Tuesday, August 17, 2010

पार्वतीचं बाळ जन्माला येत आहे

पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०

इतस्ततः पडलेले शरीराचे तुकडे. कुणाचे हात तुटलेले. कुणाचे पाय. कुणाचं पोट फाटलेलं. तर कुणाचं डोकं फुटलेलं. रक्त साकळावं तसे रंगाचे डबे विखरुन पडलेले. सुकलेले डाग. शरीरातल्या धमन्या आणि शिरा लोंबकाळव्यात तसा तुटलेल्या हाता पायातून काथ्याचा गुंता. डोळ्याच्या खोबणीत फक्त पांढरी बुब्बुळं. उघडीबंब शरीरं. स्टोव्ह, एक्सॉ ब्लेड्स, चाकू अशी आजुबाजुला पडलेली हत्यारं आणि तिथल्या माणसांच्या अंगाखांद्यावर पिठाच्या चक्कीत धान्य पिसणार्‍या भय्याच्या अंगावर साचते तशी पांढरी पावडर. जमिनीवर, भिंतींवर, कपडयांवर रंगाचे डागच डाग.



हे चित्र आहे कारखान्यातलं. जिथं गणपती आकार घेतो आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातल्या हे सगळ्याच कारखान्यातलं प्रातिनिधीक चित्र. गणपती घरात किंवा मंडपात यायला आता पंचवीस दिवस उरले आहेत. मंडळांच्या वर्गणीचे जत्थे पिवळी पावतीपुस्तकं घेऊन घराघराच्या उंबर्‍यांवर, जाहिरात दारांच्या गारेगार ऑफीसेसमध्ये फिरु लागले आहेत. मंडप, चलचित्र, लाइटींग, मनोरंजनाच्या कार्यक्रमांची जुळवाजुळव चालू आहे ती गणपतीच्या स्वागतासाठी त्या गणपतीच्या मुर्तीला रुपरंग देण्याचं काम जोरात सुरु आहे. दिवस-रात्र.


रात्री दहानंतर कारखान्यातलं काम तसं थंडावलेलंच. तरी कामावरुन सुटून आलेले कामगार इथं रात्रीचं काम करीत होते. दिवसभर काम करुन थकलेले तिथंच आडवे. तिथल्याच बाजल्यावर कुणी झोपलेले. कुणी लवंडलेले. आणि गणपतीच्या मुर्ती आपापल्या जागेवर शांत. निशब्द. मारकुटया मास्तरांनी दंगेखोर पोरांना शिक्षा करुन ठेवल्यासारखे एका जागी एका पोजिशन मध्ये बसलेले, उभे, लवंडलेले.


सलूनमध्ये न्हावी आपल्याला खुर्चीवर बसवून त्याला पाहिजे तशी आपली मान तर कधी खुर्ची वळवून घेतो. तशी कारागीरा समोर फिरत्या स्टुलावर बसलेले गणपती. कॉप्रेसरची घरघर सुरु आहे आणि स्थीर नजरेनं स्टुलाची चक्ती फिरवत रंगाचा स्प्रे गणपतीच्या धोतराच्या सुरुकुत्यांवर, पोटाच्या, मानेखालच्या, हातांच्या घडीवर सरसर फिरवला जातो आहे. सराईताप्रमाने कारागीराचा हात चालत राहतो आणि गणपतीच्या शरीराचा एक एक अवयव जिवंत होत जातो.


एका कारखान्यात गेल्या विस वर्षांपासनं गणपतीचंच काम करणारा चंद्रकांत भेटला. इथं संपुर्ण मोत्यात घडवला जाणार्‍या गणपतीची जबाबदारी त्याच्याकडं होती. शरीराच्या अववयापासून अंगावरच्या दागदागीन्या पर्यंत संपुर्ण मोतीच मोती. एक एक मोती ओळीत गुंफुन गणपतीला तो त्याच्या मनातलं रुप देत होता. त्या आधी त्यानं पंधराविस फुटाचे गणपतीही हाताळले आहेत. मी विचारलं, काम करतांना गणपतीला तुमचा पाय वैगेरे लागत असेल? तो म्हणाला, लागणारंच. दर वेळेला पाया किती पडायचं आणि काम कधी करायचं? एकदाच शेवटी सगळ्यांच्या पाया पडायचं. माफ कर म्हणायचं, झालं. रंगाचं काम असलं की पंखा पण लावता येत नाही. मच्छर फोडून काढतात. त्यामुळे शेवटी घाई होतेच. तेव्हा गणपतीच्या दर्शनी भागावरच जास्त लक्ष द्यावं लागतं. मागचं कोण बघतंय?


एका कारखान्यात शिरतांना चप्पल चालेल का विचारलं तर त्यानं आपल्या पायातली चामडयाची चप्पल दाखवली. तो सेलीब्रेटीचंच कौतूक करण्यात रंगला होता. कोण कोण कलाकार कशी कशी ऑर्डर देतो त्याचं गुणगान करतांना तो क्षणाक्षणानं फुलत होता. तिथले वेगवेगळ्या स्टाईलचे गणपती त्यांच्या वैशिष्टयांसह स्पष्ट करीत होता. प्यायला पाणी मागितलं तर त्यानं बॅगपायपरच्या रिकाम्या खंब्याची बाटली पूढं केली. पाणी पिऊन मी बाटलीकडं बघून हसलो तर तो म्हणाला, रात्रंदिवस काम करायचं तर असं अधून मधून टॉनीक लागतंच आणि कामही कसदार होतं.


मातीच्या गणपतीला खूप झंजट असतं म्हणाला. आणि त्या गणपतीचा भावही जास्त. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीलाच मागणी जास्त असते. रंग गेला तर पैसे वापस म्हणाला. पण ते टेस्ट करायचं म्हणजे विसर्जनाचा दिवस उगावणार. आणि तेव्हा कलर गेला तरी त्या दिवशी एवढं दु:खाचं वातावरण असतं की पैसे परत मागायला कोण जाणार? त्याने एशिअन पेन्टचे ऑइलबॉन्ड कलर दाखवले.


गणपतीचे डोळे काढणार्‍या कारागीराला या धंद्यात विशेष मान आहे. ते काम म्हणे जिकरीचं असतं. एक जण डोळे रंगवता रंगवता तल्लीन झाला होता. डोळ्यातल्या काळ्या वर्तुळावर मारलेला एकच सफेद ठिपका गणपतीच्या जीवात प्राण ओततो. गणपतीच्या उंचीनुसार तो या ठिपक्यांची जागा बदलत होता. तो म्हणाला जर गणपती आपल्या उंचीच्या पटटयात येत असेल तर ठिपके डोळ्यांच्या बाजुला आणि जर गणपतीची उंची जास्त असेल तर हेच ठिपके खालच्या साईडला काढावे लागतात. प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे, गणपती आपल्याकडेच बघतो आहे.


आजकाल ट्रेंड कश्याचा आहे विचारलं तर म्हणाला लालबागच्या राज्यासारख्या गणपतीचा. कुणाकुणाला तो नवसाला पावलेला असतो. पावलास तर तूला घरी आणू असाही नवस असतो. त्यामुळे अलिकडच्या काळात लालबागच्या गणपतीच्या प्रतिकृतीला बरीच मागणी असते. आणखी एक तो 'माय फ्रेंड गणेशा' सिनेमा आल्यापासनं पहिल्याच वर्षी विशेषत: मुलांच्या आग्रहाखातर गणपती आणणारे त्या गणपतीची ऑर्डर करतात. साईबाबाच्या खांद्यावर बसलेला. शिवाजीच्या आवेशात उभ्या असलेल्या, बालाजीची प्रतिकृती असलेला, टिळकांच्या सोबत असलेला, शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला असे कितीतरी गणपती लोक आवर्जुन मागतात. म्हणजे एका दगडात दोनही पक्षी मारल्यासारखं होतं. उंचीवर मर्यादा आल्यापासनं लोक गणपतीच्या सुंदरपणाकडं अधिक लक्ष देतात. काही काही तर छापून आलेल्या गणपतीची पोस्टरही आणून देतात. पण त्याचा रेटही जास्त असतो. मागणी तसा पुरवठा.


वर पत्रा बाजुला पत्रा आणि परातीवर आधारलेलं मंडप. अधुनमधून पाणी आत शिरु नये म्हणून त्यावर शाकारलेली ताडपत्री किंवा मेणकापड. सगळेच कारखाने कुठंतरी बिल्डींगच्या आधारानं किंवा मैदानात. तिन-चार महिन्यासाठी चालणारा खात्रीचा तरीही कुठलीही ठोस सोय नसलेला हा व्यवसाय. एका कारखान्याचा मालक म्हणाला की, जे आज कारखाना मालकांच्या हिमतीवर चालू आहे ते ही आता संपेल असं वाटतंय. लालबाग परळ भायकळ्याच्या आजूबाजूला आता उंचचउंच इमारती उभ्या राहायला लागल्याहेत. त्याच्या आधाराने पराती, मंडप बांधणं दुरच तिथं उभं रहायलाही मिळायचं नाही. इथला मराठी माणसाचा उत्साह फक्त मिरवणूकीत नाचण्यापुरता उरला आहे. बाकी उरलेले दिवस तेच ते बुजलेपण. इथली गणेश टॉकीज बंद झाली आणि भारतमातेच्या जागेवर मॉल, मल्टीप्लेक्स कधी उभं रहातंय याची फक्त वाट पहायची. एक एक करुन पायाखालची जमीन सरकते आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल्स मध्ये गणपती विकायला ठेवण्याचे दिवस आता दुर नाहीत. हौस आहे. परंपरा आहे म्हणून करीत रहायचं एवढंच.


लालबागच्या राजा आता सेलिब्रेटींच्या दर्शनभेटीमुळे गणपतीमधला सेलिब्रेटी झाला आहे. तो गणपती तिथल्या तिथेच तयार केला जातो. त्याचं काम आजपासूनच सुरु होतं आहे. लालबागच्या राजामुळं आजुबाजुच्या इतर गणपतीचा म्हणजे मंडळांचा झगमगाट आता कमी कमी होतो आहे. त्याला इलाज नाही. जो पर्यंत इतर गणपती भक्तांना पावत नाहीत तो पर्यंत मंडळांचेही असेच हाल होणार. भक्तांच्या सोइसाठी कोंबडीगल्लीच्या परिसरात गरम खाडा इथं भलामोठा मंडप उभारला आहे. मागच्या बाजूला दिग्विजय मिलच्या मैदानात फक्त नवस फेडणार्‍यांसाठी निवारा केला आहे. योगायोगानं त्या गल्लीचं नाव चोर गल्ली असं आहे. रांगारांगातून गणपतीच्या पायापर्यंत पोचणारी जिन्याची वळणंही मजबूत आणि नयनरम्य आहेत.


या परिसरात अनेक छोटेमोटे मंडप असेही आहेत जिथं गणपती बनत नाहीत फक्त विकले जातात. चौकशी केल्यावर कळलं ते पेण वरुन आणलेले आहेत. तिथं फक्त धंदा आहे. इथ गणपतीच्या अंगावर एक बिल्ला लटकवलेला असतो. कधी कधी तो गणपतीच्या नंबरचा असतो तर कधी तो विकत घेतलेल्या मालकाचा.


फायबरच्या साच्यातून मातीचे किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गणपती बनताना, त्यावर रंग चढताना, गणपतीच्या डोळ्यात भाव उतरतांना बघणं हा एक सोहळा आहे. वेळ, मेहनत आणि कारागीराला पैसे मिळणं हा व्यवहार आहे. तो कश्यातूनही साधता येतो. पण आज पेण वरुन गणपती आणून त्याचा रस्त्यावर बाजार मांडणं हे बघायला बरं वाटत नाही. उद्या कदाचीत काळाच्या ओघात लालबाग-परळचे कारखाने उठतील. पेण वरुन रेडीमेड गणपती आणले जातील. पण त्यानंतर एक लक्षात ठेवलं पाहिजे की, 'पेण' आणि 'चिन' काही दूर नाही.

प्रवीण धोपट

99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: