Friday, August 6, 2010

भाजीचा बाजार

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०

रात्रीचे बारा वाजले आहेत. दोघा-तिघांचा घोळका दोन-चार ठिकाणी गप्पा छाटत. एखाद-दुसरी गाय इतस्ततः पडलेला पाला हुंगत, चरत. काही गाई त्यांची वासरं मस्त रंवंत करत रस्त्यात कुठेही कशीही निवांत बसलेली. गेटवर चहा वाल्याच्या आजुबाजुला माणसांचा गराडा. स्टोव्हच्या फरफरणार्‍या आवाजाशी स्पर्धी करीत गावगप्पांचा फड रंगलेला. पिंपातलं पाणी प्लॅस्टीकच्या मगातून घटघटा पिऊन वर चहाचा झुरका त्यावर तंबाखुचा बार. दोनचार ठि़काणी ओळीत काही हातगाडया काही सायकली काही मोटारबाईक्स एखाद-दुसारा ट्रक टेम्पो. बाकी सुनसान मैदान आणि बाजूला दुकानाचे गाळे काळोखात निपचित.

वाशीच्या सेक्टर १९ मधलं एपीएमसी मार्केटचं हे चित्र त्यानंतर रात्री क्षणाक्षणानं बदलायला लागतं. माणसं, टेम्पो, ट्रक्स, लाईटस, हॉर्न्स, गाडयांचे आवाज, पेट्रोल-डिझेलचा धूर, धावपळ, पळापळ, आरोळ्या, किचाट गोंधळानं वातावरण भरुन जातं. बघता बघता रात्र चढत गेली आणि भाजीपाला मार्केटमध्ये सकाळ कधी झाली हे कळत नाही. इथं कुणाच्या डोळ्यावर पेंग नाही की कुणी झोपलेला नाही. उत्साहाला उधाण आल्यासारखं हलतं, बोलतं, चपळ वेगवान चित्र.

रात्री साडेबारा पाऊणच्या आसपास भाजीनं भरलेला एक ट्रक गाळ्याच्या कठडयाला लागतो आणि पंधरा-वीस कामगार झटापटीनं त्यातला माल उतरवायला लागतात. ट्रकातल्या काळोखातही नेमक्या व्यापार्‍याचं किंवा त्याच्या गाळ्याचं नाव घेतलं जातं, हातात विळ्यासारखा काटा गोणीत अडकवून तिघांनी उचललेला डाग एकाच्या डोक्यावर जातो. तो वळताना त्याच गतीनं दुसरा, तिसरा, चौथा... वेगवान लयीत ट्रक केव्हा खाली झाला कळला नाही. अर्ध्या चडडया, अंगात बनीयान, खांद्यावर भगवा टॉवेल, डोक्यावर चुंबळीसाठी खोलगट गोणी आणि तोंडात चित्रविचित्र हेल. यातले बहुतेक कामगार सोलापुर बॉर्डरवरचे त्यामुळे भाषा मराठी कानडी मिश्रीत. कष्टाचं काम पण त्यातल्या गतीमुळं त्याला आनंदाची, उत्साहाची झालर लागते आणि तेच काम हलकं फुलकं होऊन जातं.

सगळेजण आपापल्या कामात गर्क. एक सफारीतला तरुण मागे हाताचा गुणाकार करुन ट्रकाच्या आजुबाजुला खालीफुकट फिरत होता, म्हणून त्याला विचारलं तर म्हणाला, 'मी डायवर हाय, मला काय माहित नसतंय.' ... काय आहे, म्हणून एक म्हातारा पुढं आला. त्यानं एका झटक्यात सांगून टाकलं. 'शेतकर्‍याचा काय संबध नसतोय इथं. शेतकरी तिथल्या हुंडेकर्‍याकडं माल देतोय. हुंडेकरी सोताच्या नाहितर भाडयाच्या गाडीनं त्या त्या नावाच्या चिटटया लिहुन माल इथल्या व्यापार्‍याकडं धाडतो आनं इथनं पुढं मुंबयचा व्यापारी, त्याच्याकडनं भय्याकडं आनि तिथंन पुढं तुमच्या घरात'. एवढं बोलून तोही सटकला. त्याला कुणीतरी मास्तर अशी हाक मारली. असे अनेक मास्तर पुढे भेटले. नासीक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर कडून आलेल्या ट्रक-टेम्पोमधुन एक कागद ड्रायव्हरकडून थेट त्या मास्तरांच्या हातात पडत होता. प्रत्येक चिठठीबरोबर दहा-वीस रुपयाची नोट चिकटलेली असायची. तिथून पुढे जो तो त्या मास्तरच्या मार्गदर्शनानुसार. एकामागून एक असे ट्रक टेंम्पोची गर्दी आता वाढत चालली. एकाला लागून एक अश्या शिस्तीत गाडया उभ्या रहात आणि त्याच शिस्तीत माल उतरवला जाई. एका ड्रायव्हरला गाईड करायला पंधरावीस आवाज. व्यापार्‍यांच्या लगतलगतच्या मोकळ्या गाळ्यातही नुसत्या नंबरावरुन नेमका माल नेमक्या गाळ्यात येऊन पडत होता. अडाणीपणातही एक शहाणपण दडलेलं असतं त्याचा एक सुंदर नमुना.

