Friday, March 13, 2009

कुत्ते के पिछे

पुर्वप्रसिध्दी मासिक स्वच्छंदी पाखरु # संपादक प्रकाश तळेकर जून २००८

जो कुणी भटक्या कुत्र्याला रस्त्यावर किंवा सार्वजनीक ठिकाणी खायला घालेल त्याला ५००/- रु पर्यंत दंड. स्वच्छता आणि आरोग्य विभाग पोटकायदा २००६, कलम ४,५ प्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यानं या कायद्याचा अंमल करायचा असं ठरवलं आणि एका नव्या विषय-वादाला सुरुवात झाली.
शासन व्यवस्था, कुत्र्यांचे प्रेमी (सामान्यपणे यांचा उल्लेख प्राणिमित्र असा करतात), कुत्र्यांचे मालक, किंवा पुण्य मिळवण्यासाठी म्हणून कुत्र्याला खायला घालणारे या सगळ्यांचं लक्ष या बातमीने वेधून घेतलं. कुत्र्यांना कुत्र्यासारखं मारा असं म्हणनारे जसे आहेत तसे कुत्र्यांना माणसासारखे वागवा असंही म्हणनारे कमी नाहीत. कुत्र्याला हा...ssड म्हणन्यापलिकडे ज्यांचा संबध आला नाही ते कुत्र्याशिवाय जे जगु शकत नाही अश्या माणसांचं दु:ख कसं समजणार ?
दिवसा भटकायचं. रात्री भुंकायचं. लोकांची झोप हराम करायची. खायला मिळालं नाही की चोरीचपाटी करायची. कुठंही तोंड मारायचं. विनाकारण अंगावर यायचं. एकटा-दुकटा गाठुन त्याला चावायचं. श्रावण- भाद्रपदात ताळतंत्र सोडायचं अश्या सवयींमुळेच कुत्रे अडचणीत आले आहेत. अन्यत: कुत्रे कंपनीच्या आदर्श वागण्याचीच वर्णनं आपण ऐकत-वाचत आलेलो आहोत. इमानदारी, स्वामीनिष्ठा, प्रामाणिकपणा हे सगळे गुण माणसांन कुत्र्यांकडुनच घेतलेले असावेत. नसबंदीपासुन कोंडवाडयापर्यंत सगळे उपाय झाल्यानंतर महानगरपालिका कुत्र्यांच्या पोटावरच उठली आहे, म्हणूनच भटक्या कुत्र्यांच्या मागे केलेली ही भटकंती.
कुत्र्यांना सार्वजनीक ठिकाणी खायला द्यायचं नाही, याचा अर्थ त्यांना उपाशी ठेवायचं. त्यामुळे कसा / कोणता प्रश्न सुटेल माहीत नाही. कदाचीत तो प्रश्न अजुनच किचकट बनेल असं वाटत. कारण ताट वाढल्यावरच किंवा हातपाय धुवुन मगच पंगतीला बसेन, किंवा डायनींग टेबलावरच बसेन, किंवा आवडीचा मेनु असेल तरच जेवेन असं काही कुत्रा म्हणत नाही. त्याला भुक लागली की तो जेवतो, त्यांच्या अश्या काही ठरलेल्या वेळाही नाहीत. खरंतर जेंव्हा काही समोर येईल तेंव्हा जेवायचं हाच कुत्र्यांचा शिरस्ता असतो. त्यामुळं महानगरपालिकेनं ठरवलं म्हणून कुत्रे उपाशी राहीले हा एक शेखचिल्ली आयटम ठरावा.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न बिकट बनतो आहे हे खरंच आहे. पण ते सोडवणूकीचे मार्ग रास्त असावेत. जगभरात कुत्र्यांना ठार करुनच हा प्रश्न कायमसाठी सोडवण्याचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले आहेत. अगदी अमेरिकेत सुद्धा. आणि कमी लोकसंख्या असलेल्या देशात कुत्र्यांना पाळलं जातं, त्यामुळं संख्यावाढीला आपोआप आळा बसतो, असाही अनुभव आहे. पण कुत्र्यांना ठार मारण्याविरुद्ध चळवळी झाल्या त्यामुळे आता अमेरिकेसारख्या देशातही सर्वत्र नो किल शेल्टर दिसतात. प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे, हे मान्य होत आहे.
मुंबईच्या बाबतीत महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्याना ठार करण्यासंदर्भात हाय कोर्टाकडे परवानगी मागीतली होती. पण त्यापेक्षा निर्बीजीकरण करा असा आदेश कोर्टानं दिला.
भटक्या कुत्र्यांच्याबाबतीत काम करणार्‍या अनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन्सचं म्हणन असं की कुत्र्यांना मारण्यापेक्षा त्यांच निर्बीजीकरण करावं. अर्थात हे महानगरपालिकेच्या खर्चानं आणि सहकार्यानं. यासाठी त्यांनी काही मार्गही सुचवलेले आहेत ते असे की, सार्वजनीक ठिकाणी स्वछता पाळावी. कचरा-घाण साचू देऊ नये. नागरीकांनी जखमी कुत्र्यांची तक्रार लगेचच करावी. आणि महानगरपालिकेकडून त्या तक्रारीचं निवारणही लवकर व्हावं. विद्यार्थी, नागरीक, महानगरपालिकेचा नोकरदारवर्ग यांना कुत्र्यांच्या वागण्याच्या पध्दतीविषयी तसंच त्यांना कसं हाताळावं याचं प्रशिक्षण द्यावं. हे सगळं १९९८ च्या हायकोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करावं. आणि मुख्य म्हणजे आम्ही म्हणजे अनिमल वेल्फेअर संस्था ही रॅबीज (ज्या रोगामुळे कुत्रा पिसाळतो तो रोग) व्यतिरिक्त इतर मानवी नुकसानीत सहभागी असणार नाही, ते महानगरपालिकाच बघुन घेईल.
तरीही भटक्या कुत्र्याचां प्रश्न कायमसाठी मिटवायचा असेल तर त्यांना ठारच मारलं पाहिजे असं महानगरपालिकेचं म्हणनं आहे, कारण १९९४ पर्यंत कुत्र्याना ठार करणे हे त्यांच नित्यकर्म होतं. हाय कोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टासमोर हा प्रस्ताव मांडण्याबाबतीत महानगरपालिका अजुनही ठाम आहे. म्हणजे" कुत्ते...कमीने...मै तुझे मारकरही छोडुंगा" अशीच भुमिका महानगरपालिकेने घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्र्यांसाठी तुरुंग किंवा कोंडवाडे बनवा पण त्यांना अमानुशपणे मारु नका असं प्राणीमित्रांचं म्हणनं आहे. त्यासाठी खरंतर मुंबई महानगरपालिकेनं पालघर आणि वसईमध्ये ४४ एकर जमिन घ्यायची ठरवली होती. ज्यामुळे जवळजवळ ६ लाख कुत्र्यांचे पुनर्वसन श्यक्य होते. पण जमिनीचे हस्थांतरण आणि बाकी प्रशासकीय अडचणींमुळे तोही प्रयत्न फसला.
महानगरपालिकेच्या ताज्या सर्व्हेक्षणानुसार शहरात ९७,००० कुत्रे आहेत, त्यापैकी ७०,००० भटके आहेत. काही सामाजीक संस्था म्हणतात हा आकडा ५ लाखाच्याही वर आहे. महानगर पालिकेचे कमिशनर म्हणतात, आम्ही सर्व्हेक्षणासाठी स्थानिक व्हालिंटीअर्सची मदत घेतली. त्यांनी घराघरात जाऊन सर्व्हे केला आहे, आणि आजुबाजुच्या भटक्या कुत्र्यांना ते ओळखतातच. म्हणजे महानगरपालिका असो नाहितर सामाजीक संस्था दोन्हींचेही आधार लंगडेच म्हणायला हवेत.
महानगरपालिकेनं एकुण १२ सामाजीक संस्थाची मदत घेउन कुत्र्यांचं निर्बीजीकरण सुरु केलं आहे. त्याच्यासोबत झालेल्या करारानुसार या संस्थानी रोज १०० कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांना प्रत्येक कुत्र्यापाठी ६००/- रुपये खर्च दिला जातो. हे कॉन्ट्रक्ट ११ महिन्यांसाठी आहे. म्हणजे एका संस्थेला महिन्याला १८ लाख रुपये याप्रमाणे सगळ्या कॉन्ट्रक्टचे मिळून १९८ लाख. अश्या एकुण १२ संस्था. म्हणजे हा मामला २३ करोड ७६ लाख रुपयांवर जातो. आणि ज्या संस्था आपलं काम जलध गतीने करतील त्यांचं कॉन्ट्रक्ट पुन्हा वाढवण्यात येईल असंही ठरलं आहे.
पण अनुभव असा आहे की, गेल्या वर्षी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ४ करोड रु मंजुर झाले होते. त्यातले खर्च झाले फक्त १ लाख. २००५ साली ९ लाख मंजुर झाले त्यातले खर्च झाले फक्त साडेतीन लाख, २००४ साली १२ लाख मंजुर झाले त्यातले खर्च झाले फक्त ५५ हजार. हे असं का होतं कारण म्हणे निर्बीजीकरणासाठी सेंटर कमी आहेत. आणि सत्य हे आहे की फक्त सहा सामाजीक संस्था आहेत. जी ही सेंटर चालवतात म्हणजे वर्षाला फक्त १२००० कुत्र्यांनाच या सेवेचा लाभ होउ शकतो. बाकी जनता मोकाटच.
लोक आहेत. घाण-कचरा आहे. महानगरपालिका आहे. कुत्रे आहेत. कुत्रे प्रेमी आहेत. प्रश्न आहेत. उत्तरंही आहेत. जोपर्यंत हा विषय आहे तोपर्यंत चर्चाही आहे. तोपर्यंत आपल्याला कुत्रा चावणार नाही याची काळ्जी घ्यायला हवी. भटक्या, आक्रमक, भयंकर, भयानक, चवताळलेल्या, भुंकणार्‍या किंवा जखमी कुत्र्यांपासुन आपला बचाव कसा करावा यासाठी मार्गदर्शक सुत्र बनवली गेली आहेत. ती प्रत्यक्ष कुत्रा अंगावर आला की विसरणार असाल तर वाचू नका. १) अश्या प्रकारच्या म्हणजे भुंकणार्‍या वगैरे कुत्र्यांच्या मागे जाऊ नका. त्याच्या बाजुने सावकाशपणे चालत जा. धावू नका. त्याच्याकडे बघतबघतच सटका. २) आपण घाबरलेलो आहे हे कुत्र्याला दाखऊ नका. (हे खूप कठीण आहे. पण योग आणि साधनेनं हे शक्य आहे) ३) त्याच्याबरोबर(म्हणजे कुत्र्यांबरोबर) बोलायची वेळ आली तर खंबीरपणे बोला. ४) विस्फारलेल्या डोळ्यांनी कुत्र्याकडे पाहु नका. त्यामुळे त्याचा गैरसमज होतो, हे आपल्यासाठी आव्हान आहे असं त्याला वाटतं आणि तो अश्यावेळी हल्ला बोलू शकतो. ५) जर तो गुरगुरायला लागला तर त्याचा अर्थ त्याला म्हणायचं आहे की, मला एकटं सोडा. सोडून द्या. ६) खिशात शक्यतो बिस्कीटं ठेवा. म्हणजे आयत्यावेळी ती त्याच्यासमोर फेकता येतील. आणि हे ही लक्षात ठेवा, जे आपण ऐकत ऐकतच मोठे झालेलो असतो की, "भोंकनेवाला हर कुत्ता काँटता नही."

प्रवीण धोपट.
pravindhopat@gmail.com

2 comments:

HAREKRISHNAJI said...

छान लिहिले आहेत. ब्लॉग देखणा आहे

PravinDhopat said...

harekrishnaji,

thank u