Sunday, May 23, 2010
दादर स्टेशन
मु.पो. दादर स्टेशन. मुंबईचं हार्ट. दादरची सफर म्हणजे मुंबईकरासाठी एक विरंगुळा, आनंद. कुणीही कुणाला सहज भेटण्याचं ठिकाण म्हणजे दादर. दादर चौपाटी, शिवाजी पार्क, प्लाझा, कबूतर खाना, कोतवाल गार्डन, शिवाजी मंदीर, टिळक ब्रीज, हिंदू कॉलनी, किर्ती कॉलेज, शारदा टॉकीज, पोर्तुगीज चर्च, मामा काणेंच उपहारगृह, शिवसेना भवन, आयडीयल, श्रीकृष्ण वडेवाला, सुविधा, हनुमान मंदीर, लक्ष्मी नारायणाचं जैन मंदीर, कैलास लस्सी ही दादरची आयकॉन्स. या ठिकाणाचं नाव घेतलं तरी त्याचं चित्र त्याच्या वैशिष्टयांसह डोळ्यासमोर उभं राहतं.
तरीही या सर्वांवर कडी म्हणजे दादर स्टेशन. दादर स्टेशन म्हणजे गर्दी. अखंड वाहणारी, काही ठिकाणी थबकणारी, सरपटणारी, रेंगाळणारी, वाट पाहणारी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड गर्दीचं वारुळ दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, पायर्यांवर वळवळत असतं. संध्याकाळच्या सुमारास आपल्याला हव्या त्या माणसाचे वाट पाहणारे चेहरे आणि तो माणूस दिसल्यावर फुललेले, लटक्या रागातले, वाट पाहुन हिरमुसलेले, कातावलेले कित्तेक चेहरे प्लॅटफॉर्मनं पाहिले असतील. त्याची मोजदाद त्यालाच.
मुंबईत स्टेशनं अनेक असली तरी सगळ्यांच्या तुलनेत दादर स्टेशनला एक प्रकारचं निराळेपण आहे, उभं आडवं पसरलेलं हे स्टेशन भव्यतेच्या अंगानं सगळ्या स्टेशनांना जड जाईल. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडणारा मधला पूल दिवसभर प्रचंड गर्दीच्या भारानं थरथरत तर रात्री निपचीत पडलेला पाहताना फारच केविलवाणा दिसतो.
रात्र वाढायला लागते तसा दादर स्टेशनला एक निराळा रंग चढायला लागतो. रात्री बाराच्या पुढे ट्रेन पकडण्याची लगभग वाढते. घराची ओढ माणसाला चालत्या गाडीकडेही खेचते. त्यात कुणी कधी टाकलेली असली तर त्याची ती फरफट बघवत नाही. डोळयांवर वाढत चाललेली पेंग, दोन ट्रेन मधलं वाढत चाललेलं अंतर. माणसांच्या चेहर्यावर वैताग पसरलेला असतो. सुरक्षेच्या कारणावरुन हल्ली माणसांना रात्री दादर स्टेशनाच्या आवारात थांबायला बंदी असते. दोन रेल्वे पोलीस एवढया गर्दीसाठी पुरे पडतात. पोलिसाची नजर, हातातला दांडा, आणि आवाज त्या गर्दीला दिशा देत राहतो. रात्री १.११ ला चर्चगेटहुन दादरला येणारी विरार आणि १.२१ ला बोरीवलीसाठी शेवटची ट्रेन असते. तेंव्हा एक आवाज आपल्याला खेचुन घेतो तो असतो श्रीमती गिते यांचा. युनीफॉर्ममध्ये असतात म्हणूस त्या पोलीस नाहीतर, आईच्या आवाजातला हा आवाज दरडावत, विनंती करीत राहतो की, ही शेवटची ट्रेन आहे. शेवटची ट्रेन आहे.
ट्रेन चुकल्यावरची पंधरा-वीस मिनीटे उरलेल्या वाटसरुना त्यांनी समजावतांना, खडसावतांना पाहणं हा एक सोहळाच. त्यांच्यासोबत असतात ते शेख नावाचे रेल्वे पोलीस. एका बाजूला चुकलेल्या वाटसरुंची काळजी आणि शिस्तीच्या, सुरक्षेच्या नावाखाली त्यानां तिथं थांबूही न देणं यातली तगमग बघण्यासारखी असते. आता तुम्ही कुठे थांबाल, काय खाल, सकाळची पहिली ट्रेन कधी असते याची ते माहीती अभावितपणे पुरवीत राहतात.
ट्रेन चुकली. आता प्रत्येकालाच माहीत असतं आता सकाळी ४.३१ शिवाय पर्याय नाही. आता सगळे प्लॅटफॉर्म्स सुनसान होतात. आणि उरलेली गर्दी दादर इस्ट-वेस्ट रेंगाळत राहते. काही सरळ कोतवाल गार्डन गाठतात. काही सुविधाच्या, काही इतर दुकानांच्या पायर्यांवर पसरतात. काही लोक स्टेशनची रात्रभर सोबत करीत राहतात. त्यात वडेवाला, चहावाला, मॉलीशवाला, पेपरवाला, पानवाला, बुर्जीपाववाला, हारवाला, मलईवाला, दिवसभर कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पाने विकणार्या बाया, भिकारी, गर्दुल्ले, हमाल, छक्के, शौकीन आणि काही पोलीसवाले असतात.
उतरत्या वयाची एखाद दुसरी बाई धंद्यासाठी गिर्हाईक शोधतांना दिसते. पोलिस स्टेशन परिसरात उभं रहायला देत नाहीत. म्हणून आता त्यातल्या काही बाया शिवाजी पार्क (हो तेच ते शिवतिर्थ) मध्ये काळोखात बसून आपली कामं करीत असतात. भिकारी,गर्दुल्ले खाण्याच्या गाडीवर तुटून पडलेल्या गिर्हाईकांचे शर्ट पॅन्ट खेचत असतात. तासा-दोन तासांनी अधून मधून कुणीतरी गर्दुल्यांच्या पेकाटात लात घालतो आहे. तो खाली केकाटतो आहे, आणि पब्लिक फिदिफिदी हसतं आहे. हे चित्र पहायला मिळतं. छक्के तिन चार जणांच्या घोळक्यात फिरतांना दिसतात. ते पैसे मागतांना दिसले नाहीत. पण खाण्यापिण्याच्या स्टॉलवर मध्येच एखाद्या पदार्थावर हात मारतांना त्यामुळे स्टॉलमालकाशी हुज्जत घालतांना दिसत होत. ठाणे जिल्ह्यातून आदिवासी पाड्यावरुन कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पानं विकायला आलेल्या बाया रांगेत अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात.
रात्री अडीचच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर एक वर असलेला खाण्याचा स्टॉल सगळं आवरुन बंद होतो. त्यानंतर तिथल्या लोकांचं जेवण. झोपणं. पुन्हा सकाळी साडेतीनच्या सुमारास हे पुन्हा दुसर्या दिवसाची जुळवाजुळव करायला तयार असतात.
दिवस-रात्र प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या घडामोडी टिपून घेणारा कॅमेरा सुनसान रात्री आपली नजर वेधून घेतो. गर्दीत असतांना तो तिथेच असला तरी आपल्याला फारसा दिसत नाही. पण त्याच्या नजरेतून आपण निसटणं अशक्य. तो मात्र सगळ्या गर्दीवर आपली कडी नजर रोखून असतो. दिवसभर येणाजाणार्या ट्रेनसाठी नेमानं हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची उघडझाप करणारे सिग्नल्स फक्त रात्री लाल होउन निपचित असतात, काळोखाच्या कॅनव्हासवर ते फारच भेसूर आणि भीतीदायक वाटतं.
साठीतला पांढर्या मळकट लेंगा-सदर्यातला, पांढर्या दाढीची खूंट वाढलेला, गालफाडं बसलेला एक मराठी माणूस इथे गेली २५ वर्षे मॉलीश करतो. दादर स्टेशन पच्छिमच्या आवारात दोन-चार मॉलीशच्या बाटल्या हातात आणि पाठीवर कापडी पिशवी घेऊन फिरत असतो. आपल्या चेहर्याकडे बघून तो मॉलीश करणार का म्हणून विचारतो. त्याला मॉलीश करतांना बघीतलं तर आयुष्यातला सगळा व्याप-ताप तो त्याच्याखाली झोपलेल्या माणसावर काढतो आहे असं वाटतं. १०० रुपयात तो तुम्हाला नखशिखांत रगडतो.
विषेशतः लांबपल्ल्याच्या रेल्वेत गाडी सुरु होण्यापुर्वी हातात फडका किंवा झडलेला झाडू घेऊन काही पोरं दिसतात, तशी दोन पोरं रेल्वेच्या पायर्यांवर काही झाडतांना दिसली. कुतुहल म्हणूण विचारलं, तर ते कामगार होते. ३०००/- रुपये मासिक पगार असलेली ही मुलं रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत इथे काम करतात. पान, गुटखा, तंबाखू, उलटया, लघवी करुन चिकट आणि चिवट झालेल्या रंगीत जागा खरवडण्याचं काम ते करतात.
पहाटे तिनच्या सुमारास स्टेशनच्या पायर्यांवर पेंगत बसलेली पन्नास-साठ माणसं. पाठ जमिनीला टेकून झोपण्यातलं सुख काय असतं ते हे चित्र पाहिल्यावर समजतं. आपलं सामान सांभाळत झोप जागती ठेवत डोळे मिटणं. कलंडणारी मान, पायांच्या गुढग्यावरुन निसटणारे हात आणि झेपावणारं शरीर सांभाळत रात्र सरण्याची वाट पाहणं. हे दृष्य फार केविलवाणं होतं.
साडेतीन रुपये एमआरपी असलेला बनपाव दहा रुपयात विकणारा एक भय्या सांगत होता, धंद्यात आता मजा नाही. तरीही पाचशेच्या खाली त्याचा धंदा नसावा. चारच्या सुमारास दादरची आठवण आली म्हणून आलेला एक नाटकवाला म्हटला, रेल्वे बॉम्बस्फोटा नंतर दादरचा चेहराच बदलला. उमेदिच्या कित्तेक रात्री त्यानं दादर स्टेशनवर काढल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं सुरक्षेच्या नावाखाली दादरचं स्वैर स्वातंत्र्यच मरुन गेलं आहे. आता पहिल्यासारखी मजा नाही.
सिटी पोलीस इथंही आपलं काम नित्यनेमानं करतांना दिसत होते. पण ते प्रत्येक धंदेवाल्याकडे जात नव्हते. कामत हॉटेलच्या कॉर्नरवर व्हॅन उभी होती. धंदेवाल्यापैकी एक तरतरीत भय्या होता. तो हेच काम करीत असावा. कारण तो कोणत्याही धंद्यावर स्थीर उभा नव्हता. पण प्रत्येक धंदेवाल्याकडून १०-२० रुपये गोळा करुन त्याची पुरचुंडी करुन पोलीसाना देऊन आला. काय विचारलं तर त्यानं हसून फक्त चॅक असं केलं.
सकाळी चारच्या आसपास पुन्हा लगभग सुरु होते. ती चाहुल असते दिवस सुरु होण्याची. पुन्हा ताजेतवाजे होऊन पुन्हा ट्रेन मध्ये चढतात काही झिंगलेले, मरगळलेले काही फ्रेश, कडक चेहरे.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
तुंबलेल्या तुतार्या
अगदी आठवडयाच्या अंतरावर एक मे येऊन ठेपला (इथे मराठी माणसाने उभा ठाकला आहे असे वाचावे) आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीचा हा पन्नासावा वाढदिवस. पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणतात. पुन्हा अशी पन्नास वर्ष कधीच येणार नाहीत. नंतर एकदम साठ, पंच्याहत्तर आणि शंभर. मग त्यानंतर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे साजरा होईल तेव्हा होईल . त्यामुळे आत्ताच महाराष्ट्राच्या परंपरेला साजेश्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ढोल ताश्यांच्या वाद्या ओढल्या जात आहेत. रात्री अपरात्री लेझीमची तालीम सुरु आहे. बँजो पार्ट्या आधूनीक ढिंग्चँग गाण्यांची प्रॅक्टीस करताहेत. डिजेवाले रिमिक्स गाण्यांच्या सिडीज गोळा करत आहेत. पताका कापायचा त्रास नको म्हणून चायनीस बल्बच्या झिगझॅग माळा बिल्डींगीवर, गच्चीत, खिडक्यात, झाडां-झुडपांवर सोडल्या जात आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसाच्या छातीत उत्साहाला उधाण आले आहे.
यावेळी खरंतर शोभायात्रेला हत्तीच हवे होते. अंबारीतून संत ज्ञानेश्वर, तूकाराम-रामदास, शिवाजी महाराज आणि शक्य झाल्यास अत्रे, डांगे, एसेम, बापट,अमरशेख यांचे फोटो. बाजूला स्वच्छ -सफेद कपडयात स्थानीक नगरसेवक किंवा आमदार खासदार यांची मिरवणूक करण्याचे घाटत होते. पण हत्ती बजेटच्या बाहेर म्हणून कॅटरर्स कडून घोडे, खेचर आणि बैल यांची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत. घोडयांचे, बैलांचे मालक भैयाच असतात. त्यांना मराठीतूनच बोलण्याच्या विषेश सुचना देण्यात आल्या आहेत. फटाके, ढोल-ताशे-लेझीम या न बुजण्यार्या धीट प्राण्यांची निवड केली जात आहे. शोभायात्रेचे मार्ग आखण्यात येत आहेत. बैलगाडी किंवा ट्रकावर उभे करण्यासाठी देखावे तयार केले जात आहेत. त्यालाच चित्ररथ म्हणण्याची परंपरा आहे. पोरांना दाढया-मिशा लावून मावळ्यांच्या वेशात उभे कसे रहावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही मुले कंटाळतातच म्हणून त्यांच्यासाठी विषेश वडापाव आणि थंडा याची सोय लावण्यात आली आहे. यात भाग घेणार्या मुलांच्या पालकांनीच आपापला खर्च करायचा आहे. शक्यतो मावळ्यानी गॉगल वैगेरे वापरु नये याची काळजी घेतली जाईलच. पण उन्हाचा कहर लक्षात घेता असे नियम शिथील केले जातील. नागरीकांसाठी पिंप भरभरून लिंबू किंवा रसना सरबत फूकट वाटण्यात येणार आहेत.
तुतार्या वाजवून वाजवून काही जणांचे गाल फाटून गेले आहेत. त्यामुळे या धंद्यात आता फारसे लोक नाहीत. आणि पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने नवीनही पिढी तयार होत नाही. तरीही या दिवसाचे विषेश महत्व लक्षात घेता स्पिकरवरच रेडिमेड तुतारीची धून वाजवण्याची व्यवस्था केली आहे. स्टेजवर सर्व प्रमुख पाहुणे बसेपर्यंत आणि शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला हार घाले पर्यंत ती कितीही वेळेला रिपिट वाजवता येईल. यावेळी या दिवशी स्पिकरवर फक्त मराठमोळी गाणी (विशेषतः महाराष्ट्र गीते, भक्तीगीते वैगेरे) वाजवण्यावर भर असेल. तरीही तरुण सळसळत्या रक्ताचा हिरमोड नको म्हणून काही रिमिक्स गाण्यांचा शिडकावा अधून मधून करण्यात येईलच याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. काही मंडळानी खास मराठीचा अभिमान सांगणार्या ओळींचे टीशर्टस छापून घेतले आहेत. त्या टिशर्ट्सच्या मागे स्पॉन्सरर स्थानीक आमदार-नगरसेवकाचे सौजन्य म्हणून नाव छापले जाणार आहे.
शोभायात्रेत सहभागी होणार्या पुरुषांना झब्बे, लेंगे,फेटे कम्पल्सरी केले आहेत. ब्रेसलेट्स, चैनी, चामडयाच्या पांढर्या चपला, मोजडी अश्या वस्तूंचे खास आपापल्या स्तरावर प्रदर्शन करावे अश्या सुचना आहेत. लहान मुलांसाठी रेडीमेड धोतरे, फेटे किंवा रिबीनींची सोय करण्यात त्यांचे त्यांचे आई बाबा (स्वारी...मम्मी-पप्पा) गुंतले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्यां काढण्यात येणार आहेत, गेटवर झावळ्या तोरणे लावण्यात येणार आहेत. सत्यनारायणाची पुजा असणारच. त्यासाठी नवदांपत्याची, भटजींची शोधाशोध सुरु आहे.
आपापल्या एरियात जबरदस्तीची रक्तदान शिबीरे, मोफत चश्मा शिबीरे, मोफत वह्या वाटपाचे समाजीक कार्य करण्याचे योजीले आहे. त्यासाठी आगाऊ नावनोंदणी सूरु आहे. यानिमित्ताने दहावी-बारावीत पहिल्या आलेल्या मुलांचे कौतूक खास पेंसिल बॉक्स आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात येणार आहे. याच ठिकाणी नापास झालेल्या मुलांना धीर देण्यासाठी अपयश हीच यशाची पहिली पायरी कशी आहे याची सोदाहरण माहीती देण्यात येणार आहे. बाकी खेळ, चित्रकला किंवा तत्सम प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचेही कौतूक करण्यात येणार आहे. जेष्ट नागरीकांचा (उगाचच) शाल देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
खास ओवाळणी साठीच्या बाया नऊवारी साडयांवर मॅचींग सेट्स शोधण्यात गर्क आहेत. कपाळावरची चंद्रकोर, नथ, आंबाडा, हिरवा चुडा वैगेरे मराठमोळा साज. भरीला मेहंदी, फेशीअल, ल्बीचींग, आयब्रो आणि खिडूकमिडूक मेकअपचे सामान जुळवण्यात त्या मग्न आहेत. आयत्या वेळेला गजरे आणायचे कुणी, कुणाला ओवाळायचे कुणी, पदर डोक्यावरुन घ्यावा की खांद्यापर्यंतच बस याचे जोरदार प्लॅनींग सुरु आहे. त्यात ओवाळणीचे फोटो काढायचे कुणी याचीही आखणी चालू आहे. हल्ली डिजीटल कॅमेरा मुळे रोल भरण्याचा ताप नसतो. तरीही मशीनचा काय भरवसा म्हणून जोडीला मोबाईल्स सुध्दा तयार ठेवले जात आहेत.
शिवाजी महाराजांचे पुतळे पुसले- धुतले जात आहेत, गरज भासल्यास रंगवले, मागवले जात आहेत. महाराजांसाठी चंदनाच्या पर्मनंट हारांची ऑर्डर गेली आहे, आणि तो हार गळ्यात टिकावा म्हणून महाराज्यांच्या खांद्यावर खिळे ठोकले जात आहेत. आपापला एक पुतळा असावा यासाठी सगळीच मंडळे प्रयत्नशील असतात, तरीही तो आयत्यावेळी कुठे मिळतो याची कार्यकर्त्यांना पक्की माहीती असते. (काही लोकांना पुतळे, तलवारी, ढाली यांचीच गीफ्ट्स येत असतात) तशी चौकशी चालू आहे. तरीही प्रत्येकजण प्रत्येक पायरीवर खात्री करुन घेतो आहे. कारण यावेळी सगळं असलं आणि एकटे महाराज नसले तर सगळ्या कार्यक्रमाचा विचका होऊ शकतो. याची मराठी माणसाला जाण आहे.
काल-परवापर्यंत अनेकांना माहीत नसलेला हा दिवस उद्या एकदम दैदिप्यमान प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. या निमित्ताने मेलेल्या एकशे सहा माणसांचे स्मरण केले जाईल. त्या लढ्यात मेलेल्या माणसांपैकी कुणाचेही नाव कुणालाच माहीत नसते. फक्त मेले ते एकशे पाच की सहा येवढयाच माहीतीवर सभा गाजवल्या जातील. मेलेल्यांच्या नावानं शपथा घातल्या जातील. अत्रेंचे चार-दोन किस्से सांगून, स.का.पाटील, मोरारजीना शिव्या घालून दिवस पार पडेल. मराठी माणसांची कानशिले जरा गरम होतील. हाता- पायात झिणझिण्या येतील. जरा या निमित्ताने तुंबलेल्या तुतार्या मोकळ्या होतील.
सकाळी उठल्यावर (किंवा उतरल्यावर) मराठी माणूस गुलालाने माखलेल्या झब्या-लेंग्याकडे, विस्कटलेल्या रांगोळ्यांकडे, मलूल झालेल्या फुलांच्या माळांकडे, लटकलेल्या तोरणांकडे, निपचित चिकचिकत असलेल्या चायनीज बल्बकडे पहात मनातल्या मनात म्हणेल, अरे याचा काय संबध? महाराष्ट्र पन्नास वर्षाचा झाला म्हणजे किती खर्च झाला ...!!!
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
Sunday, April 18, 2010
वडाप
एसटी यायला अजून अर्धा-एक तास अवकाश होता. समोर जीपवाला मला ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचंच नाव घेऊन ओरडत होता. इलाज नव्हता. ड्रायव्हर शेजारची सीट म्हणून बसलो. दहाएक मिनिटात, 'भाऊ सरका' म्हणून शेजारी अजून दोन माणसं येऊन बसली. सरकलो. त्यामुळे त्यात अजून एक ऍडजस्ट झाला. ड्रायव्हर बसायचा होता. त्याच्या जागी दोघेजण येऊन बसले. मागून- पुढुन-वरुन-बाजूनं लोकं जीपमध्ये, टपावर, बोनेटवर सहज चढत होती. त्यात पुरुष होते, बाया होत्या, मुलं होती. गाठोडी-बोचकी होती. काठया-कुठया-सामान होतं.
कुणालाच काही वाटत नव्हतं. उलट माणसंच एकमेकांना आत- वर ओढत होती. आपसात एकमेकांना जागा करुन देत होती. म्हणून मीही त्यातलाच एक बनून नीपचीत बसलो होतो. ड्रायव्हर तिरका बसला. गाडी सुरु झाली. हवा लागली. बरं वाटलं. एक हलकासा गलका झाला. दहा फुटातच जीपने चौथा गिअर गाठला होता. 'खंडेरायाच्या लग्नात' च्या तालावर जीपने सुसाट वेग पकडला. जीपच्या हेलकाव्यासोबत माणसं हिंदकळत होती. रस्त्यातले अडथळे, खडडे-बिडडे चुकवत सराईतासारखी जीप निघाली. मध्येच कुठेही काही माणसं उतरत होती. काही चढत होती. सरते शेवटी शेवटच्या गावाच्या नाक्यावर गाडी थांबली. भराभरा सगळी जीप खाली झाली. गंम्मत म्हणून एकूण माणसं मोजली. ती चाळीसेक असावीत. वन प्लस फोर ची कपॅसीटी असलेल्या जीपमध्ये दहापट अधीक माणसं चढली होती.
या गर्दीची जीपला, ड्रायव्हरला, पॅसेंजरना सवय झाली होती. मी रिकाम्या जीपकडे एकवार वळून पाह्यलं आणि पुढं चालता झालो. या प्रकाराला 'वडाप' म्हणतात. एसटीला पर्याय म्हणून सुरु झालेलं वडाप आता प्रवासाचे मुख्य साधन बनून राहीले आहे. थातूर-मातूर कारवाई शिवाय आता वडापाला पर्याय नाही. गावात राहणार्याला, वडापातून प्रवास करणार्याला आता या प्रकाराची चांगलीच सवय झालीय.
मुंबईची अनेक ठिकाणांची, प्रवासाच्या साधनांची अवस्था या वडापापेक्षाही भयंकर झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मुंबईकराला सवय झाली आहे. कितीही पर्याय आले तरी मुळ प्रश्न सुटत नाही. याला कारण गर्दी. अखंड वाढत जाणारी गर्दी.
मुंबईत सकाळ संध्याकाळ, खरंतर कोणत्याही वेळेची रेल्वे. रेल्वेचे प्लॅटफॉर्म. गर्दीच्या विळख्यात आक्रसून, दबून गेलेले असतात. खुराडयात कोंबल्यासारखी रेल्वेत माणसं एकमेकांत घुसत असतात. सुटणार्या पहिल्याच स्थानकातही चौथी सीट मिळेनाशी झाली आहे. दोन सीट्स मधल्या जागा, जुळलेल्या दोन डब्यांच्या मधल्या जागा, रेल्वेच्या छतावर, दरवाजात माणसंच माणसं लोंबकाळतांना दिसतात. दरवाजावर तळपायाच्या चौडयावर उभं राहुन माणसं आपल्या जीवाशी खेळत असतात. कधी काही आपला जीव गमावतातही. पण मरणार्यालाच दोन शिव्या देऊन माणसं आपल्या नित्यकर्माला जुंपली जातात. काळ, काम आणि वेगाच्या चक्रात अडकलेल्या माणसांना याचीही सवय झाली आहे.
बेस्टच्या बसेसचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. १९ प्रवासी उभे राहु शकतात असं लिहिलेल्या ठिकाणी याच्याही चारपट उभे राहुन माणसं प्रवास करीत असतात. इथं शिव्या खायला द्यायला भांडायला ड्रायव्हर- कंडक्टर असतो एवढंच.
रेल्वेस्टेशन जवळचे रिक्षा- टॅक्सीवाले. गर्दीत गर्दी कशी वाढवायची ते यांच्याकडून शिकावं. ऐन गर्दीच्या भरात यांची माणसांच्या अंगावर धाऊन जाण्याची स्पर्धा लागली असावी असं वाटतं. कुणाला चुकुन धक्का लागलाच तर एकमेकांनी एकमेकांना हिंदीत चार-दोन शिव्या द्यायच्या आणि पुढं व्हायचं एवढंच. पाहिजे तेंव्हा रिक्षा-टॅक्सी न मिळणं. दिसली तर न थांबणं, थांबली तर आपल्याला पाहिजे तिथे यायला न निघणं, निघाली तर ट्रॅफीकमध्ये फसणं. याचीही आता सवय झाली आहे. एअरपोर्ट सारख्या परिसरात रिक्षा-टॅक्सींनी तासनतास प्रवाश्यांची वाट बघत बसणं तसंच अनेक ठिकाणी प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सीचीही वाट बघत बसणं हे दुर्दैवी चित्रही आता सवयीचं झालंय.
फुटपाथ वर पहिला हक्क पादचार्यांचा...वैगेरे...वैगेरे... तसे कायदेही आहेत. स्टेशन लगतच्या उघडया प्रत्येक फुटपाथचा ताबा फेरीवाल्यांनी, फळ-भाजीवाल्यानी केंव्हाच घेतला आहे. कायद्याला, विशेषतः कायद्याच्या रक्षकांना यानी फाटयावर मारलेलं आहे. शक्य तिथे खरेदी केलेलं आहे. त्यामुळे रस्ते आक्रसून गेले आहेत. गाडी पार्क करुन भाजी घेणारे, तिथेच ग्राहकांची वाट पाहणारे रिक्षावाले. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असे रस्ते ओव्हरलोडेड असतात.
सकाळ-संध्याकाळी रस्ते, हायवेज, ब्रीज तुडूंब असतात. फुटाच्या अंतरावरुन गाडया एकामागून एक रांगत-सरकत असतात. एक-एक किलोमिटर पर्यंत तुरळक बेस्टच्या बसेस, क्वचीत ट्रक, टॅम्पो. अधुन मधून रिक्षा-टॅक्सीज आणि अगणीत कार्स हे कोणत्याही हायवेवरचं चित्र. कोणत्याही वेळेत अवकाशातून घेतलेला फोटा एकसारखा येईल एवढं साम्य या चित्रात दिसेल. हायवेवर गर्दी असते गाडयांची. माणसांची असतेच असे नाही. रस्त्यावरच्या अनेक गाडयात एखाद दुसरा माणूस बसलेला दिसेल. ड्रायव्हर जर स्वतःच मालक असेल तर एकटाच, अन्यतः मागच्या सिटवर एखादा माणूस असं चित्र हमखास पहायला मिळतं. साधारणत: दिडशे माणसांसाठी शंभर गाडया असं विलासी चित्र म्हणजे हायवेवरची गर्दी. एकावरुन चार पदरापर्यंत वाढलेले रस्ते. ठिकठिकाणी बांधलेले ब्रीज. तरीही रस्त्यावरच्या गाडयांची गर्दी आटोक्यात येत नाही. पण याचीही आता सवय झाली आहे.
माणसं आर्थीक स्थराचं जसं जसं एक एक अंतर पार करतात तसंतसं ती प्रवासासाठीचं वहान बदलतात. बहुदा सुरुवातीला पायी किंवा सायकल, मग पुढे रेल्वे किंवा बस, रेल्वे-बसकडून रिक्षा-टॅक्सी, क्वचीत बाईक. रिक्षा-टॅक्सी कडून कार, मग छोटया कारकडून मोठया- लग्झरी कार, नंतर एका पेक्षा अनेक कार हा प्रवास अखंड चालू असतो.
आपण रेल्वेत घुसमटलेलो असतांना, बसमध्ये हेलपाटत असतांना, रस्त्यावच्या ट्रफीक मध्ये फसलेलो असतांना, रस्त्यावर चालतांना अडखळलेले असतांना मनातल्या मनात आंणि हिंम्मत आणि शक्य असेल तर कुणाच्या अंगावर जातो, कुणाशी भांडतो, कुणाशी हुज्जत घालतो. अगदीच शेवटचं म्हणजे अधिकार्यांची, पोलीसांची, सरकारची भीती दाखवतो आणि घरी परततो.
आपल्याला माहिती आहे का? लोकसंखेच्या बाबतीत मुंबईचा इतर शहरांच्या तुलनेत जगात दुसरा तर देशात पहिला क्रमांक लागतो. इथे २०१० मध्ये लोकसंखेची घनता १३,८३०,८८४ इतकी आहे जी दहा वर्षांपुर्वी ११,९७८,४५० इतकी होती. मुंबईचे क्षेत्रफळ ६०३ कि.मी. त्यात प्रत्येक चौरस मितीमध्ये २२,९३७ माणसं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असावं की बस्-रेल्वे किंवा रस्त्याचं सोडा तर अख्ख्या मुंबईचच वडाप झालेलं आहे!
वडापातून खाली उतरल्यावर आपला आणि वडापाचा संबध जसा तुटलेला असतो. तसंच इथंही असतं. आपण त्या परस्थीतीच्या गोतावळ्यात जेंव्हा अडकलेलो असतो आणि त्या परस्थीतीशी आपला थेट संबध असतो तेंव्हाच आपण ती गोष्ट मनाला लाऊन घेतो. अन्यतः आपणही मुक्त, निर्वीकार, उनाड पक्षी असतो. आपापल्या मोकळ्या जागा शोधत झेपेल तेवढं उडत असतो.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
असेल माझा हरी...!
गेल्या काही लेखांची प्रतिक्रिया म्हणून काही वाचकांनी फोन करुन, एमेल पाठवून, शक्य असल्यास भेटून स्पष्टपणाने म्हटलं होतं की, आता काही तरी उपायाचं लिहा. केवळ मराठी माणसाच्या गुणदोष सांगू नका. ते आमचेच आहेत, ते आम्हाला माहीत आहेत. पण आपल्याला माहितीच आहे की, थेट उपचार करण्याआधी काही तपासण्या कराव्या लागतात. बहुतेक वेळा त्याचा रिपोर्ट नॉर्मलच येतो, हे माहीत असतांना देखील तसं करावं लागतं. आणि जुनाट आजारात तर त्या तपासण्या कराव्याच लागतात. कारण काही आजार रक्तात किंवा हाडामासात भिनलेले असतात. त्यावर केवळ वरवरचे उपचार किंवा मलमपटटी करुन काही होत नाही. एका अर्थाने मराठी माणसांच्या मनातली राग आणि आगही तपासण्यासाठी या तपासण्या चालू होत्या. आता उपचाराचं बोलू.
मराठी माणसाला अनेक आजार आहेत. त्यातला भयंकर आजार म्हणजे स्थानीक किंवा याहून सोप्पा आणि भावनीक शब्द म्हणजे 'भूमीपुत्र' असण्याचा. आजूबाजूच्या वातावरणात थोडा बदल झाला की तब्बेत बिघडते असं त्या आजाराचं असतं. अश्या आजारात आजार्याच्या हातात काहीच नसतं. किंबहुना यात आजारी माणूस आपली रोगप्रतीकारक शक्ती कमी आहे हे कधी मान्यच करीत नाही. तर तो कायम पाऊस, उन,थंडी, वारा यांना दोष देत बसतो. त्यामूळं मूळ रोग राहतो बाजूला. याला त्याला दोष देण्यातच सगळी हयात निघून जाते. हा आजार बर्याच प्रमाणात संसर्गजन्य असतो. त्यामूळं त्याची लागण भरभर होते. आपण सगळे सारखे आणि एक आहोत असं वाटायला लागतं. आणि मला जो आजार आहे तोच तूलाही आहे असं म्हणून जो एक मानसिक आधार वाटतो तो या आजारात जास्त प्रमाणात आढळतो. मराठी माणसांमधे या रोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे.
स्थानीक आणि स्थलांतरीत
स्थानीकांपेक्षा स्थलांतरीत माणसं व्यवसाय करतात. स्थानीक त्यांच्याकडे नोकरी करतात, असा सार्वत्रीक अनुभव आहे. म्हणजे मराठी माणसाने गुजरातमध्ये जाऊन एखादा कारखाना काढला तर त्याच्याकडे मजूरी करणारे गुजरातीच (कदाचीत युपी-बिहारी) असतील. त्यामुळे थोडया काळासाठी आपणही इथे स्थलांरतीत आहोत असं मानुया. महाराष्ट्राच्या एकूण जिल्ह्यांचा विचार केला तर आपणही मुंबई किंवा मुंबई उपनगर या जिल्हयामध्ये कधी ना कधी स्थलांतरीत झालो आहोत, हे लक्षात असुद्या. म्हणजे काम सोपं होतं. झालाच तर थोडा रागही शांत होतो. कारण या सगळ्याचा शेवट व्यवसायाची व्हावा असं वाटतं. कारण व्यवसाय करणाराच जास्त श्रीमंत होतो. आपल्याला हवी ती वस्तू विकत घेण्याच्या आणि विकण्याच्या शक्तीवरच तुमची योग्यायोग्यता ठरत असते. जरा स्वतःकडे पहा, आज मी यातलं काय करु शकतो हे तपासून घ्या. तुमच्या वाटयाला आलेल्या अर्थकारणावरच तुमचं आयुष्य अवलंबून असतं.
मुंबईत गुजराती विषेशतः मारवाडी माणसं एकमेकांना मदत करतात. धंद्यामध्ये एखाद्याला पैशाची मदत हवी असल्यास पैशाची मदत देतात. उधारी हवी असल्यास उधारी देतात. कर्ज हवे असल्यास कर्ज देतात. कुणाला शब्द टाकायचा असल्यास तसं करतात. मराठी माणूस असं करीत नाही असं नाही. पण ते कोण करतात हे तूम्ही समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसांना अनंत भालेकर मदत करतात आणि माधवराव भीडे मदत करायला सांगतात, हे मला माहीत आहे.
मराठी माणसाला त्याचेच मित्र, नातेवाईक, भाऊबंद, आईवडील धंदा सुरु करायला मदत करीत नाहीतच. पण एखादा माणूस जर धंद्यात डूबला असेल त्याला तर त्याला पुन्हा उभं रहायला अजिबातच मदत करत नाहीत. अशावेळेला, बघ तूला सांगत होतो ना... इथपासून सुरु होणारे सगळे डोस त्याला पाजले जातात. मराठी माणसं फक्त कुणाला हॉस्पीटलमध्ये ऍडमीट करायला किंवा एखाद्याला लग्नकार्याला एकमेकांना पैसे देतात. यापलिकडे मदत करण्याची त्याची भावना नसते.
उद्योग- व्यवसाय कारणारा माणूस हा सहजासहजी आपला व्यवसाय वाढवत नसतो. व्यवसाय म्हणजे असंख्य अडथळ्यांची शर्यत असते. व्यवसायात माणसाच्या सगळ्या गुण-अवगुणांचा कस लागतो. त्यालाही कुणी त्याच्या वाईट दिवसात मदत केलेली नसते. त्यामुळे अश्या व्यवसाईक माणसाला तुम्ही भेटलात तर तो तुम्हाला पारखल्याशिवाय जवळ घेत नाही. किंबहुना तुमच्यातला खरेखोटेपणा त्याला लगेच कळतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात उतरतांना आपण प्रामाणिक आहोत का, हे तपासून घ्या. आणि जर तुम्ही प्रामाणिक असलात तर तुम्हाला मदत करण्यावाचून कुणीही कुणापासूनही रोखू शकत नाही. खरंतर उद्योग व्यवसाय करण्याची ओढ असणार्यांनी इतर व्यवसायीकांनाही भेटलं पाहिजे. बोललं पाहिजे. आपली कौशल्य, आपले अनुभव त्यांच्याशी शेअर केले पाहिजेत. योग्य वेळी त्यांची मदत घेतली पाहिजे.
घेता घेता एक दिवस...
कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे ' देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे '. याचा अर्थ असा आहे की, देणार्याकडून ती दातृत्वाची वृत्ती घ्यावी. आपल्या वाईट दिवसात कुणीतरी आपल्याला मदत केली आहे. तशीच मदत जो कुणी आता गरजेत असेल त्याला आपण करावी, असे अपेक्षीत आहे.
आपण आपल्या गरजेला दुसर्याकडून घेतलेली मदत दिलेल्या मुदतीत परत करा. त्याचे वायदे वाढवू नका, चुकवू तर अजिबात नका. अनेक जण मदत मागताना आणि ती परत करतांना वेगवेगळे असतात. असा व्यवहार एकदोन वेळा फायद्याचा ठरु शकतो पण पैशाच्या व्यवहारातच माणसाचा खरेखोटेपणा कसाला लागत असतो. तेंव्हा देण्या- घेण्यात जेवढी सहजता ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात कुणीही कुणावर उपकार करीत नसतो. फक्त आपला स्वार्थ जेवढा विधायक ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. मराठीत एक म्हण आहे की, 'प्रयत्नांती परमेश्वर' खरतर ती 'प्रयत्नार्थी परमेश्वर' अशी असायला पाहिजे. जो माणूस प्रयत्न करतो, सुरवात करतो त्याला परमेश्वर पदोपदी भेटतो. 'असेल माझा हरी...तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून आपलं काम आपण आपले प्रयत्न सोडता कामा नये.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
Thursday, March 25, 2010
...भांडी घासा आमची!
मुंबई कुणाची? असा प्रश्न विचारला की मराठी माणूस म्हणतो, ती माझी आहे कारण ती महाराष्ट्रात आहे. गुजराती-मारवाडी म्हणतो ती माझी आहे कारण मुंबईचा सगळा व्यापार उदीम माझ्याच हातात आहे. उत्तर प्रदेशी आणि दक्षीण भारतीय म्हणतो ती माझी आहे कारण मुंबईत सगळयात जास्त कष्ट आम्ही करतो.
भौगोलिक रचनेमुळ्ये मुंबई एकाच वेळी महाराष्ट्राची आणि देशाचीही असू शकते. यात दुमत नाही. पण मुंबईची अवस्था सध्या राधेसारखी झाली आहे. लौकिकार्थाने ती अनयची बायको आहे पण व्यवहारात ती कृष्णाच्या गळयात आहे. कृष्णाची सखी होऊन ती वावरते. कदाचीत त्यामुळेच तिची पुजा होत असावी. या नात्यात जसं कोण अनय? तसं मुंबईच्या बाबतीत कोण मराठी माणूस?
लौकिकार्थाने मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पण तिला देशाची आर्थीक राजधानी म्हणूनही ओळखतात. या सगळ्या वादात आपण न शिरता भूमिपूत्र, वारस या नात्याने मुंबई ही मराठी माणसाची आहे असे मानले. तर प्रश्न उरतो मराठी म्हणजे तरी कोण? सत्तेत असलेले मराठी म्हणतात, मुंबई देशाची आहे. नसलेले म्हणतात मुंबई मराठी माणसाची आहे. म्हणजे मराठी नावाची दोन किंवा त्याहुनही अधिक माणसं असली पाहिजेत. सत्तेत जश्या मराठी माणसाच्या दोन जाती आहेत. तश्या त्या समाजातही आहेत. दोघांचं उत्पन्न, राहणीमान वेगळं. सारखे आहेत ते यांचे देव आणि टिव्हीवरचे कार्यक्रम. बाकी यांची अनेक वर्ष वर्ष गाठभेट नाही.
मुंबई विकणे आहे
भौगोलिक अर्थाने विचार केला तर मुंबईची कितीशी जमिन आज मराठी माणसाच्या ताब्यात आहे? इतिहासाचा विचार केला तर कोणता इतिहास त्याने जतन करुन ठेवला आहे, त्याचा अभिमान बाळगला आहे. विकासाशी निगडीत बोलायचं तर मुंबईच्या जडणघडणीत, वाढीत मराठी माणसांचा थेट किती हात आहे, आणि त्याचे पुरावे काय आहेत? मुंबईच्या सांस्कृतिक अंगानं विचार केला तर आज मनोरंजन, साहित्य, खाद्य, पोशाख या गोष्टींवर कितीसा मराठी प्रभाव आहे? परंपरेच्या अंगाने विचार केला तर मराठी माणसाच्या कोणत्या परंपरा आज तग धरुन आहेत? समाजकारणाच्या आधारे विचार केला तर प्रश्नं पडतो की उत्सवाच्या पलिकडे मराठी माणसांचं सामाजीक जीवन मुंबईत शिल्लक आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं अर्थकारण. यात मराठी माणसाचा किती सहभाग आहे. याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुर्तास मुंबईला कुणी डावावर लावली किंवा स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर मुंबईला कुणी विकायला काढली तर तिला विकत घ्यायची आज मराठी माणसाची लायकी आहे का ? राजकारण, सिनेमा, स्टॉक मार्केट, मॉल्स, उद्योग या अर्थकारणाला दिशा देणार्या गोष्टींवर मराठी माणसाचे निर्वीवाद वर्चस्व किती? याचा पडताळा घेतला तर असं लक्षात येतं की, मुंबई याआधी कितीतरी वर्ष ती परप्रांतीयाना मराठी माणसाने विकली आहे. ती विकल्याची पावती त्याच्याकडे नाही एवढंच.
भांडी घासायची हौस
पुर्वी गुजराती-मारवाडी मराठी माणसाला थेट म्हणायचे की, 'मुंबई तुमची...भांडी घासा आमची'. आजही आजूबाजूला पाहिलंत तर पटेल की वस्तुस्थीती आजूनही बदललेली नाही. मराठी चित्रपटात सुपरस्टार ठरलेले हिंदित जाऊन घरगडी बनतात. आजही कोणत्याही हिंदी सिरिअल मध्ये सखुबाईची भाषा घाटी-मराठीच असते. मराठी माणसाला भांडी घासायची एवढी हौस का हे कळत नाही. कोणत्याही उत्तरप्रदेशीय माणसाच्या बायका-लेकी-सुना दुसर्याची भांडी घासायला जात नाहीत, हे बाणेदार मराठी माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. आज कोणत्याही वस्त्तीत जा, अनेक मराठी माणसांच्या, दलितांच्या घरात तुम्हाला हेच चित्र प्रकर्शाने पहायला मिळेल की, आई-बहीणी चार घरची धुणी भांडी करताहेत. बाप उतरत्या वयातही वॉचमन किंवा इथे तिथे गावखात्यात मजूरी करतो आहे. आणि आपल्या बाळ्याला बाळं झाली तरी सगळ्यांचं पालनपोषण म्हातारे आईबापच करताहेत. अश्या थकलेल्या आईबापाची अजिबात चिंता न करता तरुण पोरं केसांना रंग लाऊन, कमरेवरुन खाली घसरणार्या जिनच्या पॅन्टस घालून आणि हातात, गळ्यात कचकडयाच्या माळा अडकवून उनाडक्या करताहेत.
मराठी माणसाठी ओळख
माझ्या माहितीतला एक गुजराती शेठ फक्त मराठी माणसानांच कामाला ठेवतो. त्याचा व्यापार कपडयाचा आहे. त्याचं म्हणनं हे की मराठी माणूस कामचुकार असला तरी, महत्त्वाकांक्षी नाही. त्याच्याकडे सकाळी दुकान उघडायची चावी दिली की तो तुमचा चमचा बनून राहतो. अधून मधून किंवा गरजेला ऍडव्हान्स दिला की तो तूमचा मांडलीक बनतो. तो पुढे जाऊन आपल्या बाजूला धंदा उघडेल याची कधीच भीती नसते. मराठी माणूस नोकरीत इमानदार, प्रामाणिक असतो. त्याची स्वप्न फार तोकडी असतात. पाळीव कुत्र्या-मांजराच्या खर्चातही एक मराठी कुटुंब सुखा-समाधानानं राहु शकतं.
आज मराठी माणसाला ओळखणं सोपं आहे. तो रस्त्यावर असला तर त्याच्या हातात दगड तरी असतो किंवा झेंडा तरी. वडापाव आणि एक बिसलेरीची बॉटल यावर तो दिवसभर घोषणा देऊ शकतो. तो कधीही कार्यकर्त्याच्याच वेशात वावरतो. ट्रेनमध्ये सेकंडक्लासच्या डब्यातच तो सापडतो. चकचकीत मॉलमध्ये विंडो शॉपीग करण्याशिवाय त्याला काही परवडत नाही. रात्री अकरानंतर भाजी खरेदी करायला त्याला आवडते. फळांमध्ये अजूनही तो आंबा, रामफळ, सफरचंदासारख्या फळांचा तो राग करतो. त्याचे चिकू, केळी आणि पेरुवर पुर्वीइतकेच प्रेम आहे. गगनचुंबी इमारतीकडे बघतांना तो अजूनही भांबावतो. शनीवार- रवीवारचा सिनेमा सोडाच त्याला इतरदिवशीही सिनेमा थियेटरमध्ये जाऊन बघणे जमत नाही. मच्छी मार्केटमध्ये आता त्याच्या आवडीच्या फक्त तिनच गोष्टी उरल्या आहेत त्या म्हणजे बोंबील, बांगडा आणि मांदेली.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
Thursday, March 18, 2010
एक होता मराठी माणूस
फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट. आट पाट नगर होते. त्या नगरीचे नाव होते मुबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होती. तिनही बाजूनं समुद्रानं कवेत घेतलंल्या या नगरीत पुर्वी कोळी, आगरी, पाचकळशी लोकांचं वास्तव्य असायचं. मुख्यत्वे मराठी नावाचा माणूस इथे रहात होता. ताडा-माडा-झाडांनी वेढलेल्या या नगरीत ती माणसं सुखा-समाधानानं रहात होती. शेती, मासेमारी हे त्यांचे पोटापाण्याचे व्यवसाय. पुढे इंग्रजाच्या काळात मुंबईतला व्यापार-उदीम वाढला. त्यासाठी कामगारांची, दुकानदारांची, छोटया-मोठया व्यावसायीकांची गरज भासायला लागली. त्यासाठी राज्यातील इतर भागातून, देशातल्या इतर राज्यातून माणसं मुंबईत स्थलांतरीत होऊ लागली. स्थाईक व्हायला लागली. कामगारांच्या, कष्टकरांच्या वस्त्या इथे वाढायला लागल्या. आणि मुंबईत माणसांची गर्दीच गर्दी व्हायला लागली.
पुर्वीचा मध्यमवर्गीय मराठी माणूस उभ्या-आडव्या चाळीत रहायचा. आपण आपली नोकरी करावी. सांभाळावी. रोज संध्याकाळी टीव्हीसमोर बसावे, रविवारी दुपारी जेवणावर मनसोक्त ताव मारावा आणि संध्याकाळी दादर नाहीतर गिरगाव चौपाटीवर बायको मुलांबरोबर फिरायला न्यावे. सणाला काहीतरी गोडधोड करावे, दिवाळीला फराळ, कुटंबातल्या प्रत्येकाला नवीन कपडे करावे, उत्साही लोकांनी शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतीक मंडळे चालवावीत, पोरांनी सुट्टीच्या दिवसात रस्त्यात मैदान मांडावे. वयोवृध्दानी राजकारण्यांना, राजकारणाला, श्रीमंताना बिनधास्त शिव्या द्याव्यात, बाया-बापडयांनी घर सांभाळावे, लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वानी छोटया-मोठया उत्सवात कायम मग्न असावे, हे त्याच्या आवडीचे छंद.
महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे
स्वातंत्र्यानंतर देशभर भाषीक राज्याच्या रचनेस केंद्राची मान्यता होती. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त असतांनाही आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असतांनाही ती महाराष्ट्राला द्यावी की न द्यावी या संभ्रमात दिल्लीतले नेते होते. त्या कटात महाराष्ट्रातल्या राजकारणारले काही पुढारीही सामिल होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असे त्यांना वाटत होते. पण लेखक-पत्रकार-कलावंत-विचारवंत आणि सर्वसामान्य माणसानी सरकारविरुध्द लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली. त्यात १०६ माणसांना आपले जीव गमवावे लागले. १ मे १९६० हा दिवस त्यामुळेच महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे म्हणूनही पाळला जातो.
परप्रांतीय नावाची भीती
पोटापाण्यासाठी परप्रांतातून मुंबईत आलेल्या दक्षीण भारतीय, उत्तरप्रदेशी, बिहारी, गुजराती, पंजाबी, मारवाडी यांनी पुढे पुढे मुंबईत आपले बस्तान बांधायला सुरुवात केली. हे लोक प्रामुख्याने व्यवसाय धंदा करायच्या हेतूनेच मुंबईत आले होते. सकाळच्या चहापासून रात्री झोपायच्या चादरींपर्यत प्रत्येक गोष्टींचा या माणसानी धंदा केला. मुंबईतून अमाप पैसा कमावला. मुंबईत आपली गडगंज संप्पती मिळवली, त्याच्या जोरावर सत्तेशी जवळीक साधली. काहीनी सत्ताही मिळवली. आणि आपल्याला हवे ते सुख प्राप्त करुन घेतले.
गिरणीच्या संपानंतर मुंबईत कोकणातला, देशावरचा गरीब मराठी माणूस देशोधडीला लागला. पोटापाण्यासाठी मिळेल ती नोकरी त्याने पत्करली पण वाढत चाललेल्या महागाईने तो खंगत चालला. आपल्या कुटूंबाची देखभाल करायची की आपल्या स्वप्नांची पुर्ती करायची या कैचीत तो कातरला गेला. गावाकडे निघून जावे तर गावाकडची जमीन विकलेली. ज्याची आहे त्याची कसायची सवयही गेलेली. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी त्याची अवस्था झाली होती. नोकरी नाही म्हणून मुलांना चांगले शिक्षण नाही. चांगले शिक्षण नाही म्हणून पुन्हा त्यांना चांगली नोकरी नाही अश्या दुष्टचक्रात तो अडकून गेला. व्यवसाय करायचा तर पैसा नाही आणि रस्त्यावर धंदा करायचीही त्याला लाज वाटायची.
उत्तर भारतातून आलेल्या भय्या नावाच्या माणसाला तो खुप घाबरत असे. कारण तो माणूस कसाही, कुठेही, कोणत्याही परस्थीतीत तग धरुन रहायचा. त्याने आपली रोजी-रोटी छिनून घेतली असे मराठी माणसाला वाटायचे. तो अर्ध्या पगारात काम करतो. तो वाटेल तो धंदा करतो याचा त्याला राग यायचा. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची असे म्हणता म्हणता मुंबईत मराठी माणसांची संख्या शंभरात पंचवीसच्या खाली आणि भय्यांची शंभरात पन्नासच्या वर कधी गेली हे त्याला समजलंच नाही. मुंबईत अनधिकृत झोपडया वाढल्या. त्याही झोपडया पुढे अधिकृत झाल्या. मुंबईत त्या भय्यांचे इलाखे तयार झाले. पुढे पुढे ते इथले मतदार म्हणूनच हक्कदारही झाले. त्यातलेच काही नगरसेवक आणि आमदारही झाले. भविष्यात कदाचीत त्यातलाच एक महाराष्ट्राचा मुख्यामंत्रीही बनू शकतो. जादू घडावी अश्या गोष्टी त्याच्या नजरेसमोरच घडत होत्या.
चलो मुंबई(बाहेर)
पुढे पुढे मराठी माणूस विरार, बदलापूर, नवी मुंबईच्या पुढे आपला संसार थाटू लागला. तो प्रदुषणाचे, गर्दीचे कारण पुढे करी पण आपली मुंबईत रहायची लायकी नाही हे त्याला कळून चुकले होते. मराठी माणसाला आपल्या मृत्युची चाहुल लागेपर्यंत खुप उशीर झाला होता. पुर्वीपासूनच मरीन लाइन्स, मलबार हिल, पाली हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, जुहु, याकडे मराठी माणूस किंवा त्याच्या, बायका लेकी, सुना फक्त तिथे राहणार्या गुजराती, मारवाडी शेठ लोकांची भांडी घासायला जायच्या, तिथे राहण्याचं स्वप्न त्यानं स्वप्नातही पहीलं नाही. पण पुढे मुंबईतल्या कोणत्याही भागात उभ्या राहणार्या गगनचुंबी इमारतीत मराठी आडनावाचा माणूस औषधालाही सापडेनासा झाला. पण तेंव्हा खूप उशीर झालेला होता.
शेवटी शेवटी मराठी माणूस साध्या साध्या गोष्टींवरुन चिडायचा. संप करायचा. कुणाच्याही मुस्कटात मारायचा, शिव्या द्यायचा, दगडफेक, जाळपोळ करायचा. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. आपण फक्त घोषणेपुरताच उरलो आहोत अशी त्याची भावना झाली. तरीही मराठी मराठी म्हणून कुणी त्याला गोंजारलं तर त्याचा उर भरुन यायचा. मराठीच्या, मुंबईच्या अभिमानानं त्याची छाती भरुन यायची. काहीतरी केलं पाहीजे असं त्याला वाटायचं. पण पुन्हा सकाळ संध्याकाळच्या रेल्वेच्या गर्दीत आणि राईच्या तेलाच्या वासात त्याचा अभिमान बुजून जायचा.
असा होता मराठी माणूस. मनानं सात्विक, निर्मळ आणि भावनीकही होता. शेवटपर्यंत 'मुंबई माझी', 'मुंबई माझी' असा आक्रोश उर फुटेस्तोवर करीत राहीला. खाण्यापासून, सणांपर्यंत त्याच्या काही परंपरा होत्या. त्याची म्हणून एक संस्कृती होती. त्याचा म्हणून काही इतिहास होता, पण त्याची एक साधी खूणही आता मुंबईत सापडत नाही. शेवटी मेहनत आणि कष्ट केले नाहीत म्हणून मराठी माणसाचा झिजून झिजून मृत्यू झाला. त्याच्या आत्म्यास शांती लाभो!
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
Sunday, February 7, 2010
मराठी माणसाचे उद्योग आणि धंदे
पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१०
आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाच्या काही गरजा असतात. काही दैनंदीन, निरंतर असतात काही कधीतरी किंवा अचानक निर्माण होणार्या असतात. त्यासाठी प्रत्येकालाच कुणावर तरी अवलंबून रहावंच लागतं. अश्या स्वरुपाच्या निरंतर किंवा आकस्मिक सेवा-सुविधा पुरवणं हा देखील उद्योग-धंद्याचाच एक भाग असतो. यासाठी काय लागतं? तर एखादं कौशल्य किंवा ह्या सेवा-सुवीधा पुरवण्याची तयारी, सहज संपर्काचं एखादं माध्यम किंवा आवश्यक असेल तिथे एखादी जागा. ही ज्याची तयारी आहे तो कोणताही छोटा मोठा उद्योग-धंदा करु शकतो. अश्या उद्योग-धंद्याची समाजाला कायम गरज असते. गरज आणि ती गरज पुरवणार्या व्यक्तीची गाठभेट जिथं होते, तिथुन उद्योग-धंदा सुरु होतो.
भय्यागीरी
उत्तरेतला भय्या हा मातीच्या गोळ्यासारखा असतो. तो त्याचे तुंम्हाला पाहिजे तसे आकार बदलतो, पण त्याचा मातीचा गूण कधीच सोडत नाही. भय्या हा पृथ्वीतलावरचा सगळ्यात लवचीक, संयमी प्राणी आहे. तो रिक्षा-टॅक्सीत झोपतो, दिवसभर काम करतो, सार्वजनीक संडासात किंवा मोकळ्या जागेत सगळे विधी आटोपतो. वेळेला केळे किंवा चुरमुरे, वडापाव खातो, छप्पर असेल तर डाळ-भात स्वतः शिजवून खातो, एका गालावर मारलीत तर फक्त त्याजागी चोळतो. प्रतिकार करत नाही, सटकण्याच्या प्रयत्नात असतो. तो आपली चुक मान्य करतो, त्याला आंघोळीची, घामाची, कपडयांची पर्वा नसते. तो दुध तर देतोच पण प्रसंगी भटजीही होतो, मच्छी विकतो, भाजी विकतो, चणे-शेंगदाणे विकतो, पाणिपुरी बनवतो, पानपटटी चालवतो, वडापाव बनवतो, हार-गजरे विकतो, तो कपडे विकतो, धुतो, त्या कपडयाना इस्त्री करतो, पिठाची गिरण चालवतो, केस कापतो, सुतार बनतो, मेडीकल दुकान चालवतो, तो वकील बनतो. भय्या सगळ्या रुपात दिसतो. कारण तो फक्त काम आणि काम करतो. त्याला कामाची लाज वाटत नाही. त्याला लोक काय म्हणतील याची शरम वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रदेश सोडतांना प्रत्येक भय्या हा गरीब असतो. दरीद्री असतो. तो फार शिकलेलाही नसतो.
मराठी माणसाचे उद्योग
मराठी माणसाचे उद्योगाच्या संदर्भात काही समज आहेत. म्हणजे असे की, मराठी माणूस हा धंदेवाईक नाही (आणि जो धंदेवाईक नसतो तो सालस, सुसंस्कृत असतो!) व्यवसाय करणे म्हणजे लबाडी करणे, ग्राहकांना लूटणे, ते त्याच्या संस्कारात बसत नाही (फक्त त्याला लूटून घ्यायला आवडते) जे यशस्वी झालेली मराठी व्यावसायीक आहेत ते इतरांना घाबरवत राहतात. किंवा जे अयशस्वी आहेत ते धंदा कसा करावा याचे शिक्षण देत राहतात. त्यातले काही मराठी मराठी करत संघटना बांधतात राहतात (हा धंदा चांगला आहे!) बाकीचे फर्डे वक्ते बनतात. सचोटी, प्रामाणिकपणा याविषयी अखंड बडबडत राहतात (ज्याचा कदाचित उद्योग-धंद्याशी संबध नसावा). स्टॉक मार्केटला शिव्या देणे, पैशावर (तोंडी) थुंकणे, धंद्यावर लाथ मारणे हे काहींचे आवडते उद्योग. आपल्या व्यवसायाची इतरत्र कुठेही शाखा न खोलणे आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणे, चादर पाहुन हात-पाय पसरणे (खरंतर हात-पाय पाहुन चादर पसरणे किंवा थेट चादरीची घडी घालणे इ.) त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी माणसाच्या उद्योगाची भरारी इतरांच्या तुलनेत काही फुटापर्यंतच राहते.
मराठी माणसाचे धंदे
मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भुमीपुत्र, त्यामुळे पहिला मान त्याचा. तो मान चुकला की त्याचा पारा चढतो. हे पण समजू शकते, पण त्याचा मान चुकवला कुणी? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जबाबदारीची आणि कष्टाची वेळ सोडा चाहुल जरी लागली तरी तो मागे हटतो. खरंतर मराठी माणसानं ठरवलं आणि बेफाम काम करायची हिंम्मत दाखवली तर ब्रम्हदेवाचा बापही त्याला तसे करण्यासाठी रोखू शकणार नाही. पण मराठी माणूस असे करीत नाही. मराठी माणूस सणाला कर्ज काढतो, वर्षाला सत्यनारायण घालतो, श्रावण तर पाळतोच पण हल्ली मार्गशिर्षातले गूरुवारही घालतो, गणपती- शिमग्याला गावाला जातो, संध्याकाळी टिव्हीवरच्या टुकार सिरिअल्स पहातो, आणि रविवारची न चुकता कोंबडी सोलत बसलेला असतो. त्यावेळी भय्या, गुजराती, आणि मारवाडी, आणि दक्षिण भारतीय दिवसाचे बारा-पंधरा तास राबत असतो.
गणेशोत्सव, होळी(धुळवड), भंडारा, देव-धर्म आणि अस्मितेशी संबधीत जयंत्या-पुण्यतिथ्या, माघी गणेशोत्सव, लग्नकार्य, दुर्गोत्सव (म्हणजे थोडक्यात गरबा) या धंद्यात मराठी माणूस जेवढा ऍक्टीव्ह असतो तेवढा तो इतरवेळी कधीच नसतो. नवतरुण मंडळे स्थापणे, अध्यक्ष-उपाध्यक्ष बनणे, वर्गणी काढणे हा सगळ्यात आवडता धंदा या सगळ्यावर नजर टाकली तर लक्षात येतं की इथं कष्टापेक्षा मिरवणेच जास्त असतं.
धंद्याची गोष्ट
आपल्याला हे माहीत नाही का? की आज मुंबईत कोणताही धंदा करायला केवळ तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा कौशल्य असून चालत नाही, किंवा तुम्ही फक्त प्राणाणिक असूनसुध्द्दा चालत नाही. धंद्याला नुसती सचोटी किंवा भांडवल पुरत नाही. आहे त्या परस्थीतीशी जुळवून घेऊन पुढे व्हावे लागते. लवचिकता अंगात भिनवावी लागते. आज धंद्यासाठी कोणताही परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कर्मचार्याला पैसे चारावेच लागतात, त्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, असा सार्वत्रीक अनुभव आहे. रस्त्यावर उद्योग-धंदा करणार्याकडून पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी पैसे खातात हे दिसतं. बाकी न दिसणार्या गोष्टीही बर्याच आहेत. प्रोटेक्शन मनी हा काय प्रकार आहे ते स्थानीक नगरसेवकाना विचारुन घ्या. सरकारी / कागदी यंत्रणेजवळ फक्त मराठीत बोललात म्हणून तुमचे काम होईल असे समजू नका (कदाचित त्यामुळे काम न होण्याचीच शक्यता जास्त). त्या व्यवस्थेला पाच-पन्नास रुपयांचे इंधन कायम पुरवीत जा. (इथे या वाक्याचा अर्थ लाच देणे असा वाटल्यास, तो तसाच समजावा!) जे आपण आज बदलू शकत नाही, त्याचा विचारही करणं सोडा. मला एक १९ वर्षांचा बबलू नावाचा तरुण माहीत आहे. जो उत्तरेतला भय्या आहे. ज्याने आत्तापर्यंत कोलकत्ता, बँगलोर, आणि मुंबई या देशातल्या तीन मोठया शहरात जाऊन वेगवेगळे धंदे केले आहेत. रस्त्यावर कुठेही धंदा मांडायला त्याला लाज आता भीतीही वाटत नाही. त्याला मुंबईतले एकूण सहा होलसेल बिझनेस माहीत आहेत. (तुम्हाला माहीती आहेत?)
मराठी माणसाने आपल्या मराठी बाण्याच्या आणि ताठ कण्याच्या गोष्टी बाजूला ठेऊन फक्त काम करायचे ठरवले तर आज जी त्याची भिकार अवस्था होत चालली आहे ती थांबण्यास मदत होईल. आता तरी कुणी अवतार घेण्याची त्याने वाट बघू नये. सरळ उद्योग-धंद्याला लागावे. नाहीतर मराठी माणसाला धंद्याला लागायला वेळ लागणार नाही !
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com