Monday, March 9, 2009

उत्तरेवर वार

पुर्वप्रसिध्द्दी - महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # फेब्रुवारी २००९

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय नेत्यांच्या राजकीय नौटंकीवर हल्लाबोल केला. तेंव्हा देशाचा कानाकोपरा थरारुन गेला. तो हल्ला म्हणजे मिडियानं पुन्हा पुन्हा दाखवला तसा एका उत्तरेकडच्या भय्या टॅक्सी ड्रायव्हरवर उगारलेला हात नव्हताच. तर दिल्लीच्या थेट मस्तकावर किंवा पार्श्वभागावर उगारलेला सोटा होता. त्यावर अपेक्षेप्रमाणे दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकीय, शासकीय आणि सामाजीक स्तरातून आलेल्या उलटसुलट क्रिया-प्रतिक्रीया आणि साद-प्रतिसादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय दिशा नक्की होत गेली. वाटेवरचे खडे निवडले गेले आणि भविष्यातील भुमिका पक्की होत गेली.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून राज ठाकरेंच्या सभांना आणि मतांना वाढत गेलेला प्रतिसाद. अटके पासुन सुटके पर्यंतचा प्रवास, त्यानंतरची भाषणबंदी ....आणि तरीही पुन्हा आपल्या विधानावर आणि भुमिकेवर ठाम असलेले राज ठाकरे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासुन ते इंदिरा गांधीच्या मतांची दिलेली पुष्टी. इतिहासातील घटनांची साक्ष. देशातील साद-पडसादाची नोंद. आपल्या भुमिकेची जाहीर कबुली आणि जबाबदारीचा स्विकार ही राज ठाकरेंच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्यं बनली. मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास, भुगोल आणि नागरिकशास्त्राचा त्यांचा अभ्यास यावरुन एकच गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे राज ठाकरेंची ही लढाई हारण्यासाठी नाही.
राज ठाकरेंचा हा उत्तरेवरचा वार दिल्लीच्याही जिव्हारी लागला. त्यावेळी उत्तरेकडील नेत्यांच्या नव्या राष्ट्रीय एकात्मतेची झलक पहायला मिळाली. महाराष्ट्रातल्या काही नेत्यानीही यात आपल्या निष्ठांचे मुजरे मारुन घेतले. पण या सगळ्या प्रकारापुढे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना झुकली नाही. यातच सारं सार सामावलं आहे. मराठयांचा उत्तरेवरचा हा राग देशाला काही नवीन नाही. त्यालाही एक उज्वल परंपरा आणि स्वाभिमानी इतिहासाची जोड आहे.
पानीपतापुर्वीच्या सुमारे पन्नास वर्षे मराठे सतत उत्तर हिंदुस्थानात मुलुखगीरी करीत होते. प्रदेश मिळवत होते. राजेराजवाड्यांना दमवून आणि नमवून खंडण्या घेत होते. लुटीही करीत होते. भारतीय राजकारणाच्या सत्तास्पर्धेतून दिल्लीची बादशाही केंव्हाच बाजूला झाली होती. राजपूत सत्ता नाममात्र उरल्या होत्या. दक्षीणेत निजाम आणि बंगालमध्ये इंग्रज अशा काही नव्या शक्ती उदयाला आल्या असल्या तरीही अठराव्या शतकाच्या पुर्वार्धात मराठेच सर्वात प्रबळ ठरले होते. ज्या तडफेने आणि वेगाने मराठी सत्ता वाढत होती त्यावरुन पुढील पाच्-पंचवीस वर्षात ते हिंदुस्थानात सार्वभौम होणार की काय अशी त्यांच्या शत्रुनांही भिती वाटावी असीच एकंदर स्थीती होते.
निजामाने शाहु महाराज्यांच्या राज्यपदालाच आव्हान दिले. तेंव्हा हे आव्हान स्विकारुन शाहू महाराज जातीनिशी फौजांच्या आघाडीवर जाऊन युध्द जिंकले असते तर छत्रपती पदाचे तेज चढले असते आणि राजसत्तेचे पुनरुज्जीवन झाले असते पण युध्दाच्यावेळी लढण्याचे काम केले पेशव्याने आणि छत्रपती पुरंदर किल्ल्यावर राहुन पेशव्यांकडे जासुदांवर जासुद पाठवत राहिले. मध्ययुगात राज्य चालवायचे तर लढाऊ गुणांची आणि आपल्या लष्कराबरोबर राहुन हाल सोसण्याची राजपुरुषाची तयारी आवश्यक होती. तिच्या अभावी छत्रपती हळूहळू निष्प्रभ होत चालले आणि राजप्रमुखाचे अधीकार पेशव्यांच्या हातात जावू लागले.
पुर्वी सातारा, पुणे, नाशीक या चिमुकल्या टापुत आत्मरक्षण कसे होईल याची चिंता बाळगून राहणार्‍या मराठ्यांनी आता सर्व हिंदुस्थानावर थैमान घालण्यास सुरुवात केली. मराठी फौजानी नर्मदा ओलांडली. १७२० मध्ये बाजीराव पेशवाईवर आल्यापासून या उत्तर हिंदुस्थानातल्या राजकारणाला रंग चढला. सवाई जयसिंगाच्या सहकार्याने पेशव्याने माळव्याचा अंमल केला. माळव्यात भरभक्कम पाय रोउन मराठ्यांनी पुढे चाल केली. १७३६ च्या मार्चमध्ये दिल्लीपर्यंत दौड मारुन पेशव्याने मोगलांची त्रेधा उडवली तर १७३८ च्या जानेवारीत मोगल बादशाह व निजाम यांच्या संयुक्त फौजांचा पाडाव करुन मराठे हिंदुस्थानातील कोणत्याही सत्तेला वरचढ आहेत हे त्यानी सिध्द केले. भोपाळचा विजय हा उत्तरेत स्थापन होत चाललेल्या मराठी साम्राज्याचा पाया ठरला.
उत्तरेतील विजय हा बाजीरावाच्या कारकीर्दीचा अत्यंत यशस्वी भाग आहे. किंबहुना पेशव्यांस जे महत्पद प्राप्त झाले त्याचे कारण त्याच्या उत्तराभिमूख राजकारणात साठविले आहे, असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरु नये. दक्षीण जिंकावयाचा निर्धार बांधुन १६८१ च्या सुरुवातीस औरंगजेब बादशाहाने अलोट सैन्यासह नर्मदा ओलांडली व एका मागुन एक दक्षीणेतली लहानमोठी राज्ये भरडून काढण्यास सुरुवात केली. विजापूर गोवळकोंडा व कर्नाटक या राज्यांचा थोडक्याच दिवसात चक्काचूर उडाला पण मराठे मात्र अजींक्य राहिले. बादशहाच्या सैन्याशी सतत पंचवीस वर्षे जे युध्द चालले होते ते एका व्यक्तीने किंवा राजाने चालविले नसून लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनी यावेळी कसून मेहनत केली. सर्वस्व गमावून बसण्याची वेळ आली असतां मराठ्यांनी जो निकराचा झगडा चालविला तो अनुपमेय होता.
औरंगजेब शांत झाल्यावर शाहजादा दक्षीणेची मोहीम अर्धवट टाकून दिल्लीच्या तख्ताकरिता युध्दाच्या तयारीने सर्व सैन्यानीशी उत्तरेकडे निघून गेला आणि मराठी राज्यास लागलेले ग्रहण कायमचे सुटले. मराठ्यांचे पारिपत्य आपल्या हातून होत नाही, तर फूट पाडून त्यांचे सामर्थ्य कमी करावे या हेतूने शाहू महाराजांची मुक्तता करण्यात आली व अपेक्षे प्रमाणे मराठ्यात पक्ष निर्माण होऊन एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याचे उद्याग सुरु झाले. अंतस्थ कलहाने खच्ची होणार्‍या सामर्थ्याचा राष्टसंवर्धनासाठी उपयोग करुन घेणार्‍या व्यक्तीची मराठी राज्याला अत्यंत जरुरी होती आणि ती उणीव बाजीरावाने भरुन काढली.
देशात अराजक माजले आहे यावर रामबाण इलाज राज्याचा विस्तार साम्राज्यात करावा या धाडसी कल्पनेचा उगम बाजीरावाच्या डोक्यात आला आणि कल्पकतेला शौर्याची जोड मिळून मराठ्यांची दॄष्टी त्यांने उत्तराभिमुख केली. मोंगल झनान्यात आयुष्यातील उत्तम काळ निघून गेल्यामुळे शाहू या कामास लायक राहिला नाही आणि कारकुनीतून वाढलेल्या बाळाजी पंत नानास या भव्य कार्याची कल्पना आली असेल असे वाटत नाही. बाजीराव पेशव्याने ही जी कामगीरी बजावली ती क्रांतीकारकच समजली पाहिजे.
१७२८-२९ हे साल मराठी राज्याच्या फैलावाच्या द्रुष्टीने अत्यंत संस्मरणीय ठरते. चिमाजीने मराठ्यांची सत्ता माळव्यात कायम केली तर ऐन संकटाच्या वेळी छत्रसालाच्या सहाय्याला धाऊन जाउन बुंदेल्याना उपकृत करुन पेशव्यांनी बुंदेलखंडात शिरकाव करुन घेतला. उपकाराची फेड म्हणून छत्रसालाने पेशव्यास पुत्रवत लेखून त्यास झांसीची जहागीर बहाल केली आणि आपल्या पाठीमागे राज्याचा तिसरा विभाग पेशव्यास मिळावा अशी व्यवस्था केली. शत्रुने चढाई केल्यास परस्परास सहाय्य करावे असेही ठरले. पुढील दहा वर्षात युध्दाचा पाया बुंदेलखंडात ठेऊन पेशव्याने दिल्लीपर्यंत मजल मारली, हे ध्यानात आले म्हणजे त्याच्या कामगीरीचे महत्त्व समजून येते.
मराठ्यांनी माळवा आपल्या अमलाखाली आणला, पण त्याला बादशहाकडून मान्यता मिळवायची होती, आपल्या ताब्यातील इतका सुपीक टापू हातपाय हलवल्याशिवाय नुसत्या दबकावणीवर मराठ्यांच्या स्वाधीन करील इतका दुधखुळा बादशाह नक्कीच नव्हता. मराठ्यांनी दयाबहादराचा पाडाव केला, बंगष नामोहरम होऊन परतला, बुंदेलखंडात मराठ्यांची पाचर भक्क्म बसली, तशी या संकटाची खरी जाणीव बादशहास येत चालली. प्रांतीक अधीकार्‍यांना मराठ्यांचा प्रतिकार करणे शक्य नसून सर्व साम्राज्याची शक्ती एकवटून मराठ्यांच्या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याचा प्रयत्न झाला पाहिजे हे बादशाही मुत्सद्यास कळून चुकले होते.
मराठे लहान सहान तुकड्यावर समाधान पाऊन परत जाणारे नाहीत, ते सर्व भक्षण करावयास पहात आहेत. या जाणीवेची आंच लागून मराठ्यांचा प्रतीकार करण्याची चर्चा दिल्ली दरबारात सुरु झाली. यापुढे या लढ्याचे प्रांतीक स्वरुप पार बदलून मराठे विरुध्द मोगल साम्राज्य असे भारतीय स्वरुप प्राप्त झाले. एकट्यादुकट्या सुभेदाराने यापुढे मराठ्यांशी झूंज द्यावयाची नसून सर्व बादशाहीच्या एकवटलेल्या सामर्थ्यानीशी टक्कर देण्याची वेळ आली होती. आग्रा, अलाहाबाद, बुंदेलखंड, राजपुताना या भागातून मराठ्यांविरुध्द लष्करी हालचाली सुरु झाल्या.
इतिहासाचे तपशील बदलतात पण घटना मात्र जश्याच्या तश्या घडत राहतात. तपशील उत्तरेकडून येणार्‍या माणसांचे लोंढे थांबवण्याचा आहे. एकप्रकारे मुंबईवर होणार्‍या अतिरिक्त लोकसंख्येचे आक्रमण रोखणे ही मुंबईची प्राथमीक गरज बनली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बदलत गेलेल्या राजकीय परिमाणांचाही प्रश्न आहे. देशभरात कुठेही संचाराच्या घटनाबध्द स्वातंत्र्याचा आधार घेऊन भुमीपुत्राच्या वाट्यालाच काही येऊ द्यायचे नाही, हा गुंता आहे. मुंबईचा देशाची आर्थीक राजधानी म्हणून गौरव करीत करीत सगळा देश मुंबईत वसवायचा हा डाव आहे. राष्ट्रभाषेच्या पदरा आडून स्थानीक भाषेच्या हक्क आणि अधिकाराचा अनादर करायचा हा कावा आहे. हेच राज ठाकरेंनी ओळखलं आणि त्यावर खुलेआम वार केले.
त्यावेळी राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि समतेच्या चर्चा झाल्या. राष्ट्रीय सुरक्षेपासून, देश विभाजना पर्यंतच्या आरोप झाले, सामाजीक गप्पां, सरकारी उपायही झाले. आता सगळं संपलं असे म्हणत पाठ टेकायला जाणार्‍यांची झोप परवा ठाण्यात झालेल्या जाहीर सभेने उडवली. खरेतर मुंबई आता अश्या एका सामाजीक स्थीत्यंतरातुन जात असतांना फक्त बोलणार्‍यानां मुकाट बघण्यावाचून गत्यंतर नाही. कळणार्‍यालाही वळत नाही आहे अशी मुंबईची अवस्था झाली आहे. पण कधीतरी, कुणीतरी, कुठुनतरी सुरुवात व्हायलाच पाहिजे होती. ती राज ठाकरेंनी केली. इतिहासाचे तपशील तपासले तर काळाने योग्य माणसाची निवड केली आहे, हे मान्य करायलाच पाहिजे.

प्रवीण धोपट
pravindhopat@gmail.com

1 comment:

संदीप said...

आपला लेख व एकूणच लेखन योग्य आहे, मात्र आपण राज ठाकरे यांची तुलना बाजीरावाबरोबर करत आहात काय?
बाजीरावाने केलेल्या लढाया या प्रसंगी जीवावर बेतू शकत होत्या. आज राज ठाकरे आतून कोंग्रेसचा सपोर्ट नसता तर अटकेत नसते काय?
मी शिवसेना समर्थक नाही,मात्र राज यांनी स्वत:ला कोंग्रेसचे एजंट नाही असे सिद्ध करणे गरजेचे आहे.
असे जेव्हा ते सिद्ध करतील तेव्हा मराठी माणूस हा त्यांना आपला नेता मानू लागेल.नुसते आंदोलने करून व रामशास्त्री व सी.डी. यांची नावे घेतल्याने कदाचित निवडणूका जिंकता येतील, पण त्या काय तत्वहीन नेहरूंनीही जिंकल्या आणि लालूही जिंकू शकतो.फरक सिद्ध होणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी मात्र माझ्यासारख्या अनेकांच्या जरूर शुभेच्छा !