Monday, July 19, 2010

करवटे बदलते रहे....

पूर्वप्रसिध्दी : महानगर (संपादक- वृंदा  शरद बाळ) : जुलै-२०१०

रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र. निसर्गाचं चक्र वर्षानुवर्षे असंच चालू आहे. त्यात आपण आपला क्रम आखलेला असतो. प्रत्येकाला निसर्गानं दिलेली वेळ सारखीच. त्यात ज्यानं-त्यानं आपापली वेळ साधायची. कधी कुणाला हा दिवसाचा वेळ पुरत नाही तर कधी कुणाला तोच दिवस जाता जात नाहीत. दिवस सरतो पण रात्र छळत रहाते.

शेता-शिवारात राबणार्‍या, दिवसभर मान मोडून काम करणार्‍याला गाढ झोप लागते. तर काहिना झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मनगटाच्या घडीवर डोकं ठेऊन आणि शरीराची पुरचुंडी करुन झोपणार्‍याला पेकाटात लाथ पडल्याशिवाय जाग येत नाही आणि गुबगुबीत गालीछावर लोळत पडलेल्यांच्या डोळ्याला झोप शिवत नाही. कुणाच्या झोपेचा ताबा गोड स्वप्नांनी घेतलेला असतो. तर कुणाच्या झोपेला चिंता कुरतडत असते. दिवसरात्रीचा हा खेळ कुणाच्या वाटयाला कसा येईल हे सांगता येत नाही.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे. पावसाची रिपरिप. बाजूलाच बसस्टॉपच्या आडोशाला मी उभा.भरदाव वेगात जाणार्‍या गाडयांचे टायर्स रस्त्यावरच्या पाण्यात सुंदर नक्षी उठवतात. ती ही क्षणभरच. पुन्हा एकजीव पाणी. पुन्हा एकादी नवीन नक्षी. झरझर बदलणारे हे रस्त्यावरचे नक्षीकाम आपल्याला गुंतवून ठेवतं. त्यात वरुन मिसळणारा दिव्यांचा उजेड त्या नक्षित आणखीनच रंग भरीत रहातो. गाडयांच्या वेगाबरोबर वाढत आणि विरळ होत जाणारा आवाज. टायर्सच्या आवाजाची चरचर. पेट्रोलच्या धुरात मिसळणारा प्रकाश आणि पावसाच्या रेघा खिळवून ठेवतात.... आणि तिथं सिटखाली झोपलेला एकजण आपली कुस बदलतो. आपले हातपाय आपल्या अंगाशी आक्रसुन पुन्हा झोपेच्या कुशीत. जन्मापुर्वी आईच्या पोटात बाळ असतं तसं.

रात्री दिड वाजता हवा खायला म्हणून हायवेलगतच्याच झोपडपटटीतून आलेलं एक तरुण जोडपं. त्यातला तो म्हणाला आम्ही इथं नेहमीच येतो. त्याची बायको गर्भार होती. मला त्या झोपलेल्याचं कुतुहल होतं. मी त्याला विचारलं तर हा म्हणाला की तो गेली सहा-सात वर्षे इथंच झोपतो. युपी वरुन आलेला आहे. प्लास्टीक मोल्डींगच्या कारखान्यात दिवसभर काम करतो. घरदार नाही. खाणं पिणं इथं तिथंच. आंघोळ कारखान्यातल्या नळाखाली. कपडे साधेसुधे दोनचार. आणि झोपायला इथं बसस्टॉपवर. हा म्हणाला. आता चांगलीच सोय झाली आहे. पुर्वी साधे उघडे बसस्टॉप होते. तेव्हा याचं कठीण व्हायचं. मग कुठंतरी दुकानाच्या वळचणीला. पण आता किमान पाट टेकता येते. तो उठायची वाट बघत होतो. पण उठला नाही. ते ही दोघं निघुन गेले. मी ही.

पुढ चेकनाक्यावर. ओळीत पंधरा विस रिक्षा. काही काही रिक्षामधून मागच्या सिटमधून बाहेर आलेले पाय. जवळ जाऊन बघीतलं तर आत शरीराची मुटकुळी करुन झोपलेले रिक्षावाले. कुणी जाडजुड मागची सिट बसायच्या सिटच्या वर मागून आडवी टाकतो आणि तिच्या उतारावर उताणी झोपतो. त्यातलेच काही जागे. घोळक्याचे चार-सहा. नाक्यावर, अण्णाकडची चहा पिता पिता मी विचारतो, सोये नही? नही, मच्छर काटती है. जब ऐसी नींद आयेगी की काटनेवाली मच्छर भी याद न आये तब जा के सोयेंगे. तब तक चलता है.

तिथंच दोनचार रिक्षा. गिर्‍हाइकाची वाट बघत. कुणी येणारा जाणारा दिसला की कशीही आडवीतिडवी रिक्षा चालवीत त्याच्या समोर. किधर? गिर्‍हाईक असेल तर निघायचं नाहितर पुन्हा आपल्या घोळक्यात. विचारलं नाईट करते हो? तर हां म्हणाला. पर, आज कल कोई मजा नही है. कोई फॅमीली है तो आती है. बाकी साले सब बेवडे. दो चार रहते है. जबरदस्ती घुस जाते है. ना बोलने पर भी सुनते नही. और भाडा देने के टाईम गालीया देते है. रात का टाईम कौन क्या करे. जादा बोलूं तो मारते भी है. क्या करे? ...धंदा है.

दुसरी बात आज कल ये कॉल सेंटर का धंदा बहुत जोर मे है. उनके लिये रात और दिन एक जैसा. रातभर उनकी गाडीया घुमती है. सबको मालूम है. बस के भाडे मे वो छोडते है. कौन जाएगा रिक्षे से. जहां रिक्षा का भाडा सौ होगा वहा ये लोग दस रुपये मे छोडते है. आजकल रात का धंदा करना बहुत कठीन हो गया है. एखाद-दुसरा भाडा मिल गया तो मिल गया नही तो जय सिया राम.

कभी कभी कोई जंटलमन आता है. हात मे बक्सा. दुर का भाडा. मन मे डेढ-दो सौ की गिनती करते करते उसका ठिकाना आता है. लेफ्ट मे खडी करके दो मिनट मे आता हुं करके चला जाता है. और वापिस नही आता. बक्सा खोलके देखे तो खाली. मन मे ही उसको दो चार गाली दे के रातभर जागते रहने का. उस रात निंद आती नही. और दुसरा भी दिन खराब हो जाता है.

हायवे वर ब्रीज होऊन ट्रॅफीकचा प्रश्न किती सुटला माहीत नाही. पण त्या पुलाखाली काही गरीबांची, भिकार्‍यांची झोपायची मात्र मस्त सोय झाली. इथं झोपणार्‍यासोबत त्याची बायको, दोन चार पोरं टोरं आणि इतरही सगेसोयरे. आजुबाजुला विखुरलेलं सामानसुमान. पुलाखाली एकदम सुरक्षीत. एकमेकांवर तंगडया टाकून, अंगावरचे अस्ताव्यस्त कपडे, आणि बिनधास्त झोप. ताणून दिल्याचा आनंद आणि बेफिकीरी. अधुनमधुन उठणार्‍या खाजेला शांत करीत त्यांची रात्र 'करवटे' बदलत निघुन जाते. पहाटे पहाटे छोटया मोठ्या धंद्याना सुरुवात.

रिक्षा-टॅक्सीवाले, भिकारी, चहा-सिगरेटवाले यांच्या सोबतीने मुंबईतली रात्र पेंगत रहाते. काहींची रात्र छपरांच्या आडोशा- आडोशाने सरत असताना. याच मुंबईत काहींची रात्र मूउशार गादया गिरदयात लोळत असते. एसी बेडरुम, त्यात ऐसपैस आकर्षक बेडस, दिलखेचक रंग-संगती, चकचकीत आरसे, मंदसा उजेड आणि गुलाबी स्वप्न पहात रात्रही रंगीबेरंगी होत असतांना. दुसर्‍या दिवसाची वाट पहात जागणारी, पेंगणारी, काम करणारी मिळेल तिथं डुलक्या काढणारी, विश्वासानं कुठेही मान टाकणारी माणसं मुंबईच्या कुशीत आपापले दिवस रात्रीच्या भयाण वास्तवाच्या आधाराने ढकलत असतात.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

तू भिजत रहा

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # जुलै-२०१०

अन्यतः नकाशे बनवण्याची कटकट वाढलीच असती. पुन्हा गेली पन्नास वर्षे नजरेत भरलेला किंवा बसलेला आकार बिघडला असता ते आणि निराळंच. वर फटाक्यांचा, बॅनरवरचा आपला खर्च वाचला तो वाचलाच ना? (...नाही ...नाही, रांगोळ्या वैगेरे आत्ता नाहीत, पुढच्या वर्षापासून. त्याला आधीपासनंच तयारी करायला लागते.) त्यामुळे एका अर्थानं झालं ते बरं झालं. जर तर चा खेळ नेहमी हरण्यातच मजा असते. कारण हारलेल्याचा सल नेहमी माणसाच्या आशा आकांक्षाना अधिक उर्जा पुरवीत राहतो. विजयाचा आनंद एकदाच किंवा वर्षावर्षानं आठवत राहिला असता एवढंच. एक मे ला कंपनी म्हणून आणखी एक दिवस. त्यावरुन पुन्हा भांडणं किंवा सुवर्णमध्य. मग पुन्हा (शिवाजी महाराज जयंती स्टाईल) शिवसेना, मनसे, भाजपा यांची सुटटी एक मे आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे सरकारी हॉलीडे 7 जुलै. थोडक्यात बेळगावने महाराष्ट्रात येण्याचा मुहुर्त तुर्तास टळला आहे. हे बरंच झालं.

पण एक ना एक दिवस बेळगाव महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे केंद्रालाही माहीत असणार. तिथंली बहुसंख्य जनता मराठी आहे. अगदी आकडेवारीतच बोलायंचं झालं तर ५४.७ % मराठी तर कन्नड भाषिक २३.८ % आणि इतर उरलेले. बेळगावचा मराठी भाग ऐतिहासिक, भाषिक, वाडमयीन, धार्मीक अंगाने महाराष्ट्रीयन आहे. ज्योतिबा, खंडोबा, विठोबा, तुळजाभवानी ही त्यांच्या श्रद्धेची ठिकाणं आहेत. या शहरात एकुण दहा वाचनालयं आहेत. त्यापैकी सात पुर्णपणे मराठी. दोन द्विभाषिक तर एक कन्नड. बहुसंख्य शाळांचे माध्यम मराठी. उर्दु भाषिकांची दुसरी भाषा मराठी. १ डिसेंबर १८९१ साली पंच कमिटी म्हणून स्थापन झालेल्या आणि आता महानगर पालिकेत रुपांतर झालेल्या बेळगाव शहरातील या १३५ वर्षे जुन्या संस्थेचा कारभारही पुर्णपणे मराठीतूनच होत आला आहे. पण पुढे महाजन समितीनेही या मुद्यांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करुन महाराष्ट्राच्या विरोधीच सुर लावला. ते या ठिकाणी इतरत्र देत असलेल्या तक्त्यातूनही लक्षात येईल.

तालूका                         गावे                        भाषिक टक्केवारी


                                                        मराठी                कानडी            इतर

बेळगाव शहर               ...                ५२.००                २३.००             २५.००

बेळगाव तालूका           ९                  ९६.१६                  ...                   ...

अथणी                         १०                 ६१.००                  ३३.००             ६.००

खानापूर                      ५०                ८६.७०                 ...                   ...

कारवार                       ५०                ७८.००                १५.००             ७.००

सुपा                           १३१                ८४.००                   ६.००            १०.००

हल्याळ                      १२०                 ६२.००                 ३२.००              ६.००

हुमनाबाद                  २८                   ६३.००                  १६.००            २१.००

भालकी                      ४९                 ५९.००                  ३०.००            ११.००

संतपूर                       ६२                  ६०.००                  २६.००            १४.००

आळंद                       १०                   ६८.००                  २४.००             ८.००

त्या जनतेला महाराष्ट्रात येण्याची आस आहे. बेळगावातल्या 'महाराष्ट्र एकीकरण समिती' नावाच्या पक्षाचे चार-सहा आमदारही निवडून येतात. अपवाद गेल्या निवडणूकीचा त्याची कारणंही आता आपल्या सगळ्यांना माहिती झाली आहेत. तिथल्या महानगरपालिकेतले बहुसंख्य नगरसेवक मराठी असतात. किंबहुना १९८४ सालापासून आजपर्यंतचे १९ महापौर मराठीच आहेत. आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्य वेगवेगळी असली तरी त्यांचा देश एकच आहे. म्ह्टला तर प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. पण तरीही तो भिजत ठेवलेला आहे. आणि तो भिजत राहण्यातच खरी गंम्मत आहे. लोकशाहीत खरंतर लोकभावनाच प्रबळ ठरायला हवी. तरीही बेळगावचा प्रश्न सुटत नाही. त्याला उत्तरोत्तर आणखीनच पेच पडताहेत. हे खरंच अनाकलनीय आहे.


इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी ती म्हणजे, सिमाभाग हा प्रश्न इतिहासाचा आहे, भुगोलाचा आहे अर्थात भावनेचाच आहे. आणि काँग्रेसला त्यांच्या विरोधकांना फक्त भावनांचे खेळ खेळायला द्यायचे आहेत. भावनेच्या खेळात सामील होणार्‍यांचं शेवटी हसंच होतं. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात हा खेळ चालला आहे. या पुढेही चालणार आहे. त्यामुळे काँग्रेस सहजासहजी बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याच्या भावनेला भीक घालणार नाही, हे नक्की.

बेळगाव, निपाणी, खानापूर,कारवार, बीदर, भालकी असा मराठी बहुभाषिक सिमाभाग महाराष्ट्राला न देता तो गेली ५० वर्षे हा विषय कुजत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्राने हा मराठमोळा भाग मैसूरच्या (कर्नाटक) घश्यात ढकलला होता. भाषावार प्रांतरचनेचे नियम धाब्यावर बसवले गेले. असं करण्यामागे कोणतेही निकष नव्हते. असलेच तर ते महाराष्ट्र द्वेशाचे. खरंतर याच बेळगावात १९४६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या निमित्तानेच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं गेलं होतं. पण अजून झोप उडाली नसल्यामुळे स्वप्नही तशीच आहेत.

गुजरात राज्याची निर्मीती करतांनाही खुद्दा बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई यांनी डांगी भाषा मराठीला जवळची आहे असा अहवाल दिला होता. तरीही लोकल बोर्डाच्या ठरावावर डांग आणि उंबरगाव हा भाग गुजरात मध्ये घालण्यात आला. तेही घोंगडं अजून भिजतंच आहे. उपरवालेके घर मे देर है अंधेर नही असं आपण म्हणतो किंवा मानतो. सर्व पक्षांनी आपली सर्व शक्ती एकवटून 'जोर लगा के...' म्हणत शेवटचा टोला हाणला, सर्व बळ पणाला लावून एक जोराचा धक्का दिला तर बेळगावचा सीमाप्रश्न धक्क्याला लागू शकतो.

बेळगावची जनता दुरदैवाने कर्नाटकासोबत नांदत असली तरी तिचं प्रेम महाराष्ट्रावर आहे. खरंतर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करायला मिळावं असं वाटतंच. वाटायलाच पाहिजे. पण तसं न होण्यातही एक गंम्मत असते. ती हुरहुर आयुष्यभर तरी जपता येते. लग्नानंतरच्या नवलाईचे नऊ दिवस संपले की प्रेम, लग्न, संसार या मार्गाने पुढे सरकलेला गाडा नंतर आयुष्यभर ओढत रहावा लागतो. मग 'याच साठी केला होता का अटटाहास?' असं म्हणण्याची पाळी येते. पण नाईलाजाने का होईना वडीलधार्‍याच्या शब्दाला मान म्हणून आपल्याला न आवडणार्‍या माणसाशीही संसार करावा लागतो. तो जर प्रमाणीकपणानं केला तर पुढे बर्‍याच वेळेला (म्हणजे अश्या प्रकारच्या सगळ्याच सिनेमात) एका पावसात प्रियकराची भेट होते. याची बायको आणि तिचा नवराही अकाली गेलेला असतो. भुतकाळातल्या रम्य आठवणी निघतात. नियतीचे आभार मानले जातात. फुलं फुललेलीच असतात. झरे झुळझुळत असतात. वारे वहात असतात. पक्षी गात असतात. वासरं बागडत असतात. मुलं नाचत असतात. झाडं-वेली डोलत असतात. त्याच वेळी यांनी त्यावेळी गायलेलं गाणं बॅगराउंडला पुन्हा वाजत असतं आणि द एंड. तसं विरोधकांचं राज्य येवो अशी कार्नाटकी विठोबाला आपण प्रार्थना करुया. तेवढीच आपली गंम्मत. गेली हजारो वर्षे कानडा असुनही विठोबाला आपण आपला मानला. आता आपल्याला माहितच आहे की बेळगाव आपलाच आहे पण त्याना काही वर्षे त्याला आपला मानु दे. कारण आपल्यापेक्षा इतिहास, भुगोल आणि परमेश्वराचंही वय जरा जास्तच असतं, नाही का?



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

Sunday, July 11, 2010

केईएम ला केईएम सारखंच ठेवायंच आहे...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०

केईएम म्हणजे आरोग्य क्षेत्रातली दंतकथा. जन्म मृत्युसोबत इथं जगण्यातल्या तमाम दुखांचीही नोद होत असते. माणसा-माणसातले संबंध, नात्या-नात्यातली वीण, कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सगे-सोयरे यांच्यातल्या भावभावनांचा खेळ इथंच बघायला मिळतो. आपल्या-परक्याची सिमारेषा सुस्पष्ट दिसायला लागते ती इथंच. आपल्या माणसासाठी रात्र रात्र जागणारी आणि केवळ उपचार म्हणून मारी बिस्कीटाचा पुडा आणि नारळातलं पाणी पुढे करुन तोंडदेखली चुकचुकणारी कित्तेक माणसं याच केईएमनं पाहिली आहेत. वेदना, यातना, पिडा या शब्दांचा कचरा इथं जागोजाग साचलेला दिसतो. आक्रोश आणि आसवांची तर गिनतीच नाही. 'मी'च का? माझ्याच वाटयाला हे सर्व का? असं म्हणून परमेश्वरालाही थेट जाब विचारावा, धारेवर धारावं अशी ही जागा. पाप-पुण्याचा हिशोब मांडायला फुरसत मिळते ती ही इथंच. इथून निघतांना माणूस दोनच गोष्टी बाहेर घेऊन जातो, ते म्हणजे आनंद किंवा दु:ख. कुणाचा वाटा कोणता आहे, कुणाच्या नशीबी कोणते भोग यावेत याची कुंडली काळ मांडत असतो आणि या भोगाची तिव्रता कमी करण्यासाठी अहोरात्र कष्टत असतात डॉ. संजय ओक आणि त्यांचा परिवार.
डॉ. संजय ओक केईएमचे आजचे डीन. पाउणशे वर्षांच्या इतिहासाचे आत्ताचे साक्षिदार. नुकतीच आरोग्य सेवेतली त्यांनी एकवीस वर्षे पुर्ण केली. त्या निमित्तानं त्यांच्याशी बातचीत. गरीब कुटुंबातून वर आलेल्या डॉक्टरचा प्रवास आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा लेखाजोखा.

डॉक्टर व्हावसं का वाटलं?

एकतर आपल्या हुशार मुलांनी डॉक्टर व्हावं असं स्वप्न आपल्या आईवडीलांनी पहाण्याचा तो काळ. माझ्या वडिलांची मी डॉक्टर तेही सर्जन व्हावं अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. घरातलं वातावरण मी डॉक्टर होण्यास अनुकुल ठेवलं. त्यामुळंच मी शिवाजी विद्यापीठातून एम.बी.बी.एस आणि एम.एस पुर्ण केलं.

मुंबईत कसे, कधी आलात? केईएम चे डीन होऊ असं वाटलं होतं?

१९८६ साली. माझं अकॅडेमीक करिअर चांगलं होतं. ते बघून डॉ. स्नेहलता देशमुख यांनी मला एक पत्र पाठवलं आणि मुंबईत बोलावून घेतलं. आणि मग सुरुवातच झाली. गेल्या १ जुलैला या गोष्टीला एकवीस वर्षे पूर्ण झाली. आजही मला ते दिवस लख्ख आठवतात. मुंबईतलं असं कोणतही मोठं हॉस्पिटल नसेल जिथे मी नोकरी केली नाही. केईएम चा डीन होईन असं स्वप्नातही नव्हतं. मी माझं काम करीत गेलो. डीन होणं ही चांगल्या कामाची पावती आहे असं मी समजतो.

रॅगींग या विषयाकडे तुम्ही आज कसे बघता? मुन्नाभाई एमबीबीएस मुळे तो विषय जरा जास्त अधोरेखीत झाला होता. अधुनमधुन वर्तमानपत्रात वाचायलाही मिळतं..

मी ही विद्यार्थीदशेत असतांना सुरुवातीला रॅगींगचा बळी होतो. पण त्याचं प्रमाण अगदीच मामुली होतं. व्हर्बल कमेंटस किंवा गाणी म्हणून दाखव या टाईपमधलं. पण पुढे पुढे धीर चेपला. नंतर याच कॉलेजात मी विद्यार्थी नेता होतो. खाजगीकरणाविरोधी आम्ही आंदोलनंही केली होती.
आज रॅगींग प्रतिबंधक कायदा अस्तीत्वात आहे. त्याला कठोर शिक्षाही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्याला आळा बसला आहे. पण बळी तो कान पिळी या न्यायाप्रमाणं काही गोष्टी छुप्या पध्दतीनं चालू असतात. आज त्याचं प्रमाण निश्चितच कमी झालं आहे.

डॉक्टर झाल्यावर स्वतंत्र खाजगी प्रॅक्टीस करावी असं वाटलं नाही? काय कारणं होती पैसा, आत्मविश्वास की मराठी माणूस...?

त्याही काळी सरकारी नोकरीपेक्षा खाजगी क्षेत्र चढणीलाच होतं. पण नोकरीच करायची असं पहिल्यापासूनच ठरवलं होतं. आणि या माझ्या ठरवण्याला पुर्ण आकार दिला तो देशमुख बाईनी. ज्या मला माझ्या आई समानही आहेत. आजही त्यांच्याशी माझे स्नेहाचे संबध आहेत. त्यांनी माझ्यातला शिक्षक जागा केला. माझ्या भविष्याची दिशा ठरवून दिली. त्याचबरोबर डॉ. प्रकाश जहागीरदार. असे शिक्षक मार्गदर्शक मिळायला भाग्य लागतं. ते मला मिळालं. त्यामुळं इतक्या वर्षातल्या सरकारी सेवेचा मला पश्चाताप नाही. आज सहावा वेतन आयोग आहे. तेव्हा तो ही नव्हता. महिन्या अखेरीचा पगार मध्यमवर्गासारखा मलाही जेरीला आणायचा. पण कामाचं समाधान त्याच्याही पेक्षा शतपटीनं असायचं. जे सुख शांती, समाधान आणि सौभाग्य मला सरकारी नोकरीनं दिलं ते खाजगी प्रॅक्टीसनं कधीही दिलं नसतं. मला आजही माहीत आहे आणि तेव्हाही माहीती होतं की मी जे महिन्याला कमावतो आहे ते मला रोज छापता आलं असतं. पण पैशापेक्षाही वेगळी दुनीया असते ती मला या नोकरीनं दाखवली. खाजगी प्रॅक्टीस करुन मिळवलेला निव्वळ पैसा ते करु शकला नसता.... आणि मराठी म्हणशील तर तो मी आहेच.

या व्यवसायात कट प्रॅक्टीस, रिपोर्ट्सचं रॅकेट जोरदार आहे...

हे अगदी सुश्रुताच्या काळापासनंच चालत आलं आहे. डॉक्टर म्हणजे देव तरी असतो किंवा यम तरी, अश्या स्वरुपाचे श्लोक तेव्हाही पहायला मिळायचे. सरकारनं काही थेट ह्स्तक्षेप केला नाही तर हे टाळता येणं अश्यक्य आहे. आणि आपला वेळ प्रसंगी खिश्याला चाट देऊन रुग्णांना मदत करणारेही अनेक डॉक्टर आहेत. जिथं वाईट आहे तिथं चांगलंही आहे. आज केईइएम मध्ये कधी कधी अडीच अडीच लाखाच्या सर्जरी विनामुल्य होतात. तपासण्या, औषधांचा खर्चही नगण्य असतो. हे ही आहेच की...

बोगस किंवा अनधिकॄत डॉक्टर झोपडपट्ट्यातून दिसतात. त्यांच काय?

त्यांना आळा घालणं हे राज्य सरकारचं काम आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सील सारख्या संस्था आहेत. जे याला आळा घालू शकतात. आम्ही म्हणजे महानगरपालिकेच्या असे डॉक्टर निदर्शनास आले तर आम्ही त्याची यादी सरकारकडे सोपवतो. त्यांचं पुढ काय करायचं हा निर्णय सरकारचाच असतो.

सरकारी नोकरीच्या काही मर्यादा असतात का? तुमचा काय अनुभव...

सरकार ही एक चौकट असते. पण त्या चौकटीतही स्वातंत्र्य असतं. ते आपलं आपल्याला कळलं पाहिजे. या चौकटीत काहीही न करताही रिटायर्ड होता येतं. पण चॉईस आपला असतो. काही निर्णयांना उशीर होतो. मंजूरी लागते. पण ही त्या कामाची, यंत्रणेची गरज असते. ती गरज आपल्याला कळली की काम सोपं होतं. नुसतंच सरकार वाईट असं म्हणून चालत नाही. त्याच्या चांगल्या बाजू लक्षात ठेऊन आपल्याला नांदावं लागतं. कारण आपला संबध काम होण्याशी असतो. ते करवून घेण्याचं कौशल्य कलेकलेनं आपल्यात डेव्हलप होत जातं. जर ही यंत्रणा नाकाम असती तर ती इतके दिवस टिकून राहिली नसती. तीची म्हणून तिला एक स्ट्रेन्थ आहे. ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज मी इथपर्यंत पोहोचलो म्हणजे हे मला कळलं आहे, नाही का?

डॉक्टरांचे संप त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. या व्यवसायाला काही पथ्य असावीत की इतर व्यवसायासारखाच हा ही व्यवसाय मोजला जावा? आपल्याला काय वाटते?

दुर्दैवानं आता डॉक्टरी पेशालाही व्यवसायाचं स्वरुप आलंय. ते टाळता येण्यासारखं नाहीये. पण व्यवसायाच्या पलिकडेही जाउन जेव्हा रुग्णांच्या जीवाशी खेळ चालतो तेव्हा ते फारच भयावह वाटतं. आणि संपाचं म्हणशील तर आता सगळ्याच क्षेत्रात एक प्रकारची जागरुकता आलेली आहे. प्रत्येकाला आपल्याला मिळणार्‍या सुखसोई कायम कमीच वाटतात. ज्यानी त्यानी आपल्या मागण्यांसाठी आग्रह धरणं चुकीचा नाही म्हणता येणार. पण त्यासाठी दुसर्‍याला वेठीस धरणं चुकीचंच आहे. डॉक्टरांच्या संपाच्या वेळी रुग्णांचे हाल होतात. हे खरं आहे.

प्रत्येक डॉक्टरने खेडयामध्ये जाऊन काही काळ प्रॅक्टीस करावी असा कायदा आहे. पण तो मात्र मानला जात नाही...

याला कारण विद्यार्थ्यानी डॉक्टर होण्यासाठी घातलेला पैसा. डॉक्टर म्हणजे पैसे छापण्याचं मशीनच बनला आहे. आणि कायद्याच म्हणशील, तर कायदा म्हणतो खेडयात जा नाहीतर एक लाख भरा. आज लाख रुपये सरकारच्या तोंडावर फेकून आपली सुटका करुन घेणारे कित्तेक आहेत. खरंतर खेडयात आज डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे. अगदी ठाण्यापलिकडे चार्-पाच किलोमिटर गेलात तरी तिथं कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या सोई नाहीत. मला वाटतं हे जर खरोखरच असं व्हावं असं सरकारला वाटत असेल. तर तो अभ्यासक्रमाचाच भाग बनला पाहिजे. प्रत्येक डॉक्टरला खेड्यात जाणं कम्पलसरी करायला हवं यातूनच ते हाऊ शकतं. जसं परदेशात मिलिटरीची नोकरी करणं प्रत्येक डॉक्टरला सक्त्तीचं असतं, तसं इथंही व्हायला पाहिजे.

सरकारी खात्यात नवीन दाखल झालेल्या मशीन्स/उपकरणे बिघडली तर ती दुरुस्त करण्याची तजवीज नसते. आपल्या हॉस्पीटलमध्ये असे बंद पडलेले विभाग किती आहेत?

सुदैवानं केईएम मध्ये असं नाही. आज प्रत्येक विभागात बसवलेली अद्ययावत यंत्रणा चालू स्थीतीत आहे. याला कारण म्हणजे आम्ही तशी सोयच करुन ठवलेली आहे. कोणतही नवीन मशीन घेण्याबरोबरच आम्ही कमीतकमी पाच वर्षाचं अन्युअल मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्टच करतो. प्रत्येक मशीन बरोबर मुळ कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देते. त्यानंतरची पाच वर्षे. कदाचीत यात अधीक पैसे जातात. पण हेतू साध्य होतो. आणि केइएम सारख्या रुग्णालयात कुठलंही मशीन आठ वर्ष राहिलं तरी खुपच झालं

रात्री अपरात्री कधीही केईएममध्ये कुणालाही मुक्त प्रवेश घेता येतो? केइएम हॉस्पिटलच्या सुरक्षे विषयी कोणत्या सोयी आहेत? त्या पुरेशा आहेत का?

सुरक्षेच्या बाबतीत मी समाधानी नाही. कारण सुरक्षा रक्षकांची संख्या फारच कमी आहे. इथं महिला सुरक्षारक्षकांचीही गरज आहे. कारण काही महिला मार्‍यामार्‍याही करतात. त्यावेळी पुरुष सुरक्षारक्षकाला नुसतं बघत राहण्यापलिकडे काहिच करता येत नाही. अठराशे बेडचं हॉस्पिटल. तेवढेच किंबहुना याहुन जास्त रुग्ण. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक. त्याना बघायला येणारे असा पाच-सात हजार माणसांचा जथा रोज केईएमच्या आवारात असतो. त्याला आवर घालणं निश्चीतच सोपं नाही.

आणि केईएम्च्या सुरक्षा यंत्रणेचा कार्यभार डीन च्या अखत्यारीत येत नाही. त्याला स्वतंत्र खातं आणि त्याचा कमिशनर वेगळा असतो.

स्वच्छतेच्या बाबतीतही इथं अशीच अवस्था आहे...

आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. पण येणारी माणसं आपल्या सवयीनाही बरोबर घेऊन येतात. थूंकणे हा आपला जन्मसिध्द अधिकार असल्यासारखी माणसं वागतात. जिथे थुंकु नका असं लिहिलेलं असतं त्यावरही माणसं थुंकतात. आम्ही एक रंगरंगोटीचा अभिनव उपक्रम केला होता. प्रवेशद्वाराजवळचे खांब आम्ही रोज सकाळी रंगवून घ्यायचो. पुन्हा रात्रीपर्यंत तो पिचकार्‍यानी रंगलेला असायचा. स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या कर्मचार्‍यांनी कितीही खबरदारी घेतली तरी ती कमीच वाटते. लोकांनीही आम्हाला मदत,सहकार्य करायला हवे.

खाजगी मदत किंवा कॉर्पोरेट पार्टनरशीपचा काही विचार करता...

असे अनेक प्रस्ताव आहेत. पण हे मानायला युनीयन्स तयार होत नाहीत. त्याना खाजकीकरण होईल की काय याची भीती वाटते.

युनीयनचा आणि व्यवस्थापनेचे संबंध कसे आहेत?

जसे इतर ठिकाणी असतात तसेच. प्रत्येकानी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली की आम्ही व्यवस्थापन म्हणूनही आमची जबाबदारी टाळत नाही. माझे सगळ्याच म्हणजे जवळजवळ सहा युनीयन्सची संबध चांगले आहेत.

तुमच्या कारकिर्दीत सुरु झालेला एखादा उपक्रम...

इथे जवळजवळ साडेतीन हजाराहुन जास्त स्टाफ आहे. ज्यांचा रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी रोजचा संबध येतो. कर्मचारी आणि इथं येणार्‍या माणसांचं प्रमाण कायम व्यस्त असतं. डॉक्टरांनी, नर्सेसनी, वॉर्डबॉयनी आपल्याशी बोललं पाहिजे. आपलं दु:ख समजून घेतलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य होत नाही. त्यामुळे कधी कधी गरज नसतांनाही एकमेकांतले संबध ताणले जातात. आणि मग मारामार्‍यापर्यंत प्रकरणं येऊन पोचतात. याला आळा बसावा त्यासाठी अगदी ऑर्डबॉय, आया पासून ते डॉक्टरांपर्यंत आम्ही सॉफ्टस्किल डेव्हलप करण्याचा प्रोग्राम आयोजीत केला आहे. त्याचे परिणामही चांगले दिसताहेत.

लिखाणाची सवय कधीपासूनची...

पहिल्यापासूनच लिहितो. आजवर माझी छत्तीस पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. कधी व्यवसायाचा भाग म्हणून तर कधी मनातलं सांगावसं वाटलं म्हणून. लिहित असतो. आजही माझं काही वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिणं चालू असतं. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. यातून लोकांशी थेट संवाद साधता येतो. लिहित राहणार आहे.

आजवरच्या सेवेत आपण समाधानी आहात? पुढची काय स्वप्नं आहेत?

हो नक्कीच... मला सरकारी नोकरीनं जे दिलं आहे ते खाजगी प्रॅक्टीस नक्कीच देऊ शकली नसती. आणि स्वप्नाचं बोलायचं झालं तर मला केईएम केइएमसारखं ठेवायचं आहे. जिथं जात, धर्म, राज्य, प्रदेश याच्या सिमा ओलांडून माणसं आपल्या बरेपणासाठी येतात. इथं येतांना त्यानी हक्कानं यावं. संगवरवरी फरश्यानां, रंगीबेरंगी भिंतीना, कडेकोट बंदोबस्ताला आणि थंडगार एसीच्या गारव्याला बघुन बुजता कामा नयेत. हा परिसर, इथला स्टाफ, इथली जमीन त्याना आपली वाटायला पाहिजे. आज वाटते तशी.


प्रवीण धोपट

99672 93550

pravindhopat@gmail.com

जिथे सागरा धरणी मिळते...

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०

अथांग निळा समुद्र. सुसाट सळसळता वारा. लाटांची गाज. आजुबाजुत पसरलेला ओला गारवा. क्षितिजावर काळ्या प्रकाशाची आभा. लाटेमागून लाट एका संथ लयीत किनार्‍यावर उतरत रहाते. मनाला गुंतऊन शरीराला रिझवत ठेवते. समुद्रावर लवलवणारा वारा पाण्याला खेळवत राहतो आणि काठावरुन पाण्यात पडणारे प्रकाशाचे कवडसे वरवर नाचत राहतात. मधुनच पडणारी पावसाची सर पाण्यावर थरथरत रहाते. दिवसभराचा शीण मऊशार वाळूत निथळत राहतो आणि आपण अधिक ताजेतवाने, फ्रेश होत जातो. मन वाळूत रुतुन बसतं. पाय निघायचं नाव घेत नाहीत.

...आणि शिटयांच्या आवाज कानावर येतो. ती पोलिसाची असते म्हणून. आता निघावंच लागतं. आणि आपण पुन्हा सिंमेंटच्या चकचकीत जगात. माणसांच्या दुनियेकडे पाठ फिरवून उभं राहिलं तर जगातल्या कोणत्याही समुद्राची गोष्ट वेगळी नसावी. आपल्याच तंद्रीत, आपल्याच नादात. असाच मुंबईचा जुहु समुद्रकिनारा. मुंबईच्या सौंदर्यातली एक नखरेल अदा.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास बांधाच्या आडोश्याने, दगडांच्या कुशीत, वाळूत, बसलेली-लपलेली जोडपी घराकडे निघायच्या तयारीत. अंगाला चिकटलेली वाळू झटकत रुतलेल्या पावलांना ओढत सोबतचा आधार घेत धिम्या पावलांनं परतीला लागतात. जशी रात्र चढायला लागते तसे एक एक करुन माणसांचे पाय उलटया दिशेने चालायला लागतात. बारा साडेबारा नंतर उरतात ते श्रीमंत आणि सडाफटींग. त्यांच्यावर लक्ष ठेवायला पोलीस. त्यांच्या पोटाची भुक भागवणारी दुकानं आणि पेटलेल्या शिरीराची आग शमवणार्‍या पोरी.

जुहु पोलीस चौकीच्या तोंडावरुन समुद्रकिनार्‍यावर प्रवेश केला की उजव्या अंगाला लागतात ती खानपानाची दुकानं. पण पुर्वीसारखां मुंबईच्या किनार्‍यावरचा ऐसपैसपणा गेला आणि त्यांची जागा या पॉश दुकानांनी घेतली. दिलखेचक रंग, आकर्षक सजावट, भगभगणारा उजेड माणसाना आपल्या दिशेनं ओढत रहातो. पुर्वीचे भेळवाले, पाणिपुरीवाले भय्ये नेस्तनाबूत झाल्यासारखे. आता बहुतेक दुकानांचे मालक मुसलमान, गुजराती, मारवाडी. पावभाजीच्या दुकानावरची दोन पोरं ओरडून ओरडून दुकानाकडे गिर्‍हाईकं खेचत होती. त्यातल्याच एक म्हणाला, 'अभी बारीश है ना. इसलिये. पयले जैसा मजा नही. अभी कुछ नही. पयले घोडा गाडी थी. घोडे की सवारी थी. बच्चोंके लिये गेम थे. सर्कल थे. सोरट था. क्या नही था इधर. पुरा एंजॉयमेंट था. अभी चौपाटीका नक्षा ही बदल गया. मजा नही. कुछभी मजा नही.'

आपला कॅमेरा आणि सँपलचे लॅमिनेट केलेले फोटो हातात घेऊन एकानं विचारलं, तर नाही म्हणाल्यावर खट्टु झाला. हमारे पास मोबाईल है उससे खिचेंगे तर म्हणाला' ये मोबाईलने हमारे धंदे की गांड मारी है. त्याच्यासारखी विस-बावीस वर्षांची पाच-सहा पोरं डिजीटल कॅमेरा घेउन हा फिरता धंदा करीत होती. पुर्वी पैसे पुर्ण चुकते करुन घरी पोस्टाने आठ-दहा दिवसानी फोटो मिळायचे. आता तिथल्यातिथे पाचएक मिनिटात कॉपी काढुन देण्याची सोय आहे...तरीही ही अवस्था. त्यातूनही काही हौशी असतातच.

समुद्रकिनार्‍यावर उजाव्या साईडला चालत दोन-तिनशे मिटर गेलं की काली बस्ती आहे. हॉटेल रामदा पाल्म ग्रोव्हच्या मागच्या बाजूस. अंधुकसा उजेड. लांबून पाहिलं तर माणसांच्या काळोख्या प्रतिकृती. दहा एक मिटरवरचं दिसतं. जवळ गेल्यावर तिथं तुरळक पंधरा-वीस माणसं काही बसलेली काही भिरभिरलेली. कुणा कुणाशी तुकडया तुकडयानं बोलत काही बायका. एक बाई जवळ आली. बंगाली होती. गोरीपान. मध्यम बांध्याची. चमकदार साडी. चेहर्‍यावर जाडसर मेकअप. म्हणाली, क्या ...टाईमपास? मी म्हणालो, नही ऐसाही. ...चलेगा? किधर? इधरही. तिनं बोट दाखवलं तिथं चिंचोळा बोळ होता. क्या करोगी. क्या करनेका बोले तो... हिलानेका, दबानेका, इंजॉय करनेका. कितना? सौ रुपया. वो काम नही करती? ...उसका तिनसो रुपया. मी काहीच बोललो नाही...ती, जाने का है क्या? घर जाने का टाईम हो गया. खाली पानी निकालने का है तो बोल पचासमे...मी तरीही काही बोललो नाही तर म्हणाली फोकट का टाईमपास.

मघापासून तिथंच रेंगाळत एकजण उभा होता. ती त्याच्याकडे सरकली. दोन-चार सेकंदाचंच बोलण झालं.. आणि ती दोघं आत समुद्राकडे निघाले. आता वीसेक पावलं चालल्यावर त्यानं इकडेतिकडे पाहिलं. पोजिशन पक्क्या झाल्या. गरजे पुरते कपडे वर(तिचे) खाली(त्याचे) गेले. उभ्या उभ्याच ती दोघ एकमेकांत घुसली. ती अनुभवी होती. त्याला पुरेसा स्पेस करुन देत होती. पाच सात मिनिटांचा हा समागमाचा खेळ सागराच्या पार्श्वभुमीवरचा अजिंठया-वेरुळाची आठवण देऊन गेला.

रात्रीचा दिड वाजतो. शिटया वाजवत पोलीस यायला लागतात. माणसं आपलं आपण समजतात. हातात काठी, बॅटरी घेऊन इथं तिथं शोधत राहतात. कुणी भेटलाच तर निघायची खुण करतात. दोन पर्यंत किनारा सुनसान होतो. आता एखाद-दुसर्‍या कुत्र्यापलिकडे तिथं कुणीही नसतं. आता खाण्याच्या स्टॉल्सवर गर्दी उसळते. पावभाजी, कालाखटटा, भेळपुरी, ज्युस, पानाची दुकानं आपोआप फुलतात. गळ्यात टोपली अडकवून सिगरेट- गुटका विकणारा विकता विकता थकुन जातो. आणि मागून पोलीस शिट्या वाजवीत, काठ्या आपटीत राहतात.

निघताना सुर्यही रेंगाळतो. माणसांचंही तेच. मधल्या चौकात फॅशन परेड असावी तसा आठ-दहा पंधरा ते पंचवीसमधल्या तरुण पोरींचा घोळका हसत खिदळत असतो. कुणी झुलत, कुणी बिचकत, कुणी थेट एखाद्या पोरीला गाठतो. बोलतो. पटलं तर तिला रिक्षात बसवून निघून जातो. अडीचच्या सुमारास पोलीसांच्या शिट्यांचा जोर आणखीन वाढतो. हा शेवटचा इशारा आता प्रत्येकालाच कळतो. आता चौकीच्या कठड्याला रेलून चार-सहा पोलीस. रस्ता, मैदान, बससॉप निर्मनुष्य. रिक्षा, टॅक्सीज, बाईक्स, श्रीमंत मुलांच्या कार्स झर झर डोळ्यापुढून सरकत रहातात.


आता सारं संपलं आहे असं वाटायला लागतं आणि एका गावावरुन दुसर्‍या गावावर ढग सरकावेत तसं जुहु तारा रोड माणसानी भरायला लागतो. आता त्या मुली तिथं जाऊन उभ्या राहतात. पंधराशे रुपयाच्या खाली उतरत नाहीत. सि-प्रिन्सेस होटेलपासून जुहुतारा रोडपर्यंत रिक्षांची प्रदक्षिणा चालू असते. त्यात बसलेल्या पोरी रस्त्यावर उभ्या असलेल्या, बाईक्सवर रेललेल्या, आणि कारच्या काचा खाली सरकाऊन वाट बघत असलेल्या गिर्‍हाईकांशी दोन-दोन शब्द बोलत रहातात. संभाषणाची क्लोजींग लाइन रिक्षावाल्यालाही कळते त्यानुसार तो आपल्या एक्सलिएअटरवरची मुठ फिरवत, आतल्याआत त्यांच्या बोलण्याला गती देत रहातो. त्याच रस्त्यालगत काही मध्यमवयीन माणसं उभी असतात. येणार्‍या जाणार्‍या कारमधुन- बाईकवरुन कुणीतरी त्यांच्याजवळ थांबतं, बोलतं, निघुन जात. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं, तिथं (आता जिथं बांधकाम चालू आहे) काही छोटेखानी बंगले होते. त्यात पंधरा-वीस पोरी ठेऊन बंदिस्त धंदे चालायचे. ते आता बंद झाल्यामुळे गिर्‍हाईकांचे वांदे होऊ नयेत म्हणून ती माणसं मार्गदर्शन करीत होती. खारला सोळाव्या रस्त्याला शेर्-ए-पंजाब नावाचं हॉटेल आहे तिथं कुठतरी फ्लॅटवर हे लोक गरजवंताला घेऊन जातात. तिथं घेऊन जायचे यांना पन्नास-शंभर रुपये द्यायचे. जमलं तर तिथं बाविसशे रुपये खर्च करुन पोरीसोबत तास घालवायचा.

अर्ध्या किलोमिटरच्या जुहुच्या रस्त्यावर एकच धंद्यातील मालाचा दर पन्नास रुपयापासून बाविसशे रुपयांपर्यंत. साईज इधर्-उधर. मुंबईनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या जगण्याची सोय केली आहे, हेच खरं. कुणाच्याही वेळेची आणि भुकेची गाठभेट करुन द्यायला मुंबई सदैव एका पायावर तयार असते.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

Friday, July 2, 2010

सैनिकहो तुमच्यासाठी...

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जुलै-२०१०


सैनीकांच्या आधी महाराष्ट्रात कार्यकर्ते रहात होते. महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ ही ओळख महाराष्ट्र अनेक वर्ष अभिमानानं अंगाखांद्यावर खेळवत आला आहे. आजही कुणी तसं म्हटलं तर पुर्वीचा काळ आठवून माणूस भुतकाळात रमतो. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी विचारानं या कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्राला दिली. मंथन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण हे शब्द नव्या परिमाणासकट कार्यकर्त्यांच्या रोमारोमात भिनायचे. कार्यकर्ता बोलायला लागला की त्याच्या शब्दाशब्दातून विचाराची एक एक लडी उलगडत जायची. 'आपण समाजाचं काही देणं लागतो' हे केवळ वाक्य नसायचं तर त्यासाठी माणसं आपल्या आयुष्याची आहुती द्यायचे. आपापल्या कुवतीप्रमाने जो तो समाजाला आपलं योगदान देण्यासाठी आतुरलेला असायचां. भारलेला असायचा.

त्या काळात नेताही आपली ओळख 'कार्यकर्ता' अशी करुन द्यायचा. तेव्हा तो आपला, आपल्यातलाच वाटायचा. आपल्यासारखेच त्याचे कपडे असायचे. आपल्यासारखंच त्याचं घर असायचं. असलीच तर आपल्यासारखीच त्याची नोकरी असायची. आपल्यासारखेच त्याचेही प्रश्न असायचे. आपलेपणावर वसलेली समाजाची व्यवस्था असायची. सामान्य कार्यकर्यांची दु:खं नेत्याला माहीत असायची आणि नेत्याच्या घरातला रुबाब कार्यकर्त्यालाही माहीत असायचा. नेत्याच्या साधेपणाची समाजात चर्चा असायची आणि कार्यकर्त्याच्या तडफेचं नेत्याला कौतुक असायचं.


शिवसेनेच्या जन्माबरोबर कार्यकर्ता मेला. त्याच्या जागी सैनीक आला. पण त्याच्या ठाई जुन्या कार्यकर्त्याचा आब, पोक्तपणा नव्हता आणि सैनीकाची शिस्तही नव्हती. शिष्ठाईची जागा हुल्लडपणानं घेतली. विचाराची जागा आदेशानं घेतली. विचार आचरणासाठी असतो आणि आदेश फक्त पाळण्यासाठी. विचारांच्या आचरणात भुतकाळाचं तारतम्य असतं आणि भविष्याचं भान असतं तर आदेश पाळण्यात निव्वळ वर्तमानाचं दडपण आणि अस्तीत्वाची भीती असते. या अस्तीत्वाच्या भीतीनं माणूस फक्त गांगरुन जातो. भेदरुन जातो.


शिवसेनेच्या जन्मापासून आजतागायत मराठी माणूस फक्त भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याला कसल्यातरी अनाठाई भीतीनं, चिंतेनं ग्रासलं आहे. ही भीती ही चींता कशाची आहे हे त्यालाही अजून कळलेलं नाही. आपण मराठी असल्याचा अभिमान वाटण्याऐवजी तो त्याचा न्युनगंड बनला. मराठी माणसाचं मराठीपण समजून घेण्यात मराठी माणूस कायम चुकत राहिला. त्याला फक्त सण-समारंभ साजरे करण्यात गुंतवून ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला शिकवलं पण महाराजांची थोरवी शिकवली नाही. इतिहासाची पानं चाळून दाखवली पण वाचायला दिली नाहीत. वर्तमानातली तत्कालीक दु:ख दाखवली पण भविष्याचं स्वप्न दिलं नाहीत. त्यामुळे गेली चाळीस बेचाळीस वर्षे मराठी माणूस फक्त शाखेभोवती घुटमळत राहीला. न चुकता दसर्‍याला शिवाजी पार्कवर आणि वाढदिवसाला मातोश्रीवर हजेरी देत राहीला.


इंग्रजांच्या काळापासनच मुंबई ही एक व्यापारी पेठ आहे. इथे कुणासाठीही व्यापार- उदीमाची संधी सारखी आहे. हे दुर्दैव आता आपण मुकाटपणानं सोसतो आहोत. पण वडापावच्या गाडया, आणि झुणका भाकरीची केंद्र उभी करण्यापलिकडे शिवसेनेनं मराठी व्यावसाईकाला कोणतीही ताकद दिली नाही. शिवसेनेने व्यावसाइक तयार केले असतील तर ते फक्त कॉन्ट्रक्टर धर्तीचे. त्याना व्यावसाईकाच्या दॄष्टीपेक्षा मुकादमाची नजर दिली. नोकरीच्या लढयात त्याला जेवढं गुंतवून ठेवलं त्याच्याऐवजी जर त्याला व्यवसाय-धंद्याचेही धडे दिले असते तर आज पाचाचे पंचवीस झाले असते. त्यामुळे आज मराठी माणसाला आहे त्या परस्थीतीत मारुन-मुटकुन जगावे लागत आहे. नोकरी सांभाळण्याच्या कसरती करीत आयुष्यभर नोकरदार बनुन राहण्यापेक्षा तो आज मालक बनून ऐशोआरामात राहिला असता. तरीही जे मराठी व्यावसायीक म्हणून मोठे झालेले आहेत ते स्वतःच्या कष्टानं उभे राहिलेले दिसतात. पण त्यांचाही वर्गणीपलिकडे आणि सोविनिअरच्या जाहिराती पलिकडे यांनी कधी विचार किंवा वापर केला नाही. त्याचे भोग मराठी माणूस भोगतो आहे, भोगणार आहे. आज नोकर्‍यांची संधी नाही आणि भांडवलांची तजवीज नाही. त्यामुळे मराठी माणसाची 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था आहे.

शिवसेनेच्या पाठीपुढे असलेला बहुसंख्य मराठी माणूस हा अर्धामुर्धा शिकलेला आहे. गावातून मुंबईत आलेला आहे. झोपडपट्टीत, चाळीतून राहणारा आहे. त्याला शिवसेनेचा आधार वाटणं हे स्वाभावीकच होतं. अर्थकारणाच्या लढाईत त्याला गोंजारणारं कुणीतरी हवंच होतं. या अर्ध्याकच्या मराठी माणसाच्या हातात कायमचं जगण्याचं हत्यार देण्यापेक्षा शिवसेनेनं त्यालाच आपलं हत्यार बनवलं. त्यामुळे मोर्चा असेल, बंद असेल, सभा असेल तेव्हा हाच मराठी माणूस व्यवस्थीत वापरला गेला. मोर्च्याला, सभेला, बंदला वेगळे आणि सेटींग, मांडवलीला वेगळे. त्यामुळे यातली काही मराठी माणसं कायमची मोठी झाली आणि उरली ती कायमसाठी आहे तिथंच राहीली.


महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे (मधली साडेचार वर्ष वगळता) सत्तेच्या मखमली खुर्चीवर काँग्रेसचं सरकार आहे. आणि लोकशाही शासन व्यवस्थेत कोणत्याही खुर्चीला सर्वसामान्याच्या दु:खापेक्षाही हितसंबधाचं राजकारण करण्यातच जास्त रस असतो. ते राजकारण खेळण्यात काँग्रेस पटाईत आहे. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी कोणताही संबध नसतांना ते निवडणूकीच्या शर्यतीत कायम निवडून येतात यातच सारं येतं. आणि अशीच अवस्था राहिली तर कदाचीत यापुढेही हेच होत राहील. कोणतेही सरकार समाजाच्या विकासाचा विचार करीत नाही असे नाही. पण त्यात सर्वसमावेशकता असते. अमुक एक समाज त्यांच्या डोळ्यासमोर नसतो. त्यामुळंही सरकार मराठी माणसाचा विचार करीत नाही असं वाटत रहातं. आणि हे वाटत रहाणं अनेकदा गैरसमजातून अधीक गहीरं होत जातं. त्यामुळं वेळीच सत्तेचाही अर्थ शिवसेनेनं मराठी माणसाला समजून द्यायला हवा होता. ते ही ते करुन देण्यात चुकले. त्यामुळं १९९५ साली एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा मराठी माणसांनी शिवसेनेला सत्तेत येऊ दिलं नाही. यापुढे येऊ देतील असं वाटत नाही.

शिवसेनेनं मराठी माणसाला मराठीचा गोजीरा गुलाबी गाजर दाखवून हिंदुत्वाचा कडवट सफेद मुळा हातात दिला तो भाजपमुळं. पण ती व्यापक सत्तेची निकड होती. ती काळाची गरज होती. हे समजावून सांगण्यात शिवसेना अपयशी ठरली. आणि टिकेची धनी झाली. आता आपली गरज संपल्याची भावना मराठी माणसात बळावत गेली. आणि शिवसेनाही सैरभर झाली. ते सैरभैरलेपण ना बाळासाहेबाना थोपवता आलं त्या त्यांच्या वारसांना. त्यामुळे शिवसेना आतून फुटत गेली. दुभंगत गेली. शिवसेनेतले काही महत्त्वाचे आधार दूर गेले हे त्याचे दृष्य परिणाम. पण शिवसेनेनं मराठी माणसाला वेळीचं शहाणं केलं नाही. श्रीमंत केलं नाही. सत्तेचं, बेरजेचं गणीत समजावून सांगीतलं नाही ही खरी मेख आहे.

बाळासाहेब आता वयानं थकले आहेत. त्यांच्या चित्तवृती अजुनही जाग्या आहेत, ताज्या आहेत. तोच करिश्मा आजही आहे. पण त्यालाही फक्त भावनांचा आधार आहे. आणि मराठी समाजात त्यांच्यासाठी दयेची, केविलपणाची झालर आहे. बाळासाहेबांच्या बोलण्यात पुर्वीच्या राजकारणाची, सत्तेची आग नक्कीच नाही. असूही शकत नाही. उध्दव ठाकरे उसनं अवसान आणतात पण अजुनही कठीण समय येता ते बाळासाहेबांच्या पाठीमागे लपतात. राऊत, जोशी, देसाई, नार्वेकर यांना आपल्याच जीवावर शिवसेना आहे असं वाटतं पण यांच्यावर मराठी माणसाचा विश्वास नाही. त्यामुळे आता असलेला मराठी माणूस फक्त पुर्वपुण्याईवर शिवसेनेच्या पायाजवळ बसला आहे. पण ही मृत्युसमयी रात्र जागवण्यासारखी स्थीती आहे. भविष्यात शिवसेनेत उरलेले काय दिवे लावणार हे कोणत्याही दिवशी कोणतंही चॅनेल पाहिल्यावर समजतं. कुठलंही वर्तमानपत्र काढलं की वाचता येतं. समाजात खाजगीत बोलल्यावर कळतं. मराठी माणसाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येतं. वाईट याचं वाटतं की शिवसेनेचा अंत अश्या पध्दतीने व्हावा असं मराठी माणसाला नक्कीच आधी कधीच वाटत नव्हतं याचं. शिवसेनेचा मृत्यु समोर दिसतो आहे. हे मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com