Thursday, June 3, 2010

हो जाएगा साब...!!!

पुर्वप्रसिध्दी # महाराष्ट्र माझा - संपादक: शिरीष पारकर # जून २०१०




रात्रीचे साडे दहा वाजलेत. दारावरची बेल वाजते. समोर सत्तरीतला म्हातारा. घामानं नखशिखांत भिजला आहे. डोक्यावर पाटी. त्याच्या थरथरत्या देहाकडे पाहतांना अंदाज येत होता, त्या पाटीत तिसेक किलोचं वजन असावं. तो हसत विचारतो, बेटा कलिंगड लोगे क्या? ...मी काहीच बोलत नाही! बोलूही शकत नव्हतो. मी त्याच्या ओघळलेल्या अवताराकडे बघत बसलो. सफेद रंगाचा मळकट कुडता आणि त्याच रंगाचं धोतर. पायात चपला. झिजलेल्या. काळपट रापलेलं शरीर. तिसर्‍या मजल्यापर्यंत तो चढून आला होता. त्याला धाप लागली होती. त्याच्या दोन श्वासामधलं अंतर पार मिटून गेलेलं होतं. आशाळभूतपणे तो माझ्याकडे पहात होता. आणि मी त्याचा चेहर्‍यात माझ्या आजोबांचा चेहरा शोधत होतो. मला कळत होतं, की आत्ता त्याच्याकडचं कलिंगड विकलं जाण्यापेक्षाही त्याला कुणीतरी किंवा मी तरी म्हणायला पाहिजे की, बसा इथं दोन मिनटं पाणी प्या. मग काय ते बोला...



'बहुत मिठा है बेटा' तो पुन्हा बोलला. भानावर आलो. मी म्हणालो, 'नही चाहिये. माफ करना 'तो पुढच्या दारावर गेला. एक एक दरवाजा करीत आल्या पावली निघून गेला. (मनात होतं पण फक्त दयेपोटी मला कलिंगड घ्यायचं नव्हतं. भावनेच्या भरात केलेले व्यवहार फसतात असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाचा राग मी त्याच्यावरही काढला होता.)



मी विचार करीत राह्यलो, दिवसभर तो अशीच वणवण करीत किती भटकला असेल? तो आज किती चालला असेल? त्यानं दुपारी काय खाल्लं असेल? किती विनवण्या केल्या असतील? किती याचना केल्या असतील? किती शिव्या खाल्या असतील? आणि किती कलिंगड विकली असतील? कुठल्या मराठी माणसाच्या डोक्यावरची पाटी या भय्यानं हिसकाऊन घेतली असेल? कुणाची रोजी-रोटी छिनली असेल?



त्या भय्याला असं वाटलं नसेल का की, मराठी माणसासारखं संध्याकाळी वेळेवर घरी जावं. गरमागरम चहा घ्यावा. दिवसभराचा राग घरादारावर काढावा. बायकापोरांना शहाणपणा शिकवावा. आजुबाजुचे आपल्यासारखे चार-सहा गोळा करावे. उघडया गच्चीत उघडया अंगाने पत्याचा डाव मांडावा. गरम हवेवर, हापूस आंब्यावर, क्रिकेट, राजकारण, सिनेमा यावरती तोंडसुख घ्यावं. सिरिअल, रिऍलिटी शो यांच्या संगतीत रमाव. सत्संगाला जावं. बाबाबिबांच्या बैठकांना हजेरी लाऊन अध्यात्म समजून घ्यावं. त्यांच्याकडून आपण मेल्यानंतर आपलं काय होणार हे जाणून घ्यावं. पण तो यातलं काहीच करीत नाही. तो काम करीत राहतो. अधिक मेहनत करतो. चार पैसे अधिक मिळवतो.



माझ्या एका मित्राला एका मंत्र्याला पत्र द्यायचं होतं. ते हातानं लिहिलेलं कसं द्यायचं म्हणून तो टायपिस्ट शोधत फिरला. सापडला तो एकदम कंप्युटराइज्ड. म्हणजे सोने पे सुहागा. टायपिस्टही तेज निघाला. खटा-खट पत्र मारुन झाल्यावर, कितना कॉपी असं त्यानं मित्राला विचारलं. आधी वाचायला दे, असं म्हटल्यावर हा गडी भडकला. टाईम नही है. चाहिये तो लेलो...नही तो डिलीट करु क्या? यावर मित्र म्हणाला एका कॉपीचे जादा पैसे घे पण मला वाचायला दे, कुठं काही चुक रहायला नको. असं म्हणाल्यावर हा भाई जास्तच भडकला. आम्हाला काय टायपींग येत नाही काय. उगाच बसतो काय इथं मंत्रालयासमोर. शेवटी टाईप केलेल्या कागदाचे प्रींट आणि पैसे न देता- घेताच विषय संपला. कुतुहल म्हणून त्यानं त्याच्याशीच चौकशी केली तर तो मराठी निघाला.



त्या मराठी माणसाच्या डोक्यात एखाद्या गुजराती-मारवाडी माणसासारखा विचार का आला नसेल? की या जागेत बसायचं मला भाडं द्यावं लागतं. विज, कम्पुटर, इंटरनेट, स्टेशनरी, कम्युनिकेशन साठीही खर्च करावा लागतो. हाताशी माणूस ठेवलेला असतो. त्याच्यासोबत आपलाही मेहनताना असतो. सगळा खर्च भागून काही अधिकचंही उरायला पाहिजे कारण आपण व्यवसाय करतो. आणि सगळ्यात मह्त्वाचं की, आता झाला त्या व्यवहारात 'डिलीट' हे बटण प्रेस करायला जेवढा वेळ लागतो तेवढीच ताकद आणि वेळ 'प्रिंट' हे ही बटन प्रेस करायला लागतो. पण प्रिंट हे बटण दाबल्यामुळे त्याला त्याचे पैसे मिळाले असते. आणि प्रिंट मारायच्या आधी तर त्याने टाईपही केलं होतं. म्हणजे वेळ आणि मेहनत दोनीही खर्च झाले होते. अधिक कॉपीचे अधिक पैसेही द्यायला समोराचा माणूस तयार होता. तरी ही तो असं करत नाही. चिडतो, भडकतो. या वागण्याच्या पध्दतीला "मराठी बाणा" असं म्हणतात.



माझा मित्र ज्ञानेश्वर यानं सांगितलेल्या एकाच दिवशी अनुभवलेल्या या दोनही घटना. काल्पनीक नाहीत. वास्तवावर आधारलेल्या आहेत. या दोनही घटनेतली पात्र नावं बदलून मुंबईत इथे-तिथे भेटतच असतात.



सेवा क्षेत्रात (म्हणजे सर्व्हीस इंडस्ट्री. समाजसेवा नव्हे. जो मराठी माणसाचा अत्यंत आवडीचा पार्टटाईम उद्योग असतो) मोडणारा कोणताही व्यवसाय घ्या. इथं कौशल्याला, वेळेला, शब्दाला अधिक किंमत असते. दिलेल्या शब्दात, दिलेल्या वेळेत दिलेलं काम पुर्ण झालं की कोणताही ग्राहक संतुष्ट होतो. तिथं पैसा ही दुय्यम गोष्ट असते. इथं एकच सेवा पुरवणार्‍या दोन माणसांना भेटा. त्यातला एक मराठी आणि दुसरा अमराठी निवडा. काही ठरावीक साच्यातले शब्द दोघाच्याही मुखातून बाहेर पडतील.



कुठल्याही दुरुस्तीच्या धंद्यातल्या माणसाला भेटा. तो भय्या असेल तर म्हणेल ...हो जायेगा साब. तो तुम्हाला पुर्णपणे विश्वासात घेऊन त्या कामाला सोपं करुन टाकतो. कोणताही पर्याय त्याला मान्य असतो. म्हणजे तुम्ही त्याला पुर्ण कॉन्ट्रक्ट द्या, मटेरिअल आणून द्या, किंवा नुसतीच मजूरी द्या. कामाच्या कुठच्याही पायरीवर तो नेहमी 'तयार' असतो. आपल्यासमोर तो काम सुरु करतो. तो धंद्याचं टायमींग साधतो. ऍडव्हान्स घेतो. पुर्ण पैसे येइपर्यंत तो तुमच्यासमोर रडतो. आणि काम पुर्ण करुन लवकर अश्यासाठी देतो की त्याला पुढचा माणूस, गिर्‍हाईक किंवा कदाचित बकरा शोधायचा असतो. तो गुंतून रहात नाही. रिसर्चच्या भानगडीत तो अजिबात पडत नाही.



याउलट मराठी कारागीर बघा. आधी तो धंद्याच्या जागेवर पहिल्या भेटीत भेटला तर एक लाख. भेटला तर तो आपल्या तोंडावर पहिलं वाक्य फेकतो की, साहेब परवडत नाही. म्हागाई वाढली. धंद्याच्या लायनीत पयल्यासारखी मजा नाही. वैगेरे. तरीही मराठी माणूस म्हणून त्याच्याकडे आपण काम देतो. कामाचे पैसे त्यानं जास्तच सांगीतलेले असतात. आपण ते अश्यासाठी देतो की........ राज ठाकरे! भय्यासारखी तो थुकपटटी लावणार नाही, असं आपल्याला उगाचंच वाटतं. तो काम घेतो पण ते आपल्यासमोरच बाजूला ठेवतो. खोलायला लागेल, बघायला लागेल, दाखवायला लागेल म्हणतो. उद्या या असं सांगतो. चहा पिणार का, विचारतो. आपण साशंक मनाने तिथुन निघतो. त्यानं दिलेल्या वायद्यापेक्षा एक दिवस उशीराच जाउया म्हणून पोहचतो तर त्यानं कामाला हातच लावलेला नसतो. आपल्यासमोर तो धुळ झटकतो आणि आत्मविश्वासाने सांगतो. साहेब उद्या...उद्या....नको नाही तर असं करा...परवा नक्की अगदी हंड्रेड पर्सेंट घेऊन जा.


प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

3 comments:

भानस said...

सहमत. नको तिथे नको तितका तात्विक बाणा लेवून आवेशात यायचे अन निष्कारण शक्तीचा ~हास करायचा.

विनायक पंडित said...

प्रवीण तुम्ही अगदी अचूक लिहिलं आहे मराठी बाण्याबद्दल! आपण कसं वागतो हे कळायला आणि मग वळायला मराठी माणसाला आख्खं आयुष्य घालवावं लागतं असं वाटतं!

Unknown said...

well said pravin, keep it up!