Tuesday, May 25, 2010

केईएम : रात्रीची एन्ट्री आणि एक्झिट

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१०




मुंबईचा सगळा इतिहास पुसुन उद्या जागोजागी मॉल्स उभे राहिले तरी चालतील. पण केइएमच्या जागी दुसरं काही उभं राहता कामा नये. मुंबईच्या चकचकीत रस्त्यांवर अलिशान गाडया फिरुदे, काचांचे टॉवर्सही उभे राहुदे, जगभरातले ब्रॅन्डस मुंबईकराच्या अंगाखांद्यावर खेळूदे. पण केईएमचं साधेपण तसंच राहुदे. कारण मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही गरीब माणसाला त्याच्या आजारपणात मायेनं जवळ घेणार एकमेव ठिकाण म्हणजे केईएम हॉस्पिटल. गेलं पाउण शतक या वास्तुनं गरीबाला आपलंसं केलं आहे, त्याला कुणाची दुष्ट लागू नये.



जवळजवळ साडेपाचशे निवासी डॉक्टर्स असलेलं अठराशे खाटांचं हे हॉस्पिटल दरवर्षी साधारणतः लाखभर रुग्णाना प्रत्यक्ष दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार करीत असतं. आणि साध्यासुध्या आजारपणासाठी नुसत्या वरवरच्या तपासण्या, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेऊन जाणार्‍यांची संख्या तर दहा लाखांच्यावर आहे. लांबरुंद पसरलेल्या या दगडी वास्तूला तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिची एक ओळख आहे. आरोग्य या अत्यावश्यक आणि कमर्शीअल बनत चाललेल्या सेवेच्या दुनियेत केईएमचा साधेपणाच ग्रेट वाटतो.



आजारी माणूस सहसा एकटा कधीच हॉस्पिटल मध्ये दाखल होत नसतो. त्याच्यासोबत किमान चार-सहा माणसं तिथं हजेरी लावतातच लावतात. म्हणजे केइएम हॉस्पिटलनं कितीतरी माणसांचा जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवास पाहिला असेल. त्या प्रवासातील असंख्य अडथळयांचे डोंगर पाहिले असतील. आजारातून निर्माण होणार्‍या यातना, दु:ख, भोग अनुभवले असतील. केईएम ही निर्जीव वास्तू आहे म्हणून ठीक अन्यतः त्या वास्तूला जर माणसासारख्या भाव-भावना असत्या तर ती वास्तू कधीच कोलमडून गेली असती. माणसाच्या दु:खाचं महाभारत केईएमनं पचवलं आहे. यापुढेही हा सिलसिला असाच चालत राहणार. रहायला पाहिजे.



दिवसभराचा उकाडा संपून उघडया रस्त्यावर जराशी हवा खेळते आहे. रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत. केईम समोरच्या सिग्नलचे सगळे दिवे बंद होऊन आता फक्त ऑरेंज रंगाच्या दिव्याची उघडझाप होते आहे. हॉस्पिटलच्या आणि काळोखाच्या पार्श्वभुमीवर ऑरेंज रंग किती भयानक दिसू शकतो. याची कल्पना इथे होते.



केईएमच्या गेट क्रमांक दोननं आत गेल्यावर तिथं एक मोकळी लॉबी आहे. उजव्या बाजूला दिवसरात्र चालणारं केमिस्टचं दुकान. तिथुनच दहा पावलावर ओपिडी. तीही रात्रभर चालू. बाहेरुन आलेला पेशंट तिथं दाखल केला जातो. रात्री अकरानंतरही अधूनमधून कुणी ना कुणी तिथं येतच होतं. आलेल्या प्रत्येक पेशंटला सावरण्यासाठी आठ-दहा माणसं असतात. पण पेशंट बरोबर आत फक्त एकच रहा असं सांगायला सिक्युरिटी,डॉक्टर, काहीवेळेला पोलिसही येतात. हेच सांगणारी दारावर पाटी आहे. पण तिचा काही उपयोग नसतो. यात सगळ्यांचीच दहाएक मिनिटं मोडतात. पण याला इलाज नसतो. शेवटी पेशंटसोबत उरतो तोच त्याच्या जवळचा. बाकीचे सगळे आप्तेष्ठ, सगे सोयरे आणि मित्रपरिवार. जे बाहेर आसपास रेंगाळत राहतात.



त्याच लॉबीत डाव्या बाजूला संयोग गणेश नावाचा गणपती आहे. काहीना विषेशतः पेशंट सोबत येणार्‍या कार्यकर्त्यांना त्याची माहीती असते. ते त्याच्या पुढयात येतात. पायातल्या पायात चपला-बुट सरकवतात. खडेखडे पाया पडतात आणि निघुन जातात. मग त्याचं बघुन कुणी त्याच्यानंतरही तेच करतात. हे थोडावेळ चालतं. मग पुन्हा शांतता.



याच चौकोनी परिसरात रात्री माणसं मारुन टाकल्यासारखी इतस्ततः पडलेली असतात. पिशवीचा- चपलेचा आधार उशाला घेऊन. ते ही न मिळाल्यास हाताच्या मनगटावर डोकं ठेऊन रात्रभर पडून राहतात. मिळालाच तर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन तिथंच पसरतात. काही माणसं जागीच असतात. अधुनमधुन एखादी डुलकी. अन्यतः टकटक इकडंतिकडं भांबावल्यासारखी बघत. एखाद दुसरा एकमेकांशी बोलत, गप्पा मारत असतात.



तासा दोन तासानी पंधरा-वीस जणांचा घोळका निशब्द चेहर्‍यांने ओळीत बाहेर पडतांना दिसतो. ही खुण माणूस गेल्याची असते. काहीच्या डोळयात पाणी तरारलेलं असतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर असतो. जन्ममृत्युमधला खेळ कुणीतरी कुणालातरी सांगत-समजावत असतो. सगळं संपल्यानंतरची हतबलता किंवा सुटल्याचे भाव एकमेकांच्या चेहर्‍यावर पसरलेले असतात. त्यातल्याच कुणाचीतरी सराइतपणे पुढची तयारी सुरु होते.



रात्री दिड-दोनच्या दरम्यान एक म्हातारा हॉस्पिटल्च्या मागच्या बाजूस ३१ नंबरच्या खिडकीवर जिथं औषध मिळतात तिथं ठोठावत होता. विचारलं. तर म्हणाला, " देखो ना, कोई नही है". खिडकीतला दिवा लागलेला होता. तिथला माणूस जाग्यावर नव्हता. तिथं बहुदा औषध फुकट मिळत असावीत. त्या माणसाच्या नाकातून रक्त गळत होतं, काय झालं असं खुणेनंच विचारलं. तर रडायला लागला. पैसे नाहीत म्हणाला. हातातला केसपेपर, औषधाच्या चिठठया दाखवायला लागला. काय झालं म्हणून पुन्हा विचारलं, तर अर्ध्याकच्च्या मराठी हिंदीत म्हणाला, काळाचौकीतून आलोय, तिथं एक माणूस बायकांसमोर दारु पिऊन अचकट विचकट चाळे करीत होता. याला त्याचा राग आला. म्हणून विचारलं तर त्यानं याच्या अंगावर हातातली बाटली फेकून मारली. डोळा वाचला. नाकाच्या वरती फाटलं होतं. रक्ताचा ओघळ थांबत नव्हता. डॉक्टरनंही मलमपटटी न करताच त्याला इकडं औषध आणायला पिटाळला होता. आणि हा खिडकीवर ठोठावत होता. तो पण प्यायलेलाच होता. त्यामुळे खिडकीवर ठोठावण्याचा वेग आणि आवाज वाढत गेला.



गेटवर गाडी उभी राहिली की गेटसमोरचा आडवा दांडा आपोआप वर येतो. तपासायच्या भानगडीत कुणी पडत नाही. जागोजागी सिक्युरीटी आहे. पण सुस्त. काही अघटीत घडल्याशिवाय यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे खुर्च्या गरम करीत जो तो आपापल्या जागी बसलेला असतो. सगळ्या मुंबईची सिक्युरीटीची जबाबदारी उत्तरप्रदेशी मुलं सांभाळत असताना इथे सगळे मराठी. हे ही काही कमी नाही.



पहिल्या मजल्यावर लांबचलांब गॅलरीत दोनही बाजूला माणसं पडलेली असतात. अधेमधे लाकडी बाकडी आहेत त्यावरही कुणी झोपलेला असतो. इथं बसल्यावर लक्षात येतं. लाकडी बाकडयावरची माणसं अधुनमधुन वळवळत असतात. आजुबाजुशी बोलल्यावर कळलं की, रात्री ढेकुण जागे असतात. इथल्या शांततेला भंग करणारी एक पाण्याची संततधार खाली पडत असते. हे पडणारं पाणि एसीचं असावं असं वाटतं कदाचित टाकी ओहरफ्लो सुध्दा होत असावी. पण हा आवाज आपल्याला टाळता येत नाही. केईएमचे व्यवस्थापन या आवाजाला का टाळत असावे?



तरुण डॉक्टर्स जिन्सच्या पॅन्टस. सफेद डगला आणि गळ्यात स्टॅथोस्कोप घेऊन इकडून तिकडे. अधुनमधून बाहेर ज्युस सिगरेटी किंवा काही खाण्यापिण्यासाठी फिरत असतात. गरीब पेशंटच्या आजुबाजूला ही गोरी-गोमटी तरुण डॉक्टर पोरंपोरी फारच श्रीमंत वाटतात. या हॉस्पिटलमध्ये येणारे बरेचसे रुग्ण गरीबच असतात, त्यांच्याशी वागण्याची डॉक्टरांची पध्दत पाहिली की कधीकधी अश्या ज्युनीअर डॉक्टरांना फटके का पडतात याची कल्पना करता येते.



नर्सेसची लगभग चालू असते. सिनिअर नर्स फोन आणि खुर्ची सोडत नाही. काहीतरी लिखाण चालू असतं, कुणावरतरी ओरडणं चालू असतं. पण ज्युनीअर इकडे-तिकडे येरझार्‍या मारीत असतात. त्यातून आया नावाची जमात बिनधास्त वावरताना दिसते. चेहर्‍यावर तिटकारा आणि तोंडाचा पटटा चालू अश्या अवस्थेत त्या काम करीत असतात. वॉर्डबॉय आपल्याच तोर्‍यात कानाला हॅन्डस फ्री लाऊन गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात दंग असतात. बरेचसे रुग्णांचेच नातेवाईक स्ट्रेचर इकडून तिकडे नेताना दिसतात. हे काम वॉर्डबॉयचं आहे हे कुणी कुणाच्या लक्षात आणून द्यायचं?



केइएम परिसरातलं आदिती, ओन्ली फिश, व्हेज ऑलवेज सारख्या चकचकीत हॉटेलच्या तुलनेत मिलन हॉटेल अनेकानां आपलं वाटतं. त्या होटलनं आपला गरीब चेहरा गेली अनेक वर्ष आहे तसाच ठेवला आहे. फुटपाथ पुर्णपणे अडवून बसलेल्या या हॉटेलांनी आजवर कित्तेक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले असतील. त्याचं त्यानाच ठाऊक. अधुनमधुन महानगरपालिकेकडून फुटपाथ साफ केली जातात, अतिक्रमणावर हल्ले केले जातात, पण पुन्हा दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासनं परिस्थीती जैसे थे.



हॉटलामध्ये जाऊन बसून खाण्याइतपतही ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी बुर्जीपाव, राईस, पावभाजी च्या गाडया अगदी कामगार मैदानापर्यंत उभ्या असतात. बारा-पंधरा इंचाच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तेल आणि पाण्याचे फवारे चरचरत असताना पाहणं मोठं मजेशीरच. भाजीला आलेल्या उकळ्या आणि बुर्जीला सुटत असलेलं तेल पाहतांना नकळत भुक लागल्यासारखी वाटते. आजपर्यंतच्या माझ्या खानपानाच्या अनुभवात पावभाजी या जोडगळीतले पाव नरमच असतात. इथे एका माणसाने कडक पाव असं म्हटल्यावर मी कुतुहलानं पाहिलं तर. भाजी करणार्‍या पोरानं पाव पोटात फाडून त्याला उलटा शेगडीला पालीसारखा चिकटवला. पाव दोन मिनटात नरमचा कडक झाला होता.



या गाडया बाराच्या पुढे थांबत नाहीत. कारणं तिच. पोलीस वैगेरे. पण नंतर अगदी केईएमच्या दारावरच रात्रभर ऑमलेट बनवणारी बाकडी असतात. पेशंटचे नातेवाईक, पिऊन चुकलेले, भुकेलेले आणि टॅक्सीवाले मात्र यावर तुटून पडलेले असतात. चहा तर असतोच. सिगरेटी, गुटका, तंबाकू यांचीही सोय असते.



केईएमच्या गेटवर निपचित उभ्या असलेल्या ऍम्बुलन्स आपलं चित्त वेधुन घेतात. गर्दीला भेदून रोरावत जाणार्‍या या अऍम्बुलन्स आता दबा धरुन बसल्यासारख्या वाटतात. ऍन्बुलन्सच्या सफेद रंगावर उलटया क्रमाने लिहिलेली लाल अक्षरे वाचवत नाही. कितीतरी माणसांनी यातच आपला प्राण सोडला असेल. कितीतरी जणानी मृतुनंतर स्मशानापर्यंतचा प्रवास केला असेल.



रात्रीच्या गडद शांततेत एखादी ऍम्बुलन्स भोंगा वाजवत आत शिरते. तेव्हा इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचेच डोळे कान टवकारतात. नकळत ऍम्बुलन्सच्या दिशेने माना वळतात. उताणी पडलेला पेशंन्ट. त्याला सावरणारे त्याचे नातेवाईक. लगबघीनं पुढ आणली जाणारी स्ट्रेचर. दोन-पाच मिनिटांचा हा खेळ. पुन्हा जो तो आपापल्या व्यापात.



केईएमच्या परिसरात रात्र गजबजलेली नसली तरी जागी असते. कारण कोण, कधी, कसे एन्ट्री आणि एक्झीट घेईल माहीत नसते. त्यामुळे बाकी उरलेल्यांचा जन्म आणि मृत्युच्या मध्ये थांबून टाईमपास चाललेला असतो.



प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

4 comments:

prj said...

खुपच छान वर्णन केलंय केईएमचं तुम्ही! अगदी डोळ्यासमोर केईएम उभं राहिलं. तसेच केईएमची शक्तीस्थळं वर्णन करतांनाच तिथल्या कर्मचा-यांचा माजोरेपणाही छानच वर्णला आहे. तुमच्या पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.

PravinDhopat said...

thank u

Vijay Dada Sanap said...

chan.

tethil nursh chi hi ek shokantika, dukkh aahe. tyavr prkash taka.

keep it up

PravinDhopat said...

adhik mahiti sanga. maza mail. contact no tumchyakade ahe