Tuesday, May 25, 2010

केईएम : रात्रीची एन्ट्री आणि एक्झिट

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१०




मुंबईचा सगळा इतिहास पुसुन उद्या जागोजागी मॉल्स उभे राहिले तरी चालतील. पण केइएमच्या जागी दुसरं काही उभं राहता कामा नये. मुंबईच्या चकचकीत रस्त्यांवर अलिशान गाडया फिरुदे, काचांचे टॉवर्सही उभे राहुदे, जगभरातले ब्रॅन्डस मुंबईकराच्या अंगाखांद्यावर खेळूदे. पण केईएमचं साधेपण तसंच राहुदे. कारण मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही गरीब माणसाला त्याच्या आजारपणात मायेनं जवळ घेणार एकमेव ठिकाण म्हणजे केईएम हॉस्पिटल. गेलं पाउण शतक या वास्तुनं गरीबाला आपलंसं केलं आहे, त्याला कुणाची दुष्ट लागू नये.



जवळजवळ साडेपाचशे निवासी डॉक्टर्स असलेलं अठराशे खाटांचं हे हॉस्पिटल दरवर्षी साधारणतः लाखभर रुग्णाना प्रत्यक्ष दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार करीत असतं. आणि साध्यासुध्या आजारपणासाठी नुसत्या वरवरच्या तपासण्या, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेऊन जाणार्‍यांची संख्या तर दहा लाखांच्यावर आहे. लांबरुंद पसरलेल्या या दगडी वास्तूला तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिची एक ओळख आहे. आरोग्य या अत्यावश्यक आणि कमर्शीअल बनत चाललेल्या सेवेच्या दुनियेत केईएमचा साधेपणाच ग्रेट वाटतो.



आजारी माणूस सहसा एकटा कधीच हॉस्पिटल मध्ये दाखल होत नसतो. त्याच्यासोबत किमान चार-सहा माणसं तिथं हजेरी लावतातच लावतात. म्हणजे केइएम हॉस्पिटलनं कितीतरी माणसांचा जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवास पाहिला असेल. त्या प्रवासातील असंख्य अडथळयांचे डोंगर पाहिले असतील. आजारातून निर्माण होणार्‍या यातना, दु:ख, भोग अनुभवले असतील. केईएम ही निर्जीव वास्तू आहे म्हणून ठीक अन्यतः त्या वास्तूला जर माणसासारख्या भाव-भावना असत्या तर ती वास्तू कधीच कोलमडून गेली असती. माणसाच्या दु:खाचं महाभारत केईएमनं पचवलं आहे. यापुढेही हा सिलसिला असाच चालत राहणार. रहायला पाहिजे.



दिवसभराचा उकाडा संपून उघडया रस्त्यावर जराशी हवा खेळते आहे. रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत. केईम समोरच्या सिग्नलचे सगळे दिवे बंद होऊन आता फक्त ऑरेंज रंगाच्या दिव्याची उघडझाप होते आहे. हॉस्पिटलच्या आणि काळोखाच्या पार्श्वभुमीवर ऑरेंज रंग किती भयानक दिसू शकतो. याची कल्पना इथे होते.



केईएमच्या गेट क्रमांक दोननं आत गेल्यावर तिथं एक मोकळी लॉबी आहे. उजव्या बाजूला दिवसरात्र चालणारं केमिस्टचं दुकान. तिथुनच दहा पावलावर ओपिडी. तीही रात्रभर चालू. बाहेरुन आलेला पेशंट तिथं दाखल केला जातो. रात्री अकरानंतरही अधूनमधून कुणी ना कुणी तिथं येतच होतं. आलेल्या प्रत्येक पेशंटला सावरण्यासाठी आठ-दहा माणसं असतात. पण पेशंट बरोबर आत फक्त एकच रहा असं सांगायला सिक्युरिटी,डॉक्टर, काहीवेळेला पोलिसही येतात. हेच सांगणारी दारावर पाटी आहे. पण तिचा काही उपयोग नसतो. यात सगळ्यांचीच दहाएक मिनिटं मोडतात. पण याला इलाज नसतो. शेवटी पेशंटसोबत उरतो तोच त्याच्या जवळचा. बाकीचे सगळे आप्तेष्ठ, सगे सोयरे आणि मित्रपरिवार. जे बाहेर आसपास रेंगाळत राहतात.



त्याच लॉबीत डाव्या बाजूला संयोग गणेश नावाचा गणपती आहे. काहीना विषेशतः पेशंट सोबत येणार्‍या कार्यकर्त्यांना त्याची माहीती असते. ते त्याच्या पुढयात येतात. पायातल्या पायात चपला-बुट सरकवतात. खडेखडे पाया पडतात आणि निघुन जातात. मग त्याचं बघुन कुणी त्याच्यानंतरही तेच करतात. हे थोडावेळ चालतं. मग पुन्हा शांतता.



याच चौकोनी परिसरात रात्री माणसं मारुन टाकल्यासारखी इतस्ततः पडलेली असतात. पिशवीचा- चपलेचा आधार उशाला घेऊन. ते ही न मिळाल्यास हाताच्या मनगटावर डोकं ठेऊन रात्रभर पडून राहतात. मिळालाच तर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन तिथंच पसरतात. काही माणसं जागीच असतात. अधुनमधुन एखादी डुलकी. अन्यतः टकटक इकडंतिकडं भांबावल्यासारखी बघत. एखाद दुसरा एकमेकांशी बोलत, गप्पा मारत असतात.



तासा दोन तासानी पंधरा-वीस जणांचा घोळका निशब्द चेहर्‍यांने ओळीत बाहेर पडतांना दिसतो. ही खुण माणूस गेल्याची असते. काहीच्या डोळयात पाणी तरारलेलं असतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर असतो. जन्ममृत्युमधला खेळ कुणीतरी कुणालातरी सांगत-समजावत असतो. सगळं संपल्यानंतरची हतबलता किंवा सुटल्याचे भाव एकमेकांच्या चेहर्‍यावर पसरलेले असतात. त्यातल्याच कुणाचीतरी सराइतपणे पुढची तयारी सुरु होते.



रात्री दिड-दोनच्या दरम्यान एक म्हातारा हॉस्पिटल्च्या मागच्या बाजूस ३१ नंबरच्या खिडकीवर जिथं औषध मिळतात तिथं ठोठावत होता. विचारलं. तर म्हणाला, " देखो ना, कोई नही है". खिडकीतला दिवा लागलेला होता. तिथला माणूस जाग्यावर नव्हता. तिथं बहुदा औषध फुकट मिळत असावीत. त्या माणसाच्या नाकातून रक्त गळत होतं, काय झालं असं खुणेनंच विचारलं. तर रडायला लागला. पैसे नाहीत म्हणाला. हातातला केसपेपर, औषधाच्या चिठठया दाखवायला लागला. काय झालं म्हणून पुन्हा विचारलं, तर अर्ध्याकच्च्या मराठी हिंदीत म्हणाला, काळाचौकीतून आलोय, तिथं एक माणूस बायकांसमोर दारु पिऊन अचकट विचकट चाळे करीत होता. याला त्याचा राग आला. म्हणून विचारलं तर त्यानं याच्या अंगावर हातातली बाटली फेकून मारली. डोळा वाचला. नाकाच्या वरती फाटलं होतं. रक्ताचा ओघळ थांबत नव्हता. डॉक्टरनंही मलमपटटी न करताच त्याला इकडं औषध आणायला पिटाळला होता. आणि हा खिडकीवर ठोठावत होता. तो पण प्यायलेलाच होता. त्यामुळे खिडकीवर ठोठावण्याचा वेग आणि आवाज वाढत गेला.



गेटवर गाडी उभी राहिली की गेटसमोरचा आडवा दांडा आपोआप वर येतो. तपासायच्या भानगडीत कुणी पडत नाही. जागोजागी सिक्युरीटी आहे. पण सुस्त. काही अघटीत घडल्याशिवाय यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे खुर्च्या गरम करीत जो तो आपापल्या जागी बसलेला असतो. सगळ्या मुंबईची सिक्युरीटीची जबाबदारी उत्तरप्रदेशी मुलं सांभाळत असताना इथे सगळे मराठी. हे ही काही कमी नाही.



पहिल्या मजल्यावर लांबचलांब गॅलरीत दोनही बाजूला माणसं पडलेली असतात. अधेमधे लाकडी बाकडी आहेत त्यावरही कुणी झोपलेला असतो. इथं बसल्यावर लक्षात येतं. लाकडी बाकडयावरची माणसं अधुनमधुन वळवळत असतात. आजुबाजुशी बोलल्यावर कळलं की, रात्री ढेकुण जागे असतात. इथल्या शांततेला भंग करणारी एक पाण्याची संततधार खाली पडत असते. हे पडणारं पाणि एसीचं असावं असं वाटतं कदाचित टाकी ओहरफ्लो सुध्दा होत असावी. पण हा आवाज आपल्याला टाळता येत नाही. केईएमचे व्यवस्थापन या आवाजाला का टाळत असावे?



तरुण डॉक्टर्स जिन्सच्या पॅन्टस. सफेद डगला आणि गळ्यात स्टॅथोस्कोप घेऊन इकडून तिकडे. अधुनमधून बाहेर ज्युस सिगरेटी किंवा काही खाण्यापिण्यासाठी फिरत असतात. गरीब पेशंटच्या आजुबाजूला ही गोरी-गोमटी तरुण डॉक्टर पोरंपोरी फारच श्रीमंत वाटतात. या हॉस्पिटलमध्ये येणारे बरेचसे रुग्ण गरीबच असतात, त्यांच्याशी वागण्याची डॉक्टरांची पध्दत पाहिली की कधीकधी अश्या ज्युनीअर डॉक्टरांना फटके का पडतात याची कल्पना करता येते.



नर्सेसची लगभग चालू असते. सिनिअर नर्स फोन आणि खुर्ची सोडत नाही. काहीतरी लिखाण चालू असतं, कुणावरतरी ओरडणं चालू असतं. पण ज्युनीअर इकडे-तिकडे येरझार्‍या मारीत असतात. त्यातून आया नावाची जमात बिनधास्त वावरताना दिसते. चेहर्‍यावर तिटकारा आणि तोंडाचा पटटा चालू अश्या अवस्थेत त्या काम करीत असतात. वॉर्डबॉय आपल्याच तोर्‍यात कानाला हॅन्डस फ्री लाऊन गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात दंग असतात. बरेचसे रुग्णांचेच नातेवाईक स्ट्रेचर इकडून तिकडे नेताना दिसतात. हे काम वॉर्डबॉयचं आहे हे कुणी कुणाच्या लक्षात आणून द्यायचं?



केइएम परिसरातलं आदिती, ओन्ली फिश, व्हेज ऑलवेज सारख्या चकचकीत हॉटेलच्या तुलनेत मिलन हॉटेल अनेकानां आपलं वाटतं. त्या होटलनं आपला गरीब चेहरा गेली अनेक वर्ष आहे तसाच ठेवला आहे. फुटपाथ पुर्णपणे अडवून बसलेल्या या हॉटेलांनी आजवर कित्तेक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले असतील. त्याचं त्यानाच ठाऊक. अधुनमधुन महानगरपालिकेकडून फुटपाथ साफ केली जातात, अतिक्रमणावर हल्ले केले जातात, पण पुन्हा दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासनं परिस्थीती जैसे थे.



हॉटलामध्ये जाऊन बसून खाण्याइतपतही ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी बुर्जीपाव, राईस, पावभाजी च्या गाडया अगदी कामगार मैदानापर्यंत उभ्या असतात. बारा-पंधरा इंचाच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तेल आणि पाण्याचे फवारे चरचरत असताना पाहणं मोठं मजेशीरच. भाजीला आलेल्या उकळ्या आणि बुर्जीला सुटत असलेलं तेल पाहतांना नकळत भुक लागल्यासारखी वाटते. आजपर्यंतच्या माझ्या खानपानाच्या अनुभवात पावभाजी या जोडगळीतले पाव नरमच असतात. इथे एका माणसाने कडक पाव असं म्हटल्यावर मी कुतुहलानं पाहिलं तर. भाजी करणार्‍या पोरानं पाव पोटात फाडून त्याला उलटा शेगडीला पालीसारखा चिकटवला. पाव दोन मिनटात नरमचा कडक झाला होता.



या गाडया बाराच्या पुढे थांबत नाहीत. कारणं तिच. पोलीस वैगेरे. पण नंतर अगदी केईएमच्या दारावरच रात्रभर ऑमलेट बनवणारी बाकडी असतात. पेशंटचे नातेवाईक, पिऊन चुकलेले, भुकेलेले आणि टॅक्सीवाले मात्र यावर तुटून पडलेले असतात. चहा तर असतोच. सिगरेटी, गुटका, तंबाकू यांचीही सोय असते.



केईएमच्या गेटवर निपचित उभ्या असलेल्या ऍम्बुलन्स आपलं चित्त वेधुन घेतात. गर्दीला भेदून रोरावत जाणार्‍या या अऍम्बुलन्स आता दबा धरुन बसल्यासारख्या वाटतात. ऍन्बुलन्सच्या सफेद रंगावर उलटया क्रमाने लिहिलेली लाल अक्षरे वाचवत नाही. कितीतरी माणसांनी यातच आपला प्राण सोडला असेल. कितीतरी जणानी मृतुनंतर स्मशानापर्यंतचा प्रवास केला असेल.



रात्रीच्या गडद शांततेत एखादी ऍम्बुलन्स भोंगा वाजवत आत शिरते. तेव्हा इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचेच डोळे कान टवकारतात. नकळत ऍम्बुलन्सच्या दिशेने माना वळतात. उताणी पडलेला पेशंन्ट. त्याला सावरणारे त्याचे नातेवाईक. लगबघीनं पुढ आणली जाणारी स्ट्रेचर. दोन-पाच मिनिटांचा हा खेळ. पुन्हा जो तो आपापल्या व्यापात.



केईएमच्या परिसरात रात्र गजबजलेली नसली तरी जागी असते. कारण कोण, कधी, कसे एन्ट्री आणि एक्झीट घेईल माहीत नसते. त्यामुळे बाकी उरलेल्यांचा जन्म आणि मृत्युच्या मध्ये थांबून टाईमपास चाललेला असतो.



प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

Sunday, May 23, 2010

आता पुन्हा भेटू १ मे २०२०...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१०
अश्याप्रकारे १ मे २०१० या दिवशी महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झालेला आहे. मागच्यावेळी म्हणजे १९८५ साली आपण रौप्य महोत्सव (जो २५व्या वर्षी करतात) साजरा केलेला होता. तसे आता पुन्हा भेटू एकदम दहा वर्षानंतर १ मे २०२० या दिवशी. कारण तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्षे झालेली असतील. साठीला ... महोत्सव म्हणतात. त्यानंतर पंचाहत्तरी (म्हणजे अमृत महोत्सव). शेवटी शंभरी (म्हणजे हिरक महोत्सव) शंभरी मात्र वर्षभर साजरी करण्याची पध्दत असते. त्यामुळे ते वर्ष हरेक प्रकारे आणि चवीचवीनं साजरं होत राहणार. थोडक्यात शंभरीला कुणावर तसा म्हणजे आता सारखा स्ट्रेस नसणार. एकदम आपापल्या सोइप्रमाणे. समोरचा कोणते इव्हेन्ट करतो आहे? कोणत्या आयडीया वापरतो आहे? कोणते कलाकार नाचवतो आहे? कोणाला गाववतो आहे? किंवा कोणाला धाववतो (म्हणजे प्रायोजक, जाहिरातदार या आर्थाने) आहे? काडीचाही संबधं नसला तरी अश्यावेळी पुरस्कार वैगेरे दिले जातात. ते कुणाला द्यायचे? या सगळ्याचा अंदाज घेत घेत युक्त्या लढवल्या जातील. समोरच्या पेक्षा आपली आयडीया जड गेली पाहीजे याची प्रत्येकजण काळजी घेईल. काही पत्रकार सगळ्यांचे मित्र असतात. त्यामुळे(च) आयत्यावेळी(च) गोची(च) होते. यार्षीच्या अनुभवावरुन तो अति संवेदनशील विभाग स्वतंत्रपणे हाताळला जाईल. बर्‍याच वेळेला म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या माणसांचं महत्त्व असतं. म्हणजे यावर्षी जसे बाबासाहेब पुरंदरे सगळ्यानी पुरवून पुरवून वापरले तसे. त्यामुळे तश्या ऐतिहासिक माणसांचं ऍडव्हान्स बुकींग करुन ठेवण्यात येईल. एकुण काय पुढची दहा आणि त्यापुढचे अंतराअंतरावरचे गॅप भरेपर्यंत आपण रिकामे बसुयात. यापेक्षा आपण काय करु शकतो.
कोणत्याही व्यक्तीच्या, घटनेच्या, संघटनेच्या जन्मानंतर या(च) वर्षाना महत्त्व येतं किंवा असतं. ते वर्ष पुर्ण झालं की निदान भाषण करणार्‍याला, लेखन करणार्‍याला पहिलं वाक्य तरी आयतं मिळतं. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्ष पुर्ण झाली तरी... अजून अमकं ढमकं झालं नाही... इ...इ... (या गाळलेल्या जागेत काहीही टाकून बघा. एकदम फिटट बसतं) ...याचा काय संबध? पण आपलं अशी वाक्य वापरायला, ऐकायला, वाचायचा बरी वाटतात. बोलणार्‍याला काही बोलल्यासारखं वाटतं. ऐकणार्‍याला काही ऐकल्यासारखं वाटतं.
१ मे हा दिवस मराठी माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहेच. तो का आहे हे इथे समजून घेतलं पाहिजे. (माहीती आहे त्यांनी वाचू नये) राज्यांची निर्मीती करतांना किंवा राज्यांच्या सिमा ठरवतांना भाषावार रचना असावी म्हणजे ते राज्यांच्या विकास, प्रशासन या सगळ्याच अंगानं सोईचं होईल. हे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासनंच म्हणजे जेव्हा १९२० साली कॉग्रेसची घटना तयार करण्यात आली तेव्हापासनंच ठरलं होतं. मोतीलाल नेहरु, तेज बहादूर सप्रू इ. मंडळी ते ठरवीत होती. पण पुढे मुंबईच्या बाबतीत धन-दांडग्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. आणि चित्रही बदलत गेलंय. इंग्रजांच्या काळापासनंच मुंबई सधन होत होती. इथला व्यापार- उदीम, अर्थकारण श्रीमंतांना भुलावीत होतं.
१९४६ साली बेळगावला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यात पहिल्यांदा "संयुक्त महाराष्ट्र" या मराठी भाषिक प्रांताची मागणी करण्यात आली. त्याठिकाणी साहित्य संमेलनात राजकीय नको म्हणून नंतर शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै १९४६ रोजी "संयुक्त महाराष्ट्र परिषद" अशी सर्वपक्षीय आणि अपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. या समितीने दार कमिशन जे भाषिक राज्यांच्या प्रश्नावर काम करीत होते, त्यांना निवेदन दिले. दार कमिशनचा रिपोर्ट १९४८ साली प्रसिध्द झाला. त्यात त्यांनी भाषावार प्रांतरचना अमान्य केली होती. मग त्याचा फेरविचार करण्यासाठी जे.व्ही.पी. समिती (जयरामदास दौलतराम, वल्लभभाई आणि पट्टाभी सितारामय्या) स्थापण्यात आली. त्या समितीची "भाषावार राज्ये तुर्त बनवूच नयेत पण ती बनवायची असल्यास मुंबई शहर वगळून संयुक्त महाराष्ट्र द्यावा", अशी शिफारस होती.
पुढे १९५३ साली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. पुढचं एक वर्ष हा आयोग फक्त निवेदने स्विकारीत होता. १९५५ साली त्याचा अहवाल आला आणि महाराष्ट्राचा पुर्णपणे भ्रमनिरास झाला. त्यानंतर पुढे याच विषयावर १९५५ साली फजलअली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाला. त्याचाही नूर तसाच होता.
एकूण काय तर, समित्यांवर समित्या निर्माण होऊनही भाषावार प्रांतरचनेचा तिढा सुटत नव्हताच किंबहुना तो अधिकच किचकट बनत होता. १९५६ च्या जानेवारीत १६ तारखेला पं. नेहरुनी त्रिराज्य योजना जाहीर केली. महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात बेळगावमधील कारवार नव्हते हैदराबादचा बिदर जिल्ह्याचा मराठी भागही नव्हता. मुंबई तर नव्हतीच. आधीच कट केल्याप्रमाने त्यादिवशी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. आणि अपेक्षेप्रमाणे दुसर्‍या दिवसापासूनच मुंबईत धुमच्छक्री चालू झाली. जानेवारी १५ च्या रात्री प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, कृष्णा देसाई, लालजी पेंडसे, गुलाबराव गणाचार्य अशा जवळजवळ २९ जणाना अटक करण्यात आली. त्यानंतर गिरगावात ठाकूरद्वार इथे दंगल उसळली. आंदोलकांनी दोन ट्रामगाडया आणि बसेस जाळण्यात आल्या. त्या रात्री बंडू गोखले नावाचा नाइट स्कुलचा विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. तोच पहिला हुतात्मा. आणखी चार जणाना गोळ्या लागल्या. आणि त्यानंतर मुंबईने पेट घेतला तो घेतलाच.
याच काळात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात १०६ माणसे मारली गेली. ४५००० स्त्री-पुरुषांनी तुरुंगवास भोगला.३२ आमदारांनी राजीनामे दिले होते. या लढयाची परिणती ही की केंद्राला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यावाच लागला. तोच तो दिवस १ मे १९६०. ज्याला आपण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस असेही म्हणतो. ज्या स्वतंत्र महाराष्ट्र राजाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले.
१९४६ ते १९६० या १४ वर्षांच्या काळातला या लढयाचा खरंतर तिढयाचा हा धावता आढावा. या लढयात जे मेले ते गेलेच. जे लढले ते सुध्दा आता सगळे शिल्लक नाहीत. त्यातले काही मरता येत नाहीत म्हणून अजून जिवंत आहेत. त्यातले चंदू भरडकर मित्राच्या मेहरबानीनं जगताहेत, आत्माराम पाटील अजूनही परळच्या चाळीत राहताहेत. यावेळी यापैकी कुणाचीही याद कुणालाच नव्हती.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई धनदांडग्यांच्या हातात जाऊ नये यासाठी होता. वस्तुस्थीती अशी आहे की, पुर्वीपासूनच मुंबई व्यापार्‍यांच्या, धन-दांडग्यांच्याच हातात होती पण ती महाराष्ट्रापासून तुटली असती किंवा स्वतंत्र झाली असतं तर तसं त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं असतं. हे म्हणजे थेट लग्न नाही पण लिव्ह-इन-रिलेशनशीप सारखं झालं. मालकी म्हणजे तरी काय, तर ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार आहेत त्याची असे मानले तर हे सर्व अमराठी माणसांच्याच हातात जास्त होतं हे लक्षात येईल. पैशाने मालली हस्तांतरीत होत असते. आजही जमीन, पैसा, स्थावर- जंगम मालमत्ता (असेट) अमराठी माणसाच्याच नावावर जास्त आहे. मराठी माणसाच्या नावावर फक्त मुंबईची जबाबदारी (लायबिलीटी)आहे. विकत घेण्याची क्षमता (यात सुख, समाधान, ऐशोआराम, वस्तूंपासून मुंबईपर्यंत सगळं येतं) आजही आणि तेव्हाही अमराठी माणसाकडे जास्त होती. मराठी माणूस फक्त विकू (यात घरातले कपडे-भांडी, दागीन्यांपासून वडिलोपार्जीत मोक्याच्या जमीनीपर्यंत सगळ येतं)शकतो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतरही मुंबई काय पुन्हा गरीबाच्या, मराठी माणसाच्या हातात आली नाही. येणारही नाही. जरा पेडर रोड, पाली हिल, मलबार हिल अगदी आता लालबाग,वरळी, परळ सुध्दा. इकडे जरा फेरफटका मारुन या म्हणजे कळेल की मुंबई मराठी माणसाची तेव्हाही नव्हती आणि यापुढेही असणार नाही. पुर्वी फक्त दक्षीण मुंबई नव्हती आता दाही दिशा नाहीत.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही एक घटना होती. त्यामुळे त्याची इतिहासात नोंद झालेली आहे. हा इतिहास यापुढे आपण आपापल्या सोईनुसार वापरणार. फक्त भुगोल बदलता येत नाही म्हणून मुंबई महाराष्ट्राच्या नकाशात दिसणार. आपण फक्त भावनेच्या भरात तिला माझी माझी म्हणत राहणार. आतापर्यंत हेच होत आलं आहे. यापुढेही हेच होत राहणार. १ मे ला आपण डोक्यावर घेऊन नुसते नाचत किंवा नाचवत राहणार. उधारीवर फटाके फोडत राहणार, कॉन्ट्रीब्युशन मध्ये रांगोळ्या काढून, लग्नात शिवलेले झब्बे-लेंगे घालून, शिवाजीच्या, भवानीच्या नावानं घोषणा देत. शोभायात्रा काढून, डीजे, बँड-बाजे बाजवत आपापल्या येरियात इकडून- तिकडे बोंबलत फिरणार.
दिवस उरलेल्यांचेच असतात. कालच्या पेक्षा उद्याचा दिवस नवाच असतो. त्यामुळे पिढिही बदलतच रहाते. आणि ती कालच्या पेक्षा अपडेट असते. हे जरी खरं असलं तरीही आपण त्या निमित्ताने या दिवशी तरी केवळ डांसीग मुड मध्ये असणं बरं नाही. लढले ते का लढले याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. मुंबई मराठी माणसाच्याच हातात राखण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. कर्तृत्वाची शपथ घेण्याचा हा दिवस आहे. फक्त वाजायला लागलं की हलायला लागतं. अश्या अवस्थेतून बाहेर पडण्याची मराठी माणसाला आता गरज आहे. म्हणून आता थेट साठीची, पंच्याहत्तरीची किंवा शंभरीची वाट बघाण्यापेक्षा अधून-मधून या लढयाचं स्मरण करीत रहावं. हुतात्म्यांच्या नावानं दुसर्‍यांना शपथा घालण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी शपथ घालून घ्यावी. या निमित्ताने तरी का होईना मी मुंबईचा, महाराष्ट्राचा आहे, मुंबई, महाराष्ट्र माझा आहे म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

दादर स्टेशन

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१०

मु.पो. दादर स्टेशन. मुंबईचं हार्ट. दादरची सफर म्हणजे मुंबईकरासाठी एक विरंगुळा, आनंद. कुणीही कुणाला सहज भेटण्याचं ठिकाण म्हणजे दादर. दादर चौपाटी, शिवाजी पार्क, प्लाझा, कबूतर खाना, कोतवाल गार्डन, शिवाजी मंदीर, टिळक ब्रीज, हिंदू कॉलनी, किर्ती कॉलेज, शारदा टॉकीज, पोर्तुगीज चर्च, मामा काणेंच उपहारगृह, शिवसेना भवन, आयडीयल, श्रीकृष्ण वडेवाला, सुविधा, हनुमान मंदीर, लक्ष्मी नारायणाचं जैन मंदीर, कैलास लस्सी ही दादरची आयकॉन्स. या ठिकाणाचं नाव घेतलं तरी त्याचं चित्र त्याच्या वैशिष्टयांसह डोळ्यासमोर उभं राहतं.
तरीही या सर्वांवर कडी म्हणजे दादर स्टेशन. दादर स्टेशन म्हणजे गर्दी. अखंड वाहणारी, काही ठिकाणी थबकणारी, सरपटणारी, रेंगाळणारी, वाट पाहणारी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड गर्दीचं वारुळ दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, पायर्‍यांवर वळवळत असतं. संध्याकाळच्या सुमारास आपल्याला हव्या त्या माणसाचे वाट पाहणारे चेहरे आणि तो माणूस दिसल्यावर फुललेले, लटक्या रागातले, वाट पाहुन हिरमुसलेले, कातावलेले कित्तेक चेहरे प्लॅटफॉर्मनं पाहिले असतील. त्याची मोजदाद त्यालाच.
मुंबईत स्टेशनं अनेक असली तरी सगळ्यांच्या तुलनेत दादर स्टेशनला एक प्रकारचं निराळेपण आहे, उभं आडवं पसरलेलं हे स्टेशन भव्यतेच्या अंगानं सगळ्या स्टेशनांना जड जाईल. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडणारा मधला पूल दिवसभर प्रचंड गर्दीच्या भारानं थरथरत तर रात्री निपचीत पडलेला पाहताना फारच केविलवाणा दिसतो.
रात्र वाढायला लागते तसा दादर स्टेशनला एक निराळा रंग चढायला लागतो. रात्री बाराच्या पुढे ट्रेन पकडण्याची लगभग वाढते. घराची ओढ माणसाला चालत्या गाडीकडेही खेचते. त्यात कुणी कधी टाकलेली असली तर त्याची ती फरफट बघवत नाही. डोळयांवर वाढत चाललेली पेंग, दोन ट्रेन मधलं वाढत चाललेलं अंतर. माणसांच्या चेहर्‍यावर वैताग पसरलेला असतो. सुरक्षेच्या कारणावरुन हल्ली माणसांना रात्री दादर स्टेशनाच्या आवारात थांबायला बंदी असते. दोन रेल्वे पोलीस एवढया गर्दीसाठी पुरे पडतात. पोलिसाची नजर, हातातला दांडा, आणि आवाज त्या गर्दीला दिशा देत राहतो. रात्री १.११ ला चर्चगेटहुन दादरला येणारी विरार आणि १.२१ ला बोरीवलीसाठी शेवटची ट्रेन असते. तेंव्हा एक आवाज आपल्याला खेचुन घेतो तो असतो श्रीमती गिते यांचा. युनीफॉर्ममध्ये असतात म्हणूस त्या पोलीस नाहीतर, आईच्या आवाजातला हा आवाज दरडावत, विनंती करीत राहतो की, ही शेवटची ट्रेन आहे. शेवटची ट्रेन आहे.
ट्रेन चुकल्यावरची पंधरा-वीस मिनीटे उरलेल्या वाटसरुना त्यांनी समजावतांना, खडसावतांना पाहणं हा एक सोहळाच. त्यांच्यासोबत असतात ते शेख नावाचे रेल्वे पोलीस. एका बाजूला चुकलेल्या वाटसरुंची काळजी आणि शिस्तीच्या, सुरक्षेच्या नावाखाली त्यानां तिथं थांबूही न देणं यातली तगमग बघण्यासारखी असते. आता तुम्ही कुठे थांबाल, काय खाल, सकाळची पहिली ट्रेन कधी असते याची ते माहीती अभावितपणे पुरवीत राहतात.
ट्रेन चुकली. आता प्रत्येकालाच माहीत असतं आता सकाळी ४.३१ शिवाय पर्याय नाही. आता सगळे प्लॅटफॉर्म्स सुनसान होतात. आणि उरलेली गर्दी दादर इस्ट-वेस्ट रेंगाळत राहते. काही सरळ कोतवाल गार्डन गाठतात. काही सुविधाच्या, काही इतर दुकानांच्या पायर्‍यांवर पसरतात. काही लोक स्टेशनची रात्रभर सोबत करीत राहतात. त्यात वडेवाला, चहावाला, मॉलीशवाला, पेपरवाला, पानवाला, बुर्जीपाववाला, हारवाला, मलईवाला, दिवसभर कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पाने विकणार्‍या बाया, भिकारी, गर्दुल्ले, हमाल, छक्के, शौकीन आणि काही पोलीसवाले असतात.

उतरत्या वयाची एखाद दुसरी बाई धंद्यासाठी गिर्‍हाईक शोधतांना दिसते. पोलिस स्टेशन परिसरात उभं रहायला देत नाहीत. म्हणून आता त्यातल्या काही बाया शिवाजी पार्क (हो तेच ते शिवतिर्थ) मध्ये काळोखात बसून आपली कामं करीत असतात. भिकारी,गर्दुल्ले खाण्याच्या गाडीवर तुटून पडलेल्या गिर्‍हाईकांचे शर्ट पॅन्ट खेचत असतात. तासा-दोन तासांनी अधून मधून कुणीतरी गर्दुल्यांच्या पेकाटात लात घालतो आहे. तो खाली केकाटतो आहे, आणि पब्लिक फिदिफिदी हसतं आहे. हे चित्र पहायला मिळतं. छक्के तिन चार जणांच्या घोळक्यात फिरतांना दिसतात. ते पैसे मागतांना दिसले नाहीत. पण खाण्यापिण्याच्या स्टॉलवर मध्येच एखाद्या पदार्थावर हात मारतांना त्यामुळे स्टॉलमालकाशी हुज्जत घालतांना दिसत होत. ठाणे जिल्ह्यातून आदिवासी पाड्यावरुन कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पानं विकायला आलेल्या बाया रांगेत अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात.
रात्री अडीचच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर एक वर असलेला खाण्याचा स्टॉल सगळं आवरुन बंद होतो. त्यानंतर तिथल्या लोकांचं जेवण. झोपणं. पुन्हा सकाळी साडेतीनच्या सुमारास हे पुन्हा दुसर्‍या दिवसाची जुळवाजुळव करायला तयार असतात.
दिवस-रात्र प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या घडामोडी टिपून घेणारा कॅमेरा सुनसान रात्री आपली नजर वेधून घेतो. गर्दीत असतांना तो तिथेच असला तरी आपल्याला फारसा दिसत नाही. पण त्याच्या नजरेतून आपण निसटणं अशक्य. तो मात्र सगळ्या गर्दीवर आपली कडी नजर रोखून असतो. दिवसभर येणाजाणार्‍या ट्रेनसाठी नेमानं हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची उघडझाप करणारे सिग्नल्स फक्त रात्री लाल होउन निपचित असतात, काळोखाच्या कॅनव्हासवर ते फारच भेसूर आणि भीतीदायक वाटतं.
साठीतला पांढर्‍या मळकट लेंगा-सदर्‍यातला, पांढर्‍या दाढीची खूंट वाढलेला, गालफाडं बसलेला एक मराठी माणूस इथे गेली २५ वर्षे मॉलीश करतो. दादर स्टेशन पच्छिमच्या आवारात दोन-चार मॉलीशच्या बाटल्या हातात आणि पाठीवर कापडी पिशवी घेऊन फिरत असतो. आपल्या चेहर्‍याकडे बघून तो मॉलीश करणार का म्हणून विचारतो. त्याला मॉलीश करतांना बघीतलं तर आयुष्यातला सगळा व्याप-ताप तो त्याच्याखाली झोपलेल्या माणसावर काढतो आहे असं वाटतं. १०० रुपयात तो तुम्हाला नखशिखांत रगडतो.
विषेशतः लांबपल्ल्याच्या रेल्वेत गाडी सुरु होण्यापुर्वी हातात फडका किंवा झडलेला झाडू घेऊन काही पोरं दिसतात, तशी दोन पोरं रेल्वेच्या पायर्‍यांवर काही झाडतांना दिसली. कुतुहल म्हणूण विचारलं, तर ते कामगार होते. ३०००/- रुपये मासिक पगार असलेली ही मुलं रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत इथे काम करतात. पान, गुटखा, तंबाखू, उलटया, लघवी करुन चिकट आणि चिवट झालेल्या रंगीत जागा खरवडण्याचं काम ते करतात.
पहाटे तिनच्या सुमारास स्टेशनच्या पायर्‍यांवर पेंगत बसलेली पन्नास-साठ माणसं. पाठ जमिनीला टेकून झोपण्यातलं सुख काय असतं ते हे चित्र पाहिल्यावर समजतं. आपलं सामान सांभाळत झोप जागती ठेवत डोळे मिटणं. कलंडणारी मान, पायांच्या गुढग्यावरुन निसटणारे हात आणि झेपावणारं शरीर सांभाळत रात्र सरण्याची वाट पाहणं. हे दृष्य फार केविलवाणं होतं.
साडेतीन रुपये एमआरपी असलेला बनपाव दहा रुपयात विकणारा एक भय्या सांगत होता, धंद्यात आता मजा नाही. तरीही पाचशेच्या खाली त्याचा धंदा नसावा. चारच्या सुमारास दादरची आठवण आली म्हणून आलेला एक नाटकवाला म्हटला, रेल्वे बॉम्बस्फोटा नंतर दादरचा चेहराच बदलला. उमेदिच्या कित्तेक रात्री त्यानं दादर स्टेशनवर काढल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं सुरक्षेच्या नावाखाली दादरचं स्वैर स्वातंत्र्यच मरुन गेलं आहे. आता पहिल्यासारखी मजा नाही.
सिटी पोलीस इथंही आपलं काम नित्यनेमानं करतांना दिसत होते. पण ते प्रत्येक धंदेवाल्याकडे जात नव्हते. कामत हॉटेलच्या कॉर्नरवर व्हॅन उभी होती. धंदेवाल्यापैकी एक तरतरीत भय्या होता. तो हेच काम करीत असावा. कारण तो कोणत्याही धंद्यावर स्थीर उभा नव्हता. पण प्रत्येक धंदेवाल्याकडून १०-२० रुपये गोळा करुन त्याची पुरचुंडी करुन पोलीसाना देऊन आला. काय विचारलं तर त्यानं हसून फक्त चॅक असं केलं.
सकाळी चारच्या आसपास पुन्हा लगभग सुरु होते. ती चाहुल असते दिवस सुरु होण्याची. पुन्हा ताजेतवाजे होऊन पुन्हा ट्रेन मध्ये चढतात काही झिंगलेले, मरगळलेले काही फ्रेश, कडक चेहरे.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

तुंबलेल्या तुतार्‍या

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१०


अगदी आठवडयाच्या अंतरावर एक मे येऊन ठेपला (इथे मराठी माणसाने उभा ठाकला आहे असे वाचावे) आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीचा हा पन्नासावा वाढदिवस. पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणतात. पुन्हा अशी पन्नास वर्ष कधीच येणार नाहीत. नंतर एकदम साठ, पंच्याहत्तर आणि शंभर. मग त्यानंतर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे साजरा होईल तेव्हा होईल . त्यामुळे आत्ताच महाराष्ट्राच्या परंपरेला साजेश्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ढोल ताश्यांच्या वाद्या ओढल्या जात आहेत. रात्री अपरात्री लेझीमची तालीम सुरु आहे. बँजो पार्ट्या आधूनीक ढिंग्चँग गाण्यांची प्रॅक्टीस करताहेत. डिजेवाले रिमिक्स गाण्यांच्या सिडीज गोळा करत आहेत. पताका कापायचा त्रास नको म्हणून चायनीस बल्बच्या झिगझॅग माळा बिल्डींगीवर, गच्चीत, खिडक्यात, झाडां-झुडपांवर सोडल्या जात आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसाच्या छातीत उत्साहाला उधाण आले आहे.
यावेळी खरंतर शोभायात्रेला हत्तीच हवे होते. अंबारीतून संत ज्ञानेश्वर, तूकाराम-रामदास, शिवाजी महाराज आणि शक्य झाल्यास अत्रे, डांगे, एसेम, बापट,अमरशेख यांचे फोटो. बाजूला स्वच्छ -सफेद कपडयात स्थानीक नगरसेवक किंवा आमदार खासदार यांची मिरवणूक करण्याचे घाटत होते. पण हत्ती बजेटच्या बाहेर म्हणून कॅटरर्स कडून घोडे, खेचर आणि बैल यांची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत. घोडयांचे, बैलांचे मालक भैयाच असतात. त्यांना मराठीतूनच बोलण्याच्या विषेश सुचना देण्यात आल्या आहेत. फटाके, ढोल-ताशे-लेझीम या न बुजण्यार्‍या धीट प्राण्यांची निवड केली जात आहे. शोभायात्रेचे मार्ग आखण्यात येत आहेत. बैलगाडी किंवा ट्रकावर उभे करण्यासाठी देखावे तयार केले जात आहेत. त्यालाच चित्ररथ म्हणण्याची परंपरा आहे. पोरांना दाढया-मिशा लावून मावळ्यांच्या वेशात उभे कसे रहावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही मुले कंटाळतातच म्हणून त्यांच्यासाठी विषेश वडापाव आणि थंडा याची सोय लावण्यात आली आहे. यात भाग घेणार्‍या मुलांच्या पालकांनीच आपापला खर्च करायचा आहे. शक्यतो मावळ्यानी गॉगल वैगेरे वापरु नये याची काळजी घेतली जाईलच. पण उन्हाचा कहर लक्षात घेता असे नियम शिथील केले जातील. नागरीकांसाठी पिंप भरभरून लिंबू किंवा रसना सरबत फूकट वाटण्यात येणार आहेत.




तुतार्‍या वाजवून वाजवून काही जणांचे गाल फाटून गेले आहेत. त्यामुळे या धंद्यात आता फारसे लोक नाहीत. आणि पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने नवीनही पिढी तयार होत नाही. तरीही या दिवसाचे विषेश महत्व लक्षात घेता स्पिकरवरच रेडिमेड तुतारीची धून वाजवण्याची व्यवस्था केली आहे. स्टेजवर सर्व प्रमुख पाहुणे बसेपर्यंत आणि शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला हार घाले पर्यंत ती कितीही वेळेला रिपिट वाजवता येईल. यावेळी या दिवशी स्पिकरवर फक्त मराठमोळी गाणी (विशेषतः महाराष्ट्र गीते, भक्तीगीते वैगेरे) वाजवण्यावर भर असेल. तरीही तरुण सळसळत्या रक्ताचा हिरमोड नको म्हणून काही रिमिक्स गाण्यांचा शिडकावा अधून मधून करण्यात येईलच याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. काही मंडळानी खास मराठीचा अभिमान सांगणार्‍या ओळींचे टीशर्टस छापून घेतले आहेत. त्या टिशर्ट्सच्या मागे स्पॉन्सरर स्थानीक आमदार-नगरसेवकाचे सौजन्य म्हणून नाव छापले जाणार आहे.



शोभायात्रेत सहभागी होणार्‍या पुरुषांना झब्बे, लेंगे,फेटे कम्पल्सरी केले आहेत. ब्रेसलेट्स, चैनी, चामडयाच्या पांढर्‍या चपला, मोजडी अश्या वस्तूंचे खास आपापल्या स्तरावर प्रदर्शन करावे अश्या सुचना आहेत. लहान मुलांसाठी रेडीमेड धोतरे, फेटे किंवा रिबीनींची सोय करण्यात त्यांचे त्यांचे आई बाबा (स्वारी...मम्मी-पप्पा) गुंतले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्यां काढण्यात येणार आहेत, गेटवर झावळ्या तोरणे लावण्यात येणार आहेत. सत्यनारायणाची पुजा असणारच. त्यासाठी नवदांपत्याची, भटजींची शोधाशोध सुरु आहे.



आपापल्या एरियात जबरदस्तीची रक्तदान शिबीरे, मोफत चश्मा शिबीरे, मोफत वह्या वाटपाचे समाजीक कार्य करण्याचे योजीले आहे. त्यासाठी आगाऊ नावनोंदणी सूरु आहे. यानिमित्ताने दहावी-बारावीत पहिल्या आलेल्या मुलांचे कौतूक खास पेंसिल बॉक्स आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात येणार आहे. याच ठिकाणी नापास झालेल्या मुलांना धीर देण्यासाठी अपयश हीच यशाची पहिली पायरी कशी आहे याची सोदाहरण माहीती देण्यात येणार आहे. बाकी खेळ, चित्रकला किंवा तत्सम प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचेही कौतूक करण्यात येणार आहे. जेष्ट नागरीकांचा (उगाचच) शाल देऊन सत्कार करण्यात येणार आहे.



खास ओवाळणी साठीच्या बाया नऊवारी साडयांवर मॅचींग सेट्स शोधण्यात गर्क आहेत. कपाळावरची चंद्रकोर, नथ, आंबाडा, हिरवा चुडा वैगेरे मराठमोळा साज. भरीला मेहंदी, फेशीअल, ल्बीचींग, आयब्रो आणि खिडूकमिडूक मेकअपचे सामान जुळवण्यात त्या मग्न आहेत. आयत्या वेळेला गजरे आणायचे कुणी, कुणाला ओवाळायचे कुणी, पदर डोक्यावरुन घ्यावा की खांद्यापर्यंतच बस याचे जोरदार प्लॅनींग सुरु आहे. त्यात ओवाळणीचे फोटो काढायचे कुणी याचीही आखणी चालू आहे. हल्ली डिजीटल कॅमेरा मुळे रोल भरण्याचा ताप नसतो. तरीही मशीनचा काय भरवसा म्हणून जोडीला मोबाईल्स सुध्दा तयार ठेवले जात आहेत.



शिवाजी महाराजांचे पुतळे पुसले- धुतले जात आहेत, गरज भासल्यास रंगवले, मागवले जात आहेत. महाराजांसाठी चंदनाच्या पर्मनंट हारांची ऑर्डर गेली आहे, आणि तो हार गळ्यात टिकावा म्हणून महाराज्यांच्या खांद्यावर खिळे ठोकले जात आहेत. आपापला एक पुतळा असावा यासाठी सगळीच मंडळे प्रयत्नशील असतात, तरीही तो आयत्यावेळी कुठे मिळतो याची कार्यकर्त्यांना पक्की माहीती असते. (काही लोकांना पुतळे, तलवारी, ढाली यांचीच गीफ्ट्स येत असतात) तशी चौकशी चालू आहे. तरीही प्रत्येकजण प्रत्येक पायरीवर खात्री करुन घेतो आहे. कारण यावेळी सगळं असलं आणि एकटे महाराज नसले तर सगळ्या कार्यक्रमाचा विचका होऊ शकतो. याची मराठी माणसाला जाण आहे.



काल-परवापर्यंत अनेकांना माहीत नसलेला हा दिवस उद्या एकदम दैदिप्यमान प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. या निमित्ताने मेलेल्या एकशे सहा माणसांचे स्मरण केले जाईल. त्या लढ्यात मेलेल्या माणसांपैकी कुणाचेही नाव कुणालाच माहीत नसते. फक्त मेले ते एकशे पाच की सहा येवढयाच माहीतीवर सभा गाजवल्या जातील. मेलेल्यांच्या नावानं शपथा घातल्या जातील. अत्रेंचे चार-दोन किस्से सांगून, स.का.पाटील, मोरारजीना शिव्या घालून दिवस पार पडेल. मराठी माणसांची कानशिले जरा गरम होतील. हाता- पायात झिणझिण्या येतील. जरा या निमित्ताने तुंबलेल्या तुतार्‍या मोकळ्या होतील.



सकाळी उठल्यावर (किंवा उतरल्यावर) मराठी माणूस गुलालाने माखलेल्या झब्या-लेंग्याकडे, विस्कटलेल्या रांगोळ्यांकडे, मलूल झालेल्या फुलांच्या माळांकडे, लटकलेल्या तोरणांकडे, निपचित चिकचिकत असलेल्या चायनीज बल्बकडे पहात मनातल्या मनात म्हणेल, अरे याचा काय संबध? महाराष्ट्र पन्नास वर्षाचा झाला म्हणजे किती खर्च झाला ...!!!



प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com