Wednesday, January 27, 2010

विनाकष्ट जय महाराष्ट्र !

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०

महाराष्ट्र म्हणजे काय. मराठी माणूस म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला लागलो की, आपली भाषा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा आणि त्यातून जन्माला येणारी अस्मिता या सर्वांचा उल्लेख येणं स्वाभावीक असतं. अलिकडच्या काळात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, इतिहास आणि परंपरां याला एक विषेश महत्त्व आलेलं आहे.
खरंतर याच्या विकासासाठी राज्य भाषा विकास संस्था, सांस्कृतीक खातं, सरकारी गॅझेट, ईतिहास संशोधन मंडळ या राज्य सरकारकडून स्थापन झालेल्या संस्था आहेत. पण या त्यांची कामं प्रत्यक्ष व्यवहारात कुचकामी ठरलेली आहेत. यात समाजाचा सहभाग नाही, अंकुश नाही. एक सांस्कृतीक खातं सोडलं तर अनेकांना याची माहितीही नसते. त्यामुळेच मग सरकारबाह्य शक्ती यात हस्थक्षेप करतात. वेळप्रसंगी त्या आक्रमकही बनतात. पण त्यामुळे प्रश्न सुटत तर नाहीच पण तो आहे तिथंच राहतो, किंबहुना तो जास्तच चिघळतो.
भाषा, संस्कृती, अस्मितेचे प्रश्न फक्त भावनीकच असतात असे नाही त्यामागे अभ्यास, तारतम्य आणि विचारही असू शकतो, उत्तराच्या जागा कानाखालीच असतात असे नाही. सहकार्य आणि सहभागातूनही वाट काढता येऊ शकते, हे आता समजून घेण्याची गरज आहे. तरीही या निमित्ताने समाजात झालेली घुसळण फार महत्त्वाची आहे. या प्रश्नातलं राजकारण बाजूला करुन त्यासाठी चिकाटीनं काम करण्याची गरज त्या त्या क्षेत्रातल्या धुरीणांची असते. केवळ राजकारण करणार्‍या माणसांच्या नावानं बोटं मोडूनही असे प्रश्न सुटणार नाही. तरीही अश्या प्रकारच्या प्रश्नांसाठीची लढाई जर केवळ प्रतिक्रीयात्मकच राहीली तर भाषेचा प्रश्न अधिकच चिवट आणि किचकट बनत जाणार. भावनेचा भर लवकर ओसरतो. अश्या प्रश्नावर घटनात्मक आणि मराठी माणसाच्या मुळ मानसिकतेत बदल करणारे उपायच आवश्यक आहेत. परंतू दुर्दैवाने असे उपाय होतांना दिसत नाहीत.
या लेखाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना आणि त्यांच्या अनुयायीना काही मुलभूत प्रश्न विचारले. ज्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी अभिमान आहे. त्यासाठी ते आपल्या प्राणांचीही बाजी लाऊ शकतात. (अर्थातच यासाठी कुणाचे प्राणही घेऊ शकतात)
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मापदंडातलं मानाचं पहिलं पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जन्मतीथी आणि पुण्यतिथी विषयी जवळजवळ अनेकांना माहित नव्हतं. (एक शिवसेनेची आणि एक कॉग्रेसची एवढंच माहिती आहे) महाराजानी लढलेल्या लढाया, जिंकलेले गड- किल्ले याविषयी तर आलबेल आहे. वस्तुनिष्ठ माहितीपेक्षा मोघम इतिहास तोंडपाठ, अशी अवस्था. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तका पलिकडच्या ज्ञानात नंतर एक टक्क्याचीही भर पडलेली नाही. फक्त ...जय भवानी म्हटलं की ...जय शिवाजी म्हणायचं एवढंच.
यातल्या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराज्यांचं अष्टप्रधानमंडळ तरी माहीत असायला पाहिजे होते. पण तेही नाही. तेव्हाचं अष्टप्रधानमंडळ म्हणजे एकप्रकारे आत्ताचं कॅबिनेट मंत्रीमंडळ्च. कोण कुणाचा समर्थक, कोण कुणाचा नातेवाईक, कोण कुणाचा जावई, कोण कुणाचा भाऊबंद. एवढाच महाराजांचा त्यामागे निकष होता की आणखी काय, हे अष्टप्रधान मंडळ त्याचे प्रमुख आणि त्यांची कामं यावर जरी साधी नजर फिरवली तरी बरच शिक्षण झालं असतं. शिवाजी महाराज राज्यकर्ते म्हणून का आणि किती थोर होते याची उत्तरे यात मिळाली असती. आज तीन शतकानंतरही त्यांची थोरवी आपण का गातो हे कळलं असतं. पण एखादी गोष्ट फुकट वापरायला मिळाली की त्याची किंमत नसते असंच म्हणायला पाहिजे. महाराज्याचं नाव घ्यायला टॅक्स लागला असता तर कदाचीत त्यांची थोरवी यांना चांगल्याप्रकारे समजली असती.
पुढचा प्रश्न होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संबधातला. हे वर्ष सुवर्णमहोत्सवी आहे म्हणून त्याला महत्त्व. नाही तर काय? त्या लढयात कामी आलेल्या १०५ (खरंतर १०६) हुतात्म्यांपैकी पाच जणांची तरी नावं सांगा म्हटलं तर त्यातल्या एकालाही एकही नाव सांगता आलेलं नाही. ज्या हुतात्म्यांच्या नावानं आपण शपथ घालतो, राजकारण करतो त्यांची नावंही आपल्याला महित असु नये यासारखा दुसरा कृतघ्नपणा नाही.
या प्रश्नाचा आता तसा व्यवहारात उपयोग नसला तरीही विचारलं की, मराठी महिन्यांची नावं सांगा. या वेळी बहुतेक बाराच असावेत याविषयी एकमत होतं, पण वाढीव महिना म्हणजे काय याविषयी गोंधळ होताच. काही सन्माननीय अपवाद वगळता अनेकांना बारा महिन्यांची सलग नावं सांगता आलेली नाहीत.
एखदा माणूस सरपंच झाला की त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनल्याचं स्वप्न पडायला लागतं. पण ज्या राज्याचा पुढे आपल्याला प्रमुख बनायचे आहे, त्या राज्याचे एकुण जिल्हे किती विचारले तर ते एकालाही सांगता आलेलं नाही.
हे झालं नेत्यांचं. ते काम करुन करुन थकतात. ते वाचणार कधी? काही नेते फक्त आपल्यावरची टीका तेवढीच वाचत असावेत. पण या सर्व गोष्टींचा अभिमान आपल्यालाही असतो. आपणही महाराष्ट्रीय किंवा मराठी असतो. मग आपल्याला तरी हे माहीत आहे का? असा प्रश्न आपल्यालाही आपण विचारायला हवा. आपण महाराष्ट्रीय किंवा मराठी आहोत हे फक्त म्हणण्यापेक्षा ते चाचपून पहायला हवं.
महाराष्ट्राच्या गौरवाची, अभिमानाची जी प्रतीकं आपण वापरतो त्याची साधी ओळखही आपल्याला करुन घ्यावीशी वाटत नाही. हे युग माहीतीचं आहे. ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी सताड उघडे आहेत. आपल्याला वाचता येतं, बघता येतं. मग प्रश्न हा उरतो की घोडं अडतं कुठं ? श्रध्दा डोळस असायला काय हरकत आहे ? कोणतेही कष्ट न घेता नुसतं जय महाराष्ट्र म्हणायचं हे किती दिवस चालायचं ?

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: