Sunday, May 23, 2010

दादर स्टेशन

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१०

मु.पो. दादर स्टेशन. मुंबईचं हार्ट. दादरची सफर म्हणजे मुंबईकरासाठी एक विरंगुळा, आनंद. कुणीही कुणाला सहज भेटण्याचं ठिकाण म्हणजे दादर. दादर चौपाटी, शिवाजी पार्क, प्लाझा, कबूतर खाना, कोतवाल गार्डन, शिवाजी मंदीर, टिळक ब्रीज, हिंदू कॉलनी, किर्ती कॉलेज, शारदा टॉकीज, पोर्तुगीज चर्च, मामा काणेंच उपहारगृह, शिवसेना भवन, आयडीयल, श्रीकृष्ण वडेवाला, सुविधा, हनुमान मंदीर, लक्ष्मी नारायणाचं जैन मंदीर, कैलास लस्सी ही दादरची आयकॉन्स. या ठिकाणाचं नाव घेतलं तरी त्याचं चित्र त्याच्या वैशिष्टयांसह डोळ्यासमोर उभं राहतं.
तरीही या सर्वांवर कडी म्हणजे दादर स्टेशन. दादर स्टेशन म्हणजे गर्दी. अखंड वाहणारी, काही ठिकाणी थबकणारी, सरपटणारी, रेंगाळणारी, वाट पाहणारी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड गर्दीचं वारुळ दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, पायर्‍यांवर वळवळत असतं. संध्याकाळच्या सुमारास आपल्याला हव्या त्या माणसाचे वाट पाहणारे चेहरे आणि तो माणूस दिसल्यावर फुललेले, लटक्या रागातले, वाट पाहुन हिरमुसलेले, कातावलेले कित्तेक चेहरे प्लॅटफॉर्मनं पाहिले असतील. त्याची मोजदाद त्यालाच.
मुंबईत स्टेशनं अनेक असली तरी सगळ्यांच्या तुलनेत दादर स्टेशनला एक प्रकारचं निराळेपण आहे, उभं आडवं पसरलेलं हे स्टेशन भव्यतेच्या अंगानं सगळ्या स्टेशनांना जड जाईल. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडणारा मधला पूल दिवसभर प्रचंड गर्दीच्या भारानं थरथरत तर रात्री निपचीत पडलेला पाहताना फारच केविलवाणा दिसतो.
रात्र वाढायला लागते तसा दादर स्टेशनला एक निराळा रंग चढायला लागतो. रात्री बाराच्या पुढे ट्रेन पकडण्याची लगभग वाढते. घराची ओढ माणसाला चालत्या गाडीकडेही खेचते. त्यात कुणी कधी टाकलेली असली तर त्याची ती फरफट बघवत नाही. डोळयांवर वाढत चाललेली पेंग, दोन ट्रेन मधलं वाढत चाललेलं अंतर. माणसांच्या चेहर्‍यावर वैताग पसरलेला असतो. सुरक्षेच्या कारणावरुन हल्ली माणसांना रात्री दादर स्टेशनाच्या आवारात थांबायला बंदी असते. दोन रेल्वे पोलीस एवढया गर्दीसाठी पुरे पडतात. पोलिसाची नजर, हातातला दांडा, आणि आवाज त्या गर्दीला दिशा देत राहतो. रात्री १.११ ला चर्चगेटहुन दादरला येणारी विरार आणि १.२१ ला बोरीवलीसाठी शेवटची ट्रेन असते. तेंव्हा एक आवाज आपल्याला खेचुन घेतो तो असतो श्रीमती गिते यांचा. युनीफॉर्ममध्ये असतात म्हणूस त्या पोलीस नाहीतर, आईच्या आवाजातला हा आवाज दरडावत, विनंती करीत राहतो की, ही शेवटची ट्रेन आहे. शेवटची ट्रेन आहे.
