Wednesday, January 27, 2010

शी...sss मराठी ?

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०

संवादामध्ये 'साधणे' हा हेतू असतो. असायला पाहिजे. मग आपण काय साधतो ? तर एखाद्या भाजीवाल्याकडून एखादी भाजी आपण स्वतात मिळवतो. एखाद्याला पत्ता विचारुन आपण नेमक्या ठिकाणी पोचतो. कुणाला प्रश्न विचारतो किंवा कुणाला उत्तर सांगतो. यासाठी आपण काही सर्वमान्य साधनं वापरतो. हावभाव, अंगविक्षेप किंवा हातवारे यानेही गोष्टी साधता येत असल्या तरीही या साधनांपेक्षा 'भाषा' हे संवादाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून आपण वापरतो. त्या साधनावरुन किंवा माध्यमावरुन सध्या महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस यांच्या मनात काही प्रश्न आहेत. यातल्या काही प्रश्नांची उत्तरे त्याच्याच म्हणजे मराठी माणसाच्या हातात आहेत.
भाषा म्हणजे काय?
भाषा केवळ संवादासाठी वापरण्यात येत असती तर मग आपण यावरुन इतर भाषिकांशी भांडतो कशाला ? याचा अर्थ भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही तर त्याचा संबध आपल्या रागलोभाशी आहे. अस्मितेशीही आहे. आपण कोण आहोत ? आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला भुगोल याचा संबध या भाषा नावाच्या गोष्टींशी असतो. आपली भाषा मराठी. मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते आजवर मराठी साहित्य, समाज, संस्कृतीच्या क्षेत्रात भर टाकणार्‍या महनीय व्यक्तींची आणि संस्थांची मांदीयाळी. त्यामुळे जेंव्हा या मांदीयाळीतील कोणत्याही एका घटकाचा अपमान व्हायला लागतो तेंव्हा तो आपल्या भाषेचा म्हणजे मराठीचा अपमान आहे असे आपण समजतो, आणि आपल्याला राग येतो. एका अर्थाने भाषेची जपणूक करणे म्हणजे अनेक अर्थाने या सार्‍याची जपणूक असा त्याचा अर्थ होतो.
आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राचा एक नकाशा आहे. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे आपण रोजचे जगतो-वागतो, जे व्यवहार करतो त्यासाठी माध्यम म्हणून कोणती भाषा वापरतो? म्हणजे कोणती भाषा वापरायला पाहिजे? अर्थातच मराठी...! मातृभाषा म्हणून मराठी बद्दल जे प्रेम महाराष्ट्रीय माणसाला वाटेल ते परभाषिकाला वाटेलच असे नाही. तसे प्रेम त्याला त्याच्या मातृभाषेविषयी असेल. तरीही परप्रांतातून येणार्‍या प्रत्येकाला तिथल्या स्थानीक भाषेचा किमान आदर असायलाच पाहिजे.
भाषेचा अभिमान म्हणजे काय ?
एखादा अमराठी माणूस मराठी बोलतो त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. तो त्याचं काम साधतो. जे भाषा या माध्यमाचा मुळ हेतू असतो. आपण मराठी आहोत, पण आपण मराठी बोलतो याचं कौतुक कोण करणार? तर कुणीच नाही. मग आपण सरळ इंग्रजी किंवा थेट हिंदीत सुरु होतो. आणि तिथुनच आपण आपल्याला फसवायला लागतो. एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलल्यामुळे व्यवहारात त्या भाषेचा वावर वाढतो. भाषा ती त वाढत जाणार्‍या शब्दा शब्दातून समृध्द होत जाते. इतर भाषाही ती आपल्यात सामावून घ्यायला लागते. बोलण्यात, लिहिण्यात ज्या भाषेचा जेवढा जास्तीत जास्त वापर होईल तेवढं तिचं आयुष्य वाढण्याची शक्यता जास्त होते. जेंव्हा आजुबाजूची सर्वच माणसं संवादासाठी एकच एक भाषा वापरतात तेंव्हा त्या भाषेच्या एकजिनसीपणामुळे त्या समाजाचा व्यवहार अधिक सहज, साधा, सुखकर आणि सोपा होतो. मग इथे मराठी अमराठी, महाराष्ट्रीय नॉन- महाराष्ट्रीय हा मुद्दा उरत नाही. इथून पुढे संवाद शक्य असतो (यात भाषेचा प्रश्न सोपा होतो भाषिकांचा कठीण होत जातो)
संधी मिळेल तेंव्हा आपण इतर भाषा किंवा भाषिकांचे विष्लेशण करायला हरकत नाही. पण वेळ मिळेल तेंव्हा, आपण आपल्याला आपल्या भाषेबद्दल वाटणारं प्रेम तपासून पहायला पाहिजे. आज मुंबईत बेस्ट बसेस मध्ये कंडक्टर्स(वाहक) आणि मासळी बाजारात कोळणी या दोनच जमाती मागे पुढे न बघता थेट मराठीतून सुरुवात करतात. बाकी झाडून सगळे हिंदीत उतरतात. हिंदी भाषेला तिला म्हणून तिचं एक सौंदर्य आहेच. पण आपण जेंव्हा तिला आपल्या घाटी, कोकणी सुरात घोळवतो, तेंव्हा भाषा म्हणून तिचाही आपण कचराच केलेला असतो. आपली भाषा आपल्याच बोलीत गोड वाटते. संवादच साधायचा आहे ना, मग करा ना आपल्या भाषेत सुरुवात. समोरच्याला असेल अडचण तर तर तो सांगेल किंवा शिकेल. पण ती त्याची अडचण असुदे. तुम्ही कशाला आपल्या भाषेला अडचणीत टाकताय. कारण भाषेच्या बाबतीत असं आहे की जी भाषा वापरली जाते तीच टिकते आणि जी वापरली जात नाही ती संपते सुध्द्दा.
मराठी पालक इंग्रजी बालक
आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतो. ठीक आहे. ती काळाची गरज आहे असं आपण समजू. भाषेच्या आदराचाच प्रश्न आहे तर इंग्रजीचाही करु. पण इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांचं कौतुक त्यांच्याच पालकांकडून ऐकतांना शिसारी येते. मुलं शाळेतच शिकतात असं नाही. कुटुंब, समाज, परिसर याच्याकडूनही ती शिकतच असतात. यातली अनेक मुलं रोजच्या व्यवहारातलं सुध्दा मराठी चुकीचं बोलतात. विशेषतः चुकीचे उच्चार करतात. करत राहतात, याला कारण त्यांच्या अश्या बोलण्याचं घरातुनच भारी कोडकौतूक केलं जातं. 'ट्वेल्व्ह ओ क्लॉक वाजले' यापेक्षा 'बारा वाजले' असं म्हणनं खरोखरच सोप आहे, तरी तसंच बोलतात. 'बाबा' ला 'पप्पा' किंवा 'डॅडी' म्हणतात 'आई' ला 'मम्मी' किंवा 'मॉम' म्हणतात. (आजीला आई म्हणण्याची फॅशन सध्या जोर धरते आहे) हे अश्यासाठी लिहिलंय की वाचतांना तरी कळेल, या शब्दांचे उच्चार मराठीत किती सोपे आहेत ते. या मुलांना 'टर्न' कळतं तर 'दीर्घ' कसं कळत नाही, हे समजणे कठीण जाते. प्रश्न असा आहे की प्रयत्नपुर्वक जिथं आपण दुसर्‍या भाषा शिकतो तिथं थोडयाश्या प्रयत्नात आपण आपली भाषा नीट वापरायला शिकण्यात काय हरकत आहे ?
ज्ञानेश्वरांची एखादी ओवी ऐका म्हणजे मराठी भाषेत किती गोडवा आहे हे जाणवेल. तुकारामांचा एखादा अभंग ऐका म्हणजे मराठी भाषा किती थेट आहे हे कळेल. गोविंदाग्रज, बालकवी, कुसुमाग्रज किंवा पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी वाचा म्हणजे मराठी भाषेतलं सौदर्य कळेल. जे आपलं आहे ते बिनधास्त आपलं म्हणायला शिका.

प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

No comments: