Monday, July 19, 2010

करवटे बदलते रहे....

पूर्वप्रसिध्दी : महानगर (संपादक- वृंदा  शरद बाळ) : जुलै-२०१०

रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र. निसर्गाचं चक्र वर्षानुवर्षे असंच चालू आहे. त्यात आपण आपला क्रम आखलेला असतो. प्रत्येकाला निसर्गानं दिलेली वेळ सारखीच. त्यात ज्यानं-त्यानं आपापली वेळ साधायची. कधी कुणाला हा दिवसाचा वेळ पुरत नाही तर कधी कुणाला तोच दिवस जाता जात नाहीत. दिवस सरतो पण रात्र छळत रहाते.

शेता-शिवारात राबणार्‍या, दिवसभर मान मोडून काम करणार्‍याला गाढ झोप लागते. तर काहिना झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मनगटाच्या घडीवर डोकं ठेऊन आणि शरीराची पुरचुंडी करुन झोपणार्‍याला पेकाटात लाथ पडल्याशिवाय जाग येत नाही आणि गुबगुबीत गालीछावर लोळत पडलेल्यांच्या डोळ्याला झोप शिवत नाही. कुणाच्या झोपेचा ताबा गोड स्वप्नांनी घेतलेला असतो. तर कुणाच्या झोपेला चिंता कुरतडत असते. दिवसरात्रीचा हा खेळ कुणाच्या वाटयाला कसा येईल हे सांगता येत नाही.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे. पावसाची रिपरिप. बाजूलाच बसस्टॉपच्या आडोशाला मी उभा.भरदाव वेगात जाणार्‍या गाडयांचे टायर्स रस्त्यावरच्या पाण्यात सुंदर नक्षी उठवतात. ती ही क्षणभरच. पुन्हा एकजीव पाणी. पुन्हा एकादी नवीन नक्षी. झरझर बदलणारे हे रस्त्यावरचे नक्षीकाम आपल्याला गुंतवून ठेवतं. त्यात वरुन मिसळणारा दिव्यांचा उजेड त्या नक्षित आणखीनच रंग भरीत रहातो. गाडयांच्या वेगाबरोबर वाढत आणि विरळ होत जाणारा आवाज. टायर्सच्या आवाजाची चरचर. पेट्रोलच्या धुरात मिसळणारा प्रकाश आणि पावसाच्या रेघा खिळवून ठेवतात.... आणि तिथं सिटखाली झोपलेला एकजण आपली कुस बदलतो. आपले हातपाय आपल्या अंगाशी आक्रसुन पुन्हा झोपेच्या कुशीत. जन्मापुर्वी आईच्या पोटात बाळ असतं तसं.

रात्री दिड वाजता हवा खायला म्हणून हायवेलगतच्याच झोपडपटटीतून आलेलं एक तरुण जोडपं. त्यातला तो म्हणाला आम्ही इथं नेहमीच येतो. त्याची बायको गर्भार होती. मला त्या झोपलेल्याचं कुतुहल होतं. मी त्याला विचारलं तर हा म्हणाला की तो गेली सहा-सात वर्षे इथंच झोपतो. युपी वरुन आलेला आहे. प्लास्टीक मोल्डींगच्या कारखान्यात दिवसभर काम करतो. घरदार नाही. खाणं पिणं इथं तिथंच. आंघोळ कारखान्यातल्या नळाखाली. कपडे साधेसुधे दोनचार. आणि झोपायला इथं बसस्टॉपवर. हा म्हणाला. आता चांगलीच सोय झाली आहे. पुर्वी साधे उघडे बसस्टॉप होते. तेव्हा याचं कठीण व्हायचं. मग कुठंतरी दुकानाच्या वळचणीला. पण आता किमान पाट टेकता येते. तो उठायची वाट बघत होतो. पण उठला नाही. ते ही दोघं निघुन गेले. मी ही.

