Sunday, April 18, 2010

असेल माझा हरी...!

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # एप्रील-२०१०



गेल्या काही लेखांची प्रतिक्रिया म्हणून काही वाचकांनी फोन करुन, एमेल पाठवून, शक्य असल्यास भेटून स्पष्टपणाने म्हटलं होतं की, आता काही तरी उपायाचं लिहा. केवळ मराठी माणसाच्या गुणदोष सांगू नका. ते आमचेच आहेत, ते आम्हाला माहीत आहेत. पण आपल्याला माहितीच आहे की, थेट उपचार करण्याआधी काही तपासण्या कराव्या लागतात. बहुतेक वेळा त्याचा रिपोर्ट नॉर्मलच येतो, हे माहीत असतांना देखील तसं करावं लागतं. आणि जुनाट आजारात तर त्या तपासण्या कराव्याच लागतात. कारण काही आजार रक्तात किंवा हाडामासात भिनलेले असतात. त्यावर केवळ वरवरचे उपचार किंवा मलमपटटी करुन काही होत नाही. एका अर्थाने मराठी माणसांच्या मनातली राग आणि आगही तपासण्यासाठी या तपासण्या चालू होत्या. आता उपचाराचं बोलू.
मराठी माणसाला अनेक आजार आहेत. त्यातला भयंकर आजार म्हणजे स्थानीक किंवा याहून सोप्पा आणि भावनीक शब्द म्हणजे 'भूमीपुत्र' असण्याचा. आजूबाजूच्या वातावरणात थोडा बदल झाला की तब्बेत बिघडते असं त्या आजाराचं असतं. अश्या आजारात आजार्‍याच्या हातात काहीच नसतं. किंबहुना यात आजारी माणूस आपली रोगप्रतीकारक शक्ती कमी आहे हे कधी मान्यच करीत नाही. तर तो कायम पाऊस, उन,थंडी, वारा यांना दोष देत बसतो. त्यामूळं मूळ रोग राहतो बाजूला. याला त्याला दोष देण्यातच सगळी हयात निघून जाते. हा आजार बर्‍याच प्रमाणात संसर्गजन्य असतो. त्यामूळं त्याची लागण भरभर होते. आपण सगळे सारखे आणि एक आहोत असं वाटायला लागतं. आणि मला जो आजार आहे तोच तूलाही आहे असं म्हणून जो एक मानसिक आधार वाटतो तो या आजारात जास्त प्रमाणात आढळतो. मराठी माणसांमधे या रोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे.
स्थानीक आणि स्थलांतरीत

स्थानीकांपेक्षा स्थलांतरीत माणसं व्यवसाय करतात. स्थानीक त्यांच्याकडे नोकरी करतात, असा सार्वत्रीक अनुभव आहे. म्हणजे मराठी माणसाने गुजरातमध्ये जाऊन एखादा कारखाना काढला तर त्याच्याकडे मजूरी करणारे गुजरातीच (कदाचीत युपी-बिहारी) असतील. त्यामुळे थोडया काळासाठी आपणही इथे स्थलांरतीत आहोत असं मानुया. महाराष्ट्राच्या एकूण जिल्ह्यांचा विचार केला तर आपणही मुंबई किंवा मुंबई उपनगर या जिल्हयामध्ये कधी ना कधी स्थलांतरीत झालो आहोत, हे लक्षात असुद्या. म्हणजे काम सोपं होतं. झालाच तर थोडा रागही शांत होतो. कारण या सगळ्याचा शेवट व्यवसायाची व्हावा असं वाटतं. कारण व्यवसाय करणाराच जास्त श्रीमंत होतो. आपल्याला हवी ती वस्तू विकत घेण्याच्या आणि विकण्याच्या शक्तीवरच तुमची योग्यायोग्यता ठरत असते. जरा स्वतःकडे पहा, आज मी यातलं काय करु शकतो हे तपासून घ्या. तुमच्या वाटयाला आलेल्या अर्थकारणावरच तुमचं आयुष्य अवलंबून असतं.
मुंबईत गुजराती विषेशतः मारवाडी माणसं एकमेकांना मदत करतात. धंद्यामध्ये एखाद्याला पैशाची मदत हवी असल्यास पैशाची मदत देतात. उधारी हवी असल्यास उधारी देतात. कर्ज हवे असल्यास कर्ज देतात. कुणाला शब्द टाकायचा असल्यास तसं करतात. मराठी माणूस असं करीत नाही असं नाही. पण ते कोण करतात हे तूम्ही समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसांना अनंत भालेकर मदत करतात आणि माधवराव भीडे मदत करायला सांगतात, हे मला माहीत आहे.

मराठी माणसाला त्याचेच मित्र, नातेवाईक, भाऊबंद, आईवडील धंदा सुरु करायला मदत करीत नाहीतच. पण एखादा माणूस जर धंद्यात डूबला असेल त्याला तर त्याला पुन्हा उभं रहायला अजिबातच मदत करत नाहीत. अशावेळेला, बघ तूला सांगत होतो ना... इथपासून सुरु होणारे सगळे डोस त्याला पाजले जातात. मराठी माणसं फक्त कुणाला हॉस्पीटलमध्ये ऍडमीट करायला किंवा एखाद्याला लग्नकार्याला एकमेकांना पैसे देतात. यापलिकडे मदत करण्याची त्याची भावना नसते.
उद्योग- व्यवसाय कारणारा माणूस हा सहजासहजी आपला व्यवसाय वाढवत नसतो. व्यवसाय म्हणजे असंख्य अडथळ्यांची शर्यत असते. व्यवसायात माणसाच्या सगळ्या गुण-अवगुणांचा कस लागतो. त्यालाही कुणी त्याच्या वाईट दिवसात मदत केलेली नसते. त्यामुळे अश्या व्यवसाईक माणसाला तुम्ही भेटलात तर तो तुम्हाला पारखल्याशिवाय जवळ घेत नाही. किंबहुना तुमच्यातला खरेखोटेपणा त्याला लगेच कळतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात उतरतांना आपण प्रामाणिक आहोत का, हे तपासून घ्या. आणि जर तुम्ही प्रामाणिक असलात तर तुम्हाला मदत करण्यावाचून कुणीही कुणापासूनही रोखू शकत नाही. खरंतर उद्योग व्यवसाय करण्याची ओढ असणार्‍यांनी इतर व्यवसायीकांनाही भेटलं पाहिजे. बोललं पाहिजे. आपली कौशल्य, आपले अनुभव त्यांच्याशी शेअर केले पाहिजेत. योग्य वेळी त्यांची मदत घेतली पाहिजे.
घेता घेता एक दिवस...
कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे ' देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे '. याचा अर्थ असा आहे की, देणार्‍याकडून ती दातृत्वाची वृत्ती घ्यावी. आपल्या वाईट दिवसात कुणीतरी आपल्याला मदत केली आहे. तशीच मदत जो कुणी आता गरजेत असेल त्याला आपण करावी, असे अपेक्षीत आहे.

आपण आपल्या गरजेला दुसर्‍याकडून घेतलेली मदत दिलेल्या मुदतीत परत करा. त्याचे वायदे वाढवू नका, चुकवू तर अजिबात नका. अनेक जण मदत मागताना आणि ती परत करतांना वेगवेगळे असतात. असा व्यवहार एकदोन वेळा फायद्याचा ठरु शकतो पण पैशाच्या व्यवहारातच माणसाचा खरेखोटेपणा कसाला लागत असतो. तेंव्हा देण्या- घेण्यात जेवढी सहजता ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात कुणीही कुणावर उपकार करीत नसतो. फक्त आपला स्वार्थ जेवढा विधायक ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. मराठीत एक म्हण आहे की, 'प्रयत्नांती परमेश्वर' खरतर ती 'प्रयत्नार्थी परमेश्वर' अशी असायला पाहिजे. जो माणूस प्रयत्न करतो, सुरवात करतो त्याला परमेश्वर पदोपदी भेटतो. 'असेल माझा हरी...तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून आपलं काम आपण आपले प्रयत्न सोडता कामा नये.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

2 comments:

SHIVAMARG said...

pravin sir,
Aapale saamana,NAWAKAL,maharashtra maza madhil lekh pharach wachhniya hot aahet.mee te wachat aasto.Mee pune yethun SHIVAMARGA Navachhe ek masik geli teen varshe prasidha kareet aahe.ya masikat aapale ekhade Nawe sadar suru karnyachi mazi ichhya aahe.aapan aapale lekhan sahitya mala pathaoon tee purna karaal ke? May-10 chhha aank "Maratha Sardar"ya vishayawar prasidha kareet aahot.twarit lekh pathawa.dhanyawad !!
Aapla,
Dattatrya Surve
Editor-shivamarga,Pune
sadafuli-A,Flat.No.12,S.No.78/79,Left Bhusari Colony,Paud Road,Kothrud,Pune-411038
Mob-9423023289,9372111575

PravinDhopat said...

Surve,
prayatna karto.mala tumche masik mumbait kuthe pahta yeil ka?