ट्रेन चुकल्यावरची पंधरा-वीस मिनीटे उरलेल्या वाटसरुना त्यांनी समजावतांना, खडसावतांना पाहणं हा एक सोहळाच. त्यांच्यासोबत असतात ते शेख नावाचे रेल्वे पोलीस. एका बाजूला चुकलेल्या वाटसरुंची काळजी आणि शिस्तीच्या, सुरक्षेच्या नावाखाली त्यानां तिथं थांबूही न देणं यातली तगमग बघण्यासारखी असते. आता तुम्ही कुठे थांबाल, काय खाल, सकाळची पहिली ट्रेन कधी असते याची ते माहीती अभावितपणे पुरवीत राहतात.
ट्रेन चुकली. आता प्रत्येकालाच माहीत असतं आता सकाळी ४.३१ शिवाय पर्याय नाही. आता सगळे प्लॅटफॉर्म्स सुनसान होतात. आणि उरलेली गर्दी दादर इस्ट-वेस्ट रेंगाळत राहते. काही सरळ कोतवाल गार्डन गाठतात. काही सुविधाच्या, काही इतर दुकानांच्या पायर्‍यांवर पसरतात. काही लोक स्टेशनची रात्रभर सोबत करीत राहतात. त्यात वडेवाला, चहावाला, मॉलीशवाला, पेपरवाला, पानवाला, बुर्जीपाववाला, हारवाला, मलईवाला, दिवसभर कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पाने विकणार्‍या बाया, भिकारी, गर्दुल्ले, हमाल, छक्के, शौकीन आणि काही पोलीसवाले असतात.

उतरत्या वयाची एखाद दुसरी बाई धंद्यासाठी गिर्‍हाईक शोधतांना दिसते. पोलिस स्टेशन परिसरात उभं रहायला देत नाहीत. म्हणून आता त्यातल्या काही बाया शिवाजी पार्क (हो तेच ते शिवतिर्थ) मध्ये काळोखात बसून आपली कामं करीत असतात. भिकारी,गर्दुल्ले खाण्याच्या गाडीवर तुटून पडलेल्या गिर्‍हाईकांचे शर्ट पॅन्ट खेचत असतात. तासा-दोन तासांनी अधून मधून कुणीतरी गर्दुल्यांच्या पेकाटात लात घालतो आहे. तो खाली केकाटतो आहे, आणि पब्लिक फिदिफिदी हसतं आहे. हे चित्र पहायला मिळतं. छक्के तिन चार जणांच्या घोळक्यात फिरतांना दिसतात. ते पैसे मागतांना दिसले नाहीत. पण खाण्यापिण्याच्या स्टॉलवर मध्येच एखाद्या पदार्थावर हात मारतांना त्यामुळे स्टॉलमालकाशी हुज्जत घालतांना दिसत होत. ठाणे जिल्ह्यातून आदिवासी पाड्यावरुन कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पानं विकायला आलेल्या बाया रांगेत अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात.
रात्री अडीचच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर एक वर असलेला खाण्याचा स्टॉल सगळं आवरुन बंद होतो. त्यानंतर तिथल्या लोकांचं जेवण. झोपणं. पुन्हा सकाळी साडेतीनच्या सुमारास हे पुन्हा दुसर्‍या दिवसाची जुळवाजुळव करायला तयार असतात.
दिवस-रात्र प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या घडामोडी टिपून घेणारा कॅमेरा सुनसान रात्री आपली नजर वेधून घेतो. गर्दीत असतांना तो तिथेच असला तरी आपल्याला फारसा दिसत नाही. पण त्याच्या नजरेतून आपण निसटणं अशक्य. तो मात्र सगळ्या गर्दीवर आपली कडी नजर रोखून असतो. दिवसभर येणाजाणार्‍या ट्रेनसाठी नेमानं हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची उघडझाप करणारे सिग्नल्स फक्त रात्री लाल होउन निपचित असतात, काळोखाच्या कॅनव्हासवर ते फारच भेसूर आणि भीतीदायक वाटतं.