पुढ चेकनाक्यावर. ओळीत पंधरा विस रिक्षा. काही काही रिक्षामधून मागच्या सिटमधून बाहेर आलेले पाय. जवळ जाऊन बघीतलं तर आत शरीराची मुटकुळी करुन झोपलेले रिक्षावाले. कुणी जाडजुड मागची सिट बसायच्या सिटच्या वर मागून आडवी टाकतो आणि तिच्या उतारावर उताणी झोपतो. त्यातलेच काही जागे. घोळक्याचे चार-सहा. नाक्यावर, अण्णाकडची चहा पिता पिता मी विचारतो, सोये नही? नही, मच्छर काटती है. जब ऐसी नींद आयेगी की काटनेवाली मच्छर भी याद न आये तब जा के सोयेंगे. तब तक चलता है.

तिथंच दोनचार रिक्षा. गिर्‍हाइकाची वाट बघत. कुणी येणारा जाणारा दिसला की कशीही आडवीतिडवी रिक्षा चालवीत त्याच्या समोर. किधर? गिर्‍हाईक असेल तर निघायचं नाहितर पुन्हा आपल्या घोळक्यात. विचारलं नाईट करते हो? तर हां म्हणाला. पर, आज कल कोई मजा नही है. कोई फॅमीली है तो आती है. बाकी साले सब बेवडे. दो चार रहते है. जबरदस्ती घुस जाते है. ना बोलने पर भी सुनते नही. और भाडा देने के टाईम गालीया देते है. रात का टाईम कौन क्या करे. जादा बोलूं तो मारते भी है. क्या करे? ...धंदा है.

दुसरी बात आज कल ये कॉल सेंटर का धंदा बहुत जोर मे है. उनके लिये रात और दिन एक जैसा. रातभर उनकी गाडीया घुमती है. सबको मालूम है. बस के भाडे मे वो छोडते है. कौन जाएगा रिक्षे से. जहां रिक्षा का भाडा सौ होगा वहा ये लोग दस रुपये मे छोडते है. आजकल रात का धंदा करना बहुत कठीन हो गया है. एखाद-दुसरा भाडा मिल गया तो मिल गया नही तो जय सिया राम.

कभी कभी कोई जंटलमन आता है. हात मे बक्सा. दुर का भाडा. मन मे डेढ-दो सौ की गिनती करते करते उसका ठिकाना आता है. लेफ्ट मे खडी करके दो मिनट मे आता हुं करके चला जाता है. और वापिस नही आता. बक्सा खोलके देखे तो खाली. मन मे ही उसको दो चार गाली दे के रातभर जागते रहने का. उस रात निंद आती नही. और दुसरा भी दिन खराब हो जाता है.

हायवे वर ब्रीज होऊन ट्रॅफीकचा प्रश्न किती सुटला माहीत नाही. पण त्या पुलाखाली काही गरीबांची, भिकार्‍यांची झोपायची मात्र मस्त सोय झाली. इथं झोपणार्‍यासोबत त्याची बायको, दोन चार पोरं टोरं आणि इतरही सगेसोयरे. आजुबाजुला विखुरलेलं सामानसुमान. पुलाखाली एकदम सुरक्षीत. एकमेकांवर तंगडया टाकून, अंगावरचे अस्ताव्यस्त कपडे, आणि बिनधास्त झोप. ताणून दिल्याचा आनंद आणि बेफिकीरी. अधुनमधुन उठणार्‍या खाजेला शांत करीत त्यांची रात्र 'करवटे' बदलत निघुन जाते. पहाटे पहाटे छोटया मोठ्या धंद्याना सुरुवात.

रिक्षा-टॅक्सीवाले, भिकारी, चहा-सिगरेटवाले यांच्या सोबतीने मुंबईतली रात्र पेंगत रहाते. काहींची रात्र छपरांच्या आडोशा- आडोशाने सरत असताना. याच मुंबईत काहींची रात्र मूउशार गादया गिरदयात लोळत असते. एसी बेडरुम, त्यात ऐसपैस आकर्षक बेडस, दिलखेचक रंग-संगती, चकचकीत आरसे, मंदसा उजेड आणि गुलाबी स्वप्न पहात रात्रही रंगीबेरंगी होत असतांना. दुसर्‍या दिवसाची वाट पहात जागणारी, पेंगणारी, काम करणारी मिळेल तिथं डुलक्या काढणारी, विश्वासानं कुठेही मान टाकणारी माणसं मुंबईच्या कुशीत आपापले दिवस रात्रीच्या भयाण वास्तवाच्या आधाराने ढकलत असतात.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

No comments: