटण्याऐवजी तो त्याचा न्युनगंड बनला. मराठी माणसाचं मराठीपण समजून घेण्यात मराठी माणूस कायम चुकत राहिला. त्याला फक्त सण-समारंभ साजरे करण्यात गुंतवून ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला शिकवलं पण महाराजांची थोरवी शिकवली नाही. इतिहासाची पानं चाळून दाखवली पण वाचायला दिली नाहीत. वर्तमानातली तत्कालीक दु:ख दाखवली पण भविष्याचं स्वप्न दिलं नाहीत. त्यामुळे गेली चाळीस बेचाळीस वर्षे मराठी माणूस फक्त शाखेभोवती घुटमळत राहीला. न चुकता दसर्‍याला शिवाजी पार्कवर आणि वाढदिवसाला मातोश्रीवर हजेरी देत राहीला.


इंग्रजांच्या काळापासनच मुंबई ही एक व्यापारी पेठ आहे. इथे कुणासाठीही व्यापार- उदीमाची संधी सारखी आहे. हे दुर्दैव आता आपण मुकाटपणानं सोसतो आहोत. पण वडापावच्या गाडया, आणि झुणका भाकरीची केंद्र उभी करण्यापलिकडे शिवसेनेनं मराठी व्यावसाईकाला कोणतीही ताकद दिली नाही. शिवसेनेने व्यावसाइक तयार केले असतील तर ते फक्त कॉन्ट्रक्टर धर्तीचे. त्याना व्यावसाईकाच्या दॄष्टीपेक्षा मुकादमाची नजर दिली. नोकरीच्या लढयात त्याला जेवढं गुंतवून ठेवलं त्याच्याऐवजी जर त्याला व्यवसाय-धंद्याचेही धडे दिले असते तर आज पाचाचे पंचवीस झाले असते. त्यामुळे आज मराठी माणसाला आहे त्या परस्थीतीत मारुन-मुटकुन जगावे लागत आहे. नोकरी सांभाळण्याच्या कसरती करीत आयुष्यभर नोकरदार बनुन राहण्यापेक्षा तो आज मालक बनून ऐशोआरामात राहिला असता. तरीही जे मराठी व्यावसायीक म्हणून मोठे झालेले आहेत ते स्वतःच्या कष्टानं उभे राहिलेले दिसतात. पण त्यांचाही वर्गणीपलिकडे आणि सोविनिअरच्या जाहिराती पलिकडे यांनी कधी विचार किंवा वापर केला नाही. त्याचे भोग मराठी माणूस भोगतो आहे, भोगणार आहे. आज नोकर्‍यांची संधी नाही आणि भांडवलांची तजवीज नाही. त्यामुळे मराठी माणसाची 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था आहे.

शिवसेनेच्या पाठीपुढे असलेला बहुसंख्य मराठी माणूस हा अर्धामुर्धा शिकलेला आहे. गावातून मुंबईत आलेला आहे. झोपडपट्टीत, चाळीतून राहणारा आहे. त्याला शिवसेनेचा आधार वाटणं हे स्वाभावीकच होतं. अर्थकारणाच्या लढाईत त्याला गोंजारणारं कुणीतरी हवंच होतं. या अर्ध्याकच्या मराठी माणसाच्या हातात कायमचं जगण्याचं हत्यार देण्यापेक्षा शिवसेनेनं त्यालाच आपलं हत्यार बनवलं. त्यामुळे मोर्चा असेल, बंद असेल, सभा असेल तेव्हा हाच मराठी माणूस व्यवस्थीत वापरला गेला. मोर्च्याला, सभेला, बंदला वेगळे आणि सेटींग, मांडवलीला वेगळे. त्यामुळे यातली काही मराठी माणसं कायमची मोठी झाली आणि उरली ती कायमसाठी आहे तिथंच राहीली.


महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे (मधली साडेचार वर्ष वगळता) सत्तेच्या मखमली खुर्चीवर काँग्रेसचं सरकार आहे. आणि लोकशाही शासन व्यवस्थेत कोणत्याही खुर्चीला सर्वसामान्याच्या दु:खापेक्षाही हितसंबधाचं राजकारण करण्यातच जास्त रस असतो. ते राजकारण खेळण्यात काँग्रेस पटाईत आहे. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी कोणताही संबध नसतांना ते निवडणूकीच्या शर्यतीत कायम निवडून येतात यातच सारं येतं. आणि अशीच अवस्था राहिली तर कदाचीत यापुढेही हेच होत राहील. कोणतेही सरकार समाजाच्या विकासाचा विचार करीत नाही असे नाही. पण त्यात सर्वसमावेशकता असते. अमुक एक समाज त्यांच्या डोळ्यासमोर नसतो. त्यामुळंही सरकार मराठी माणसाचा विचार करीत नाही असं वाटत रहातं. आणि हे वाटत रहाणं अनेकदा गैरसमजातून अधीक गहीरं होत जातं. त्यामुळं वेळीच सत्तेचाही अर्थ शिवसेनेनं मराठी माणसाला समजून द्यायला हवा होता. ते ही ते करुन देण्यात चुकले. त्यामुळं १९९५ साली एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा मराठी माणसांनी शिवसेनेला सत्तेत येऊ दिलं नाही. यापुढे येऊ देतील असं वाटत नाही.

शिवसेनेनं मराठी माणसाला मराठीचा गोजीरा गुलाबी गाजर दाखवून हिंदुत्वाचा कडवट सफेद मुळा हातात दिला तो भाजपमुळं. पण ती व्यापक सत्तेची निकड होती. ती काळाची गरज होती. हे समजावून सांगण्यात शिवसेना अपयशी ठरली. आणि टिकेची धनी झाली. आता आपली गरज संपल्याची भावना मराठी माणसात बळावत गेली. आणि शिवसेनाही सैरभर झाली. ते सैरभैरलेपण ना बाळासाहेबाना थोपवता आलं त्या त्यांच्या वारसांना. त्यामुळे शिवसेना आतून फुटत गेली. दुभंगत गेली. शिवसेनेतले काही महत्त्वाचे आधार दूर गेले हे त्याचे दृष्य परिणाम. पण शिवसेनेनं मराठी माणसाला वेळीचं शहाणं केलं नाही. श्रीमंत केलं नाही. सत्तेचं, बेरजेचं गणीत समजावून सांगीतलं नाही ही खरी मेख आहे.

बाळासाहेब आता वयानं थकले आहेत. त्यांच्या चित्तवृती अजुनही जाग्या आहेत, ताज्या आहेत. तोच करिश्मा आजही आहे. पण त्यालाही फक्त भावनांचा आधार आहे. आणि मराठी समाजात त्यांच्यासाठी दयेची, केविलपणाची झालर आहे. बाळासाहेबांच्या बोलण्यात पुर्वीच्या राजकारणाची, सत्तेची आग नक्कीच नाही. असूही शकत नाही. उध्दव ठाकरे उसनं अवसान आणतात पण अजुनही कठीण समय येता ते बाळासाहेबांच्या पाठीमागे लपतात. राऊत, जोशी, देसाई, नार्वेकर यांना आपल्याच जीवावर शिवसेना आहे असं वाटतं पण यांच्यावर मराठी माणसाचा विश्वास नाही. त्यामुळे आता असलेला मराठी माणूस फक्त पुर्वपुण्याईवर शिवसेनेच्या पायाजवळ बसला आहे. पण ही मृत्युसमयी रात्र जागवण्यासारखी स्थीती आहे. भविष्यात शिवसेनेत उरलेले काय दिवे लावणार हे कोणत्याही दिवशी कोणतंही चॅनेल पाहिल्यावर समजतं. कुठलंही वर्तमानपत्र काढलं की वाचता येतं. समाजात खाजगीत बोलल्यावर कळतं. मराठी माणसाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येतं. वाईट याचं वाटतं की शिवसेनेचा अंत अश्या पध्दतीने व्हावा असं मराठी माणसाला नक्कीच आधी कधीच वाटत नव्हतं याचं. शिवसेनेचा मृत्यु समोर दिसतो आहे. हे मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

Tuesday, June 22, 2010

मदनपुरा

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०

"गांडू, अपनी मा चुदा रहा है क्या?", कितनी बार तेरेको बोला की कपडे को हात मत लगा, फिर भी सुनता नही है साला. भैंचोत. झटापटीचे शब्द कानावर आले आणि मागे वळून पाहिलं. तर एका फळं विकणारा पोरगा शिरा पराठा विकणार्‍या पोराची कॉलर धरुन त्याच्या कानाखाली खेचण्याच्या तयारीत होता. आजू-बाजूचे चार-सहा जण गोळा झाले आणि ते दोघं आपापल्या धंद्यावर जाऊन बसले.




भांडणाचं कारण साधं होतं. एकमेकांना लगडून गाडया लाऊन बसलेले हे धंदेवाले. शिरा पराठा विकणार्‍या पोरानं हाताला तेल लागलं ते पुसण्यासाठी फळवाल्याच्या धंद्यावरचा फडका वापरला होता. त्यामुळं चिडून जाऊन त्यानं त्याच्यावर हात उगारला होता. क्षणभर असं वाटलं ते एकमेकांचा जीव घेतील. पण पाच-दहा मिनिटातच ते नंतर पुन्हा काहीच न घडल्यासारखे शांत. आपापल्या गिर्‍हाइकात गढून गेले.



रात्री साडेबाराची वेळ. मदनपुरा. नागपाडा जंक्शनजवळ रात्रभर जागा असलेला हा इलाका. खाण्यापिण्याच्या स्टॉलनं सजलेला. रंगारंग लाईटसचा उजेड. वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरांची तोबा गर्दी. हलचल. गडबड. गोंधळ. मेणकापडाच्या छपरांनी झाकलेले छोटे छोटे स्टॉल्स. पावसाची चिकचिक. पायात लुडबुडणारा चिखल. रस्त्यावरच्या डबक्यात साचलेलं गढूळ पाणी. बकर्‍या, गुरा-वासरांची चरण्यासाठीची धडपड. बाईक्स, टॅक्सीची ये-जा. आणि हातगाडया, दुकानाच्या पायर्‍यांवर लवंडलेली माणसं.



झियाउद्दीन बुखारी चौकापासून बाबा सरवर चौका पर्यंत पसरलेला लांबचलांब साधारणतः अर्ध्या किलोमिटरचा हा रस्ता चोवीस तास गजबजलेलाच असतो. जरीकाम करणारे छोटे-छोटे व्यवसाय. बॅगा, चपला बनवण्याचे कारखाने इथे दिवसरात्र सुरु असतात. मुख्यतः युपी-बिहार वरुन आलेले कारागीर आपली रोजीरोटी इथं कमावतात. कुणीही सोबत आपल्या कुटुंबाला बायकापोराना आणलेलं नसतं. एखादाच या धंद्यातून वर आलेला आणि पुढं शेठ बनलेला आपला कुटुंबकबीला आणतो. तोपर्यंत त्यांच्या पोटापाण्याची सोय लावण्याचं काम हा रस्ता करतो. मौलाना आझाद रोड असं याचं नाव.



इथला कामगार म्हणजे साधारण आठ-दहा ते विस-पंचविशीतला तरुण वर्ग. घामानं मळकट कळकट झालेले कपडे. पायात रबरी-प्लॅस्टीकच्या चपला. वर भोकाभोकांची बनीयन किंवा टिशर्ट. बर्‍याचजणांच्या डोक्यावर मुसलमानी जाळीदार गोल टोपी. हातात सिगरेट-वीडी नाहीतर मोबाईल. वयस्कर कामगारांच्या कमरेवर चौकटची लुंगी, वर बनीयान किंवा कुर्ता. जुन्या जाणत्या अनुभवी धंदेवाल्याच्या अंगावर पांढरेशुभ्र झब्बे-लेंगे.



मोकाट बकरे, वासरं केळ्यांच्या सालीवर, कागदांवर ताव मारीत होती. कोंबडयांची हाडं म्हणजे कुत्र्यांसाठी मेजवानीच. अधुनमधुन पावसाची सर यायची आणि ती दुकानांच्या वळचणीला घुसायची. मधेच झोपलेल्यापैकी कुणीतरी झोपमोड झाली म्हणून त्यांना शिवी हासडत उठायचा. पुन्हा मुकाट ती आपला रस्ता बदलायची. रात्रभर ही मुकी जनावर इकडून तिकडे फिरत राहतात.



अधुनमधुन बाटल्यांची किणकीण ऐकायला येते. ती खुण असते मॉलीशवाल्याची. दारोदार कपबशी विकणारे ज्यापध्दतीनं आपल्या कपबशीचा आवाज करतात. तसाच तो वाटतो. चिराबाजार, मरीनलाईन्स, कामाठीपुरा ते मदनपुरा अशी पायपीट करीत ते मॉलीशवाले आपलं गिर्‍हाईक शोधत फिरत असतात. हाफ कॉर्टर (मराठी माणसाला ती 'चपटी' या नावानं परिचीत आहे) साईझची एक खोबरेल तेलाची आणि दुसरी राईच्या तेलाची अश्या दोन बाटल्यांच्या भांडवलावर कुणीही रात्रभर अडीचशे तिनशेचा धंदा करतो. २५ वर्षाचा अमित इथे गेल्या चार वर्षा पासून हा धंदा करतो. माहीमला राहतो. रात्री आठच्या दरम्यान तो इथे पोचतो. आणि रात्रभर मॉलीशचा धंदा करतो. एवढी मेहनत करुन एखादया गुजराती भाभीचं आमंत्रण म्हणजे दिवाळी. पैसेही चांगले मिळतात आणि टिंबटिबही, असं तो म्हणाला. वेश्याही त्यांच्याकडून मॉलीश करुन घेतात. पण पैसे देत नाहीत. शिव्या देतात. ओळख झाल्यावर फुकट अंग दाबून घेतात. पण त्याला इलाज नसतो. अमित या धंद्यात चांगला मुरलेला दिसला.



नर्गीस बुरखा, ए१ मुस्तफा ज्युस सेंटर, शबरी बेकरी, बिसमिल्लाह रेस्टोरंट, नॅशनल हॉटेल, मामू फिटींग्ज, समुंदर, नॅशनल हॉटेल्स यासारख्या दुकानांवर खास टिपिकल पाटया इथे दिसतात. अधेमध्ये उर्दु-हिंदीतले पोस्टर्स, स्थानीक नेत्यांची पोस्टर्स आपले लक्ष वेधुन घेतात. मशीदीतही रात्री उशीरापर्यंत लोकांची ये-जा चालू होती.



डॉ. मोहम्मद रफीक या नावानं इथला दवाखाना रात्री उशीरापर्यंत खुला होता. त्या दवाखान्यावरच बंद करण्याची अधिकृत वेळ रात्री अडीचची होती. त्यानंतरही माणसं बाहेरच्या बाकडयांवर बसून होती. दवाखाना अर्थातच नोंदणीकृत (रजिस्टर्ड) आहे. त्यावर आय-३३७९३ असा नंबर आहे. डॉक्टर एम.डी. आहेत पुढे कंसात ए.एल.टी अशी इंग्रजीत अक्षरं लिहिलेली आहेत. त्यानंतर बी.यु.एम.एस., सी.सी.एच. अशी अक्षरंही आहेत. त्यामुळे डॉक्टर भरपूर काही शिकलेला आहे असा भास होत राहतो. इंग्रजी अल्फाबेटसचा इतका अर्थशुन्य तरीही अर्थपुर्ण उपयोग दुसरा कुठेही पहायला मिळणार नाही. चौकशीत लक्षात आलं की इथं येणार्‍या तरुणांचे आजार सर्दी, ताप-खोकल्याचे असतातच पण बहुतेक करुन गुप्तांगाचे जास्त असतात.



इथुन पाचच मिनिटाच्या अंतरावर कामाठीपुरा सुरु होतो. कामातून वेळ मिळाला की तिथं विरंगुळयासाठी जाणारे असतात. तिथुनच काहीजण असे कमरेखालचे रोग घेऊन आलेले असतात. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने त्या रस्त्यावर वळणार्‍या चार-पाच जणांचे घोळके दिसतात. बाकी दिवसरात्र कोंदट जागेत काम करुन, त्याच त्याच कपडयात वावरुन, घामाचे कपडे तसेच अंगावर वाळगून, आंघोळीचा पत्ता नाही, स्वच्छतेचा मागमूसही नाही यामुळे बर्‍याच जणांना चामडयाचे आजार झालेले असतात. ती सगळी तरुण पोरं या डॉक्टराच्या टार्गेटवर असतात. भगंदर, बवासीर, मुळव्याद च्या इलाजाच्या एका डॉक्टरचं क्लिनीकही याच भागात दिसलं. त्याचीही चलती असावी.



खाणं-खिलवणं हे या गल्लीचं वैशिष्टय. चरचणार्‍या तेलाचा, डालडयाचा खमंग वास वातावरणात भरुन राहिलेला असतो.. चिकन बिर्याणीचा घमघमाट. लालेलाल दगडी निखार्‍यावर भाजलं जाणारं सिख कबाब- चिकन तंदुरी, बुर्जी पाव, भगव्या रंगाचा शिरा (हलवा) आणि त्यासोबत मैद्याचा पराठा, बेकरीतली बिस्कीटं, केक, पाव. शानदार रचुन ठेवलेले चिकट मातेरी खजूर, केळ्यांचा ढिग आणि फळांची आरास सोबत पानीकम चहाचा झुरका आपल्याला हैराण करते. नसलेलीही भुक चाळवते.



रात्री झोपेत एकजण मोबाईलवर काहीतरी पहात पडला होता. आम्हाला पाहिल्यावर गडबडीन मोबाईलची स्क्रीन त्यानं फिरवली. विचारलं काय? तर 'कुछ नही', म्हणाला. मी म्हणालो, मेरे पास भी है, चाहिये क्या? तर खुलला. त्यानं सांगीतलं. मेरेको उदर (कामाठी पुर्‍याकडे बोट दाखवून) जाना अच्छा नही लगता. तो अपना टाईमपास मोबाईलपर. त्याच्या मोबाईलमध्ये सेक्सी फिल्म्स होत्या. तो म्हणाला, अभी आदत सी हो गयी है. फिल्म देखे बिना निंद नही आती.



रात्री तीनच्या सुमारास धिम्या गतीनं एक पोलिस व्हॅन कॉलीस येताना दिसली. झरझर मॅसेज फिरला. आणि चालू असलेले बल्ब गेले. भरभरणारे स्टोव्ह गप्प झाले. मोबाईल आणि सीडी प्लेअरवरच्या कवाल्या बंद झाल्या. हातगाड्यांवर पसरलेल्या खाण्याच्या जिन्नसांवर पांघरुणं पडली. गाडयांजवळचे कामगार पांगले. दोन क्षण चिडीचुप. पोलीसांची गाडी पुढे सरकत गेली. आणि पुन्हा दिवे लागले. स्टोव्ह सुरु झाले. पुन्हा गलबला झाला.



मी विचारलं, पुलीस को इतना क्युं डरते हो? हप्ता नही देते क्या? तर म्हणाले, उनका जितना पगार नही उतनी आमदानी इस रोड से उनको हप्तेसे मिलती है. ऐसे तकलीफ नही देते किसिको. लेकीन उनकी इज्जत रखनी पडती है. एक पन्नाशीतला माणूस पोलीसाला शिव्या द्यायला लागला. तो तिथंच एरियात बफ मशीन चालवतो. म्हणाला, पुलीस की जात हरामी है. उनको कितना भी खिलाव उनकी आदत नही छुटती. लेकीन ये हराम का पैसा है. इसलीये गरीब मजदूरकी हाय उनको लगती है. उनके बालबच्चे देखो. लुले निकलते है. अच्छे निकले तो बेकार, लफंगे निकलेंगे. बीवी बीमार रहेगी. मी विचार केला. कुठं बघायला गेला असेल हा त्या पोलीसांची कौटुंबीक पार्श्वभुमी. पण तो त्याच्या मनातला राग बोलत होता. कदाचीत पोलीसांचं असंच व्हावं असं त्याला वाटत असावं का?



मुंबईतल्या कित्तेक खाऊ गल्यांची कौतुकं मी ऐकली आहेत. पण तिथं पोटापेक्षा जिभेचेच चोचले जास्त पुरवले जातात. इथलां खाउ हा कष्ट करणार्‍या माणसासाठी आहे. रात्री फक्त पन्नास ग्रॅम शिरा-पराठा किंवा दोन केळ्यांच्या वर पाणी पिऊन झोपणार्‍या माणसाचं जेवण मला पुर्णब्रम्हापेक्षाही ग्रेट वाटलं.



प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

Monday, June 14, 2010

अंदाज म्हणाला चुकलो...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जून-२०१०


अंदाज हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं याना धीर देण्याचं काम अंदाज करतो. अंदाजावर आंधळा चालतो, शेतकरी धान्य पेरतो, व्यावसाईक पैसा फेकतो, जुगारी बोली लावतो आणि सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य ढकलत असतो. अंदाजाच्या आधारावर माणसाचं सगळं जगणं उभ असतं. माणसाच्या भविष्यातील प्रत्येक कृतीचा आधार पुन्हा अंदाजच असतो. अंदाजाशिवाय माणूस शुन्य आहे. अंदाजानं चुकू नये नेहमीच बरोबर आणि वेळेवर यावं असं आपल्याला वाटतं ते याचसाठी.



अंदाज हा काही हवेत बांधायचा इमला नव्हे. त्याला काही घटनांची, संदर्भांची साथ असते. इतिहासाची जोड असते. आणि एकाच घटनेविषयी जेव्हा एकापेक्षा अनेकजण एकाच पातळीवर येऊन एकसारखा अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्याला एका अर्थानं समाजाची मान्यता असते. अणि अनेक अर्थानं तो अंदाज ती त्या समाजाची मागणीही असते.



हे अशासाठी, की याआधी प्रत्येक वेळी मराठी माणसाचा अंदाज चुकला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची प्रक्रीया इतकी जिवंत होती की त्यावेळी वाटले होते. आता मराठी माणसाचे, मराठी भाषेचे राज्य येणार आणि मराठी माणसाचे भले होणार. त्याला कारणेही तशीच होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील नेते खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रतिनीधी होते. एस.एम., डांगे, ठाकरे, अत्रे या नेत्यांचे आर्थीक, सामाजीक, सांस्कृतीक जीवन सर्वसामान्याच्याच पंक्तीतले होते, सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या अडचणी त्यांच्याही घरात होत्या. त्यांच्या व्यक्त्तीगत इच्छा आकांक्षा कवडीमोलाच्या होत्या. सार्वजनीक जीवन उघडया पुस्तकासारखे होते.



मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर मराठी माणसाचं नक्की भलं होणार असा अंदाज होता. लढयाचं सुत्रही तेच होतं. १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला. पण त्यामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. मुंबईचा भुगोल आहे तसाच राहिला. इतिहासाच्या पानात संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाची नोंद झाली. नागरीक शास्त्र नेहमीच काळानुरुप आपलं स्वरुप बदलत राहतं. फक्त यानिमित्ताने मराठी माणसाला साजरा करायला आणखी एक दिवस मिळाला इतकंच. लढयातले नेते वयानं थकले. काही गेले. सगळेच संदर्भ बदलले. सर्वसामान्य माणसाचा चेहरा फक्त लढतानाच दिसतो. इतरवेळी तो आपल्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या व्यापात असतो. तसं यावे़ळीही झालं. पुढचे चालक-वाहक बदलले. त्यांनी आपले मार्ग आपल्या सोईनुसार बदलून घेतले. खादी-कुर्त्यातलं, फाटक्या चपलेतलं समाजकारण मागे पडलं. धोतरांचं, सफेद कपडयातलं, गांधी टोपीचं राजकारण सुरु झालं. सत्तेच्या राजकारणात मराठी माणसाचं भलं करायचं राहुन गेलं. यावेळीही अंदाज चुकला.



पुढे १९६६ साली शिवसेना जन्माला आली. मराठी माणसाला पुन्हा हुरुप आला. आता आपलं नक्की भलं होणार असं वाटलं. आपले रोजगार चोरतात म्हणून दाक्षिणात्यांवर राग निघाला. काही प्रमाणात मराठी माणसाला नोकर्‍या मिळाल्या. वडापावच्या गाडया, झुणका भाकर केंद्र, वर्गणी, वसुली असे छुटुरफुटुर धंदे सुरु झाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेनं मराठी माणसाला सत्तेचं स्वप्नही दाखवलं आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. शिवसेनेची आंदोलनं, सार्वजनीक बंद मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही लक्षात रहावी अशी झाली. तळागाळात शाखांचा वचक वाढला. कपाळावर केशरी टिळा, वाढलेल्या दाढया-मिश्या, सफेद चपला, सफेद कडक सफारी, क्रमाक्रमानं मोटारसायकली, चार चाकी गाडया, मनगटावर सोनेरी सैलसर घडयाळ, ब्रेसलेट, बोटात चार-सहा अंगठया, गळ्यात दोन-चार चैनी त्याला लटकवलेली वागनखं (यानीच वाघ संपवले असतील काय?), मागेपुढे आठ-दहा चेले-चमचे, तोंडात आवाज कुणाचा आणि गरजेला....जय भवानी-जय शिवाजी.



१९९५ साली भगवा झेंडा विधानसभेवर फडकला. नंतर मराठी सोडून हिंदु सुरु झालं. साडेचार वर्षांच्या सत्तेनं यांना पार बिघडवलं. काही जणांच्या पुढच्या पिढयांची सोय झाली. पण यात मराठी माणसाची कुतरओढ झाली. सत्तेत गेले ते काय बोलून गेले ते विसरले. त्यामुळे मराठी माणसानी त्यांची जागा त्याना दाखवली. यापुढे पुन्हा सत्तेत दिसलात तर याद राखा कामा अशी सक्त ताकीदच मराठी सांनी शिवसेनेला दिली आहे, असे वाटते. शिवसेना नावाचा विश्वास तुटला. मराठी माणसाचा पुन्हा एकदा अंदाज चुकला.



आता याच मराठी माणसाच्या खांद्यावर मदार आहे ती राज ठाकरे यांची. किंवा हेच वाक्य उलट करुनही वाचता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मरगळलेला मराठी माणूस पुन्हा एकदा जागा झाला आहे. त्यामुळे जे शिवसेनेला द्यायला अनेक वर्ष लावली ती सत्ता किंवा सत्तेचा काही हिस्सा मराठी माणसानं मनसेच्या हातात पदार्पणातच दिला आहे. मराठी माणसानं ही घाई अश्यासाठी केली असावी की त्याला माहित आहे की आता फारच उशीर झाला आहे. आणि कदाचीत ही शेवटची संधी आहे.



मुंबईत माझं माझं म्हणावं असं मराठी माणसाच्या हातात आता फार कमी शिल्लक आहे. आशा लावावी असं एकच नाव आहे ते म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे जे उरलं आहे ते टिकवण्यासाठी तुमचाच आधार आहे. गोरगरीब, सर्वसामान्य माणसाबरोबर तरुण, शिक्षित असा एक मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा राहतो आहे. तुम्ही काय बोलता, काय करता याकडे प्रत्येक मराठी माणूस डोळे लाऊन बसला आहे. तुम्ही त्यांचे आशास्थान बनला अहात. बलस्थान बनला अहात. ...मेरे पास राज ठाकरे है असं तो गर्वानं म्हणतो आहे. मराठी माणसानं विश्वासानं मान टाकावी असा एक शेवटचा खांदा आहे. मराठी माणसाचा हा विश्वास तुम्ही जपायला हवा.



आज सत्तेत असलेले तेरा आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी मिळालेल्या वेळेत जर आपापल्या विभागाचा स्वर्ग बनवला तर पुढचा उरलेला महाराष्ट्र यांच्या गळ्यात संपुर्ण सत्तेची माळ घालेल. पण जर हेच आता कारणं सागंत बसले तर मराठी माणसांनी यांना कोणती कारणं सांगायची?



गेल्या ५० वर्षाचा महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठी माणसाचा इतिहास बघितला तर त्याचा पुन्हा पुन्हा तेजोभंग झाला आहे. यानिमित्ताने त्याने तुमच्यावर टाकलेला विश्वास खरा ठरो. मराठी माणूस आणि आपण यानी एकमेकांसाठी घेतलेली ही शेवटची संधी आहे. तुमच्याविषयी मराठी माणसाने बांधलेला अंदाज अभंग राहो. खरा ठरो. मराठी माणसाच्या राजकारणात आणि सत्तेच्या सारिपाटात पुन्हा पुन्हा चुकलेला हा अंदाज कदाचित उद्या मराठी माणसाला म्हणेल मी हरलो तुम्ही जिंकलात आणि तुमच्यासमोर होत जोडून हाच अंदाज म्हणेल साहेब माफ करा चुकलो!



प्रवीण धोपट

99672 93550

pravindhopat@gmail.com

Tuesday, June 8, 2010

व्हिटी ते सिएसटी: रात्री १२.४३ नंतर

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०

रात्री १२.४३ ला पनवेलला जाणारी शेवटची गाडी निघाली की सातही ट्रॅक सुनसान होतात. मागे उरतात त्या फक्त ट्रॅकच्या लांबचलांब ओळी. डीजीटल घडयाळंयातल्या सेकंदांची जलधगती हालचाल. आणि बंद इंडीकेटरच्या कडांवर पेटलेल्या लाल दिव्यांच्या उभ्या माळा. अंधुक प्रकाश. चालू पंखे आणि लक्ष वेधुन घेणार्‍या जाहिराती.



व्हिटी स्टेशनाचं भव्य छत आता आपली नजर वर खेचून घेतं. उंचच उंच नक्षिदार लोखंडी कमानी. काळ्या पाषाणात कोरलेले कसदार खांब. गोल घुमट. भव्य दरवाजे. खांबावर कोरलेल्या पशुपक्षांच्या चेहर्‍याचे आकार. हे बघतांना आपल्याला फक्त इंग्रजाच्या कामाची, कलाकुसरीची आठवण येते. आपोआप आपल्या मुखात त्यांच्यासाठी कौतुकाचे, आभाराचे दोन शब्द आणि आताच्या प्रशासनासाठी दोन शिव्या. त्यानंतर व्हीटी स्टेशनाशी आपलाही संबध तुटतो. आणि आपला प्रवास सुरु होतो छत्रपती शिवाजी टर्मीनसवरुन. जे आपल्याला आपल्यासारखं आहे असं वाटतं.



प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच्या लाद्या उखडलेल्या आहेत. लाकडांचे, डबराचे,लाकडी घोडयांचे, तुटक्या-फुटक्या सामानाचे ढीग इतस्ततः पडलेले आहेत. नवीन लावलेल्या (चिकटवलेल्या) लाद्यावर त्या अधिक चमकाव्या म्हणून एकजण पॉलीश मशीन फिरवतो आहे. त्या मशीनचा आवाज आपल्या मस्तकात जातो आहे. सफेद चिखलाचे पाट आपलीच आपल्यासाठी वाट काढताहेत. त्याचे ओघळ प्लॅटफॉर्म वरुन सरळ ट्रॅकवर पडताहेत. रेल्वेतून उतरणारी माणसं त्या ओघळावरुन लटपटताहेत. काही शिताफीनं त्या ओघळावरुन उडया मारुन जाताहेत. गाडया येत आहेत. जात आहेत. माणसं उतरताहेत. चढताहेत. वेळ चालला आहे. चालणार आहे.



प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असलेल्या सुरक्षा चौकीतून कुणीतरी एखाद-दुसरा एकदोनदा आतबाहेर करतं. इकडेतिकडे बघुन परत आत. पोलीस उरलेल्यांना पळवायच्या मागे. पोलीसाच्या हातातला दांडा उगारुन मागे जातो त्यासरशी गुढग्यात जरासा वाकलेला कुणीही दुसर्‍या क्षणाला सटकलेला असतो. एक वेडसर बाई पोलिसाच्या अंगाशी झटत रहाते. दांडा उगारल्यावरही ती हटत नाही. हसत- बडबडत राहते. तिथं आधिच ठरल्यासारखी एक महिला पोलिस पुढे येते आणि आता तीच बाई तिला बघुन सरळ चालायला लागते. थेट बाहेरचा रस्ता धरते.



रात्री कुणालाही प्लॅटफॉर्मवर वस्ती करायला थांबायला बंदी असते. तरीही प्लॅटफॉर्मचे सगळेच दरवाजे बंद होत नाहीत. शेवटाची ट्रेन गेल्यावरही काहीवेळ दोन स्टॉल सुरु असतात. रिफ्रेश नावाच्या हॉटेलात आवराआवर चालू असते. पोलिस कक्षात दोन-चार पोलीस गप्पा छाटत बसलेले असतात. माणसं इकडून तिकडे करत राहतात. पोलिसातले काहीजण नकळत आल्या-गेल्यावर लक्ष ठेवतात. विपरीत काही घडण्याची शक्यता मावळते. कोपर्‍यावरची मुतारी रात्रभर उघडी असते. बंद असती तरी फरक पडला नसता. स्टेशनच्या पच्छिमेला अनेक ठिकाणी छोटया-छोटया कोपर्‍यात धारेचा आवाज ऐकू येत राहतो. उजेड मिसळलेल्या काळोखातही मुताचा वास आपल्याला ऍलर्ट करीत राहतो.



आता हार्बर- मध्य रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाडया जिथुन सुटतात तिथंल्या मोलळ्या जागेत माणसं आपल्या सामानासह स्थिरावतात. बायका-पोरं-सामानाचा गलका झालेला असतो. लांबरुद मोकळ्या जागेत किमान दोन-अडीच हजार माणसं असावीत. कुणाला बाहेरगावी जाणार्‍या रात्रीच्या गाडया पकडायच्या असतात. कुणी कुणाला सोडायला आलेले असतात. तर कुणी येणार्‍याची वाट पहात असतात.



मेन लाईनच्या प्रवेश दारावरच चौकशीची खिडकी आहे. खिडकीचा व्यास दहा बाय दहा इंचाचा असावा त्यात आळीपाळीनं किंवा कसंही विसेक माणसं भांबावल्यासारखी काहीही विचारीत असतात आणि आत बसलेला त्याना शांतपणे उत्तरे देत रहातो. कुणाच्या प्रश्नाचे उत्तर कोणते हे ज्याने त्याने समजून घ्यावे.



मागच्या बाजुने टॅक्सीना आत यायला रस्ता आहे. टॅक्सी तडक आत आल्यावर तिथे ट्रॅफीक पोलिस असतात. ते टॅक्सीला मार्ग दाखवतात. जो टॅक्सीचालकांना अधिच माहित असतो. पण डयुटी म्हणजे डयुटी. सामानाच्या बॅगा, खोकी, माणसं जिथुन आतल्या लॉबीत प्रवेश करतात तिथं ACIL REPISCAN नावांच एक मशीन आहे. त्याच्या घरंगळत्या पटटयावर सामान ठेवलं जाणं अपेक्षीत असतं. पण तिथं ऐछिक असतं. ज्याला सामान ठेवायचं तो ठेवतो. ज्याला नाही, त्याला कुणी विचारीतही नाही. सोईसाठी एन्ट्री आणि एक्झीट साठी वेगवेगळे गेट आहेत. पण वेळेला जे गेट मोकळं आहे तिथुन माणसं पोलिसांच्या समक्ष इकडून तिकडे करीत असतात. साडे-दहा अकरापर्यंत पोलीसांचे घोळके दिसतात. नंतर एखाद-दुसरा. इकडे-तिकडे. ACIL REPISCAN जवळच्या गेटमधून आतबाहेर जाणार्‍या माणसांची मोजदाद होते. वाचले तर दोन गेटवर वेगवेगळे आकडे होते. एकात ५३,३०४ तर एकात ७०. पुन्हा आतबाहेर केलं आता पहिल्या गेटवर एक आकडा वाढला होता. दुसर्‍या गेटवर सत्तरच. आजही सत्तरच असेल.



कॅमेरे जागोजाग दिसतात. दिसणारच. २६ नोव्हे.२००८ चा हल्लाच तसा होता. पण जर माणसांच्या, मशीनच्या परिणामकारक वापराविषयी जर अशी हेळसांड होत असेल तर पुन्हा एखादं अघटीत घडल्यानंतरच त्या कॅमेरात टिपलेली चित्र चॅनेलसाठी फक्त ब्रेकींग न्युजच्या कामी येणार आहेत काय? असा प्रश्न पडतो.



स्टेशनवर जिथेजिथे गेट आहे तिथेतिथे एक चौकोनी प्रवेशदार आहे. त्यातून आत-बाहेर जाताना टूं टूं असा आवाज येतो. आवाजाची मजा वाटते म्हणून एखादा बालबुध्दीचा माणूस पुन्हा पुन्हा आत-बाहेर करतो. त्या चौकोनांचा संबध सुरक्षेशी असावा. पण तिथं रक्षकच हजर नसतो. त्या चौकोनांचा उपयोग फक्त वर्धापन दिन किंवा सत्यनारायणाच्या महापुजेच्या दिवशी बल्बच्या माळा सोडायला होत असावा. रेतीच्या गोण्या रचुन ठेवलेल्या चौकोनात पोलीस बंदुक रोखुन उभे असतात. हे कसाबच्या हल्ल्यानंतर सुचलेलं असावं. एक जागी न हलता-बोलता उभ राहणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. ती उभ्या असलेल्याच्या चेहर्‍यावर जाणवते.



रात्री दोन-अडीच नंतर प्रवासी माणसंही पेंगलेली असतात. काही गाढ झोपेत असतात. झोपेत आपलं अंग/ अवयव खाजवणार्‍या किंवा आपलीच लाळ गिळणार्‍या माणसाकडे बघतांना कसंसंच वाटतं. मजाही वाटते. किळसही वाटतो. अधुन मधुन स्पिकरवर होणारी अनाउन्समेंट गर्दीला चाळवते. सगळ्यानाच आपल्या गाडीचं नाव, वेळ माहीत असते. सामानाची उचलापाचल, झोपलेल्याला जागवणं हा एक अनोखा खेळ रात्रभर फरका-फरकाने चालू राहतो.



जवळजवळ प्रत्येक गेटपाशी एक लाल रंगात रंगवलेलं टेबल दिसतं. ते खुर्चीला चिकटलेलं असतं. त्याच्यावर 'सुविधा' द कम्प्लेट फॅमिली शॉप ची जाहीतात असतेच. समर्थ सिक्युरीटी सर्वीस कडूनही होलसेल मध्ये फ्लेक्सचे बॅनर छापून घेतलेले दिसतात. एका बाजूला एक ऍबुंलन्स उभी असते. तिचा ड्रायव्हर कुठे आजुबाजूला दिसत नाही.



रेल्वेच्या आवारात जिथं जिथं जागा मिळेल तिथं पाटया, बॅनर लावलेले आहेत. त्यावरच्या सुचना आपलं मनोरंजन करतात. म्हणजे 'स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे', 'स्वच्छतेसाठी रेल्वेला सहकार्य करा'. प्रश्न पडतो 'स्वच्छता' हे कुठल्या देवाचे नाव आहे? कचरा डब्यातून ओसंडत असतो. जो उचलायला माणूस येतो तो पहाटे. तो नुडल्स उचलल्यासारखा कचरा उचलत होता. सकाळ पर्यंत कचर्‍याचा व्यास वाढतच जातो. फुकट पाण्याच्या नळाभोवती पाणी सांडतेच. त्याच्यावर फडका मारायला कुणीही नसतो. माणसं दिवस असो रात्र असो अखंड खातपीत असतात. कचरा साचतच जातो. माणसानी सहकार्य करायचे म्हणजे काय करायचे? 'कार इज नॉट वर्कींग' असं एअरटेलची जाहीरात असलेली चारचाकी खुली मोटारगाडी सामानाची ने-आण करण्यासाठी बाहेर उभी आहे. कुणी अपेक्षा केली आहे असल्या गाडया चालू असण्याची? लाल डगल्याचे हमाल आहेतच की..! 'प्रवासी सुरक्षा हेच आमचे ध्येय','सुरक्षा पडताळनीस मदत करा',आणि 'सुरक्षेला तडजोड नाही' ...हे करायला माणसं जाग्यावर तर असायला हवीत? आणि सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मह्त्वाचं वाक्य म्हणजे, "स्वयं की सुरक्षा स्वयं के हात" ही सुचना वाचली की सुरक्षेचे सगळे प्रश्न निकालात निघाल्यासारखे वाटतात. पहाटेच्या दरम्यान एक सुरक्षारक्षक गेटवरच्या मशीनमध्येच डोक खुपसुन झोपला होता. एक पोलीस पायात चपला घालून आणि हातात दांडा घेउन फिरत होता. असे कर्मचारी दुश्मन फुटाच्या अंतरावर आल्याशिवाय काय करु शकतात? सगळ्यानाच आतंकदाद्याला मिठी मारायची संधी दरवेळी मिळेल, असं होणार नाही. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत नुसती बॅनरबाजी करण्यापेक्षा सतर्कच रहाणे फायदेशीर ठरावे.



री-फ्रेश नावाचे एक हॉटेल चोवीस तास चालू असते. बाकी सगळ्या गोष्टींबरोबर तिथे दहा रुपयात जनता थाळी मिळते. त्याविषयी काही तक्रार असल्यास एक टोलफ्री नंबरही दिलेला आहे. चेक केला, तर तो चालूही आहे. असा नंबर झुणका भाकर केंद्रासाठीही दिला असता तर ती केंद्र आजही कदाचीत चालू असती. त्याच्याच बाजूला एक मुतारी आहे. मुतारीचा ऑपरेटर जुन्या हिंदी गाण्यांचा शौकीन आहे. पेन ड्राइव्हवर लोड केलेली गाणी तो रिमोट कंन्ट्रोलच्या आधारे बदलत रहातो. स्पिकरच्या आवाजाचा दणकाही मोठा असतो. त्या सुरेल आवाजात इतर आवाज मारला जातो. मुतारीत दोनच संडास आहेत. पाच-सहा माणसं एकाचवेळी एकामागुन एक अशी उभी असतात. लग्नातल्या थाळी सिस्टीमची आठवण होते.



स्टेशनच्या पच्छिमेला मधल्या मोकळ्या आवारात पंधरा-वीस पुरुष-बायका आपल्या पोराबाळांसह, बोचक्यांसह रात्रभर पडलेले होते. तिथंच त्यांच जेवणखाण करणं, मशेर्‍या लावणं, थुंकण, चुळ भरण चालू होतं. दिवसभर फिरुन भांडी विकून कपडा गोळा करायचं काम ते करतात. आणि गोळा केलेले कपडे सकाळी पाच वाजता चिंधी मार्केट मध्ये जाऊन विकतात.



एक चायवाला अण्णा सकाळी चार वाजता गेटवर चहा-सिगरेटी विकत उभा होता. त्या आधी त्याचा भाऊ होता. याच्याकडे धंदा सोपऊन तो स्टेशनात जाऊन झोपला होता. तो वॉचमनची नोकरी संपऊन आला होता. गेली चाळीस वर्ष हे त्यांच काम चालू आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या मागच्या झोपडपट्टीतच तो राहतो.



रात्री अकराच्या सुमारास एक बावीस-तेवीस वर्षांची मुलगी आपल्याच मुडमध्ये चालत स्टेशनच्या मागाच्या बाजुस असलेल्या बसस्टॉपकडे जाताना पाहिली. अंदाज होताच. खात्री नव्हती. कुतुहलानं तिच्यामागनं गेलो. बसस्टॉपचा काळोखा कोपरा धरुन ती उभी राहिली. आळीपाळीनं तिच्याजवळ माणसं जात- येत होती. दोनचार वाक्यानंतर मागं वळत होती. मी ही गेलो. म्हणाली हजार. लॉज का तिनसो. एसी रुम का पाचसो. आता ती गप्प. मी ही. तिनं माझ्या पायापासनं डोक्यापर्यंत नजर मारली. मला कळलं. मीही मागं वळलो. इकडे तिकडे पाहिल्यावर लक्षात आलं. तिच्याच सारख्या त्याच धंद्यातल्या आणखी पाच-सहा जणी. एकीकडे प्रवासी बॅग होती. मला ही तिची बॅगेची आयडीया आवडली. पन्नाशीची असावी. मराठी वाटली पण तेलगू निघाली. तिनं मला तेलगु येतं का असं तेलगुत विचारलं. मी नाही म्हणालो आणि हिंदीत सुरु झालं. तीनं, 'क्या हुआ' असं विचारलं. तिचा रोख मघाच्या मुलीबरोबर मी बोललो होतो त्याच्याकडे होता. तिनं तिची थोडक्यात बदनामी केली. वो लोग कैसा फसाते है सांगीतले. चलो, म्हणाली छेसो. मी विचारलं, लॉजका कितना? तर म्हणाली नही इसमेही सब हो जाएगा. माझ्या मित्राकडे बघुन ती म्हणाली, दोनोका आठसो. मी काहीच बोललो नाही. ती हसली. आणि चार-सहा पावलं दुर जाऊन उभी राहीली.



रात्री दोन वाजेलेले असावेत. दिनशॉ पेटीट गार्डन समोर एक बाई आपल्या तहान्या मुलासह झोपली होती. झिंगलेली होती. तिथं एक घाइघाईत तिच्याच वयाचा पंचविशीतला एक गर्दुल्ला आला. ती बाई कुशीवर होती. त्यानं तिला उताणी केलं. तिच्या पायजम्याची नाडी सैल केली आणि पायजमा गुढग्यापर्यंत खाली खेचला. त्यानं त्याच्या पॅन्टची चैन स्वत:च काढली. पुढची पाच-सात मिनटात काम संपलं. तो उठला. निघुन गेला. त्या बाईनं आपलाच आपण पयजमा वर केला आणि कुशीवर पुन्हा झोपली. पहिल्यासारखी निर्जीव.



पुढे डी.एन रोडवर एक चकाचक मुतारी आहे. इंग्लीश वाटावी अशी. रात्री बंद असते. तिच्या दारासमोर चटई टाकून एक काटकुळा भय्या एका जाडजुड बाईला दाबत बसला होता. ते बघत असताना एका माणसानं हटकलं. क्या देखते हो, असं सुरात विचारलं. कुछ नही. मी म्हणालो. त्याच्या कानाच्या पाळीत हिर्‍याचा खडा चमकत होता. त्यानं गेली दोन-अडीच तास आमच्यावर पाळत ठेवली होती. आणि त्याच्या रेंजमध्ये आल्यावर तो खुश झाला होता. चलो ना...जाओगे क्या?... त्यानं विचारलं. तेव्हा खात्री पटली. तो ही याच धंद्यातला 'माणूस' होता. प्रत्येक शब्दागणीक तो गालातल्या गालात हसत होता. एक बार आओगे तो बार बार आओगे असं आत्मविश्वासानं म्हणाला. बाईमध्ये आणि पुरुषामध्ये (अर्ध्या) काय फरक असतो ते त्यानं सोदाहरण समजाऊन सांगीतलं. त्यान मला विचारलं काय करतो म्हणून मी ही त्याला विचारलं. तर तो लिफ्टमन होता. त्याच बिल्डींगच्या जिन्याखाली तो रात्रीही झोपतो. त्याचं नाव अनील. मुळ दिल्लीचा. थर्माकोलसारखी त्याची गोरी कातडी होती. खाजवली-खरवडली तर पाढंरा भुसा उडाला असता. खुपच खनपटीला आला. म्हणाला देखो तो सही. त्यानं तिथंच बाजुला असलेल्या जिजाऊ लेनमध्ये त्याची झोपायची आणि काम करायची जागा दाखवली. त्याचा नंबरही स्वतःहुन दिला. म्हणाला तुमको नही सही लेकीन दिलवालोंके काम आयेगा.



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com