रात्री दोन-अडीचच्या सुमारास मार्केटच्या गेटमधुन चारचाकी सुंदर चकचकीत गाडया येतांना दिसतात. त्या असतात मुंबईच्या व्यापार्‍यांच्या. घामानं भिजलेल्या हमालांच्या दुनियेत, चेहर्‍यावर झोपून उठल्यानंतरची तॄप्ती,. ताज्या चेहर्‍यावर पावडरचा हलका हात, कपडयांवर सेंटचा अंधुक वास. मनगटावर घडयाळ, एखाद्याच्या हातात ब्रेसलेट किंवा बोटात अंगठी, खिशात मोबाईल घेऊन व्यापारी प्रवेश करतो. बहुसंख्य मराठीच. पण गुजरात्यांनाही या धंद्यातली गंमत कळायला लागली आहे. हमालांच्या यादीत युपी-बिहारींची नावं केव्हाच घुसली आहेतच. मैदान ते गाळ्यामधली धावपळ सुरुच राहते. पण आता लक्ष वेधून घेतो तो दुकानाचा गाळा.

संपुर्ण मैदान ट्रक-टेम्पो-हातगाडया आणि माणसांच्या लगबघीनं भरुन गेलेलं असतं. दुकानाचे गाळे आता स्वच्छ प्रकाशात उजळतात. वांगी, पडवळ, भेंडी, कारले, काकडी, कोबी, वाटाणा, दुधी, भोपळा, तोंडली, दोडका, रताळी, पालक, मेथी, कोथींबीर, मिरच्यांची पोतीच्या पोती. एकावर एक रचुन ठेवलेल्या गोण्यांच्या मधोमध भाजी विक्रीचा घाऊक धंदा सुरु होतो. मुख्य व्यापार्‍याच्या आजूबाजूला भाजी घेण्यासाठी उत्सुक चार-सहा जणांचा कोंडाळा. मुख्य विकणारा हातरुमालाच्या खाली समोरच्याच्या हाताची बोटं नेमक्या पेरात दाबून भाव पक्का करतो. भाव पटला तर टाळी कडाडते. (अंतराअंतरावर वेगवेगळ्या गाळ्यावर अश्या टाळ्या कडाडत राहतात आणि त्याचाच एक उत्सव बनुन राहतो.) सांकेतीक भाषेत व्यापारी भाव उच्चारतो, झरझर डाग (गोणी) वजन काटयावर येते. काटयावर वहीत लिहित असतो कृषी उत्पन्न बाजार समीतीचा एक माणूस. प्रत्येक वजनातला आठ टक्के हिस्सा त्याचा. शेतकर्‍याची फसवणूक होऊ नये म्हणून तो उभा.

त्या दिवशी भेंडीचा किरको़ळ बाजारातला भाव चाळीस रुपये किलो होता. तेव्हा ती भाजी इथे चौदा रुपये किलो होती. जो विकत होता त्या अडत्याचं कमिशन, त्याआधी काटेवाल्याचा पगार, समितीचं कमिशन, ट्रक-टेंपोचं भाडं, शेतापासून इथपर्यंत किमान चारवेळा मालाची चढउतार करण्यासाठी हमालांची मजूरी, ड्रायव्हर, डिझेल, मेंटेंनन्स, जाग्याचं भाडं. आणि या सगळ्याच्या खाली शेतकरी. ज्याच्या वाटयाला याच भाजीचा भाव किलोला तीन ते पाच रुपयाच्या आसपास मिळतो. ज्यासाठी तो किमान चार-सहा महिने शेतात राबतो. खतासाठी, पावसासाठी, पाण्यासाठी, विजेसाठी, कर्जासाठी कायम दुसर्‍यावर अवलंबून राहतो. शेतकर्‍यानं या सगळयासाठी हुंडेकर्‍याकडून आगाऊ घेतलेली उचल शेतातला माल उचलता क्षणीच काटली जाते. त्याच्या वाटया येणारा पैसा हा सगळ्यांच्यापेक्षा कमी. निसर्गापासून व्यापार्‍यापर्यंत आणि सरकारपासून अधिकार्‍यापर्यंत सगळ्याकडूनच शेतकर्‍याला नाडलं जाण्याची हमी आहे.

रात्रभर आपल्या खांद्याला झोळी लटकवून काही बाया काही पोरं फिरतांना दिसत होती. सुरुवातीला लक्षात येत नव्हतं, पण नंतर तेच चित्र डोळयापुढून हलेना. त्यांची लाचार लगभग बघण्यासारखी असायची. ट्रक-टेंम्पो खाली करतांना फाटलेल्या गोण्यातून काही भाजीपाला खाली पडायचा. तो उचलण्यासाठी यांची झुंबड उडायची. पण रात्रभरच्या या झटापटीत त्यांच्या झोळ्या भरुन जायच्या. इतक्या मेहनतीनंतर मिळवलेल्या या सप्तरंगी भाजीवर त्यांच्या दिवसाचा भार असायचा. ती उचललेली भाजी दिवसभर नाक्यावर विकायची. आणि पुन्हा दुसर्‍या रात्री इथंच. पु.ल.देशपांडेच्या 'ती फुलराणी' नाटकात एक वाक्य होतं की, 'आपल्यासारख्या माणसांचा उकीरडा तो कावळ्यासाठी घास असतो' त्याची आठवण झाली.

भाजी उतरता उतरता चहावाला यायचा. सगळ्या हमालाना आहे त्याच जागेवर चहा दिला जायचा. ट्रकावर वेगवेगळ्या पोजमध्ये उभे असलेले हमाल युध्दानंतरच्या विजयी विरांसारखे वाटले. चहा म्हणजे कामगारांसाठी अमृत-विसावा. चहावर तंबाखू किंवा त्याचीच सुधारीत आधुनीक आवृत्ती गुटखा आणि पुन्हा त्याच उत्साहात मर- मर. तेवढया मिळालेल्या वेळेत बाजुलाच लटकवलेल्या पिशवीत पसा दोन पसा भाजी जायची. शेजार्‍या पाजार्‍यांना फुकट वाटायला नाहितर खानावळ वालीला द्यायला. प्रत्येकाच्या डोक्यावर मागून उघडी खोल गोणी असायची. सहज हाताला लागतील त्या भाज्यानी आपसूक भराल्या जायच्या.

भाजी मार्केटच्या दक्षीण बाजूला संडास मुतार्‍यांची रांगच रांग. रात्रभर गर्दीत. तिथंच एका टोकाला विठ्ठल रखुमाइचं मंदीर. कुलूपात. विठोबाच्या अंगणात शनीचं मंदीर. उघड्यावर. शनी कोणात्याही सिझनमध्ये किमान बारापैकी एका राशीला नडतच असतो. त्याची उठबस झाली पाहिजे. विठोबाची आठवण दर एकादशीला नाहीतर आषाढी कार्तीकीला तर दर शनिवारी शनीचा टिळा लावणारे अनेक.
पुढे त्याच रांगेत चहा, वडा, मिसळच्या टपर्‍या रात्रभर भरात असतात. नदीच्या पाण्यातल्या भवर्‍यासारखा पितळेच्या पातेल्यात चहा उकळत रहातो. आधी सफेदच पण पिळून पिळून काळ्या चॉकलेटी पडलेल्या फडक्यात गुंडाळून चहा गाळला (पिळला) जातो. चहा वर चहा संपत रहातो.
दाना बाजार, कांदा बटाटा बाजार, फळ बाजार आणि हा भाजी पाला बाजार. सुधाकर नाईकांच्या काळात मुंबईच्या बाहेर नवी मुंबई वाशी इथं हलवलेला हा शेती उत्पन्न बाजार आता इथं चांगलाच रुळला आहे. कितिही महागाई असो दोन वेळच्या जेवणाच्या ताटात आपल्या हक्काची जागा राखुन ठेवणारी भाजी आपल्यापर्यंत पोचण्याआधी शेतकर्‍यापासून ते भाजी विकणार्‍या शेवटच्या भय्यापर्यंत हजारो हात खपत असतात.


प्रवीण धोपट.
99672 93550

pravindhopat@gmail.com

No comments: