Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?

पूर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरिष पारकर # ऑगस्ट २०१

काल त्रेसष्ठावं सरलं म्हणून आजपासून चौसष्ठावं लागलं. घडयाळाची टिकटिक रोखता येत नाही. सरणारी वेळ थांबवता येत नाही. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष या क्रमानं काळ आपलं एक एक पाउल टाकत पुढं सरकत राहतो. आणि आपण योगायोगानं किंवा ठरवून साधलेली वेळ वर्षावर्षानं साजरी करीत राहतो. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे. हे आता सवयीनं आपल्याला माहित झालेलं आहे.

या दिवशी दरवर्षी सकाळी 'कर चले हम फिदा जान और तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या गाण्यानंच जाग येते. हक्काची सुटटी म्हणून उशीरापर्यंत ताणून द्यायचं तर हमखास झोप येत नाही आणि सकाळी झोपेच्या ऐन मोसमात स्पिकरवर 'कर चले..'. अशी दिवसाची अनवॉन्टेड सुरुवात. टिव्ही लावावी तर पुन्हा मनोज कुमार 'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती' उगाळत बोंबलत असतो. चॅनेल बदलावा तरी तेच.

सालाबाद प्रमाणे या ही वर्षी, शाळेच्या पटांगणात (अर्थात ज्यांची शिल्लक आहेत त्यांची, उरलेली वर्गातल्या वर्गात) उभे राहुन मुले झेंडयाला अभिवादन करतात. एकुणच आज तरी देशभक्तीपर आवेशात वंदे मातरंम आणि जनगणमन. शेवटी कुणीतरी... कुठुनतरी... 'भारत माता की... जय'. या दिवशी हौशी शिक्षक गांधी टोप्या घालतात. काही नेहरुंचे कपडे. शिक्षिका तिरंगी किंवा पांढर्‍या साडयात. बर्‍याच जणांच्या खिशाला टाचणीत अडकवलेला झेंडा दिसतो. नंतरही काही दिवस मुख्याध्यापकांच्या टेबलावर एकमेकांना तलवारीसारखे छेद देऊन दोन झेंडे दिसत राहतात. अशा देशप्रेमानं भारलेल्या दिवसात कुणीतरी त्यांना ते भेट म्हणून देतोच. शाळेतल्या काही हुशार मुला-मुलींची तिच ती तोंडपाठ भाषणं होतात. झाशीच्या राणीपासून टिळक, गांधी, बोस, सावरकरांपर्यंत सगळ्यांची उजळणी होते. ज्या शाळेत संगीत शिक्षक असतील तिथे कंपल्सरी एक देशभक्तीपर समुहगीत. अर्थात मुला-मुलींच्या वेगवेगळ्या तसंच उंचीनुसार रांगा लाऊन आणि संगीत शिक्षक मधोमध उभे राहुन हातवारे करीत तबला-पेटीच्या नादात-ताला-सुरात (?) गाणं सादर केलं जातं.

आज काही पालक आपल्या गाडयातून प्रवास करतांना आणि आपल्या मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मुद्दामहुन सिग्नलवर तिरंगी झेंडे विकत (ते ही भीख मागितल्यासारखं) असलेल्या मुलांकडूनच घासाघीस करुन का होईना घेतात. तेवढंच आपलं देशप्रेम आणि गरीबालाही मदत. गाडीच्या डॅशबोर्डावर गणपतीच्या शेजारी आपला काही दिवस शोभा म्हणूनही झेंडा बरा वाटतो.

सरकारी कचेर्‍यात आज गांधीजीना भिंतीवरुन खाली उतरवलं जातं. बाकीच्यांचे फोटो उपलब्धतेनुसार आजुबाजुला. काही ठिकाणी शिवाजी महाराजांनाही त्या रांगेत बसवतात (बिचार्‍या महाराजांना कल्पनाही नसेल की अश्या काही स्वातंत्र्यदिवसासाठी आपल्याला इथं बसायला लागेल) पण फोटोला इलाज नसतो. तो जिथं बसवला किंवा ठोकला जातो तिथं बसतो किंवा लटकतो. मग तो फोटो शिवाजीचा असो नाहीतर गणपतीचा.

देशातर्फे दिल्लीच्या लाल मैदानात आणि महाराष्ट्र राज्यातर्फे शिवाजी पार्क वर पोलीसांचे बँड, लेझीम पथक आपली कलाकारी सादर करतात. सराव कर-करुन आज मुख्यमंत्र्याना, राज्यपालाना, गॉगल वाल्या प्रेक्षकांना आणि टिव्हीवाल्यांना शिस्तीत चालून दाखवतात. काही दुचाकीवरुन तर काही विमानातूनही कसरती करुन आपलं प्रदर्शन मांडतात. अश्यावेळी लोककला पाहिजेच. ती असतेच. याठिकाणी कुठुन कुठुन कश्या कश्यात पहिल्या आलेल्या लोकांचे सत्कार केले जातात. प्रशस्तीपत्रकं, शाली किंवा श्रीफळं दिली जातात. ती कुणाकुणाला वाटायची यासाठी काही कमिटया, समित्या वर्षभर कार्यरत असतात.

या दिवशी चढाओढ दिसते ती बॅनरची. वेगवेगळ्या पक्षांचे नेते-उपनेते-कार्यकर्ते आपापल्या वकुबाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा देत झळकतात. आजकाल कुणी कुणाला शुभेच्छा द्यायच्या याचाही धरबंद राहिला नाही. जो तो उठतो. फ्लेक्स वाल्याला गाठतो. कटींग-पेस्टींग करतो. दोन-चार पोरांना हाताला धरुन रातोरात झळकतो. नजर जाईल तिकडे तिरंगा. डोळ्यासमोर, पायाखाली तिरंग्याचा कचराच कचरा. म्युनसीपालटी देशाच्या नावानं बोटं मोडीत डंपिंग ग्राउंडवर दुसर्‍या दिवशी शिळं झालेलं देशप्रेम जाळून टाकते.

बिल्डर सुध्दा या दिवशी वर्तमानपत्रात पान पान जाहीराती देतात. वेगवेगळया बिल्डरांच्या रंगीबेरंगी, गगनचुंबी जाहिराती बघुन आपल्यालाच आपण 'बेघर' आहोत असं वाटायला लागतो. मनातल्या मनात आपण रस्त्यावर आल्यासारखे वाटतो. चित्रातल्या गाडया, झाडं, रस्ते, तलाव, माणसं, फर्नीचर पाहिलं की वाटायला लागतं की आपण एखाद्या गुहेत वैगेरे रहात आहोत की काय. शक्य आहे ते आजच्या दिवशी बुकींग करतात बाकीचे चोळत चडफडत राहतात.


काही बाजार आजच्या दिवशीच किंवा मागे पुढे दोन-चार दिवस 'बीग' सुट देतात. त्या दिवशी आपल्याला कळत नाही. भावनेच्या भरात आपणही खर्च करतो. अमुक घेतलं तर तमूक फ्री. येवढं घेतलं की तेवढं फ्री. या फ्री फ्री च्या नादात माणूस फिरफिर फिरतो. नंतर कळतं की सुट-बीट झुट है. पण त्याला काही इलाज नसतो. सर्वसामान्य माणसालाही वाटत राहतं की, आपण काळाला धरुन असलंच पाहिजे. काळाबरोबर वहात गेलंच पाहिजे. मार्केटला- जाहिरातीना बळी पडलंच पाहिजे. आता सगळ्यांनाच दरवर्षी येणार्‍या अश्या 'सुटी'चे दिवस पाठ झाले आहेत. त्या दिसवांसाठी तरी यापुढे आपण १५ ऑगस्टची वाट पहायला पाहिजे.

भारत आपला देश आहे. हा देश शेतीप्रधान आहे. त्यामुळं इथं आत्महत्येसाठी शेतकर्‍याला प्राधान्य दिलं जातं. इथं अजुनही दारिद्रय रेषेखाली जगत राहणार्‍या माणसांचं प्रमाण ३७ टक्के आहे. इथं छोटे उद्योग धंदे जन्माला आल्यापासून एक दोन वर्षात बंद पडतात. आणि मोठया व्यावसाईकांच्या प्रगतीपुढे आकाशही ठेंगणं पडतं. जन्माला येण्याआधीच किमान शंभरातल्या दहा मुलीना मारलं जातं. कुपोषणानं अजुनही १७ टक्के मुलं मरतात. इथं प्राथमीक शाळेत गळती होणार्‍या मुलांचं प्रमाण २.७ दशलक्ष इतकं आहे. अजुनही राज्याराज्यात सिमेवरुन, पाण्यावरुन आपापसात भांडणं आहेतच. इथलं हजारो टन धान्य साठवायला गोदाम नाही म्हणून सडतं आणि इथंच भुकेपाठी गरीबाचा जीवही जातो. इथं दिड-दोन लाखाचा पगार घेणार्‍याला आणि दोन-चार हजारात काम करणार्‍यालाही एकच बाजार आहे. इथं काही गाडीवानांच्या समोर पार्कींगसाठीचा प्रश्न आहे तर काहींच्या पायात फाटक्या चपला नाहीत. इथं आपल्या मतावर निवडून आलेल्या माणसाची झटपट प्रगती कशी, का आणि कधी होते हे कळत नाही. टिव्हीवरच्या बातम्यामुळं काल काय झालं ते आठवत नाही. आता काय चाललंत ते समजत नाही आणि उद्या काय होणार आहे याचा अंदाज येत नाही. नुसता किचाट, गोंधळ.

हा लोकशाही देश आहे, हे माहीत आहे. पण लोकांचं लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय रे भाऊ? कुठले लोक, कुणाचं राज्य, कश्याचं कल्याण?

प्रवीण धोपट.
pravindhopat@gmail.com

No comments: