Thursday, September 2, 2010

रात्र गणेशोत्सवाची आहे... मराठी माणसा जागा रहा...

पुर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # सप्टेंबर २०१०

टिळक तुमचे महत्त्व फक्त दोन गोष्टींसाठी. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती. मराठी माणसाला तहहयात वर्गणीची सोय करुन गेल्याबद्दल टिळक तुम्हाला धन्यवाद! बाकी, 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही', 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' आणि 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हे तुमचे डायलॉग पाठ व्हायला सोपे म्हणून अजून सर्वांच्या लक्षात आहेत. तुमच्या भरगोस मिश्या आणि पुणेरी पगडी यामुळे तुम्हाला चारचौघात ओळखणे सोपे जाते. गेला बाजार स्वातंत्र्य वैगेरे ठीक आहे पण गणेशोत्सवाची आयडीया ग्रेटच. शिवजयंती ऐवजी शिवसप्ताह करण्याचे तुमच्या डोक्यात कसे आले नाही ? फक्त एका दिवसाच्या जयंतीसाठी प्रायोजक मिळवतांना किती फाटते याची तुम्हाला कल्पना नाही यायची टिळक. तरीही तिथीनुसार आणि तारखेनुसार दोन दोन जयंत्या साजर्‍या करुन आम्ही आमची भागवून घेतो आहोत. तरीही, यासाठी मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही आज जर इथे असतात तर एवढया अपराधासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा मंडालेच्या तुरुंगात पाठवले असते. पण असो. गणेशोत्सवासाठी तरी मराठी माणूस मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. आता या उत्सवाला मागे-पुढे घडणार्‍या सगळ्याच गोष्टी 'लोकमान्य' झाल्या आहेत.


टिळक, तुम्हाला माहित आहे, श्रावणात आपण घेत नाही. त्यामुळे ओस पडलेल्या बारची अवस्था बघवत नाही. कदाचीत तुमच्या काळात ब्रम्हवृंद तसले अभक्ष भक्षण करीत नसावेत. आता आम्ही सगळेच सगळ्या बाबतीत समता, बंधुभाव पाळतो. तरीही जी चैतन्यावस्था असते तिला गौरी पुजनानंतर सुरुवात होईल. त्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत. थोडी 'ढकलल्या'नंतर सुर-तालाला जी धार येते ती वर्णनातीत असते. ढोल-ताश्याच्या गजरात किंवा बेंजोच्या तालावर गणपतीच्या पुढे-मागे जे आणि जश्याप्रकारे आम्ही नाचतो ते तुम्ही बघितलेत तर टिळक तुम्हीही तोंडात बोटे घातली असतीत. त्यावेळी आम्ही तुम्हालाच काय पण आम्हालाही विसरतो. तुम्हीही गणेशोत्सवामागचा हेतू विसरुन जाल. पण तो मुद्दा नाही. आता आमचाही गणेशोत्सव साजरा करण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. आता तुम्हीच काय ब्रम्हदेवाचे पप्पा आले तरी तो आम्ही बदलणार नाही. 'गणेशोत्सव साजरा करणे हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे तो आम्ही बजावणारच'. 'तुमचे डोके ठिकाणावर राहो न राहो.'


रस्त्यारस्त्यावर मुर्त्यांचे बाजार भरले आहेत. गणपतीबाप्पा भक्तांची वाट पहात आहेत. प्रत्येक गणेशमुर्तीच्या गळ्यात, हातात त्यांच्या किमतींचे टॅग लटकवलेले आहेत. किंमतीवरुन घासाघीस चालू आहे. वजन, उंची, रुप, रंगाची चाचपणी करुन माल पसंत केला जातो आहे. सरत्या श्रावणाच्या मौसमात गणेशोत्सवाचा वारा सुटला आहे. मराठी माणूस पेटला आहे.


गणपतीची चाहुल लागली की आरत्यांची फुकट पुस्तकं घरात यायला लागतात. कुठे पेपराबरोबर कुणी मोदकाबरोबर तर कुणी आणि कश्या कश्या बरोबर. पुस्तकं साचत जातात. पुस्तक समोर धरलं तरीही आम्ही 'सुखकरता दुख'करता'च म्हणतो. पण इतकी वर्ष असाच सराव झाल्यामुळे गणपतीलाही त्याची सवय झाली असावी. आणि हो, प्रत्येक वेळेला आरत्या संपता संपताना 'घालीन लोटांगण' हा शब्द कानावर आला की सुटल्यासारखं वाटतं. पण त्यानंतर 'अन्याय माझे...' वैगेरे सुरु झालं आणि कॉंपिटिशनला एकासएक भेटले की बघायला नको. काहीजण यावर तास तास घालवतात. आरतीचा सुर इतका कानात आणि मनात बसलाय की आरतीतल्या त्या त्या जागा आल्या की नुसतं त्या त्या लयीत ओरडलं तरी भवसागर पार केल्यासारखं वाटतं.


या दिवसात सार्वजनीक मंडळं, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या छातीवरचे बिल्ले यांचा रुबाब बघण्यासारखा असतो. चिल्लर चिल्लर माणसं या दिवसात कडक नोटेसारखी फडफडत असतात. झब्बा लेंगा घालायचा आणि इकडून तिकडून फिरत बसायचं एवढंच काम. पण तरीही त्या कामात ऐट असते. मंडळात पैसा खाण्याचा मान सगळ्यानाच मिळतो असं नाही. पण उमेदवारीच्या काळात खुलेआम मिरवण्याचा चान्सही काही कमी नाही. इकडून तिकडे कुणा कुणाला आवाज देण्यातही सुख असतं. रांगेला वळण लावायचं, भाविकांवर उगाचच आब दाखवायचा. कुणाला तिर्थ-प्रसाद द्यायचा. कुणाला लाईनीत घुसवायचं. कुणाला लाईनीतून काढून गाभार्‍यात बसवायचं. असा बिनपैशाचा तोरा मिरवायला मिळाला की मराठी माणसाला धन्य वाटतं.


मंडप, डेकोरेशन, लाईटींग, देखावे, स्पिकर, सांस्कृतीक कार्यक्रम यांची व्यवस्था लावण्यात अध्यक्ष गर्क आहेत. त्यात काही अधिक उणं होता कामा नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. कडेकोट बंदोबस्तातही कुठे कुठे हात मारता येईल. कुणाकुणाची पत्ती काटता येईल याचं प्लॅनींग चालू आहे. गेल्या वर्षिचा जमाखर्च मनासारखा जमला आहे. पुरावा म्हणून त्याची पुस्तकं छापून आली आहेत. बाकी स्थानीक नागरिकांसाठी संगीत खुर्ची, बायकांसाठी गाढवाला शेपूट लावणे सारख्या स्पर्धा आयोजण्याचे घाटत आहे, त्यांचे बक्षिस समारंभ, सत्कार समारंभ यासाठी मंडळांतर्गत विशेष समिती असते.


उरलेला मराठी माणूस भावीक होऊन रात्रभर फिरत असतो. काहींच्या श्रध्दा फारच जहाल असतात ते अनवाणी म्हणजे चप्पल-बूट हातात घेऊन फिरत असतात. यांना डेकोरेशन, देखावे बघण्यातच जास्त रस असतो. त्यासाठी तो अख्खा गाव-मुंबई पालथी घालतो. अशा भाविकांच्या सेवेसाठी फुकट पचपचित रसना जागोजाग असतोच. चुकून चहा. गणपतीचा प्रसाद म्हणजे सफेत फुटाणे. नंतर नंतर तो तेच तेच खाऊन-पिऊन कंटाळतो. पण हा नियतीनेच मराठी माणसासाठी दिलेला प्रसाद आहे. त्यानं यापेक्षा वेगळी अपेक्षा करु नये.


पुर्वी रात्रभर भरगच्च कार्यक्रम असायचे. काहीच नाही तर रात्रभर भजनं कुटत बसायची. पण आता रात्री दहा नंतर सरकारने स्पिकरवरच बंदी आणल्यामुळे आणि पोलीस एवढं काम तरी इमाने इतबारे करीत असल्यामुळे मराठी माणसाची 'जान'च हरवल्यासारखी झाली आहे. आणि आपण जे जे करतो आहे ते ते दुसर्‍याला कळल्याशिवाय मराठी माणसाला चैनच पडत नाही. शांततेने काही करण्याचा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे रात्र सामसूम. कदाचित मनातल्या मनात गणपतीबाप्पा सुप्रीम कोर्टाचे आभार मानत असेल. पण गणपती तर जागवला पाहिजे. त्याच्या समोरची वात जळत ठेवण्याच्या नावावर काही लोकांना पत्त्याचा डाव मांडता येतो. पत्त्याला जुगार म्हणणे या पवित्र दिवसात तरी बरे दिसत नाही. पण अनेक लोक या दिवसात देशोधडीला लागतात. नव्या खिलाडींची एन्ट्री याच दिवसात होते. 'ज्योत से ज्योत जगाते चलो' या धर्तीवर हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोच आहे. वेळ घालवण्यासाठी सुरु झालेला हा डाव आयुष्य वाया कधी घालवतो कळत नाही.


शेवटी विसर्जन. म्हणजे एक प्रकारचं दु:खच. ते ज्या ज्या प्रकारे व्यक्त करता येईल ते केलं जातं. दु:ख पिण्यानं हलकं होतं हे पुरातन सत्य आहे. त्यामुळे ते इथंही असतंच. सजवलेल्या ट्रकावर गणपती. अंगाखांद्यावर विरघळलेला गुलालाचा घाम, डोक्याला भगवी पटटी, नाशिक बाजा किंवा पुना ढोलाचा खणखणाट, तो बजेट बाहेर असल्यास बेंजो किंवा नुसताच स्पिकर. त्या तालावर थिरकणारी गर्दी. पोटात कंट्री, कॉर्टर किंवा चपटी आणि मुखात गणपती बाप्पा मोरया. बघणार्‍याच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय रहात नाही.


विसर्जनाला दरवर्षी पहाट होते. पुढल्यावर्षी लवकर या म्हणत दुसरा दिवस उजाडतो. दुसर्‍या दिवशी सकाळी किनार्‍यावर गणेशमुर्तींचे भग्नावशेष इतस्ततः विखरुन पडलेले असतात. त्याच अवयवांसारखा मराठी माणूसही उत्सवाची धुंदी उतरल्यावर सैरभर होतो. ते विखुरलेले तुटलेले अवयव संदर्भहीन असतात. त्यात देवत्व किंवा सत्त्व नसतं असं त्या क्षेत्रातले अधिकारी मानतात. भक्ताच्या मनातही त्याला काही किंमत नसते, तसं मराठी माणसाचंही! गेल्या दहा दिवसाचा रंग उतरवून मराठी माणूस डोळे चोळीत उठतो. सुकी भाजी चपातीत गुंडाळून खिशात नाहीतर रंग उडालेल्या प्लास्टीकच्या पिशवीत कोंबतो आणि नऊ सत्राच्या ट्रेन मध्ये घुसतो. ट्रेन प्लॅटफॉर्म सोडते आणि गर्दीचाच गजर होतो. गणपती बाप्पा ss मोरया sss , पुढल्या वर्षी ss लवकर या sss

प्रवीण धोपट

सेक्सी छक्के

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # सप्टेंबर-२०१०

लालेलाल लिप्स्टीक, भडक मेकअप, कडक हावभाव आणि ढंगदार अदा. गोरेगावच्या चेकनाक्यावरचं रात्री आठ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत हे चित्र नजर खेचून घेतं. प्रवासात असू तर पुढं जाणार्‍या वहानासोबत माना आपोआप मागे मागे वळत राहतात. चालत असू तर पाय आपोआप थबकतात. बोलत असू तर शब्द जिथल्या तिथे थिजतात. कुतूहल जागं होतं आणि जाणारा येणारा प्रत्येकजण तिथं मनातल्या मनात का होईना क्षणभर तरी रेंगाळतो. पुढं ज्याची त्याची कुवत, हिंमत, काळ, काम आणि वेळ.



गोरेगाव आरे चेकनाका. हायवेवर गाडयांची ये जा. आणि रस्त्यालगतच्या झाडीत उभ्या असलेल्या तृतीयपंथीचे इशारे. मधुनच भरदाव गाडयांना ब्रेक लागतो. साईडचा सिग्नल देत गाडया डाव्या बाजूला पार्क होतात. लघवीच्या बहाण्याने जो तो वळून वळून मागे बघतो. आणि हिंमत करुन थोडा मागे मागे सरकतो. उभ्या तृतीयपंथीतला कुणीतरी एक पुढं होऊन व्यवहार समजावतो. पटला तर झाडीत आत नेतो. पंधरा-वीस मिनीटांच्या अंतराने कुणीतरी इकडे-तिकडे पहात बाहेर. पुन्हा पुढच्या रस्त्याला. अडकलेल्या गाण्याचे तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू यावेत तसं चित्र. रात्रभर.


रात्री अकरानंतर बसेसची ये जा तशी कमीच. पण बसस्टॉपवर रेंगाळणार्‍यांची संख्या कमी होत नाही. कुणी सिगरेटच्या बहाण्याने, कुणी पाणीपुरीच्या बहाण्याने बिचकत विचकत जवळ जाऊन झाडीत काय दिसतंय का याचा अंदाज घेत राहतो. पण काळोख आणि घनदाट झाडी दाद देत नाही. मग सुरु होते पाणीपुरी वाल्या भैया जवळ चौकशी. तो ही कॅसेट वाजवल्यासारखा सांगत राहतो. ज्याला एवढंच ज्ञान पुरेसं होतं तो निघतो. त्याच बसस्टॉपच्या आजुबाजुला कॉलसेंटर वाल्या गाडयाही थांबतात. ज्याची वेळ भरते तो निघुन जातो बाकीचे थांबून राहतात डोळयांचे लाड पुरवीत.


मुंबईतल्या रिक्षा-टॅक्सीवाल्यांना मुंबईचं विशेषतः रात्रीच्या मुंबईचं जे ज्ञान असतं ते त्याला तोड नाही. अनेकांना इथला व्यवहार माहीती असतो. काही रिक्षावाले बसस्टॉपच्या पुढे रिक्षा उभ्या करुन सराईताप्रमाणे बिनधास्त उभ्या कुणाच्या सोबतीनें आत जातात. बाहेत येतात. रिक्षात ठेवलेली पाण्याची बाटली हातावर, तोंडावर रिकामी करतात. कुणी पॅसेंजर मिळालाच तर त्याच्यासोबत पुढे नाहीतर स्टार्टर मारुन एकटाच तृप्त रिकामा होऊन जोगेश्वरीच्या दिशेने. त्यातलाच एकजण असाच बाहेर आल्यावर त्याला विचारलं, लुटेते नही? तर म्हणाला 'बिल्कुल नही, सबका एकही भाव रहता है. जादा कुछ रहेगा तो जादा पैसा'. जादा मतलब ? फ्रेंच करना है तो डबल...


माझ्या डोक्यात खटाखट टाळ्या मारुन घाबरवणारे तृतीयपंथी होते. आडदांड, झगझगीत साडया. गालावर तुरळक दाढीचे खुंट वाढलेले किंवा गुळगुळीत दाढी करुनही चेहर्‍यावर उरलेल्या दाढीमिश्यांची जागा ओळखता येऊ शकणारे. पैसे मागणारे. शिव्या देणारे. आशीर्वाद देणारे. रागाला आले की नेसणं वर करु का असे विचारणारे. सिग्नलवर, रेल्वेत भीख मागणारे. अंगचटीला येतांना किळस वाटावी असे पुरषी छक्के. पण इथलं चित्र याच्या शतपटीनं उलटं. बारीक चणीचे. अपवाद वगळता सगळेच गोरेपान. पातळ पोटाचे. भरगच्च छातीचे. पंधरा ते पंचविशीतल्या मुलींसारखे बाकदार, नक्षिदार. क्षणभर या मुलीच असाव्यात अशी शंका येते. वॅक्सींग, आयब्रो, नेलपॉलीश, सेंट, मनगटावर सोनेरी घडयाळं, एखाददुसरी कचकडयांची बांगडी. कानात डौलदार डूल, उंच टाचांच्या चपला, उत्तम साज आणि नवथर अंदाज. एखाद्या नखरेल तरुणीला लाजवेल अशी अदा. ना अधिक ना उणं. सगळे रंग-ढंग मापासमाप, जिथल्यातिथे. कपडे कमीच. मीडी, नाहीतर फ्रॉक्स. चुकुन साडी किंवा पंजाबी ड्रेस.


ब्रीज वरुन जाणारे उघडया ट्रक- टेंपोतले माहितगार खुलेआप आवाज देतात. ' ए मामू ...' खालूनही त्याला लागलीच प्रतिसाद जातो' ए भडवे...'. तास-दिडतासानी असा सादप्रतिसाद चालू राहतो. रस्त्यावरुन छत्रीचा आडोसा करुन कुणी-कुणी दबकत जायला लागतो. ना धड त्याला त्यांच्याकडे बघण्याची हिंमत होत ना विचारण्याची. तेव्हा दुरुनच त्याला एखाद्या मालाची माहीती सांगावी तसं, 'आजा आरामसे करुंगी, क्या करना है ? आगेसे? पिछेसे? आजा... मुह मे भी लुंगी. पचास रुपया. आजा ये छोरा... ये राजा... ये मेरी जान... तरीही तो पुढेच चालला तर मागून कचकचीत शिवी आणि सोबतीला टाळी.


पोलीसांची गाडी धिम्या गतीनं सिग्नल ओलांडते आणि यांची पळापळ होते. मागच्या झाडीत चिडीचुप आणि सामसुम. आता इथं काहीच घडत नसल्यासारखं. श्वास रोखुन धरल्यासारखी. आत गेलेली गिर्‍हाईकं आतल्याआत. आणि बाहेर पोलीसांची गाडी साईडचे पिवळे सिग्नल सुरु करुन पंधरावीस मिनीटांसाठी उभी. पोलीसांची ठरलेली गिर्‍हाईक आत दडून बसलेली असतानाही बाहेर उलटया दिशेनं गाडी हाकणारे रिक्षावाले, बाईक्सवाले, गाडीवान आपसूक गळाला लागतात. वाघ मारायला गेलेल्या शिकार्‍याच्या जाळ्यात ससेही अडकतात तसं होतं. पोलीस आत जातांना दिसले नाहीत.


पोलीसांची गाडी दूर गेल्यावर पुन्हा रस्त्याच्या कडेने पहिल्यासारखा रंग भरतो. आता मी ही थोडं धाडस करुन पुढे होतो. एकासोबत बोलता बोलता चल अंदर चल म्हणत त्यानं हाताला धरुन मला आत झाडीत खेचलं. आता सुटका नव्हतीच. त्यानं क्या करना है विचारलं. मी पन्नास रुपयांची नोट काढुन पुढं धरली. झपकन खेचुन त्यानं ती नोट छातीच्या आडोशाला खेचली. मी विचारलं, पुलीसका डर नही. तो म्हणला, डर कायका ? पुलीसभी भडवे है... मी साधेसुधे प्रश्न विचारण्याच्या तयारीत आणि तो माझ्या पॅंटच बक्कल उघडण्याच्या घाईत. मी म्हणालो सिर्फ बात करनी है काम नही. तर म्हणाला रायटर है क्या? सिरीअल लिखनी है, पिक्चर निकालनेका है की पेपरमे छपवानेका है? मी म्हणालो ऐसा कुछ नही, बस जनरल बात करनेकी है. त्यानं टाळी मारुन अजुन एकाला आत बोलावलं. त्याला म्हणाला, रायटर है... काम नही करनेका. तर दुसरा सुरु... बोल क्या चाहिये इन्फॉरमेशन... हम काम भी करना चाहे तो क्या करे... कौन रखेगा काम पर... कौनसी नौकरी मिलेगी हमे... और कौन देगा... भीख मांगने गये तो भी कोई भीक नही देता. आंखे फाड फाड कर देखेते रहते है... उन आखोंको क्या चाहिये ओ हमे मालूम है... वही हम करते है... बोल काम करने का है क्या... मी पुन्हा नाही म्हणालो तर म्हणाला... तो फिर चल निकल...


रात्रीचे अडीच वाजले होते. पावसाची रिपरीप चालू होती. चहा- सिगरेटच्या सायकलस्टॉलवर काही रिक्षावाले, काही फिरस्ते रेंगाळत होते. तिथंच पुलाखाली एक जोडपं इडली- डोसे काढीत होतं. तुरळक गाड्या रस्त्यावरुन चरचरत जात होत्या. आणि सस्त्यालगतच्या या खेळातले काही भिडू आत जात होते काही बाहेर येत होते.

प्रवीण धोपट
pravindhopat@gmail.com

Tuesday, August 17, 2010

पार्वतीचं बाळ जन्माला येत आहे

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०

इतस्ततः पडलेले शरीराचे तुकडे. कुणाचे हात तुटलेले. कुणाचे पाय. कुणाचं पोट फाटलेलं. तर कुणाचं डोकं फुटलेलं. रक्त साकळावं तसे रंगाचे डबे विखरुन पडलेले. सुकलेले डाग. शरीरातल्या धमन्या आणि शिरा लोंबकाळव्यात तसा तुटलेल्या हाता पायातून काथ्याचा गुंता. डोळ्याच्या खोबणीत फक्त पांढरी बुब्बुळं. उघडीबंब शरीरं. स्टोव्ह, एक्सॉ ब्लेड्स, चाकू अशी आजुबाजुला पडलेली हत्यारं आणि तिथल्या माणसांच्या अंगाखांद्यावर पिठाच्या चक्कीत धान्य पिसणार्‍या भय्याच्या अंगावर साचते तशी पांढरी पावडर. जमिनीवर, भिंतींवर, कपडयांवर रंगाचे डागच डाग.



हे चित्र आहे कारखान्यातलं. जिथं गणपती आकार घेतो आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातल्या हे सगळ्याच कारखान्यातलं प्रातिनिधीक चित्र. गणपती घरात किंवा मंडपात यायला आता पंचवीस दिवस उरले आहेत. मंडळांच्या वर्गणीचे जत्थे पिवळी पावतीपुस्तकं घेऊन घराघराच्या उंबर्‍यांवर, जाहिरात दारांच्या गारेगार ऑफीसेसमध्ये फिरु लागले आहेत. मंडप, चलचित्र, लाइटींग, मनोरंजनाच्या कार्यक्रमांची जुळवाजुळव चालू आहे ती गणपतीच्या स्वागतासाठी त्या गणपतीच्या मुर्तीला रुपरंग देण्याचं काम जोरात सुरु आहे. दिवस-रात्र.


रात्री दहानंतर कारखान्यातलं काम तसं थंडावलेलंच. तरी कामावरुन सुटून आलेले कामगार इथं रात्रीचं काम करीत होते. दिवसभर काम करुन थकलेले तिथंच आडवे. तिथल्याच बाजल्यावर कुणी झोपलेले. कुणी लवंडलेले. आणि गणपतीच्या मुर्ती आपापल्या जागेवर शांत. निशब्द. मारकुटया मास्तरांनी दंगेखोर पोरांना शिक्षा करुन ठेवल्यासारखे एका जागी एका पोजिशन मध्ये बसलेले, उभे, लवंडलेले.


सलूनमध्ये न्हावी आपल्याला खुर्चीवर बसवून त्याला पाहिजे तशी आपली मान तर कधी खुर्ची वळवून घेतो. तशी कारागीरा समोर फिरत्या स्टुलावर बसलेले गणपती. कॉप्रेसरची घरघर सुरु आहे आणि स्थीर नजरेनं स्टुलाची चक्ती फिरवत रंगाचा स्प्रे गणपतीच्या धोतराच्या सुरुकुत्यांवर, पोटाच्या, मानेखालच्या, हातांच्या घडीवर सरसर फिरवला जातो आहे. सराईताप्रमाने कारागीराचा हात चालत राहतो आणि गणपतीच्या शरीराचा एक एक अवयव जिवंत होत जातो.


एका कारखान्यात गेल्या विस वर्षांपासनं गणपतीचंच काम करणारा चंद्रकांत भेटला. इथं संपुर्ण मोत्यात घडवला जाणार्‍या गणपतीची जबाबदारी त्याच्याकडं होती. शरीराच्या अववयापासून अंगावरच्या दागदागीन्या पर्यंत संपुर्ण मोतीच मोती. एक एक मोती ओळीत गुंफुन गणपतीला तो त्याच्या मनातलं रुप देत होता. त्या आधी त्यानं पंधराविस फुटाचे गणपतीही हाताळले आहेत. मी विचारलं, काम करतांना गणपतीला तुमचा पाय वैगेरे लागत असेल? तो म्हणाला, लागणारंच. दर वेळेला पाया किती पडायचं आणि काम कधी करायचं? एकदाच शेवटी सगळ्यांच्या पाया पडायचं. माफ कर म्हणायचं, झालं. रंगाचं काम असलं की पंखा पण लावता येत नाही. मच्छर फोडून काढतात. त्यामुळे शेवटी घाई होतेच. तेव्हा गणपतीच्या दर्शनी भागावरच जास्त लक्ष द्यावं लागतं. मागचं कोण बघतंय?


एका कारखान्यात शिरतांना चप्पल चालेल का विचारलं तर त्यानं आपल्या पायातली चामडयाची चप्पल दाखवली. तो सेलीब्रेटीचंच कौतूक करण्यात रंगला होता. कोण कोण कलाकार कशी कशी ऑर्डर देतो त्याचं गुणगान करतांना तो क्षणाक्षणानं फुलत होता. तिथले वेगवेगळ्या स्टाईलचे गणपती त्यांच्या वैशिष्टयांसह स्पष्ट करीत होता. प्यायला पाणी मागितलं तर त्यानं बॅगपायपरच्या रिकाम्या खंब्याची बाटली पूढं केली. पाणी पिऊन मी बाटलीकडं बघून हसलो तर तो म्हणाला, रात्रंदिवस काम करायचं तर असं अधून मधून टॉनीक लागतंच आणि कामही कसदार होतं.


मातीच्या गणपतीला खूप झंजट असतं म्हणाला. आणि त्या गणपतीचा भावही जास्त. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीलाच मागणी जास्त असते. रंग गेला तर पैसे वापस म्हणाला. पण ते टेस्ट करायचं म्हणजे विसर्जनाचा दिवस उगावणार. आणि तेव्हा कलर गेला तरी त्या दिवशी एवढं दु:खाचं वातावरण असतं की पैसे परत मागायला कोण जाणार? त्याने एशिअन पेन्टचे ऑइलबॉन्ड कलर दाखवले.


गणपतीचे डोळे काढणार्‍या कारागीराला या धंद्यात विशेष मान आहे. ते काम म्हणे जिकरीचं असतं. एक जण डोळे रंगवता रंगवता तल्लीन झाला होता. डोळ्यातल्या काळ्या वर्तुळावर मारलेला एकच सफेद ठिपका गणपतीच्या जीवात प्राण ओततो. गणपतीच्या उंचीनुसार तो या ठिपक्यांची जागा बदलत होता. तो म्हणाला जर गणपती आपल्या उंचीच्या पटटयात येत असेल तर ठिपके डोळ्यांच्या बाजुला आणि जर गणपतीची उंची जास्त असेल तर हेच ठिपके खालच्या साईडला काढावे लागतात. प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे, गणपती आपल्याकडेच बघतो आहे.


आजकाल ट्रेंड कश्याचा आहे विचारलं तर म्हणाला लालबागच्या राज्यासारख्या गणपतीचा. कुणाकुणाला तो नवसाला पावलेला असतो. पावलास तर तूला घरी आणू असाही नवस असतो. त्यामुळे अलिकडच्या काळात लालबागच्या गणपतीच्या प्रतिकृतीला बरीच मागणी असते. आणखी एक तो 'माय फ्रेंड गणेशा' सिनेमा आल्यापासनं पहिल्याच वर्षी विशेषत: मुलांच्या आग्रहाखातर गणपती आणणारे त्या गणपतीची ऑर्डर करतात. साईबाबाच्या खांद्यावर बसलेला. शिवाजीच्या आवेशात उभ्या असलेल्या, बालाजीची प्रतिकृती असलेला, टिळकांच्या सोबत असलेला, शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला असे कितीतरी गणपती लोक आवर्जुन मागतात. म्हणजे एका दगडात दोनही पक्षी मारल्यासारखं होतं. उंचीवर मर्यादा आल्यापासनं लोक गणपतीच्या सुंदरपणाकडं अधिक लक्ष देतात. काही काही तर छापून आलेल्या गणपतीची पोस्टरही आणून देतात. पण त्याचा रेटही जास्त असतो. मागणी तसा पुरवठा.


वर पत्रा बाजुला पत्रा आणि परातीवर आधारलेलं मंडप. अधुनमधून पाणी आत शिरु नये म्हणून त्यावर शाकारलेली ताडपत्री किंवा मेणकापड. सगळेच कारखाने कुठंतरी बिल्डींगच्या आधारानं किंवा मैदानात. तिन-चार महिन्यासाठी चालणारा खात्रीचा तरीही कुठलीही ठोस सोय नसलेला हा व्यवसाय. एका कारखान्याचा मालक म्हणाला की, जे आज कारखाना मालकांच्या हिमतीवर चालू आहे ते ही आता संपेल असं वाटतंय. लालबाग परळ भायकळ्याच्या आजूबाजूला आता उंचचउंच इमारती उभ्या राहायला लागल्याहेत. त्याच्या आधाराने पराती, मंडप बांधणं दुरच तिथं उभं रहायलाही मिळायचं नाही. इथला मराठी माणसाचा उत्साह फक्त मिरवणूकीत नाचण्यापुरता उरला आहे. बाकी उरलेले दिवस तेच ते बुजलेपण. इथली गणेश टॉकीज बंद झाली आणि भारतमातेच्या जागेवर मॉल, मल्टीप्लेक्स कधी उभं रहातंय याची फक्त वाट पहायची. एक एक करुन पायाखालची जमीन सरकते आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल्स मध्ये गणपती विकायला ठेवण्याचे दिवस आता दुर नाहीत. हौस आहे. परंपरा आहे म्हणून करीत रहायचं एवढंच.


लालबागच्या राजा आता सेलिब्रेटींच्या दर्शनभेटीमुळे गणपतीमधला सेलिब्रेटी झाला आहे. तो गणपती तिथल्या तिथेच तयार केला जातो. त्याचं काम आजपासूनच सुरु होतं आहे. लालबागच्या राजामुळं आजुबाजुच्या इतर गणपतीचा म्हणजे मंडळांचा झगमगाट आता कमी कमी होतो आहे. त्याला इलाज नाही. जो पर्यंत इतर गणपती भक्तांना पावत नाहीत तो पर्यंत मंडळांचेही असेच हाल होणार. भक्तांच्या सोइसाठी कोंबडीगल्लीच्या परिसरात गरम खाडा इथं भलामोठा मंडप उभारला आहे. मागच्या बाजूला दिग्विजय मिलच्या मैदानात फक्त नवस फेडणार्‍यांसाठी निवारा केला आहे. योगायोगानं त्या गल्लीचं नाव चोर गल्ली असं आहे. रांगारांगातून गणपतीच्या पायापर्यंत पोचणारी जिन्याची वळणंही मजबूत आणि नयनरम्य आहेत.


या परिसरात अनेक छोटेमोटे मंडप असेही आहेत जिथं गणपती बनत नाहीत फक्त विकले जातात. चौकशी केल्यावर कळलं ते पेण वरुन आणलेले आहेत. तिथं फक्त धंदा आहे. इथ गणपतीच्या अंगावर एक बिल्ला लटकवलेला असतो. कधी कधी तो गणपतीच्या नंबरचा असतो तर कधी तो विकत घेतलेल्या मालकाचा.


फायबरच्या साच्यातून मातीचे किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गणपती बनताना, त्यावर रंग चढताना, गणपतीच्या डोळ्यात भाव उतरतांना बघणं हा एक सोहळा आहे. वेळ, मेहनत आणि कारागीराला पैसे मिळणं हा व्यवहार आहे. तो कश्यातूनही साधता येतो. पण आज पेण वरुन गणपती आणून त्याचा रस्त्यावर बाजार मांडणं हे बघायला बरं वाटत नाही. उद्या कदाचीत काळाच्या ओघात लालबाग-परळचे कारखाने उठतील. पेण वरुन रेडीमेड गणपती आणले जातील. पण त्यानंतर एक लक्षात ठेवलं पाहिजे की, 'पेण' आणि 'चिन' काही दूर नाही.

प्रवीण धोपट

99672 93550
pravindhopat@gmail.com

Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?

पूर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरिष पारकर # ऑगस्ट २०१

काल त्रेसष्ठावं सरलं म्हणून आजपासून चौसष्ठावं लागलं. घडयाळाची टिकटिक रोखता येत नाही. सरणारी वेळ थांबवता येत नाही. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष या क्रमानं काळ आपलं एक एक पाउल टाकत पुढं सरकत राहतो. आणि आपण योगायोगानं किंवा ठरवून साधलेली वेळ वर्षावर्षानं साजरी करीत राहतो. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे. हे आता सवयीनं आपल्याला माहित झालेलं आहे.

या दिवशी दरवर्षी सकाळी 'कर चले हम फिदा जान और तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या गाण्यानंच जाग येते. हक्काची सुटटी म्हणून उशीरापर्यंत ताणून द्यायचं तर हमखास झोप येत नाही आणि सकाळी झोपेच्या ऐन मोसमात स्पिकरवर 'कर चले..'. अशी दिवसाची अनवॉन्टेड सुरुवात. टिव्ही लावावी तर पुन्हा मनोज कुमार 'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती' उगाळत बोंबलत असतो. चॅनेल बदलावा तरी तेच.

सालाबाद प्रमाणे या ही वर्षी, शाळेच्या पटांगणात (अर्थात ज्यांची शिल्लक आहेत त्यांची, उरलेली वर्गातल्या वर्गात) उभे राहुन मुले झेंडयाला अभिवादन करतात. एकुणच आज तरी देशभक्तीपर आवेशात वंदे मातरंम आणि जनगणमन. शेवटी कुणीतरी... कुठुनतरी... 'भारत माता की... जय'. या दिवशी हौशी शिक्षक गांधी टोप्या घालतात. काही नेहरुंचे कपडे. शिक्षिका तिरंगी किंवा पांढर्‍या साडयात. बर्‍याच जणांच्या खिशाला टाचणीत अडकवलेला झेंडा दिसतो. नंतरही काही दिवस मुख्याध्यापकांच्या टेबलावर एकमेकांना तलवारीसारखे छेद देऊन दोन झेंडे दिसत राहतात. अशा देशप्रेमानं भारलेल्या दिवसात कुणीतरी त्यांना ते भेट म्हणून देतोच. शाळेतल्या काही हुशार मुला-मुलींची तिच ती तोंडपाठ भाषणं होतात. झाशीच्या राणीपासून टिळक, गांधी, बोस, सावरकरांपर्यंत सगळ्यांची उजळणी होते. ज्या शाळेत संगीत शिक्षक असतील तिथे कंपल्सरी एक देशभक्तीपर समुहगीत. अर्थात मुला-मुलींच्या वेगवेगळ्या तसंच उंचीनुसार रांगा लाऊन आणि संगीत शिक्षक मधोमध उभे राहुन हातवारे करीत तबला-पेटीच्या नादात-ताला-सुरात (?) गाणं सादर केलं जातं.

आज काही पालक आपल्या गाडयातून प्रवास करतांना आणि आपल्या मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मुद्दामहुन सिग्नलवर तिरंगी झेंडे विकत (ते ही भीख मागितल्यासारखं) असलेल्या मुलांकडूनच घासाघीस करुन का होईना घेतात. तेवढंच आपलं देशप्रेम आणि गरीबालाही मदत. गाडीच्या डॅशबोर्डावर गणपतीच्या शेजारी आपला काही दिवस शोभा म्हणूनही झेंडा बरा वाटतो.

सरकारी कचेर्‍यात आज गांधीजीना भिंतीवरुन खाली उतरवलं जातं. बाकीच्यांचे फोटो उपलब्धतेनुसार आजुबाजुला. काही ठिकाणी शिवाजी महाराजांनाही त्या रांगेत बसवतात (बिचार्‍या महाराजांना कल्पनाही नसेल की अश्या काही स्वातंत्र्यदिवसासाठी आपल्याला इथं बसायला लागेल) पण फोटोला इलाज नसतो. तो जिथं बसवला किंवा ठोकला जातो तिथं बसतो किंवा लटकतो. मग तो फोटो शिवाजीचा असो नाहीतर गणपतीचा.

देशातर्फे दिल्लीच्या लाल मैदानात आणि महाराष्ट्र राज्यातर्फे शिवाजी पार्क वर पोलीसांचे बँड, लेझीम पथक आपली कलाकारी सादर करतात. सराव कर-करुन आज मुख्यमंत्र्याना, राज्यपालाना, गॉगल वाल्या प्रेक्षकांना आणि टिव्हीवाल्यांना शिस्तीत चालून दाखवतात. काही दुचाकीवरुन तर काही विमानातूनही कसरती करुन आपलं प्रदर्शन मांडतात. अश्यावेळी लोककला पाहिजेच. ती असतेच. याठिकाणी कुठुन कुठुन कश्या कश्यात पहिल्या आलेल्या लोकांचे सत्कार केले जातात. प्रशस्तीपत्रकं, शाली किंवा श्रीफळं दिली जातात. ती कुणाकुणाला वाटायची यासाठी काही कमिटया, समित्या वर्षभर कार्यरत असतात.

या दिवशी चढाओढ दिसते ती बॅनरची. वेगवेगळ्या पक्षांचे नेते-उपनेते-कार्यकर्ते आपापल्या वकुबाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा देत झळकतात. आजकाल कुणी कुणाला शुभेच्छा द्यायच्या याचाही धरबंद राहिला नाही. जो तो उठतो. फ्लेक्स वाल्याला गाठतो. कटींग-पेस्टींग करतो. दोन-चार पोरांना हाताला धरुन रातोरात झळकतो. नजर जाईल तिकडे तिरंगा. डोळ्यासमोर, पायाखाली तिरंग्याचा कचराच कचरा. म्युनसीपालटी देशाच्या नावानं बोटं मोडीत डंपिंग ग्राउंडवर दुसर्‍या दिवशी शिळं झालेलं देशप्रेम जाळून टाकते.

बिल्डर सुध्दा या दिवशी वर्तमानपत्रात पान पान जाहीराती देतात. वेगवेगळया बिल्डरांच्या रंगीबेरंगी, गगनचुंबी जाहिराती बघुन आपल्यालाच आपण 'बेघर' आहोत असं वाटायला लागतो. मनातल्या मनात आपण रस्त्यावर आल्यासारखे वाटतो. चित्रातल्या गाडया, झाडं, रस्ते, तलाव, माणसं, फर्नीचर पाहिलं की वाटायला लागतं की आपण एखाद्या गुहेत वैगेरे रहात आहोत की काय. शक्य आहे ते आजच्या दिवशी बुकींग करतात बाकीचे चोळत चडफडत राहतात.


काही बाजार आजच्या दिवशीच किंवा मागे पुढे दोन-चार दिवस 'बीग' सुट देतात. त्या दिवशी आपल्याला कळत नाही. भावनेच्या भरात आपणही खर्च करतो. अमुक घेतलं तर तमूक फ्री. येवढं घेतलं की तेवढं फ्री. या फ्री फ्री च्या नादात माणूस फिरफिर फिरतो. नंतर कळतं की सुट-बीट झुट है. पण त्याला काही इलाज नसतो. सर्वसामान्य माणसालाही वाटत राहतं की, आपण काळाला धरुन असलंच पाहिजे. काळाबरोबर वहात गेलंच पाहिजे. मार्केटला- जाहिरातीना बळी पडलंच पाहिजे. आता सगळ्यांनाच दरवर्षी येणार्‍या अश्या 'सुटी'चे दिवस पाठ झाले आहेत. त्या दिसवांसाठी तरी यापुढे आपण १५ ऑगस्टची वाट पहायला पाहिजे.

भारत आपला देश आहे. हा देश शेतीप्रधान आहे. त्यामुळं इथं आत्महत्येसाठी शेतकर्‍याला प्राधान्य दिलं जातं. इथं अजुनही दारिद्रय रेषेखाली जगत राहणार्‍या माणसांचं प्रमाण ३७ टक्के आहे. इथं छोटे उद्योग धंदे जन्माला आल्यापासून एक दोन वर्षात बंद पडतात. आणि मोठया व्यावसाईकांच्या प्रगतीपुढे आकाशही ठेंगणं पडतं. जन्माला येण्याआधीच किमान शंभरातल्या दहा मुलीना मारलं जातं. कुपोषणानं अजुनही १७ टक्के मुलं मरतात. इथं प्राथमीक शाळेत गळती होणार्‍या मुलांचं प्रमाण २.७ दशलक्ष इतकं आहे. अजुनही राज्याराज्यात सिमेवरुन, पाण्यावरुन आपापसात भांडणं आहेतच. इथलं हजारो टन धान्य साठवायला गोदाम नाही म्हणून सडतं आणि इथंच भुकेपाठी गरीबाचा जीवही जातो. इथं दिड-दोन लाखाचा पगार घेणार्‍याला आणि दोन-चार हजारात काम करणार्‍यालाही एकच बाजार आहे. इथं काही गाडीवानांच्या समोर पार्कींगसाठीचा प्रश्न आहे तर काहींच्या पायात फाटक्या चपला नाहीत. इथं आपल्या मतावर निवडून आलेल्या माणसाची झटपट प्रगती कशी, का आणि कधी होते हे कळत नाही. टिव्हीवरच्या बातम्यामुळं काल काय झालं ते आठवत नाही. आता काय चाललंत ते समजत नाही आणि उद्या काय होणार आहे याचा अंदाज येत नाही. नुसता किचाट, गोंधळ.

हा लोकशाही देश आहे, हे माहीत आहे. पण लोकांचं लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय रे भाऊ? कुठले लोक, कुणाचं राज्य, कश्याचं कल्याण?

प्रवीण धोपट.
pravindhopat@gmail.com

Friday, August 6, 2010

भाजीचा बाजार

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०

रात्रीचे बारा वाजले आहेत. दोघा-तिघांचा घोळका दोन-चार ठिकाणी गप्पा छाटत. एखाद-दुसरी गाय इतस्ततः पडलेला पाला हुंगत, चरत. काही गाई त्यांची वासरं मस्त रंवंत करत रस्त्यात कुठेही कशीही निवांत बसलेली. गेटवर चहा वाल्याच्या आजुबाजुला माणसांचा गराडा. स्टोव्हच्या फरफरणार्‍या आवाजाशी स्पर्धी करीत गावगप्पांचा फड रंगलेला. पिंपातलं पाणी प्लॅस्टीकच्या मगातून घटघटा पिऊन वर चहाचा झुरका त्यावर तंबाखुचा बार. दोनचार ठि़काणी ओळीत काही हातगाडया काही सायकली काही मोटारबाईक्स एखाद-दुसारा ट्रक टेम्पो. बाकी सुनसान मैदान आणि बाजूला दुकानाचे गाळे काळोखात निपचित.

वाशीच्या सेक्टर १९ मधलं एपीएमसी मार्केटचं हे चित्र त्यानंतर रात्री क्षणाक्षणानं बदलायला लागतं. माणसं, टेम्पो, ट्रक्स, लाईटस, हॉर्न्स, गाडयांचे आवाज, पेट्रोल-डिझेलचा धूर, धावपळ, पळापळ, आरोळ्या, किचाट गोंधळानं वातावरण भरुन जातं. बघता बघता रात्र चढत गेली आणि भाजीपाला मार्केटमध्ये सकाळ कधी झाली हे कळत नाही. इथं कुणाच्या डोळ्यावर पेंग नाही की कुणी झोपलेला नाही. उत्साहाला उधाण आल्यासारखं हलतं, बोलतं, चपळ वेगवान चित्र.

रात्री साडेबारा पाऊणच्या आसपास भाजीनं भरलेला एक ट्रक गाळ्याच्या कठडयाला लागतो आणि पंधरा-वीस कामगार झटापटीनं त्यातला माल उतरवायला लागतात. ट्रकातल्या काळोखातही नेमक्या व्यापार्‍याचं किंवा त्याच्या गाळ्याचं नाव घेतलं जातं, हातात विळ्यासारखा काटा गोणीत अडकवून तिघांनी उचललेला डाग एकाच्या डोक्यावर जातो. तो वळताना त्याच गतीनं दुसरा, तिसरा, चौथा... वेगवान लयीत ट्रक केव्हा खाली झाला कळला नाही. अर्ध्या चडडया, अंगात बनीयान, खांद्यावर भगवा टॉवेल, डोक्यावर चुंबळीसाठी खोलगट गोणी आणि तोंडात चित्रविचित्र हेल. यातले बहुतेक कामगार सोलापुर बॉर्डरवरचे त्यामुळे भाषा मराठी कानडी मिश्रीत. कष्टाचं काम पण त्यातल्या गतीमुळं त्याला आनंदाची, उत्साहाची झालर लागते आणि तेच काम हलकं फुलकं होऊन जातं.

सगळेजण आपापल्या कामात गर्क. एक सफारीतला तरुण मागे हाताचा गुणाकार करुन ट्रकाच्या आजुबाजुला खालीफुकट फिरत होता, म्हणून त्याला विचारलं तर म्हणाला, 'मी डायवर हाय, मला काय माहित नसतंय.' ... काय आहे, म्हणून एक म्हातारा पुढं आला. त्यानं एका झटक्यात सांगून टाकलं. 'शेतकर्‍याचा काय संबध नसतोय इथं. शेतकरी तिथल्या हुंडेकर्‍याकडं माल देतोय. हुंडेकरी सोताच्या नाहितर भाडयाच्या गाडीनं त्या त्या नावाच्या चिटटया लिहुन माल इथल्या व्यापार्‍याकडं धाडतो आनं इथनं पुढं मुंबयचा व्यापारी, त्याच्याकडनं भय्याकडं आनि तिथंन पुढं तुमच्या घरात'. एवढं बोलून तोही सटकला. त्याला कुणीतरी मास्तर अशी हाक मारली. असे अनेक मास्तर पुढे भेटले. नासीक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर कडून आलेल्या ट्रक-टेम्पोमधुन एक कागद ड्रायव्हरकडून थेट त्या मास्तरांच्या हातात पडत होता. प्रत्येक चिठठीबरोबर दहा-वीस रुपयाची नोट चिकटलेली असायची. तिथून पुढे जो तो त्या मास्तरच्या मार्गदर्शनानुसार. एकामागून एक असे ट्रक टेंम्पोची गर्दी आता वाढत चालली. एकाला लागून एक अश्या शिस्तीत गाडया उभ्या रहात आणि त्याच शिस्तीत माल उतरवला जाई. एका ड्रायव्हरला गाईड करायला पंधरावीस आवाज. व्यापार्‍यांच्या लगतलगतच्या मोकळ्या गाळ्यातही नुसत्या नंबरावरुन नेमका माल नेमक्या गाळ्यात येऊन पडत होता. अडाणीपणातही एक शहाणपण दडलेलं असतं त्याचा एक सुंदर नमुना.

रात्री दोन-अडीचच्या सुमारास मार्केटच्या गेटमधुन चारचाकी सुंदर चकचकीत गाडया येतांना दिसतात. त्या असतात मुंबईच्या व्यापार्‍यांच्या. घामानं भिजलेल्या हमालांच्या दुनियेत, चेहर्‍यावर झोपून उठल्यानंतरची तॄप्ती,. ताज्या चेहर्‍यावर पावडरचा हलका हात, कपडयांवर सेंटचा अंधुक वास. मनगटावर घडयाळ, एखाद्याच्या हातात ब्रेसलेट किंवा बोटात अंगठी, खिशात मोबाईल घेऊन व्यापारी प्रवेश करतो. बहुसंख्य मराठीच. पण गुजरात्यांनाही या धंद्यातली गंमत कळायला लागली आहे. हमालांच्या यादीत युपी-बिहारींची नावं केव्हाच घुसली आहेतच. मैदान ते गाळ्यामधली धावपळ सुरुच राहते. पण आता लक्ष वेधून घेतो तो दुकानाचा गाळा.

संपुर्ण मैदान ट्रक-टेम्पो-हातगाडया आणि माणसांच्या लगबघीनं भरुन गेलेलं असतं. दुकानाचे गाळे आता स्वच्छ प्रकाशात उजळतात. वांगी, पडवळ, भेंडी, कारले, काकडी, कोबी, वाटाणा, दुधी, भोपळा, तोंडली, दोडका, रताळी, पालक, मेथी, कोथींबीर, मिरच्यांची पोतीच्या पोती. एकावर एक रचुन ठेवलेल्या गोण्यांच्या मधोमध भाजी विक्रीचा घाऊक धंदा सुरु होतो. मुख्य व्यापार्‍याच्या आजूबाजूला भाजी घेण्यासाठी उत्सुक चार-सहा जणांचा कोंडाळा. मुख्य विकणारा हातरुमालाच्या खाली समोरच्याच्या हाताची बोटं नेमक्या पेरात दाबून भाव पक्का करतो. भाव पटला तर टाळी कडाडते. (अंतराअंतरावर वेगवेगळ्या गाळ्यावर अश्या टाळ्या कडाडत राहतात आणि त्याचाच एक उत्सव बनुन राहतो.) सांकेतीक भाषेत व्यापारी भाव उच्चारतो, झरझर डाग (गोणी) वजन काटयावर येते. काटयावर वहीत लिहित असतो कृषी उत्पन्न बाजार समीतीचा एक माणूस. प्रत्येक वजनातला आठ टक्के हिस्सा त्याचा. शेतकर्‍याची फसवणूक होऊ नये म्हणून तो उभा.

त्या दिवशी भेंडीचा किरको़ळ बाजारातला भाव चाळीस रुपये किलो होता. तेव्हा ती भाजी इथे चौदा रुपये किलो होती. जो विकत होता त्या अडत्याचं कमिशन, त्याआधी काटेवाल्याचा पगार, समितीचं कमिशन, ट्रक-टेंपोचं भाडं, शेतापासून इथपर्यंत किमान चारवेळा मालाची चढउतार करण्यासाठी हमालांची मजूरी, ड्रायव्हर, डिझेल, मेंटेंनन्स, जाग्याचं भाडं. आणि या सगळ्याच्या खाली शेतकरी. ज्याच्या वाटयाला याच भाजीचा भाव किलोला तीन ते पाच रुपयाच्या आसपास मिळतो. ज्यासाठी तो किमान चार-सहा महिने शेतात राबतो. खतासाठी, पावसासाठी, पाण्यासाठी, विजेसाठी, कर्जासाठी कायम दुसर्‍यावर अवलंबून राहतो. शेतकर्‍यानं या सगळयासाठी हुंडेकर्‍याकडून आगाऊ घेतलेली उचल शेतातला माल उचलता क्षणीच काटली जाते. त्याच्या वाटया येणारा पैसा हा सगळ्यांच्यापेक्षा कमी. निसर्गापासून व्यापार्‍यापर्यंत आणि सरकारपासून अधिकार्‍यापर्यंत सगळ्याकडूनच शेतकर्‍याला नाडलं जाण्याची हमी आहे.

रात्रभर आपल्या खांद्याला झोळी लटकवून काही बाया काही पोरं फिरतांना दिसत होती. सुरुवातीला लक्षात येत नव्हतं, पण नंतर तेच चित्र डोळयापुढून हलेना. त्यांची लाचार लगभग बघण्यासारखी असायची. ट्रक-टेंम्पो खाली करतांना फाटलेल्या गोण्यातून काही भाजीपाला खाली पडायचा. तो उचलण्यासाठी यांची झुंबड उडायची. पण रात्रभरच्या या झटापटीत त्यांच्या झोळ्या भरुन जायच्या. इतक्या मेहनतीनंतर मिळवलेल्या या सप्तरंगी भाजीवर त्यांच्या दिवसाचा भार असायचा. ती उचललेली भाजी दिवसभर नाक्यावर विकायची. आणि पुन्हा दुसर्‍या रात्री इथंच. पु.ल.देशपांडेच्या 'ती फुलराणी' नाटकात एक वाक्य होतं की, 'आपल्यासारख्या माणसांचा उकीरडा तो कावळ्यासाठी घास असतो' त्याची आठवण झाली.

भाजी उतरता उतरता चहावाला यायचा. सगळ्या हमालाना आहे त्याच जागेवर चहा दिला जायचा. ट्रकावर वेगवेगळ्या पोजमध्ये उभे असलेले हमाल युध्दानंतरच्या विजयी विरांसारखे वाटले. चहा म्हणजे कामगारांसाठी अमृत-विसावा. चहावर तंबाखू किंवा त्याचीच सुधारीत आधुनीक आवृत्ती गुटखा आणि पुन्हा त्याच उत्साहात मर- मर. तेवढया मिळालेल्या वेळेत बाजुलाच लटकवलेल्या पिशवीत पसा दोन पसा भाजी जायची. शेजार्‍या पाजार्‍यांना फुकट वाटायला नाहितर खानावळ वालीला द्यायला. प्रत्येकाच्या डोक्यावर मागून उघडी खोल गोणी असायची. सहज हाताला लागतील त्या भाज्यानी आपसूक भराल्या जायच्या.

भाजी मार्केटच्या दक्षीण बाजूला संडास मुतार्‍यांची रांगच रांग. रात्रभर गर्दीत. तिथंच एका टोकाला विठ्ठल रखुमाइचं मंदीर. कुलूपात. विठोबाच्या अंगणात शनीचं मंदीर. उघड्यावर. शनी कोणात्याही सिझनमध्ये किमान बारापैकी एका राशीला नडतच असतो. त्याची उठबस झाली पाहिजे. विठोबाची आठवण दर एकादशीला नाहीतर आषाढी कार्तीकीला तर दर शनिवारी शनीचा टिळा लावणारे अनेक.
पुढे त्याच रांगेत चहा, वडा, मिसळच्या टपर्‍या रात्रभर भरात असतात. नदीच्या पाण्यातल्या भवर्‍यासारखा पितळेच्या पातेल्यात चहा उकळत रहातो. आधी सफेदच पण पिळून पिळून काळ्या चॉकलेटी पडलेल्या फडक्यात गुंडाळून चहा गाळला (पिळला) जातो. चहा वर चहा संपत रहातो.
दाना बाजार, कांदा बटाटा बाजार, फळ बाजार आणि हा भाजी पाला बाजार. सुधाकर नाईकांच्या काळात मुंबईच्या बाहेर नवी मुंबई वाशी इथं हलवलेला हा शेती उत्पन्न बाजार आता इथं चांगलाच रुळला आहे. कितिही महागाई असो दोन वेळच्या जेवणाच्या ताटात आपल्या हक्काची जागा राखुन ठेवणारी भाजी आपल्यापर्यंत पोचण्याआधी शेतकर्‍यापासून ते भाजी विकणार्‍या शेवटच्या भय्यापर्यंत हजारो हात खपत असतात.


प्रवीण धोपट.
99672 93550

pravindhopat@gmail.com

महाराष्ट्राच्या सीमा जळताहेत

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # ऑगास्ट -२०१०



मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला या वर्षी पन्नास वर्षे झाली. तो दिवस साजरा करुन तीन महिने उलटले नाहीत तोवर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांचा सिमावाद उफाळून आला. जो वाद गेली पन्नास वर्षे चालूच आहे. पुढेही चालू राहील, कारण महाराष्ट्राचे बेळगाववरचे आणि बेळगावकरांचे महाराष्ट्रावरचे प्रेम कमी व्हायला तयार नाही. खरंतर कर्नाटक राज्याच्या बाजुने हा वाद संपला आहे कारण बेळगाव आणि सिमेवरची गावं कर्नाटकातच राहतील असा निर्णय केंद्राने दिला आहे. कॉग्रेसला हा प्रश्न मिटवण्यात कधीच रस नव्हता. भाजपच्या मनात काय आहे हे कळायला मार्ग नाही. कारण कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आहेत. आणि ते मराठी आहेत. तरीही हा प्रश्न मिटावा असे भाजपलाही वाटत नाही. शिवसेना निवडणूका आल्या की गरजेपुरता हा प्रश्न गरम करुन पुरवते आहे.

महाराष्ट्राचं केंद्रातलं सर्वपक्षीय खासदारांचं बळ लक्षात घेता हा प्रश्न आजही धसास लावता आला असता पण त्यात बिचार्‍या बेळगावच्या मराठी जनतेपलिकडे कुणालाही या प्रश्न सोडवावा असे सध्या तरी वाटत नाही. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी असे चार मुख्यमंत्री केंद्रात आहेत. पण या निर्णयानं कुणाच्याही अस्मितेला तडा गेलेला नाही. राजीनामा वैगेरे दुरच साधी प्रतिक्रीयाही कुणी दिली नाही. शरद पवारानी या प्रश्नाची उडवलेली खिल्ली सर्व टिव्ही धारकांनी पाहिली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या अर्ध्या कच्या मराठी (महाराष्ट्रासाठी) इंग्लीशमधे (दिल्ली(मॅडम)साठी) चष्म्याआडून आपली मते मांडली. 'वर्क इन प्रोग्रेस' या धर्तीवर त्यांचे उपाय चालू आहेत. केंद्राकडून हा निकाल जाहीर झाला त्या दिवशी आणि काही दिवस नंतरही त्याचे पडसाद कोल्हापुरात (कदाचित शेजारधर्म म्हणून) उमटत राहिले. बाकी महाराष्ट्र तसा थंडच होता. वर्तमानपत्रांच्या बातमीपलिकडे त्या प्रश्नाला मुंबईत आणि उर्वरीत महाराष्ट्रात जागा नव्हती. जाळणे, तोडणे, फोडणे, मोडणे, फासणे, फेकणे, मारणे हे शिवसेना पुरस्कृत सगळे सोपस्कार झाल्यावरही प्रश्न आहे तिथंच आहे. त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी दोनचार टिव्ही बाइटच्या पलिकडे कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेला बेळगावच्या मराठी माणसानी त्यांची जागा दाखवली आहे. आता मनसेच्या भीतीने शिवसेनाही या बेळगाव सिमावादाच्या प्रश्नातून काढता पाय घेईल असे वाटते. वाट बघण्याशिवाय आता कुणालाच पर्याय नाही.

कर्नाटकचा धुरळा बसतो न बसतो तोच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधार्‍यावरुन घेतलेला पवित्रा हा सुध्दा महाराष्ट्राच्या सिमावादाची नवीन नांदीच म्हणावी लागेल. चंद्राबाबूनी केवळ पोटनिवडणूकीसाठी केलेली स्टंटबाजी आहे असे म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर उद्या हा वाद आणखी पेटल्याशिवाय राहणार नाही. चंद्राबाबू नायडूं बरोबर ५० आमदार, २ खासदार आणि २३ कार्यकर्त्यांना अटक झाली होती. आपल्या किती आमदारानी कुठल्या प्रश्नासाठी अशी एकत्रीत अटक करुन घेतल्याची आठवतेय? नांदेड जिल्ह्यात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र सिमेवर असलेल्या धर्माबाद तालूक्यात गोदावरी नदीवर जो बाभळी बंधारा बांधाण्यात येणार आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशातील पोचमपाड धरणातील एकूण क्षमतेच्या फक्त अर्धा टक्काच पाणी अडणार आहे. हे वास्तव माहिती असूनही चंद्राबाबूनी सर्वशक्तीनीशी हा प्रश्न पणाला लावला आहे. आणि त्याची सुनावनी सर्वोच्च न्यायालयात १६ ऑगस्ट २०१० ला होणार आहे. प्रश्न मानला तर समजूतीनेही सुटू शकतो पण तो संबधीताना सोडवायचा असला तर... कर्नाटकाचाही प्रश्न सोपाच वाटला होता.

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश सिमावादाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतर काही सिमांचाही विचार करुया. जो कदाचीत महाराष्ट्रासाठी भविष्यातली डोकेदुखी ठरणार आहे. गेल्याच आठवडयात सिमांन्तच्या (मुंबईतल्या पत्रकारांचा गट, ज्याच्यावतीने महाराष्ट्राच्या सिमेवर वसलेल्या तालूक्यांच्या आर्थीक-सामाजीक- शैक्षणीक आणि राजकीय परस्थीतीचा अभ्यास केला जातो) निमित्ताने जळगाव जिल्यातल्या चोपडा तालूक्याला जाणे झाले. चोपडा तालूका मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर आहे. ही बॉर्डर म्हणजे वणेर नदी. मुख्यथा आदिवासी वस्ती असलेला वणेर नदीचा परिसर जंगलानी व्यापलेला आहे. खरतंर आता होता असे म्हणायला हवे. कारण गेल्या चार-सहा वर्षात इथे भरमसाठ जंगलतोड झाली आहे. सरकारी नोकरदार म्हणतात याला केंद्रीय वन संरक्षक कायदा २००६ जबाबदार आहे. जंगलतोडी संबधी कलेक्टर म्हणतात या जमिनींवर आमचा अधिकार नाही. या जमिनींचे सात-बाराचे उतारे देण्याचा अधिकार आमच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे कलेक्टर म्हणजे महसूल विभाग मोकळा. फॉरेस्ट खाते म्हणते आम्ही काही करु शकत नाही. लोक रात्रीची झाडं तोडतात. आमच्या हातात बंदुका आहेत पण त्या चालवण्याचं स्वातंत्र्य नाही. जंगल तोडणार्‍याना कायद्याचं छुपं संरक्षण आहे. आणि परिसरातले लोक म्हणतात फॉरेस्ट खात्यात भ्रस्टाचार आहे. तेच जंगलतोडीला प्रोस्ताहन देतात आणि पैसे खातात. राजकीय अनास्था इथेही आहे. या तालूक्यातून तिन आमदार आहेत. त्यातलेच एक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अरुण गुजराथी. त्याच्या रसाळ वाणीतून स्त्रवणार्‍या मधाळ कविता आपण ऐकल्याच असतील.

महाराष्ट्राच्या जंगलांची कत्तल करुन ८३ हजार हेक्टर जमीन सपाट झाली आहे. जंगलतोडीचं दु:ख आहेच पण त्याहीपलिकडचं वास्तव म्हणजे त्या सपाट झालेल्या जमिनीवरची मालकी मध्यप्रदेशच्या आदिवासी शेतकर्‍यांची आहे. जमीन महाराष्ट्राची आणि शेती मध्यप्रदेशची ही स्थिती म्हणजे अगामी सिमावादाची चाहुल आहे.


गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर जिथं सुरु होते त्या सुरगणा तालूक्याची सिमारेषा अगदी न आखताही स्पष्ट दिसते. जिथून गुजरात बॉर्डर सुरु होते तिथून हिरवळही सुरु होते. आणि उलटया दिशेला रखरखाट. इथुन महाराष्ट्र सुरु होतो हे ओळखता येते. या दोन्हीच्या सिमारेषांवर चेकपोस्ट आहेत. एक गुजरातचा जो गुजरातच्या हद्दीत आहे आणि एक महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. काही मिटर अंतरावर असलेल्या ह्या दोनही चेकपोस्टवर महाराष्ट्राचे जे उत्पन्न आहे त्याच्या शंभर पट गुजरातचे उत्पन्न आहे.

महाराष्ट्राच्या एकूण ३६ जिल्यातल्या ३५६ तालूक्यांपैकी २० तालूके दुसर्‍या राज्याना मिळतात. ज्यांच्या सिमारेषा अगदीच पुसट आहेत. अर्थातच अशा बॉर्डरवर भींती घालणे हा उपाय होऊ शकत नाही. पण तरिही इथे त्यांचे आपापसात रोजच्या भेटीगाठीतून काही प्रश्न तयार होतात. त्या प्रश्नाना काही नाजूक वळणं असतात. ती समजून घेऊन वेळीच सोडवली गेली नाहीत तर पुढे त्याचे स्वरुप भयंकर होऊ शकते.

इथं बॉर्डरवर राहणार्‍या लोकांच्या मनातून राज्यांच्या सिमारेषांची गणीतं पुसून गेलेली असतात. त्यांचे आपापसात रोटी-बेटीचे, सलोख्याचे, प्रमाचे संबध असतात. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या मुलीचे बाळंतपण तिच्या माहेरात म्हणजे परराज्यात होते आणि मग जन्माला आलेल्या मुलाची गिनती कुठे करायची हा पेच कलेक्टरला पडतो. कुणी महाराष्ट्राचा असून इतर राज्यात नोंदवला जातो तर कुणाची स्थीती ना घर का न घाट का अशी. काही बिलंदरांची नावे दोन्ही राज्यात. दोन दोन रेशन कार्ड आणि दोन दोन मतदार ओळखपत्र. भाषा हा प्रश्न नसतो. पण तो प्रश्न मानला तर त्याचंही शेवटी राजकारण होतंच. बॉर्डरवर राहणारा दोन्हीकडच्या भाषा लिलया बोलतो. सहज वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून इथं राहणार्‍या लोकांचे रोजचे प्रश्न जरी सुटले, तरी कदाचित तेच उद्याचे वाद ठरु शकतात.


प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

Monday, July 19, 2010

करवटे बदलते रहे....

पूर्वप्रसिध्दी : महानगर (संपादक- वृंदा  शरद बाळ) : जुलै-२०१०

रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र. निसर्गाचं चक्र वर्षानुवर्षे असंच चालू आहे. त्यात आपण आपला क्रम आखलेला असतो. प्रत्येकाला निसर्गानं दिलेली वेळ सारखीच. त्यात ज्यानं-त्यानं आपापली वेळ साधायची. कधी कुणाला हा दिवसाचा वेळ पुरत नाही तर कधी कुणाला तोच दिवस जाता जात नाहीत. दिवस सरतो पण रात्र छळत रहाते.

शेता-शिवारात राबणार्‍या, दिवसभर मान मोडून काम करणार्‍याला गाढ झोप लागते. तर काहिना झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मनगटाच्या घडीवर डोकं ठेऊन आणि शरीराची पुरचुंडी करुन झोपणार्‍याला पेकाटात लाथ पडल्याशिवाय जाग येत नाही आणि गुबगुबीत गालीछावर लोळत पडलेल्यांच्या डोळ्याला झोप शिवत नाही. कुणाच्या झोपेचा ताबा गोड स्वप्नांनी घेतलेला असतो. तर कुणाच्या झोपेला चिंता कुरतडत असते. दिवसरात्रीचा हा खेळ कुणाच्या वाटयाला कसा येईल हे सांगता येत नाही.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे. पावसाची रिपरिप. बाजूलाच बसस्टॉपच्या आडोशाला मी उभा.भरदाव वेगात जाणार्‍या गाडयांचे टायर्स रस्त्यावरच्या पाण्यात सुंदर नक्षी उठवतात. ती ही क्षणभरच. पुन्हा एकजीव पाणी. पुन्हा एकादी नवीन नक्षी. झरझर बदलणारे हे रस्त्यावरचे नक्षीकाम आपल्याला गुंतवून ठेवतं. त्यात वरुन मिसळणारा दिव्यांचा उजेड त्या नक्षित आणखीनच रंग भरीत रहातो. गाडयांच्या वेगाबरोबर वाढत आणि विरळ होत जाणारा आवाज. टायर्सच्या आवाजाची चरचर. पेट्रोलच्या धुरात मिसळणारा प्रकाश आणि पावसाच्या रेघा खिळवून ठेवतात.... आणि तिथं सिटखाली झोपलेला एकजण आपली कुस बदलतो. आपले हातपाय आपल्या अंगाशी आक्रसुन पुन्हा झोपेच्या कुशीत. जन्मापुर्वी आईच्या पोटात बाळ असतं तसं.

रात्री दिड वाजता हवा खायला म्हणून हायवेलगतच्याच झोपडपटटीतून आलेलं एक तरुण जोडपं. त्यातला तो म्हणाला आम्ही इथं नेहमीच येतो. त्याची बायको गर्भार होती. मला त्या झोपलेल्याचं कुतुहल होतं. मी त्याला विचारलं तर हा म्हणाला की तो गेली सहा-सात वर्षे इथंच झोपतो. युपी वरुन आलेला आहे. प्लास्टीक मोल्डींगच्या कारखान्यात दिवसभर काम करतो. घरदार नाही. खाणं पिणं इथं तिथंच. आंघोळ कारखान्यातल्या नळाखाली. कपडे साधेसुधे दोनचार. आणि झोपायला इथं बसस्टॉपवर. हा म्हणाला. आता चांगलीच सोय झाली आहे. पुर्वी साधे उघडे बसस्टॉप होते. तेव्हा याचं कठीण व्हायचं. मग कुठंतरी दुकानाच्या वळचणीला. पण आता किमान पाट टेकता येते. तो उठायची वाट बघत होतो. पण उठला नाही. ते ही दोघं निघुन गेले. मी ही.

पुढ चेकनाक्यावर. ओळीत पंधरा विस रिक्षा. काही काही रिक्षामधून मागच्या सिटमधून बाहेर आलेले पाय. जवळ जाऊन बघीतलं तर आत शरीराची मुटकुळी करुन झोपलेले रिक्षावाले. कुणी जाडजुड मागची सिट बसायच्या सिटच्या वर मागून आडवी टाकतो आणि तिच्या उतारावर उताणी झोपतो. त्यातलेच काही जागे. घोळक्याचे चार-सहा. नाक्यावर, अण्णाकडची चहा पिता पिता मी विचारतो, सोये नही? नही, मच्छर काटती है. जब ऐसी नींद आयेगी की काटनेवाली मच्छर भी याद न आये तब जा के सोयेंगे. तब तक चलता है.

तिथंच दोनचार रिक्षा. गिर्‍हाइकाची वाट बघत. कुणी येणारा जाणारा दिसला की कशीही आडवीतिडवी रिक्षा चालवीत त्याच्या समोर. किधर? गिर्‍हाईक असेल तर निघायचं नाहितर पुन्हा आपल्या घोळक्यात. विचारलं नाईट करते हो? तर हां म्हणाला. पर, आज कल कोई मजा नही है. कोई फॅमीली है तो आती है. बाकी साले सब बेवडे. दो चार रहते है. जबरदस्ती घुस जाते है. ना बोलने पर भी सुनते नही. और भाडा देने के टाईम गालीया देते है. रात का टाईम कौन क्या करे. जादा बोलूं तो मारते भी है. क्या करे? ...धंदा है.

दुसरी बात आज कल ये कॉल सेंटर का धंदा बहुत जोर मे है. उनके लिये रात और दिन एक जैसा. रातभर उनकी गाडीया घुमती है. सबको मालूम है. बस के भाडे मे वो छोडते है. कौन जाएगा रिक्षे से. जहां रिक्षा का भाडा सौ होगा वहा ये लोग दस रुपये मे छोडते है. आजकल रात का धंदा करना बहुत कठीन हो गया है. एखाद-दुसरा भाडा मिल गया तो मिल गया नही तो जय सिया राम.

कभी कभी कोई जंटलमन आता है. हात मे बक्सा. दुर का भाडा. मन मे डेढ-दो सौ की गिनती करते करते उसका ठिकाना आता है. लेफ्ट मे खडी करके दो मिनट मे आता हुं करके चला जाता है. और वापिस नही आता. बक्सा खोलके देखे तो खाली. मन मे ही उसको दो चार गाली दे के रातभर जागते रहने का. उस रात निंद आती नही. और दुसरा भी दिन खराब हो जाता है.

हायवे वर ब्रीज होऊन ट्रॅफीकचा प्रश्न किती सुटला माहीत नाही. पण त्या पुलाखाली काही गरीबांची, भिकार्‍यांची झोपायची मात्र मस्त सोय झाली. इथं झोपणार्‍यासोबत त्याची बायको, दोन चार पोरं टोरं आणि इतरही सगेसोयरे. आजुबाजुला विखुरलेलं सामानसुमान. पुलाखाली एकदम सुरक्षीत. एकमेकांवर तंगडया टाकून, अंगावरचे अस्ताव्यस्त कपडे, आणि बिनधास्त झोप. ताणून दिल्याचा आनंद आणि बेफिकीरी. अधुनमधुन उठणार्‍या खाजेला शांत करीत त्यांची रात्र 'करवटे' बदलत निघुन जाते. पहाटे पहाटे छोटया मोठ्या धंद्याना सुरुवात.

रिक्षा-टॅक्सीवाले, भिकारी, चहा-सिगरेटवाले यांच्या सोबतीने मुंबईतली रात्र पेंगत रहाते. काहींची रात्र छपरांच्या आडोशा- आडोशाने सरत असताना. याच मुंबईत काहींची रात्र मूउशार गादया गिरदयात लोळत असते. एसी बेडरुम, त्यात ऐसपैस आकर्षक बेडस, दिलखेचक रंग-संगती, चकचकीत आरसे, मंदसा उजेड आणि गुलाबी स्वप्न पहात रात्रही रंगीबेरंगी होत असतांना. दुसर्‍या दिवसाची वाट पहात जागणारी, पेंगणारी, काम करणारी मिळेल तिथं डुलक्या काढणारी, विश्वासानं कुठेही मान टाकणारी माणसं मुंबईच्या कुशीत आपापले दिवस रात्रीच्या भयाण वास्तवाच्या आधाराने ढकलत असतात.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com