साठीतला पांढर्‍या मळकट लेंगा-सदर्‍यातला, पांढर्‍या दाढीची खूंट वाढलेला, गालफाडं बसलेला एक मराठी माणूस इथे गेली २५ वर्षे मॉलीश करतो. दादर स्टेशन पच्छिमच्या आवारात दोन-चार मॉलीशच्या बाटल्या हातात आणि पाठीवर कापडी पिशवी घेऊन फिरत असतो. आपल्या चेहर्‍याकडे बघून तो मॉलीश करणार का म्हणून विचारतो. त्याला मॉलीश करतांना बघीतलं तर आयुष्यातला सगळा व्याप-ताप तो त्याच्याखाली झोपलेल्या माणसावर काढतो आहे असं वाटतं. १०० रुपयात तो तुम्हाला नखशिखांत रगडतो.
विषेशतः लांबपल्ल्याच्या रेल्वेत गाडी सुरु होण्यापुर्वी हातात फडका किंवा झडलेला झाडू घेऊन काही पोरं दिसतात, तशी दोन पोरं रेल्वेच्या पायर्‍यांवर काही झाडतांना दिसली. कुतुहल म्हणूण विचारलं, तर ते कामगार होते. ३०००/- रुपये मासिक पगार असलेली ही मुलं रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत इथे काम करतात. पान, गुटखा, तंबाखू, उलटया, लघवी करुन चिकट आणि चिवट झालेल्या रंगीत जागा खरवडण्याचं काम ते करतात.
पहाटे तिनच्या सुमारास स्टेशनच्या पायर्‍यांवर पेंगत बसलेली पन्नास-साठ माणसं. पाठ जमिनीला टेकून झोपण्यातलं सुख काय असतं ते हे चित्र पाहिल्यावर समजतं. आपलं सामान सांभाळत झोप जागती ठेवत डोळे मिटणं. कलंडणारी मान, पायांच्या गुढग्यावरुन निसटणारे हात आणि झेपावणारं शरीर सांभाळत रात्र सरण्याची वाट पाहणं. हे दृष्य फार केविलवाणं होतं.
साडेतीन रुपये एमआरपी असलेला बनपाव दहा रुपयात विकणारा एक भय्या सांगत होता, धंद्यात आता मजा नाही. तरीही पाचशेच्या खाली त्याचा धंदा नसावा. चारच्या सुमारास दादरची आठवण आली म्हणून आलेला एक नाटकवाला म्हटला, रेल्वे बॉम्बस्फोटा नंतर दादरचा चेहराच बदलला. उमेदिच्या कित्तेक रात्री त्यानं दादर स्टेशनवर काढल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं सुरक्षेच्या नावाखाली दादरचं स्वैर स्वातंत्र्यच मरुन गेलं आहे. आता पहिल्यासारखी मजा नाही.
सिटी पोलीस इथंही आपलं काम नित्यनेमानं करतांना दिसत होते. पण ते प्रत्येक धंदेवाल्याकडे जात नव्हते. कामत हॉटेलच्या कॉर्नरवर व्हॅन उभी होती. धंदेवाल्यापैकी एक तरतरीत भय्या होता. तो हेच काम करीत असावा. कारण तो कोणत्याही धंद्यावर स्थीर उभा नव्हता. पण प्रत्येक धंदेवाल्याकडून १०-२० रुपये गोळा करुन त्याची पुरचुंडी करुन पोलीसाना देऊन आला. काय विचारलं तर त्यानं हसून फक्त चॅक असं केलं.
सकाळी चारच्या आसपास पुन्हा लगभग सुरु होते. ती चाहुल असते दिवस सुरु होण्याची. पुन्हा ताजेतवाजे होऊन पुन्हा ट्रेन मध्ये चढतात काही झिंगलेले, मरगळलेले काही फ्रेश, कडक चेहरे.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: