Thursday, March 25, 2010

...भांडी घासा आमची!

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # मार्च-२०१०

मुंबई कुणाची? असा प्रश्न विचारला की मराठी माणूस म्हणतो, ती माझी आहे कारण ती महाराष्ट्रात आहे. गुजराती-मारवाडी म्हणतो ती माझी आहे कारण मुंबईचा सगळा व्यापार उदीम माझ्याच हातात आहे. उत्तर प्रदेशी आणि दक्षीण भारतीय म्हणतो ती माझी आहे कारण मुंबईत सगळयात जास्त कष्ट आम्ही करतो.

भौगोलिक रचनेमुळ्ये मुंबई एकाच वेळी महाराष्ट्राची आणि देशाचीही असू शकते. यात दुमत नाही. पण मुंबईची अवस्था सध्या राधेसारखी झाली आहे. लौकिकार्थाने ती अनयची बायको आहे पण व्यवहारात ती कृष्णाच्या गळयात आहे. कृष्णाची सखी होऊन ती वावरते. कदाचीत त्यामुळेच तिची पुजा होत असावी. या नात्यात जसं कोण अनय? तसं मुंबईच्या बाबतीत कोण मराठी माणूस?

लौकिकार्थाने मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पण तिला देशाची आर्थीक राजधानी म्हणूनही ओळखतात. या सगळ्या वादात आपण न शिरता भूमिपूत्र, वारस या नात्याने मुंबई ही मराठी माणसाची आहे असे मानले. तर प्रश्न उरतो मराठी म्हणजे तरी कोण? सत्तेत असलेले मराठी म्हणतात, मुंबई देशाची आहे. नसलेले म्हणतात मुंबई मराठी माणसाची आहे. म्हणजे मराठी नावाची दोन किंवा त्याहुनही अधिक माणसं असली पाहिजेत. सत्तेत जश्या मराठी माणसाच्या दोन जाती आहेत. तश्या त्या समाजातही आहेत. दोघांचं उत्पन्न, राहणीमान वेगळं. सारखे आहेत ते यांचे देव आणि टिव्हीवरचे कार्यक्रम. बाकी यांची अनेक वर्ष वर्ष गाठभेट नाही.

मुंबई विकणे आहे

भौगोलिक अर्थाने विचार केला तर मुंबईची कितीशी जमिन आज मराठी माणसाच्या ताब्यात आहे? इतिहासाचा विचार केला तर कोणता इतिहास त्याने जतन करुन ठेवला आहे, त्याचा अभिमान बाळगला आहे. विकासाशी निगडीत बोलायचं तर मुंबईच्या जडणघडणीत, वाढीत मराठी माणसांचा थेट किती हात आहे, आणि त्याचे पुरावे काय आहेत? मुंबईच्या सांस्कृतिक अंगानं विचार केला तर आज मनोरंजन, साहित्य, खाद्य, पोशाख या गोष्टींवर कितीसा मराठी प्रभाव आहे? परंपरेच्या अंगाने विचार केला तर मराठी माणसाच्या कोणत्या परंपरा आज तग धरुन आहेत? समाजकारणाच्या आधारे विचार केला तर प्रश्नं पडतो की उत्सवाच्या पलिकडे मराठी माणसांचं सामाजीक जीवन मुंबईत शिल्लक आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं अर्थकारण. यात मराठी माणसाचा किती सहभाग आहे. याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुर्तास मुंबईला कुणी डावावर लावली किंवा स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर मुंबईला कुणी विकायला काढली तर तिला विकत घ्यायची आज मराठी माणसाची लायकी आहे का ? राजकारण, सिनेमा, स्टॉक मार्केट, मॉल्स, उद्योग या अर्थकारणाला दिशा देणार्‍या गोष्टींवर मराठी माणसाचे निर्वीवाद वर्चस्व किती? याचा पडताळा घेतला तर असं लक्षात येतं की, मुंबई याआधी कितीतरी वर्ष ती परप्रांतीयाना मराठी माणसाने विकली आहे. ती विकल्याची पावती त्याच्याकडे नाही एवढंच.


भांडी घासायची हौस

पुर्वी गुजराती-मारवाडी मराठी माणसाला थेट म्हणायचे की, 'मुंबई तुमची...भांडी घासा आमची'. आजही आजूबाजूला पाहिलंत तर पटेल की वस्तुस्थीती आजूनही बदललेली नाही. मराठी चित्रपटात सुपरस्टार ठरलेले हिंदित जाऊन घरगडी बनतात. आजही कोणत्याही हिंदी सिरिअल मध्ये सखुबाईची भाषा घाटी-मराठीच असते. मराठी माणसाला भांडी घासायची एवढी हौस का हे कळत नाही. कोणत्याही उत्तरप्रदेशीय माणसाच्या बायका-लेकी-सुना दुसर्‍याची भांडी घासायला जात नाहीत, हे बाणेदार मराठी माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. आज कोणत्याही वस्त्तीत जा, अनेक मराठी माणसांच्या, दलितांच्या घरात तुम्हाला हेच चित्र प्रकर्शाने पहायला मिळेल की, आई-बहीणी चार घरची धुणी भांडी करताहेत. बाप उतरत्या वयातही वॉचमन किंवा इथे तिथे गावखात्यात मजूरी करतो आहे. आणि आपल्या बाळ्याला बाळं झाली तरी सगळ्यांचं पालनपोषण म्हातारे आईबापच करताहेत. अश्या थकलेल्या आईबापाची अजिबात चिंता न करता तरुण पोरं केसांना रंग लाऊन, कमरेवरुन खाली घसरणार्‍या जिनच्या पॅन्टस घालून आणि हातात, गळ्यात कचकडयाच्या माळा अडकवून उनाडक्या करताहेत.


मराठी माणसाठी ओळख

माझ्या माहितीतला एक गुजराती शेठ फक्त मराठी माणसानांच कामाला ठेवतो. त्याचा व्यापार कपडयाचा आहे. त्याचं म्हणनं हे की मराठी माणूस कामचुकार असला तरी, महत्त्वाकांक्षी नाही. त्याच्याकडे सकाळी दुकान उघडायची चावी दिली की तो तुमचा चमचा बनून राहतो. अधून मधून किंवा गरजेला ऍडव्हान्स दिला की तो तूमचा मांडलीक बनतो. तो पुढे जाऊन आपल्या बाजूला धंदा उघडेल याची कधीच भीती नसते. मराठी माणूस नोकरीत इमानदार, प्रामाणिक असतो. त्याची स्वप्न फार तोकडी असतात. पाळीव कुत्र्या-मांजराच्या खर्चातही एक मराठी कुटुंब सुखा-समाधानानं राहु शकतं.

आज मराठी माणसाला ओळखणं सोपं आहे. तो रस्त्यावर असला तर त्याच्या हातात दगड तरी असतो किंवा झेंडा तरी. वडापाव आणि एक बिसलेरीची बॉटल यावर तो दिवसभर घोषणा देऊ शकतो. तो कधीही कार्यकर्त्याच्याच वेशात वावरतो. ट्रेनमध्ये सेकंडक्लासच्या डब्यातच तो सापडतो. चकचकीत मॉलमध्ये विंडो शॉपीग करण्याशिवाय त्याला काही परवडत नाही. रात्री अकरानंतर भाजी खरेदी करायला त्याला आवडते. फळांमध्ये अजूनही तो आंबा, रामफळ, सफरचंदासारख्या फळांचा तो राग करतो. त्याचे चिकू, केळी आणि पेरुवर पुर्वीइतकेच प्रेम आहे. गगनचुंबी इमारतीकडे बघतांना तो अजूनही भांबावतो. शनीवार- रवीवारचा सिनेमा सोडाच त्याला इतरदिवशीही सिनेमा थियेटरमध्ये जाऊन बघणे जमत नाही. मच्छी मार्केटमध्ये आता त्याच्या आवडीच्या फक्त तिनच गोष्टी उरल्या आहेत त्या म्हणजे बोंबील, बांगडा आणि मांदेली.


प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: