Thursday, September 2, 2010

रात्र गणेशोत्सवाची आहे... मराठी माणसा जागा रहा...

पुर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # सप्टेंबर २०१०

टिळक तुमचे महत्त्व फक्त दोन गोष्टींसाठी. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती. मराठी माणसाला तहहयात वर्गणीची सोय करुन गेल्याबद्दल टिळक तुम्हाला धन्यवाद! बाकी, 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही', 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' आणि 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हे तुमचे डायलॉग पाठ व्हायला सोपे म्हणून अजून सर्वांच्या लक्षात आहेत. तुमच्या भरगोस मिश्या आणि पुणेरी पगडी यामुळे तुम्हाला चारचौघात ओळखणे सोपे जाते. गेला बाजार स्वातंत्र्य वैगेरे ठीक आहे पण गणेशोत्सवाची आयडीया ग्रेटच. शिवजयंती ऐवजी शिवसप्ताह करण्याचे तुमच्या डोक्यात कसे आले नाही ? फक्त एका दिवसाच्या जयंतीसाठी प्रायोजक मिळवतांना किती फाटते याची तुम्हाला कल्पना नाही यायची टिळक. तरीही तिथीनुसार आणि तारखेनुसार दोन दोन जयंत्या साजर्‍या करुन आम्ही आमची भागवून घेतो आहोत. तरीही, यासाठी मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही आज जर इथे असतात तर एवढया अपराधासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा मंडालेच्या तुरुंगात पाठवले असते. पण असो. गणेशोत्सवासाठी तरी मराठी माणूस मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. आता या उत्सवाला मागे-पुढे घडणार्‍या सगळ्याच गोष्टी 'लोकमान्य' झाल्या आहेत.


टिळक, तुम्हाला माहित आहे, श्रावणात आपण घेत नाही. त्यामुळे ओस पडलेल्या बारची अवस्था बघवत नाही. कदाचीत तुमच्या काळात ब्रम्हवृंद तसले अभक्ष भक्षण करीत नसावेत. आता आम्ही सगळेच सगळ्या बाबतीत समता, बंधुभाव पाळतो. तरीही जी चैतन्यावस्था असते तिला गौरी पुजनानंतर सुरुवात होईल. त्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत. थोडी 'ढकलल्या'नंतर सुर-तालाला जी धार येते ती वर्णनातीत असते. ढोल-ताश्याच्या गजरात किंवा बेंजोच्या तालावर गणपतीच्या पुढे-मागे जे आणि जश्याप्रकारे आम्ही नाचतो ते तुम्ही बघितलेत तर टिळक तुम्हीही तोंडात बोटे घातली असतीत. त्यावेळी आम्ही तुम्हालाच काय पण आम्हालाही विसरतो. तुम्हीही गणेशोत्सवामागचा हेतू विसरुन जाल. पण तो मुद्दा नाही. आता आमचाही गणेशोत्सव साजरा करण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. आता तुम्हीच काय ब्रम्हदेवाचे पप्पा आले तरी तो आम्ही बदलणार नाही. 'गणेशोत्सव साजरा करणे हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे तो आम्ही बजावणारच'. 'तुमचे डोके ठिकाणावर राहो न राहो.'


रस्त्यारस्त्यावर मुर्त्यांचे बाजार भरले आहेत. गणपतीबाप्पा भक्तांची वाट पहात आहेत. प्रत्येक गणेशमुर्तीच्या गळ्यात, हातात त्यांच्या किमतींचे टॅग लटकवलेले आहेत. किंमतीवरुन घासाघीस चालू आहे. वजन, उंची, रुप, रंगाची चाचपणी करुन माल पसंत केला जातो आहे. सरत्या श्रावणाच्या मौसमात गणेशोत्सवाचा वारा सुटला आहे. मराठी माणूस पेटला आहे.


गणपतीची चाहुल लागली की आरत्यांची फुकट पुस्तकं घरात यायला लागतात. कुठे पेपराबरोबर कुणी मोदकाबरोबर तर कुणी आणि कश्या कश्या बरोबर. पुस्तकं साचत जातात. पुस्तक समोर धरलं तरीही आम्ही 'सुखकरता दुख'करता'च म्हणतो. पण इतकी वर्ष असाच सराव झाल्यामुळे गणपतीलाही त्याची सवय झाली असावी. आणि हो, प्रत्येक वेळेला आरत्या संपता संपताना 'घालीन लोटांगण' हा शब्द कानावर आला की सुटल्यासारखं वाटतं. पण त्यानंतर 'अन्याय माझे...' वैगेरे सुरु झालं आणि कॉंपिटिशनला एकासएक भेटले की बघायला नको. काहीजण यावर तास तास घालवतात. आरतीचा सुर इतका कानात आणि मनात बसलाय की आरतीतल्या त्या त्या जागा आल्या की नुसतं त्या त्या लयीत ओरडलं तरी भवसागर पार केल्यासारखं वाटतं.


या दिवसात सार्वजनीक मंडळं, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या छातीवरचे बिल्ले यांचा रुबाब बघण्यासारखा असतो. चिल्लर चिल्लर माणसं या दिवसात कडक नोटेसारखी फडफडत असतात. झब्बा लेंगा घालायचा आणि इकडून तिकडून फिरत बसायचं एवढंच काम. पण तरीही त्या कामात ऐट असते. मंडळात पैसा खाण्याचा मान सगळ्यानाच मिळतो असं नाही. पण उमेदवारीच्या काळात खुलेआम मिरवण्याचा चान्सही काही कमी नाही. इकडून तिकडे कुणा कुणाला आवाज देण्यातही सुख असतं. रांगेला वळण लावायचं, भाविकांवर उगाचच आब दाखवायचा. कुणाला तिर्थ-प्रसाद द्यायचा. कुणाला लाईनीत घुसवायचं. कुणाला लाईनीतून काढून गाभार्‍यात बसवायचं. असा बिनपैशाचा तोरा मिरवायला मिळाला की मराठी माणसाला धन्य वाटतं.


मंडप, डेकोरेशन, लाईटींग, देखावे, स्पिकर, सांस्कृतीक कार्यक्रम यांची व्यवस्था लावण्यात अध्यक्ष गर्क आहेत. त्यात काही अधिक उणं होता कामा नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. कडेकोट बंदोबस्तातही कुठे कुठे हात मारता येईल. कुणाकुणाची पत्ती काटता येईल याचं प्लॅनींग चालू आहे. गेल्या वर्षिचा जमाखर्च मनासारखा जमला आहे. पुरावा म्हणून त्याची पुस्तकं छापून आली आहेत. बाकी स्थानीक नागरिकांसाठी संगीत खुर्ची, बायकांसाठी गाढवाला शेपूट लावणे सारख्या स्पर्धा आयोजण्याचे घाटत आहे, त्यांचे बक्षिस समारंभ, सत्कार समारंभ यासाठी मंडळांतर्गत विशेष समिती असते.


उरलेला मराठी माणूस भावीक होऊन रात्रभर फिरत असतो. काहींच्या श्रध्दा फारच जहाल असतात ते अनवाणी म्हणजे चप्पल-बूट हातात घेऊन फिरत असतात. यांना डेकोरेशन, देखावे बघण्यातच जास्त रस असतो. त्यासाठी तो अख्खा गाव-मुंबई पालथी घालतो. अशा भाविकांच्या सेवेसाठी फुकट पचपचित रसना जागोजाग असतोच. चुकून चहा. गणपतीचा प्रसाद म्हणजे सफेत फुटाणे. नंतर नंतर तो तेच तेच खाऊन-पिऊन कंटाळतो. पण हा नियतीनेच मराठी माणसासाठी दिलेला प्रसाद आहे. त्यानं यापेक्षा वेगळी अपेक्षा करु नये.


पुर्वी रात्रभर भरगच्च कार्यक्रम असायचे. काहीच नाही तर रात्रभर भजनं कुटत बसायची. पण आता रात्री दहा नंतर सरकारने स्पिकरवरच बंदी आणल्यामुळे आणि पोलीस एवढं काम तरी इमाने इतबारे करीत असल्यामुळे मराठी माणसाची 'जान'च हरवल्यासारखी झाली आहे. आणि आपण जे जे करतो आहे ते ते दुसर्‍याला कळल्याशिवाय मराठी माणसाला चैनच पडत नाही. शांततेने काही करण्याचा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे रात्र सामसूम. कदाचित मनातल्या मनात गणपतीबाप्पा सुप्रीम कोर्टाचे आभार मानत असेल. पण गणपती तर जागवला पाहिजे. त्याच्या समोरची वात जळत ठेवण्याच्या नावावर काही लोकांना पत्त्याचा डाव मांडता येतो. पत्त्याला जुगार म्हणणे या पवित्र दिवसात तरी बरे दिसत नाही. पण अनेक लोक या दिवसात देशोधडीला लागतात. नव्या खिलाडींची एन्ट्री याच दिवसात होते. 'ज्योत से ज्योत जगाते चलो' या धर्तीवर हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोच आहे. वेळ घालवण्यासाठी सुरु झालेला हा डाव आयुष्य वाया कधी घालवतो कळत नाही.


शेवटी विसर्जन. म्हणजे एक प्रकारचं दु:खच. ते ज्या ज्या प्रकारे व्यक्त करता येईल ते केलं जातं. दु:ख पिण्यानं हलकं होतं हे पुरातन सत्य आहे. त्यामुळे ते इथंही असतंच. सजवलेल्या ट्रकावर गणपती. अंगाखांद्यावर विरघळलेला गुलालाचा घाम, डोक्याला भगवी पटटी, नाशिक बाजा किंवा पुना ढोलाचा खणखणाट, तो बजेट बाहेर असल्यास बेंजो किंवा नुसताच स्पिकर. त्या तालावर थिरकणारी गर्दी. पोटात कंट्री, कॉर्टर किंवा चपटी आणि मुखात गणपती बाप्पा मोरया. बघणार्‍याच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय रहात नाही.


विसर्जनाला दरवर्षी पहाट होते. पुढल्यावर्षी लवकर या म्हणत दुसरा दिवस उजाडतो. दुसर्‍या दिवशी सकाळी किनार्‍यावर गणेशमुर्तींचे भग्नावशेष इतस्ततः विखरुन पडलेले असतात. त्याच अवयवांसारखा मराठी माणूसही उत्सवाची धुंदी उतरल्यावर सैरभर होतो. ते विखुरलेले तुटलेले अवयव संदर्भहीन असतात. त्यात देवत्व किंवा सत्त्व नसतं असं त्या क्षेत्रातले अधिकारी मानतात. भक्ताच्या मनातही त्याला काही किंमत नसते, तसं मराठी माणसाचंही! गेल्या दहा दिवसाचा रंग उतरवून मराठी माणूस डोळे चोळीत उठतो. सुकी भाजी चपातीत गुंडाळून खिशात नाहीतर रंग उडालेल्या प्लास्टीकच्या पिशवीत कोंबतो आणि नऊ सत्राच्या ट्रेन मध्ये घुसतो. ट्रेन प्लॅटफॉर्म सोडते आणि गर्दीचाच गजर होतो. गणपती बाप्पा ss मोरया sss , पुढल्या वर्षी ss लवकर या sss

प्रवीण धोपट

No comments: