Sunday, May 23, 2010

आता पुन्हा भेटू १ मे २०२०...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१०
अश्याप्रकारे १ मे २०१० या दिवशी महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झालेला आहे. मागच्यावेळी म्हणजे १९८५ साली आपण रौप्य महोत्सव (जो २५व्या वर्षी करतात) साजरा केलेला होता. तसे आता पुन्हा भेटू एकदम दहा वर्षानंतर १ मे २०२० या दिवशी. कारण तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्षे झालेली असतील. साठीला ... महोत्सव म्हणतात. त्यानंतर पंचाहत्तरी (म्हणजे अमृत महोत्सव). शेवटी शंभरी (म्हणजे हिरक महोत्सव) शंभरी मात्र वर्षभर साजरी करण्याची पध्दत असते. त्यामुळे ते वर्ष हरेक प्रकारे आणि चवीचवीनं साजरं होत राहणार. थोडक्यात शंभरीला कुणावर तसा म्हणजे आता सारखा स्ट्रेस नसणार. एकदम आपापल्या सोइप्रमाणे. समोरचा कोणते इव्हेन्ट करतो आहे? कोणत्या आयडीया वापरतो आहे? कोणते कलाकार नाचवतो आहे? कोणाला गाववतो आहे? किंवा कोणाला धाववतो (म्हणजे प्रायोजक, जाहिरातदार या आर्थाने) आहे? काडीचाही संबधं नसला तरी अश्यावेळी पुरस्कार वैगेरे दिले जातात. ते कुणाला द्यायचे? या सगळ्याचा अंदाज घेत घेत युक्त्या लढवल्या जातील. समोरच्या पेक्षा आपली आयडीया जड गेली पाहीजे याची प्रत्येकजण काळजी घेईल. काही पत्रकार सगळ्यांचे मित्र असतात. त्यामुळे(च) आयत्यावेळी(च) गोची(च) होते. यार्षीच्या अनुभवावरुन तो अति संवेदनशील विभाग स्वतंत्रपणे हाताळला जाईल. बर्‍याच वेळेला म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या माणसांचं महत्त्व असतं. म्हणजे यावर्षी जसे बाबासाहेब पुरंदरे सगळ्यानी पुरवून पुरवून वापरले तसे. त्यामुळे तश्या ऐतिहासिक माणसांचं ऍडव्हान्स बुकींग करुन ठेवण्यात येईल. एकुण काय पुढची दहा आणि त्यापुढचे अंतराअंतरावरचे गॅप भरेपर्यंत आपण रिकामे बसुयात. यापेक्षा आपण काय करु शकतो.
कोणत्याही व्यक्तीच्या, घटनेच्या, संघटनेच्या जन्मानंतर या(च) वर्षाना महत्त्व येतं किंवा असतं. ते वर्ष पुर्ण झालं की निदान भाषण करणार्‍याला, लेखन करणार्‍याला पहिलं वाक्य तरी आयतं मिळतं. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्ष पुर्ण झाली तरी... अजून अमकं ढमकं झालं नाही... इ...इ... (या गाळलेल्या जागेत काहीही टाकून बघा. एकदम फिटट बसतं) ...याचा काय संबध? पण आपलं अशी वाक्य वापरायला, ऐकायला, वाचायचा बरी वाटतात. बोलणार्‍याला काही बोलल्यासारखं वाटतं. ऐकणार्‍याला काही ऐकल्यासारखं वाटतं.
१ मे हा दिवस मराठी माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहेच. तो का आहे हे इथे समजून घेतलं पाहिजे. (माहीती आहे त्यांनी वाचू नये) राज्यांची निर्मीती करतांना किंवा राज्यांच्या सिमा ठरवतांना भाषावार रचना असावी म्हणजे ते राज्यांच्या विकास, प्रशासन या सगळ्याच अंगानं सोईचं होईल. हे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासनंच म्हणजे जेव्हा १९२० साली कॉग्रेसची घटना तयार करण्यात आली तेव्हापासनंच ठरलं होतं. मोतीलाल नेहरु, तेज बहादूर सप्रू इ. मंडळी ते ठरवीत होती. पण पुढे मुंबईच्या बाबतीत धन-दांडग्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. आणि चित्रही बदलत गेलंय. इंग्रजांच्या काळापासनंच मुंबई सधन होत होती. इथला व्यापार- उदीम, अर्थकारण श्रीमंतांना भुलावीत होतं.
१९४६ साली बेळगावला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यात पहिल्यांदा "संयुक्त महाराष्ट्र" या मराठी भाषिक प्रांताची मागणी करण्यात आली. त्याठिकाणी साहित्य संमेलनात राजकीय नको म्हणून नंतर शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै १९४६ रोजी "संयुक्त महाराष्ट्र परिषद" अशी सर्वपक्षीय आणि अपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. या समितीने दार कमिशन जे भाषिक राज्यांच्या प्रश्नावर काम करीत होते, त्यांना निवेदन दिले. दार कमिशनचा रिपोर्ट १९४८ साली प्रसिध्द झाला. त्यात त्यांनी भाषावार प्रांतरचना अमान्य केली होती. मग त्याचा फेरविचार करण्यासाठी जे.व्ही.पी. समिती (जयरामदास दौलतराम, वल्लभभाई आणि पट्टाभी सितारामय्या) स्थापण्यात आली. त्या समितीची "भाषावार राज्ये तुर्त बनवूच नयेत पण ती बनवायची असल्यास मुंबई शहर वगळून संयुक्त महाराष्ट्र द्यावा", अशी शिफारस होती.
पुढे १९५३ साली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. पुढचं एक वर्ष हा आयोग फक्त निवेदने स्विकारीत होता. १९५५ साली त्याचा अहवाल आला आणि महाराष्ट्राचा पुर्णपणे भ्रमनिरास झाला. त्यानंतर पुढे याच विषयावर १९५५ साली फजलअली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाला. त्याचाही नूर तसाच होता.
एकूण काय तर, समित्यांवर समित्या निर्माण होऊनही भाषावार प्रांतरचनेचा तिढा सुटत नव्हताच किंबहुना तो अधिकच किचकट बनत होता. १९५६ च्या जानेवारीत १६ तारखेला पं. नेहरुनी त्रिराज्य योजना जाहीर केली. महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात बेळगावमधील कारवार नव्हते हैदराबादचा बिदर जिल्ह्याचा मराठी भागही नव्हता. मुंबई तर नव्हतीच. आधीच कट केल्याप्रमाने त्यादिवशी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. आणि अपेक्षेप्रमाणे दुसर्‍या दिवसापासूनच मुंबईत धुमच्छक्री चालू झाली. जानेवारी १५ च्या रात्री प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, कृष्णा देसाई, लालजी पेंडसे, गुलाबराव गणाचार्य अशा जवळजवळ २९ जणाना अटक करण्यात आली. त्यानंतर गिरगावात ठाकूरद्वार इथे दंगल उसळली. आंदोलकांनी दोन ट्रामगाडया आणि बसेस जाळण्यात आल्या. त्या रात्री बंडू गोखले नावाचा नाइट स्कुलचा विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. तोच पहिला हुतात्मा. आणखी चार जणाना गोळ्या लागल्या. आणि त्यानंतर मुंबईने पेट घेतला तो घेतलाच.
याच काळात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात १०६ माणसे मारली गेली. ४५००० स्त्री-पुरुषांनी तुरुंगवास भोगला.३२ आमदारांनी राजीनामे दिले होते. या लढयाची परिणती ही की केंद्राला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यावाच लागला. तोच तो दिवस १ मे १९६०. ज्याला आपण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस असेही म्हणतो. ज्या स्वतंत्र महाराष्ट्र राजाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले.
१९४६ ते १९६० या १४ वर्षांच्या काळातला या लढयाचा खरंतर तिढयाचा हा धावता आढावा. या लढयात जे मेले ते गेलेच. जे लढले ते सुध्दा आता सगळे शिल्लक नाहीत. त्यातले काही मरता येत नाहीत म्हणून अजून जिवंत आहेत. त्यातले चंदू भरडकर मित्राच्या मेहरबानीनं जगताहेत, आत्माराम पाटील अजूनही परळच्या चाळीत राहताहेत. यावेळी यापैकी कुणाचीही याद कुणालाच नव्हती.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई धनदांडग्यांच्या हातात जाऊ नये यासाठी होता. वस्तुस्थीती अशी आहे की, पुर्वीपासूनच मुंबई व्यापार्‍यांच्या, धन-दांडग्यांच्याच हातात होती पण ती महाराष्ट्रापासून तुटली असती किंवा स्वतंत्र झाली असतं तर तसं त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं असतं. हे म्हणजे थेट लग्न नाही पण लिव्ह-इन-रिलेशनशीप सारखं झालं. मालकी म्हणजे तरी काय, तर ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार आहेत त्याची असे मानले तर हे सर्व अमराठी माणसांच्याच हातात जास्त होतं हे लक्षात येईल. पैशाने मालली हस्तांतरीत होत असते. आजही जमीन, पैसा, स्थावर- जंगम मालमत्ता (असेट) अमराठी माणसाच्याच नावावर जास्त आहे. मराठी माणसाच्या नावावर फक्त मुंबईची जबाबदारी (लायबिलीटी)आहे. विकत घेण्याची क्षमता (यात सुख, समाधान, ऐशोआराम, वस्तूंपासून मुंबईपर्यंत सगळं येतं) आजही आणि तेव्हाही अमराठी माणसाकडे जास्त होती. मराठी माणूस फक्त विकू (यात घरातले कपडे-भांडी, दागीन्यांपासून वडिलोपार्जीत मोक्याच्या जमीनीपर्यंत सगळ येतं)शकतो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतरही मुंबई काय पुन्हा गरीबाच्या, मराठी माणसाच्या हातात आली नाही. येणारही नाही. जरा पेडर रोड, पाली हिल, मलबार हिल अगदी आता लालबाग,वरळी, परळ सुध्दा. इकडे जरा फेरफटका मारुन या म्हणजे कळेल की मुंबई मराठी माणसाची तेव्हाही नव्हती आणि यापुढेही असणार नाही. पुर्वी फक्त दक्षीण मुंबई नव्हती आता दाही दिशा नाहीत.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही एक घटना होती. त्यामुळे त्याची इतिहासात नोंद झालेली आहे. हा इतिहास यापुढे आपण आपापल्या सोईनुसार वापरणार. फक्त भुगोल बदलता येत नाही म्हणून मुंबई महाराष्ट्राच्या नकाशात दिसणार. आपण फक्त भावनेच्या भरात तिला माझी माझी म्हणत राहणार. आतापर्यंत हेच होत आलं आहे. यापुढेही हेच होत राहणार. १ मे ला आपण डोक्यावर घेऊन नुसते नाचत किंवा नाचवत राहणार. उधारीवर फटाके फोडत राहणार, कॉन्ट्रीब्युशन मध्ये रांगोळ्या काढून, लग्नात शिवलेले झब्बे-लेंगे घालून, शिवाजीच्या, भवानीच्या नावानं घोषणा देत. शोभायात्रा काढून, डीजे, बँड-बाजे बाजवत आपापल्या येरियात इकडून- तिकडे बोंबलत फिरणार.
दिवस उरलेल्यांचेच असतात. कालच्या पेक्षा उद्याचा दिवस नवाच असतो. त्यामुळे पिढिही बदलतच रहाते. आणि ती कालच्या पेक्षा अपडेट असते. हे जरी खरं असलं तरीही आपण त्या निमित्ताने या दिवशी तरी केवळ डांसीग मुड मध्ये असणं बरं नाही. लढले ते का लढले याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. मुंबई मराठी माणसाच्याच हातात राखण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. कर्तृत्वाची शपथ घेण्याचा हा दिवस आहे. फक्त वाजायला लागलं की हलायला लागतं. अश्या अवस्थेतून बाहेर पडण्याची मराठी माणसाला आता गरज आहे. म्हणून आता थेट साठीची, पंच्याहत्तरीची किंवा शंभरीची वाट बघाण्यापेक्षा अधून-मधून या लढयाचं स्मरण करीत रहावं. हुतात्म्यांच्या नावानं दुसर्‍यांना शपथा घालण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी शपथ घालून घ्यावी. या निमित्ताने तरी का होईना मी मुंबईचा, महाराष्ट्राचा आहे, मुंबई, महाराष्ट्र माझा आहे म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: