Sunday, April 18, 2010

वडाप

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # एप्रील-२०१०

एसटी यायला अजून अर्धा-एक तास अवकाश होता. समोर जीपवाला मला ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचंच नाव घेऊन ओरडत होता. इलाज नव्हता. ड्रायव्हर शेजारची सीट म्हणून बसलो. दहाएक मिनिटात, 'भाऊ सरका' म्हणून शेजारी अजून दोन माणसं येऊन बसली. सरकलो. त्यामुळे त्यात अजून एक ऍडजस्ट झाला. ड्रायव्हर बसायचा होता. त्याच्या जागी दोघेजण येऊन बसले. मागून- पुढुन-वरुन-बाजूनं लोकं जीपमध्ये, टपावर, बोनेटवर सहज चढत होती. त्यात पुरुष होते, बाया होत्या, मुलं होती. गाठोडी-बोचकी होती. काठया-कुठया-सामान होतं.
कुणालाच काही वाटत नव्हतं. उलट माणसंच एकमेकांना आत- वर ओढत होती. आपसात एकमेकांना जागा करुन देत होती. म्हणून मीही त्यातलाच एक बनून नीपचीत बसलो होतो. ड्रायव्हर तिरका बसला. गाडी सुरु झाली. हवा लागली. बरं वाटलं. एक हलकासा गलका झाला. दहा फुटातच जीपने चौथा गिअर गाठला होता. 'खंडेरायाच्या लग्नात' च्या तालावर जीपने सुसाट वेग पकडला. जीपच्या हेलकाव्यासोबत माणसं हिंदकळत होती. रस्त्यातले अडथळे, खडडे-बिडडे चुकवत सराईतासारखी जीप निघाली. मध्येच कुठेही काही माणसं उतरत होती. काही चढत होती. सरते शेवटी शेवटच्या गावाच्या नाक्यावर गाडी थांबली. भराभरा सगळी जीप खाली झाली. गंम्मत म्हणून एकूण माणसं मोजली. ती चाळीसेक असावीत. वन प्लस फोर ची कपॅसीटी असलेल्या जीपमध्ये दहापट अधीक माणसं चढली होती.
या गर्दीची जीपला, ड्रायव्हरला, पॅसेंजरना सवय झाली होती. मी रिकाम्या जीपकडे एकवार वळून पाह्यलं आणि पुढं चालता झालो. या प्रकाराला 'वडाप' म्हणतात. एसटीला पर्याय म्हणून सुरु झालेलं वडाप आता प्रवासाचे मुख्य साधन बनून राहीले आहे. थातूर-मातूर कारवाई शिवाय आता वडापाला पर्याय नाही. गावात राहणार्‍याला, वडापातून प्रवास करणार्‍याला आता या प्रकाराची चांगलीच सवय झालीय.

मुंबईची अनेक ठिकाणांची, प्रवासाच्या साधनांची अवस्था या वडापापेक्षाही भयंकर झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मुंबईकराला सवय झाली आहे. कितीही पर्याय आले तरी मुळ प्रश्न सुटत नाही. याला कारण गर्दी. अखंड वाढत जाणारी गर्दी.
मुंबईत सकाळ संध्याकाळ, खरंतर कोणत्याही वेळेची रेल्वे. रेल्वेचे प्लॅटफॉर्म. गर्दीच्या विळख्यात आक्रसून, दबून गेलेले असतात. खुराडयात कोंबल्यासारखी रेल्वेत माणसं एकमेकांत घुसत असतात. सुटणार्‍या पहिल्याच स्थानकातही चौथी सीट मिळेनाशी झाली आहे. दोन सीट्स मधल्या जागा, जुळलेल्या दोन डब्यांच्या मधल्या जागा, रेल्वेच्या छतावर, दरवाजात माणसंच माणसं लोंबकाळतांना दिसतात. दरवाजावर तळपायाच्या चौडयावर उभं राहुन माणसं आपल्या जीवाशी खेळत असतात. कधी काही आपला जीव गमावतातही. पण मरणार्‍यालाच दोन शिव्या देऊन माणसं आपल्या नित्यकर्माला जुंपली जातात. काळ, काम आणि वेगाच्या चक्रात अडकलेल्या माणसांना याचीही सवय झाली आहे.

बेस्टच्या बसेसचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. १९ प्रवासी उभे राहु शकतात असं लिहिलेल्या ठिकाणी याच्याही चारपट उभे राहुन माणसं प्रवास करीत असतात. इथं शिव्या खायला द्यायला भांडायला ड्रायव्हर- कंडक्टर असतो एवढंच.

रेल्वेस्टेशन जवळचे रिक्षा- टॅक्सीवाले. गर्दीत गर्दी कशी वाढवायची ते यांच्याकडून शिकावं. ऐन गर्दीच्या भरात यांची माणसांच्या अंगावर धाऊन जाण्याची स्पर्धा लागली असावी असं वाटतं. कुणाला चुकुन धक्का लागलाच तर एकमेकांनी एकमेकांना हिंदीत चार-दोन शिव्या द्यायच्या आणि पुढं व्हायचं एवढंच. पाहिजे तेंव्हा रिक्षा-टॅक्सी न मिळणं. दिसली तर न थांबणं, थांबली तर आपल्याला पाहिजे तिथे यायला न निघणं, निघाली तर ट्रॅफीकमध्ये फसणं. याचीही आता सवय झाली आहे. एअरपोर्ट सारख्या परिसरात रिक्षा-टॅक्सींनी तासनतास प्रवाश्यांची वाट बघत बसणं तसंच अनेक ठिकाणी प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सीचीही वाट बघत बसणं हे दुर्दैवी चित्रही आता सवयीचं झालंय.

फुटपाथ वर पहिला हक्क पादचार्‍यांचा...वैगेरे...वैगेरे... तसे कायदेही आहेत. स्टेशन लगतच्या उघडया प्रत्येक फुटपाथचा ताबा फेरीवाल्यांनी, फळ-भाजीवाल्यानी केंव्हाच घेतला आहे. कायद्याला, विशेषतः कायद्याच्या रक्षकांना यानी फाटयावर मारलेलं आहे. शक्य तिथे खरेदी केलेलं आहे. त्यामुळे रस्ते आक्रसून गेले आहेत. गाडी पार्क करुन भाजी घेणारे, तिथेच ग्राहकांची वाट पाहणारे रिक्षावाले. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असे रस्ते ओव्हरलोडेड असतात.

सकाळ-संध्याकाळी रस्ते, हायवेज, ब्रीज तुडूंब असतात. फुटाच्या अंतरावरुन गाडया एकामागून एक रांगत-सरकत असतात. एक-एक किलोमिटर पर्यंत तुरळक बेस्टच्या बसेस, क्वचीत ट्रक, टॅम्पो. अधुन मधून रिक्षा-टॅक्सीज आणि अगणीत कार्स हे कोणत्याही हायवेवरचं चित्र. कोणत्याही वेळेत अवकाशातून घेतलेला फोटा एकसारखा येईल एवढं साम्य या चित्रात दिसेल. हायवेवर गर्दी असते गाडयांची. माणसांची असतेच असे नाही. रस्त्यावरच्या अनेक गाडयात एखाद दुसरा माणूस बसलेला दिसेल. ड्रायव्हर जर स्वतःच मालक असेल तर एकटाच, अन्यतः मागच्या सिटवर एखादा माणूस असं चित्र हमखास पहायला मिळतं. साधारणत: दिडशे माणसांसाठी शंभर गाडया असं विलासी चित्र म्हणजे हायवेवरची गर्दी. एकावरुन चार पदरापर्यंत वाढलेले रस्ते. ठिकठिकाणी बांधलेले ब्रीज. तरीही रस्त्यावरच्या गाडयांची गर्दी आटोक्यात येत नाही. पण याचीही आता सवय झाली आहे.

माणसं आर्थीक स्थराचं जसं जसं एक एक अंतर पार करतात तसंतसं ती प्रवासासाठीचं वहान बदलतात. बहुदा सुरुवातीला पायी किंवा सायकल, मग पुढे रेल्वे किंवा बस, रेल्वे-बसकडून रिक्षा-टॅक्सी, क्वचीत बाईक. रिक्षा-टॅक्सी कडून कार, मग छोटया कारकडून मोठया- लग्झरी कार, नंतर एका पेक्षा अनेक कार हा प्रवास अखंड चालू असतो.

आपण रेल्वेत घुसमटलेलो असतांना, बसमध्ये हेलपाटत असतांना, रस्त्यावच्या ट्रफीक मध्ये फसलेलो असतांना, रस्त्यावर चालतांना अडखळलेले असतांना मनातल्या मनात आंणि हिंम्मत आणि शक्य असेल तर कुणाच्या अंगावर जातो, कुणाशी भांडतो, कुणाशी हुज्जत घालतो. अगदीच शेवटचं म्हणजे अधिकार्‍यांची, पोलीसांची, सरकारची भीती दाखवतो आणि घरी परततो.

आपल्याला माहिती आहे का? लोकसंखेच्या बाबतीत मुंबईचा इतर शहरांच्या तुलनेत जगात दुसरा तर देशात पहिला क्रमांक लागतो. इथे २०१० मध्ये लोकसंखेची घनता १३,८३०,८८४ इतकी आहे जी दहा वर्षांपुर्वी ११,९७८,४५० इतकी होती. मुंबईचे क्षेत्रफळ ६०३ कि.मी. त्यात प्रत्येक चौरस मितीमध्ये २२,९३७ माणसं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असावं की बस्-रेल्वे किंवा रस्त्याचं सोडा तर अख्ख्या मुंबईचच वडाप झालेलं आहे!
वडापातून खाली उतरल्यावर आपला आणि वडापाचा संबध जसा तुटलेला असतो. तसंच इथंही असतं. आपण त्या परस्थीतीच्या गोतावळ्यात जेंव्हा अडकलेलो असतो आणि त्या परस्थीतीशी आपला थेट संबध असतो तेंव्हाच आपण ती गोष्ट मनाला लाऊन घेतो. अन्यतः आपणही मुक्त, निर्वीकार, उनाड पक्षी असतो. आपापल्या मोकळ्या जागा शोधत झेपेल तेवढं उडत असतो.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: